Saturday, August 7, 2021

बिसलरी पन्नास श्रीधर तिळवे नाईक 

पाणी पन्नास वर्षाचे झाले 

कृत्रिम शुद्ध पाणी 

मिनरल झरे विकत घेतले गेले 
कार्बोनेट केले गेले 
लोकांना वाटले किती निरुपद्रवी निरोद्योग आहे हा 

पाणी कोण विकत घेतं का ?
तहान शमली कि 
पैसे दिले तरी कोणी पाणी पिणार नाही 

स्पा मावळत गेले 
आणि उगवले बॉटल्ड डिस्ट्रिब्युशन 

तहान डिस्ट्रिब्युट करायची गरज न्हवती 
नाहीतर तीही डिस्ट्रिब्युट केली गेली असती 
मात्र तहानेच्या जाहिराती केल्या गेल्या 

पाणव्याकूळ नट नट्या आणि बॉटल्स 

डोळ्यात कमर्शियल तहान उतरवली गेली 
आणि अशुद्ध पाण्याचे भय 
व मिनरल वॉटरचे फायदे 

घाबरणारे अधिक घाबरले 
शेवटी रोग थांबवणारे पाणी 
आणि रोग देणारे पाणीच  

बघता बघता मिनरल जनरेशन अवतरली 
पस्तिशीत पोहचली 

आता माझ्या देहात 
कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बिस्लरललेले 
आणि झरे आतले 
आटलेले

मी कोरडा पन्नाशीत 
आणि समोर बिसलरी 
सेलिब्रेटिंग फिफ्टी इयर्स ऑफ ट्रस्ट 

मला रिसायकल करत

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून)


 नीरज चोप्रासाठी श्रीधर तिळवे नाईक 


एक भाला पार होतोय 


अन्कम्फर्टेबल व्यवस्थेच्या मढ्यावरून 


एक भाला पार होतोय 


स्पर्शाचीही ऍलर्जी असलेल्या ऍसिडिक झोनमधून 


एक भाला पार होतोय


त्या खांद्यातून जो जमीन पेलून थकला 

पण ज्याने आभाळ पेलले 

एखाद्या पिलोसारखं 


एक भाला पार होतोय 


निसर्गाचा एन्ड करून त्याला प्रेत बनवायला निघालेल्या आर्टिफिशियल फेकंदाजीवरून 


एक भाला पार होतोय

झोपेत क्रायसिसचे ड्रम वाजवणाऱ्या ऑर्केस्ट्रावरून 


एक भाला पार होतोय 

स्वतःच्या मांसावर हृदयाला  टॅटू बनवत 

रक्ताच्या उसळीला देशाची सळसळ बनवत 


एक भाला पार होतोय 

टॉन्टिंग ऐकणाऱ्या कानांना सस्पेंड करत 


एक भाला पार होतोय 

टॉर्चर करणाऱ्या अनऍथलेटिकल रोड्सना अनप्रेडिक्टेबल मसल्स दाखवत 


एक भाला पार होतोय 

कनेक्टीव्ह टिश्यूजना महत्वाकांक्षेला टाचत फुल वेगात 


एक भाला पार होतोय 

अनाटॉमी सांभाळत वर्किंग हॅंड्सना गरुड दाखवत 


एक भाला पार होतोय 

डमी इमोशन्स साईडलाईन करत ओरिजनल आवेगात 


शरीर खवळलेलं दिसत नाही 

फक्त वळलेलं दिसतंय 

समतोलाच्या ठाय पायात 

वळसे घेत 


स्वतःच्या जीवावर स्वतःला उत्क्रांत करत 


एक भाला 

त्या क्षणात 

अचूक 

काळ गिळत 

पारंपरिक घड्याळे मोडत 

सुवर्णात 


मातीतून 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या फाईल मधून )


फोन विकताना श्रीधर तिळवे नाईक 


फोन विकायचा नाही 

ज्याच्याकडून आला त्याला परत करायचा 

हा संन्यासी फण्डा पाळायचा 

तर देणाऱ्याने 

घ्यायला नकार दिलेला 


मग तुझ्या संलग्न हातांनी मागितला खरेदीसाठी 

मग मी हो म्हणालो ह्या करोना काळाची मजबुरी म्हणून 

तर तू म्हणतीयेस 

छान आहे एकदम कुल 

टचपॅड एकदम कुल 

डिझाईन एकदम कुल 


मी फोन करतोय व्हॉइस क्वालिटी तुला कळावी तर 

अचानक समुद्र नासावा आणि नावाडी वासाने मरून जावा 

तशी तू म्हणतीयेस 

व्हॉइस कुल 

पण परवडेबल नाही बाप ओरडेल माझा 


स्वतःचे पैसे आणि बाप ओरडेल ?


मी फोन विकण्याचे टास्क दुमडून ठेवू का ?

मी संन्यासी म्हणून तुला फोन फुकट द्यावा का ?


तुझी मुंडी नकारात्मक मॅनेजमेंटमध्ये 


डिझाईन कुल आहे ह्याचे 


काळजात लोखंडाची खाण 

काळजाबाहेरचे सोनं पंचप्राण 


मी ओपिनियन हलवत नाही 

समग्र माणूस हलवतो 

किंवा आसपास समा हेलावतो 


तुझ्या नजरेत डोळ्यांची भेळ झालेली 

स्वतःच्या सेंटीमेंट्सचे डिटेक्शन 


सर , माझ्या आऊटडेटेड मायक्रोमॅक्सच्या  कि पॅडपेक्षा ह्याचे एकदम स्लिक 

अक्षरं किस घेत शब्द पाडतात फ्लुएंटली 

माझा डब्बा वाटतोय 

नोकिया का बंद पडला होता सर ?


तुला ओपिनियन बनवता येत नाहीये कि 

स्ट्रक्चरल फॅक्चर आहे ब्रेन कल्चरमध्ये ?


तू ओपिनियन मागवतीयेस 

मॉडेल व्हाटसप करत 

मी हालचाली पहात हसतोय 


नाईस बोटं 

पण टेरिबल नखं 

कि लिपस्टिकचा चॉईस हॉरिबल ?


फोनवर मैत्रीण तुझा टेरिबल आहे नवा घे 

एव्हढ्या स्वस्तात कोण देणार 

संन्यासी आहे फायदा घे 


पिक्चर क्वालिटी कशी आहे सर ?


मग माझेच फोटो काढत 

क्वालिटी चेक 


वाळवंटाच्या रिलेशनमध्ये फूल 

सर तुमच्या चेहऱ्यावर इतकं वाळवंट का ?

आणि किती भाजले गेलाय 

आणि कुठं कुठं 


मी इयरफोन ब्रेक झाल्यासारखा 


ओपिनियन व्हाटसप होतायत 


ओपिनियन बार टेंडरसारखे दारू वाटत 

ओपिनियन कूल प्रोटेस्टस 

ओपिनियन अधाशता ताशासारख्या वाजवत 

ओपिनियन महागड्या वस्त्रासारखे माजत गाजत 


मी फक्त हसतोय 


सर आई म्हणतीये 

संन्याश्याकडून फोन घेतला 

कि लग्न होत नाही 

सॉरी 


मी अनलिमिटेड हसतोय 

कि पॅड मधून 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या फाईल मधून )

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, May 25, 2021

माझं समस्त ब्रह्मांडावर प्रेम आहे 

त्यात तू ही येतेस 

विशेष प्रेम माझ्यात अस्तित्वात नाही 



मी आहे समग्र 

तूला हवं आहे अग्र 

पुनरुत्पादनासाठी 


तुला नीना गुप्ता व्हायचं आहे 

आणि मी व्हिव्हियन रिचर्ड्स व्हावं अशी तुझी इच्छा आहे 


इच्छा चुकीची नाही  

शेवटी मूळ कुणाचे ठेवायचे 

हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बाईला असतो 

पण मूल फक्त हवेवर सांभाळणार आहेस का ?



मी मूलांना जन्म दिला नाही 

कारण संसार 

मूलांच्यापासून सुरु होतो 

एकदा मूळ सुरु झालं कि 

झाडं आपोआप तयार होतात 

आणि जंगलही 


मला मोक्षाखेरीज काहीच नको होतं 

आणि मुमुक्षुला 

झाड आणि जंगल 

दोन्ही वगळावी लागतात 

संसार वगळावा लागतो 


कंडोमने मूल होत नाही म्हणून 

संसार सुरु होत नाही 

म्हणून मी सेक्स एन्जॉय केला 

पण पुढं कळलं 

सेक्स ही सर्वात मोठी तृष्णा आहे 

आणि सेक्समधून जोवर मोकळा होत नाही 

तोवर मी मुक्त होणार नाही 


मी मग कामावर फोकस करून 

 कामातून मुक्त झालो 


तुला आता असं वाटतंय कि 

मी फक्त मूल द्यावं 

आणि निघून जावं 


मूल म्हणजे काय पार्टटाइम कनेक्टिव्हीटी नसते 

बाप ऑपरेट होत राहतो सूक्ष्मपणे 

म्हणूनच बुद्ध यशोधरेकडे येतो 

आणि राहूलला घेऊन जातो 



सेक्स न करता मूल होऊ शकतं 

पण त्याचा परिणाम नेमका काय 

ह्याविषयी मीही तुझ्याइतकीच अनभिज्ञ आहे 


आपल्याला अज्ञानापासून सुरवात करावी लागेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )


जागतिक व्हायला निघालो होतो 

घरामध्ये अगतिक झालो 


आकाश अवघे दिसत होते 

पिंजऱ्याचा नागरिक झालो 


जमीन सर्वांना मुक्त वाटली  

रस्त्यांसाठी मोताज झालो 


कुठेही कसाही बाउंस व्हायचो 

कोपऱ्यामधली केरसुणी झालो 


वाटले जग अव्हेलेबल झाले 

मर्यादित डिजिटल खिडकी झालो 


जो तो देतोय गाईडलाईन्स 

घेणारा पाईप लाईन झालो 


होईन मीही कधीतरी रिस्टोर 

ट्रांझीटरी ठहराव झालो 


जगण्यावर ताव मारायचा होता 

मी जगण्याचा आव झालो 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )



==========================================================

फॅमिली मॅन श्रीधर तिळवे नाईक 

आई गेलीये 

मेंदूतले कैक डाऊनलोड्स 

अनलोड करून 

माझ्या रिक्ततेचा एकमेव शृंगार समाप्त 

अंगार समाप्त  


करोना स्टॅटिस्टिकल फॅट  वाढवत 

प्रोटिन्सच्या आवाक्याबाहेर

ह्युमन इम्म्युनिटीचा अदमास घेत 

 

मी गोरेगावमधलं आकाश मोजत बसलोय 

आणि गोव्यात मडकईत 

ऍसिड 

थेम्ब न मोजता 

फॅक्ट्रीत काम करतांना 

भूषणच्या हातापायांवर 

आगीचा भाजलेला नकाशा नोंदवत 


कयामतींची मला सवय झालीये 

मी फक्त अलची डेन्सिटी मोजत 


आसपास त्रिशंकू झालेलं युग 

स्वतःचा मर्डर 

आत्महत्या म्हणून सादर करत 


तुझ्या सौंदर्याच्या हालचाली पहाव्या म्हणावं तर 

तुझा पाय नाचण्याआधीच जायबंदी 


नृत्य थांबलेल्या कालखंडाचं काय करावं 

अमर नसलेल्या माणसांनी ?



बुद्धाचा सार्वजनिक अस्त झालाय 

मोक्ष पर्सनल करण्याचं कारस्थान यशस्वी 


नैतिकतेने कुत्र्यासारखी शेपूट हलवत उभं रहावं

अशी राजकीय अपेक्षा सर्वत्र 


एक निराशा आहे चहुबाजूने चालून येणारी पब्लिकवर 

आणि पब्लिक जखमी जनावरासारखं 

मीडियाला हवे असलेले आवाज 

बाइट्स म्हणून देत 


माणुसकी गोठून पडलीये आसमंतात 

बर्फ इनव्हिजिबल ठेवत 


चांगुलपणाचे ल लागलेत 

आणि वाईट य फाकवून 


माणसं मरतायत 

पण मरताना आसक्त्या सोडत नाहीयेत 


युद्धसुद्धा स्मॉल एडिशन वाटावी अशी परिस्थिती 

मी निष्क्रिय व्हायरससारखा जीवनमुक्त 


आणि जो तो मी ऍक्टिव्ह व्हावं म्हणून प्रयत्नशील 



कदाचित सारीच युगं अशी होती दारू प्यालेली 

आणि कदाचित सारेच बुद्ध असे होते कवितेत खितपत पडलेले 


निवृत्तीवर ज्ञानेश बसलेले 

मुक्ती पहात 

चढलेले सोपान उतरावे लागतात जगात वावरताना शरीराला 


शरीराला ज्वलंत भूक लागते 

शरीर जेवण करते 

शरीराला पार्थिव व्याप्ती असते 

शरीर घर व्यापते 

शरीराला किकमय  संडास लागतो 

शरीर संडासला जाते 


साध्या सोप्या क्रिया 

दुबळ्या शरीराच्या 


माया चढत 

माया उतरत 

आडव्या तिडव्या 


बुद्धिबळाच्या सोंगट्या हलाव्यात तशा 


प्रसन्न हसत 



शरीर मळतं कागदासारखं 

पण फाटत नाही 


मळ इरेज करण्यासाठी अंघोळ 


डेटॉलच्या चेहऱ्यावर माझे अंग अंग 

तरंग तरंग जलतरंग 


नव्याने बसवलेल्या चायनीज टाईल्स 

चकाचक डेंजरस सुंदर 

वॉर्निंग देऊनही बसवल्या गेलेल्या 


पाणी त्वचेवर मायक्रो नद्या सोडत 

आणि मी अचानक 

चायनीज टाइल्सवरून घसरतोय 


घसरताना मला भान 

पकडायला काहीच नाही 

मी संडासातील बादलीवर पाठ टाकत कोसळतोय 


डाव्या हाताला अपघात झाला म्हणून उजव्या हातावर तोलत 

नको तेवढं ओझं 


बोटं मोडू नयेत म्हणून मनगट 


माझ्या डोक्याखाली बादली ठार 


तोलाचं इंद्रिय गमावलेल्या माणसाला खूप सावधान जगावं लागतं 


आंतरिक चैतन्य 

मानवी हालचालींना 

प्रत्येकवेळी सपोर्ट देईलच असं नाही 


अपघात झाला नाही अशी जागा कुठाय शरीरावर ?


नखंसुद्धा बोंबलली विषात 


मी कसाबसा उभा 

पेलत चैतन्याचा सुभा 



मग पुन्हा संडासाच्या भांड्यात 

संडास करतांना 


फर्स्ट ट्रॅजेडी 

सेकण्ड टाइम कॉमेडी 


आपण हसतोय 

आपल्यातले ढग हलवत 



तुझा डान्स करणारा डान्सर पाय गेलाय 

माझा कविता लिहिणारा लेखकाचा हात गेलाय 


काहीही न करण्याचं युग दाटलंय अपंग जीवनशैलीत 


मी फॅमिली मॅन पहात 

टाईमपास  


शून्यता 

नॉनस्क्रीनल 

शरीर नाही म्हणून वाचत 

वाचवत 

वावरत 


तू विचारतीयेस 

नेमकं काय झालं 


मी म्हणतोय 

शिव आंघोळ करतांना 

शिवामध्ये पडला 

आणि आता तुझ्याशी बोलतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )


रीओपन करणाऱ्यास  श्रीधर तिळवे नाईक 


घाबरू नकोस समुद्र रिओपन करायला 

घाबरू नकोस मोकळे आकाश पाहायला 

री ओढत सरकारची जगलास 

आता री ओढ नव्या सुरवातीची 


मृत्यू झाले 

नाही असं नाही 

पण मृत्यूच्या भींतीने 

कितीकाळ स्वतःला कुलूप घालणार ?


स्वतःचं अख्ख आयुष्य लॉकडाऊन करणार ?


पूर्णविराम न्हवता हा अन्गझायटीचा स्वल्पविराम होता 

संपूर्ण वीज न्हवे विजेचा झटका होता 


रक्ताचा बर्फ वितळव आईस्क्रीम बन 

नव्या संवादाची रिमझिम बन 


बंद खिडक्यांचा कोर्स सम्पव 

सडलेले जुनाट सारे सोर्स सम्पव 


हो ताजा फ्रेश भाज्यांसारखा 

पर्यावरणाचे होमवर्क पुन्हा शिकव 

भीतीचा चष्मा डोळ्यावरून उतरव 


काळजातली डायग्राम रियल कर 

किलोग्रॅम झालेले ओझे मिलिग्रॅम कर 


करोना आहे सैतान नाही 

सर्वव्यापक त्याचा अद्याप प्राण नाही 


आऊटब्रेकची शक्यता किती 

आणि तुझ्या इन्फेक्ट होण्याचे भय किती 


नीट बघ नको जाऊ गडबडून 

डिप्रेशनचे ताणही ताड ताडून 


नव्या मेडिटेशनची संधी म्हणून बघ 

स्वतःत वाकण्याची संधी म्हणून बघ 


ऍबिलिटीची क्वालिटी मेंटेन कर 

काही होणार नाही काळजी घे सस्टेन कर 


मेथड बदल क्लोजपची सवय लाव 

आणखी नव्या लयीची सवय लाव 


बघ बाग पुन्हा गजबजली 

फुलांची रहदारी पुन्हा नव्याने सजली 


क्रियेट ट्रॅक ! सेट ! गो फॉर न्यू बिगिनीग माय डियर ! विदाउट फीयर !

झाड  हेल्थ अँड हेल्दीनेस 

मुळातून 

मूळापासुन 


श्रीधर तिळवे नाईक 



फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


पडतांना  गेले बूड 

हातांवर पडला आसूड 

रक्तात रवंथ आहेत 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


लिहिता नाही येत मला 

टायपिंगने तोल सांभाळला 

अक्षरांची  दन्त आहेत 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


पुन्हा घोळ चायनीज 

मणक्यातली काढली वीज 

तरी रीच वाढवंत आहे 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


लेखणीचा हा अस्त का ?

संगणकच मस्त का ?

हा कशाकशाचा अंत  आहे 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

Saturday, May 22, 2021

३६ लोक इस्पितळांत गेले आणि परतले श्रीधर तिळवे नाईक 


३६ लोक इस्पितळांत गेले आणि परतले 


एक आमदार होता आणि स्वातंत्र्यसैनिक 

पासवर्ड हरवलेलं प्रेरणास्थान 

गांधींच्या चष्म्यातून हिटलरला पाहणारं 


एक होता हॉटेलवाला 

फिशहुक्ड आणि नेटदार 

तिळवे भोजनालयाच्या डिजिटल फ्लेम ग्लोबल करणारा 


एक नोकरी करणारा 

निहीलिस्टिक भगव्या शेपट्या हलवणारा 


एक करंटआमदाराचा माजी पी ए माजी सरपंच 

ऋतूस्क्रॅपर आणि हातांवर अँबिशनचे डोंगर मळणारा 


एक शॉपर 

पृथ्वीला तबला बनवून 

त्यावर ताल घोळवणारा 

आणि तरीही अमान्य असूनही 

आर्टिफिशियल जग विकणारा 


एक हाऊसवाईफ 

पदरात आत्महत्या , मृत्यू आणि वेडेपणा फरफरवणारी 


दुसरी हाऊसवाईफ 

अनलिमिटेड दुःख गवतात फेकून त्याला नाहीसं करणारी 

चावी शोधणारी 


एक टीव्हीधारक 

मॅचधारक कॅचधारक 


एक आणखी काही आणखी काही 


एका घराण्यातील तीन घरातील 


म्हणतायत 

कोव्हीड खरोखर झाला कि नाही झाला 

माहीत नाही 

पॉझिटिव्ह झालो खरे कि खोटे 

माहीत नाही 


गेलो आणि परतलो 

एव्हढंच मेडिकल सत्य 


बाकी बरे होईपर्यंत आम्हालाही 

आम्ही अफवा आहोत 

असा फील होता 


३६ माणसे पेशन्ट वास्तव म्हणून इस्पितळात गेली 

अफवा बनली 

आणि माणूस बनून घरात परतली 


श्रीधर तिळवे नाईक 

***


तौक्ते श्रीधर तिळवे नाईक 


 १

माणसांना लॉकडाऊन करता येईल 

वादळांचं काय ? निसर्गातल्या ट्रॉपिकल डिस्टरबन्सचं काय ?

आईकडून मुंबईत दाखल झालोय 

तर तुम्ही म्हणताय तौक्ते माणसांच्या काळजावर  घोंगावतंय 

आणि रॅपीडीटीसकट धडकणार  आहे 


आता उघड्या पडलेल्या छताकडं एकटक पाहू 

कि घरातल्या बादल्या नजरेनं मोजू ?

कि काळजाचा करोनाग्रस्त थयथयाट सहन करू ?



कुलपांनी समस्या सोडवल्या असत्या 

तर चाव्या तयार कराव्या लागल्या नसत्या 

लॉकडाऊन म्हणजे चाव्या तयार करण्यासाठी 

मागितलेला कालावधी 

पण तुम्ही तो ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत 

सगळ्यांची दलाली करण्यात वाया घालवला 


टाळूवरचा ऑक्सिजन खाणाऱ्यांचे काय करायचे ?



राजकारण नेहमीच सडलेल्या लोकांच्या हातात असत 

एखादा शिवाजी एखादा यशवंतराव अपवाद 

कारण लोकही शॉर्टकट हितसंबंधपूर्ती शोधत असतात 


लोकांना बेसिक नागरिक कोड पाळायचा नाहीये 

आणि तुम्हाला बेसिक प्रशासकीय ढाचा 


लोकसंख्या इतकीकी 

पूर्वी मेलेले लोक्स दिसायचे नाहीत 

आता मीडिया पाठलाग करत प्रेतं शोधतो 

आणि टीआरपीच्या घोळात आत्महत्या करतो 


गंगेतून वाहिलेली प्रेतं 

लोकशाहीची हत्या सांगतात 



लॉकडाऊन हळूहळू लोकडाऊन बनत चाललंय 


मला माहीत नाही 

ह्या शहरांत जे सतत राजकारणात रुतत 

मी कसा सर्वायव्ह होणार आहे ?


जेमतेम छप्पर 

आणि १२० मेल वेगाने येणारे वादळ 


दलदलीत वसवलं गेलेलं घर 

उखडलं गेलं नाही तरी खूप झालं 


रोज जगण्यासाठी प्रार्थना करणारे लोक 

अधिक काय मागणार ?



तुम्ही सोसायट्यांना माणूस नाकारण्याचा अधिकार दिला 

आणि त्यांनी मी केवळ संन्यासी आहे म्हणून नकार दिला 


गरिबांच्या वस्तीत राहिलो 

तर तुम्ही म्हणालात 

गरिबांनी कौलं नाहीत पत्रे टाकावेत 


आणि पत्रे दिले तेही फाटके 

त्यावर प्लास्टिक कव्हरं घालायला गेलो 

तुम्ही वादळाची वॉर्निंग दिली म्हणून 

तर लॉकडाऊनमुळं दुकानं बंद 

आणि कव्हरं गायब 


तुम्ही सांगा 

पत्र्यांच्या साहाय्यानं 

वादळ कसं परतवायचं ?


तुम्हाला अशा समस्या दिसत नसणारच 

आणि वादळाला तर ते समस्या आहे हेच माहीत नाही 



पाऊस पडतोय 

सारख्याच स्पीडनं 


पूर्वी सहा ते आठ बादल्या पुरायच्या 

आता जे मिळतंय ते लावत सुटलोय 


बादल्या फुल्ल 

भांडी फुल्ल 


एक ओतेतोवर दुसरं फुल्ल 


आणि तेच 

जे होईल असं वाटत होतं 


पत्रा फाटलाय 


पाऊस घरात पडतोय कि बाहेर ?


मी चिंब भिजलोय 


पुस्तकं चिंब भिजलेत 


प्रथमच भिंती पाण्यानं भिजलेत 


मी सर्व पुस्तकांना बाहेर हाकलून द्यावं का ?

किंवा प्रेतासारखं गंगेत विसर्जित ?


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधल्या आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीमधून )


एक आडमुठे कन्फ्युजन 

सत्तेच्या खुर्चीवर देश अडवून बसलेले 


सतत एक्स्ट्रीम गाईडलाईन्स 

सोप्या गाईडमध्ये सपाटपणे पाठ केलेल्या 


अंमलबाजवणी म्हातारी 

सतत भोपळ्यात बसून 

चलरे भोपळ्या टुणूक टुणूक 


कम्फर्टमुद्रा 

विस्कटत 

इतरांना उचकटत 


जणू प्राईममिनिस्टरशिप वॉज एन ऍक्सिडन्टल नाईटमेअर  


समुद्राचा पत्ता नाही शॉवर्स ऑन 


व्हायरसविषयी निदान ऐकलंय हे काय कमीय ?


सायकॉलॉजिकल करोना नावाचा रोग अस्तित्वात आलाय का 

आला असेल तर मनोविश्लेषक तो बरा कसा करणारयत 

कि सत्ता गेली कि आपोआप बरा होईल ?


श्रीधर तिळवे नाईक 


Thursday, April 8, 2021

 तू शासनसंस्था 

सत्ता प्राप्त झालेली 

आणि सत्ता हाताळण्यास उत्सुक 


तू भ्रष्टाचार 

मंत्री होण्यास उत्सुक 

संधीची वाट पाहणारा 


तू मेडिकल सायन्स नेट्वर्कतोय 


तुला विरोध करणारा लसीचा पक्ष स्थापन झालाय 

आणि आम्ही पॉलिटीकल नजरेनं पाहतोय 

आमच्या आयुष्याचा फैसला 

आम्हाला वगळून होणारा 


दोन सरकारं बॅडमिंटन खेळतायत 

एकमेकाला बॅड ठरवत 

आणि आम्ही त्यांचे फुल होतोय 


एक उदास करणारा नरराक्षसीपणा सुरूय 

आणि आम्हाला काहीच करता येत नाही 

जीव जात असतानाही 


आरोग्य इतकं पॉलिटिकल होईल असं कुठं वाटलं होतं ?


मॅडनेस ऑफ सिव्हिलायझेशन प्रत्येकाला जडलाय 

आणि आजारी पडणारा बेदखल 


मला कळत नाहीये 

एक नागरिक म्हणून काय करावं 


लस बनवणारी कम्पनी इंडियन 

तर तिचे सगळे प्रॉडक्शन खरेदी करून 

का लसीकरण केले गेले नाही 


परदेशी लसी पाठवण्यातला ग्लोबल माज 

अडाणचोटपणे कुणी फॉल्लो केला आणि का 


तू हे सर्व एन्जॉयच करत असशील 


पॉप्युलेशन जीवाची किंमत कमी करत जाते 

आणि माणसे एकमेकांच्या मरणाविषयी बधिर होतात 


मंगेश बनसोड तिकडे हॉस्पिटलात 

आणि इकडे मला क्वारंटाईन होण्याचा आदेश 


मी आता चौथ्यांदा पार होईन ऑर्फियससारखा 

तुझ्या मृत्युप्रदेशातून 

मागे न पाहता 

माझ्या हेल्थ नामक प्रेयसीला वाचवत 

क्वारंटाईनचे व्हायोलिन वाजवत 


मुद्दा माझ्या आत्मविश्वासाचा नाही 

कितीवेळा क्वारंटाईन हा आहे 


असं नाही कि मी थकलोय 

फक्त माझे पाय आता यमाळू होऊन होऊन कंटाळलेत 


मित्रा 

मी तुला जा म्हणणार नाही

कारण व्हायरस माणसाप्रमाणेच कुठेही जात नाहीत 

फक्त हा जो व्हरायटी सादर करण्याचा तुझा जो वेग आहे 

तो पॉलिटिक्सपेक्षा कमी ठेव 


नाहीतर हे नतद्रष्ट राजकारणी 

तुझ्या नावाने माणसे संपवतील 

आणि माणुसकीही 


व्हायरसा 

मानवांना जमले नाही 

तूच मानवतावादी हो 


श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )






Friday, March 26, 2021

फोटोत दिसणारा मेदूवडा श्रीधर तिळवे 


फोटोत दिसणारा प्रकाशमान मेदू वडा 

आत ओढून नाहीसा करणारा 

जणू आदीयोनीची पिवळी किंचाळी  गिळणारी 


कोट्यावधी वर्षांचा कोट्याधीश 

त्याला माहीत आहे मला त्याच्या चवीचा उन्माद आहे 

चुंबन चुंबकाचे  माझा वीकपॉइंट आहे 


अनेकांनी टाकलेले तंबू नाहीसे झालेत 

प्रकाशी राजवाड्यांचे  प्रकाशदगडही शिल्लक नाहीत जे गिळले गेले 

सूप बनवून टाकले गेलेले तारे परतले नाहीत 


प्रकाश वेफरसारखा वाकलाय ह्याबद्दल दुःख करावं 

कि तो वाकलेला पहायला मिळाला म्हणून उत्सव साजरा करावा ?


हॉकिंग्ज स्वप्नात आईन्स्टाईनला म्हणतायत 

फोटो घेतला गेलाय 

पण जो जवळ होता त्याचा नाही 

तर जो दूर आहे त्याचा त्याने कोऑपरेट केले 


आईन्स्टाईन म्हणतायत जवळ दूरही सापेक्ष आहे फोटो घेतांना पण कि काय 

मी जोकवर हसतोय 


आईन्स्टाईनचे स्थूल प्लॅन्क क्वान्टमचे सूक्ष्म 

शक्तीचे फॉर्मलेस शून्य आणि त्या अतित शिव 


जग म्हणजे लॉन्च केलेलं लोणचं 


बिअरचे गरम झालेले कॅन्स 


शीळ रोलप होतीये 


कार्ल स्कॅवझशिल्ड सरळसोट ताऱ्यांवर गणिती पाय देत 


वर्महोल साकारत आकारत निराकारत 


मॅजिक स्फिअरचं गेट उघडंच आहे 

या ! स्वागसे करेंगे सबका स्वागत 


शब्द माणसांना मॅनेज करतायत कि माणसे शब्दांना मॅनेज करतायत 

ह्या वादाचा हा दि एन्ड आहे 


जे एकीला दिसत नाही 

ते अनेकींचे फिल्डिंग लावून कमवावे 

ह्यालाच नेटवर्क फिल्डिंग म्हणतात 


प्रतिमांचे सिम्युलेशन 


टीमवर्क शेपूट हलवत समोर पाहतंय 

स्वतःशी इंटेन्स वफादार आणि पारदर्शक 


सगळे बोल्ट एकमेकांशी आवळले गेलेले पेप्सी पीत 


प्रकाशाचे गोड सोने 

आणि कृष्णीकेचे घुंघट 


हॉन्टिंग बूट एकत्र 


सर्वांना माहितीये 

ह्या मेदूवड्यापुढे मिश्याचा ताव निकामी 

जे खांदा मोडायला गेले त्यांचे हात पिरगळले गेले 

जे गरुडासारखे बसायला गेले ते गारुड होऊन खोलीत कोसळले 


फोटोत दिसणारा मेदुवडा तयार 


माझ्या स्वप्नात २०२०


२०२० चे नोबल मेदुवड्याच्या हस्ते रॉजर पेनरोज ऱ्हाइनहार्ड गेंझेल अँड्रिया गेज ह्यांना 

मेदुवडा भाषणात म्हणतोय मी खात्री देतो तुमच्या किमान अस्थी तरी मी आनंदाने आमच्या बंधूंच्या द्वारे 

आमच्या समूहात न्हेईंन 

वर्स्ट हार्ट उकाडा उकाळा करून प्या पेनरोज 


ब्युटी सिग्नलवर टपलेला रस्ता 

लपलेल्या फांदीवर तापलेल्या कावळ्याचा कवकवाट 


मी जागा होतोय तर 

फोटोत दिसणारा मेदुवडा विचारतोय 

श्रीधरराव तुम्ही एव्हढे चिल्लर 

इतके थिल्लर कसे 

मी मरण दाखवतोय 

आणि तुम्ही संशोधन खरं झालं म्हणून आनंदित 


माझ्याबरोबर कुत्रा नाही म्युनिसिपाल्टीने जप्त केलाय 

मी सध्या गाण्यात गात नाही लॉग इन होतोय 

कादाचित तुझ्यात लॉग इन झालोय ह्याचा हा आनंद असेल 


फोटोत दिसणारा मेदुवडा मला साईडला करून 

माझ्या साईडस पाहतोय 


मी त्याच्या मूव्हने हलतोय 

मोक्ष दिसेल तर काय 

मोक्ष न दिसेल तर काय 


डिसेक्शन चालूय 

आणि ते सहन करण्याशिवाय माझ्या हाती काही नाही 


माझ्यातलं जुनं तेल फ्लश होतंय 

मूळ शेंगदाणे पर्सनल हिस्टरीसकट उभे 

माझ्या वेगवेगळ्या जेवणांची जिओग्राफी जिओच्या स्क्रीनवर 

मी आश्चर्यमुग्ध किंचाळीचे बकोट धरलंय म्हणून ती गप्प आहे 


सेक्सनं सुरु झालेल्या आणि कवितेत समाप्त झालेल्या गोष्टी 

ज्ञच्या मांड्यांची अंतर्गृहे आणि माझा ढिसाळलेला प्लग 

भाऊंचे चौकशीचे स्क्रू ड्रायव्हर आणि माझी उसवलेली वेल्डींग्ज 

आईचे क्रोमोझोम्स आणि त्याच्या इच्छांच्या ढिगाचे ढग 


मावशीने केलेला सख्ख्या बहिणीचा खून आणि त्यातून उडणारे डास रक्त पिणारे 

वॉकिंग डिस्टन्सवरचे फ़ुटबाँल आणि डिकोड न झालेले गोल शाहू मैदानावरचे 

कलकत्त्याच्या मगमध्ये विरघळत गेलेला ग्रांट रोड आणि सेंटर नसलेले बॉम्बे सेंट्रल 

गोरेगावमध्ये स्टन झालेली कामवासना आणि तिचे मातृमुखी बनत गेलेले स्तन 


जे जे स्कुलच्या कँटिनमधली भिंतीचित्रे कोल्डड्रिंकमधले बुटके राक्षस 

कारगिलच्या सैनिकांची मुलगी बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणारी तिची सूर्यराखी हातावर 

सिग्रेटी फुंकणारे तरुण आणि धुरात कोंडल्या गेलेल्या बायका 

झुळकीने उडवलेले धुराळे आणि मातीचे पडलेले थारोळे 


पानावर फर्स्ट गिअर टाकून बसलेले दवबिंदू 

कॅफे कॉफीडे मधले अड्डे आणि निगोशिएशनमध्ये उडालेली क्लिव्हेजी तारांबळ 

उजूच्या दुःखांच्या सुऱ्या भारतच्या मृत्यूमध्ये आपण ओरडलेल्या धाकाचा धक्का 

भाऊंच्या मृत्यूनंतर संपूर्ण आयुष्यभर पसरलेली शांतता 


माझ्या आतलं काय काय काढलं जातंय गिळण्यासाठी 

मी देत -कर्णासारखा 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सीरीजमधील आजच्या कविता ह्या फाईलमधून )



Monday, January 11, 2021

आईस दिलेले वचन 

शिवांनी वचन दिलंय पार्वतीला 

कुठेही असलो तरी एका तपात 

परतेनच परतेन 

शिव परततोय किमान एकदा बारा वर्षात 


शंकराचार्यांनी वचन दिलंय आईला 

आयुष्यात पुन्हा एकदा घरी परतेन 

परततायत 


बसवेश्वर वचन देतायत आपल्या दोन्ही बायकांना 

बाहेर असलो तर किमान एकदा येईनच प्रत्येक महिन्यात 

येतायत 


मी तुला वचन देतोय 

भारतात कुठेही असलो तरी 

वर्षातून एकदा घरी येईन 

मग तू कोल्हापुरात अस कि गोव्यात 


आणि हा चैत्र गेला वैशाख गेला 

हां हां म्हणता कार्तिक आला 

आणि मी कोव्हिडच्या कैदेत 


आयुष्यात प्रथमच वचनभंग होतो कि काय 

ह्या प्रश्नात 


संन्याश्यांनी दिलेले  वचन प्राणावर बेतले तरी मोडूं नये 

अशी खूणगाठ आहे 


मी भेटतोय दरवर्षी 

कधी चैत्राच्या वसंताला तू पदरात कसं साठवलं आहेस ते पाहायला 

कधी वैशाखाच्या उन्हाचे रॅपर डोक्याला गुंडाळायला 

कधी आषाढाच्या  गुरु पोर्णिमेतला चंद्र तपासून परत द्यायला 


नवरात्रींचा शाक्त पाउलपंचनामा खिळून 

तुझ्या त्वचेच्या इंटेरियरवर 

दिवाळीचे कुबेर आणि यम 

तू शिवलेले पोशाख घालून उंबरठ्यावर 


"तू व्हावास म्हणून गणपतीला नवस केला 

तर गणेश विसर्जनाला तूच नसतोस

तो शंकर तुला कसा फळणार माहित नाही " 


मी उजू  किंवा भूषणने पाठवलेले फोटो पाहून 

गणेशोत्सव भिनवलेला आहे कित्येकदा डोळ्यात 


आपल्या मिटींगा कधी सफोकेट झाल्या नाहीत 

कि तुझ्या मिठीतल्या नद्या कधी माद्या झाल्या नाहीत 


शुद्ध स्वरांचा कॉन्टिनेन्टल ऍड्रेस कधीच बदलला नाही 

तुझ्या मातृमुखी कपाळावरचा 

तुझ्या भव्य कपाळाचा पर्चा  

मी उसना  घेतला  जीन्समधून 

बुद्धीचा संतापविलासही 

पण संतापातही सोर्स कधी हलला नाही 


गावानं शिव्याही घातल्या वर्षातून यायला लाज कशी वाटत नाही म्हणून 


मी चालत राहिलो शिवातून शक्तीतून बुद्धातून शून्यातून 


आत्महत्या करता येत नाही म्हणून संन्यासी झालेले शेतकरी 

मालकाने काढून टाकल्यावर दुसरं कुठलं काम जमत नाही म्हणून संन्यासी झालेले कामगार 

बायकोपीडित नवरे 

आणि क्वचित एखादा मोक्षजडित ध्यासाची तलवार बाळगणारा मोक्षकु 


पुढील जन्म कोणी पाहिला 

ह्याच जन्मी मोक्ष पाहिजे 


"शब्द संन्याश्याना वापरतात 

आणि भाषा संन्यास बिघडवते 

अशा काळात कशाला पाळायला हवं दिलेलं वचन"

मथुरेत एक संन्यासी विचारतोय 


"तुम लोगोमे ड्रेस नही होता क्या " 

एक जर्मन विचारतोय भक्तिवेदांतामधून 


आईवर प्रेम करणं वेगळं 

आणि आईत अडकून पडणे वेगळं 


तेरा लॉजिक समझमे नही आता श्रीधरभाई 

मुझे तो आप संन्यासी कम डॉनही ज्यादा लगते हो 


तू नकुलीश दर्शनाची प्रतिष्ठा आहेस 

आर्य तक्लीफ देंगे फितरत हैं उनकी अडियल रहना 


भाषा स्विंग होतीये 

मी ब्लॅक होलसारखा आ वासतोय 


शिव विचारतोय 

तू माझ्यासारखा कधी होणार 

मी म्हणतोय 

मी तूच आहेस 


शिव हसतोय 

म्हणतोय 

संन्याशाला पाण्यापासून पूल बनवावे लागतात 


ह्या पापड गल्लीत आरंभही खिंचंताण आहे 


हिसका फ्लोट होतोय 


क्षणांचे आरसे वितळतायत काळाच्या अणुभट्टीत 


हृदय हे कुलूप नाही चावी आहे 

हे कितीजणांना कळतं ?


माझे वचन हृदयापासून आलं होतं 

आणि आता वचनभंग होतोय कि काय 

अशी हृदयात शक्यता 


रक्ताला विरक्त करणारा संन्यास 

शंकरानी कधीच शिकवला नाही 

मात्र रक्ताला आसक्त बनवणारा संन्यासही 

त्यांनी कधी सांगितला नाही 


आसक्ती आणि विरक्ती 

ह्यांच्यादरम्यान जो रक्त समतोल ठेवतो 

तो संन्यासी 



आस्था आणि अंतर सारख्याच आनंदाने साजरा करणारी माझी हाडे 

मी लोकांच्या बर्थडेचे पाढे कधी पाठ केले नाहीत 

अगदी तुझाही जन्मदिवस कधी लक्ष्यात ठेवला नाही 

आणि स्वतःचाही अनेकदा विसरलो 


तू मला भेटतोस तोच माझा बर्थडे 

तू म्हणाली होतीस 

त्यावेळचा तुझा आवाज आनंदाला प्लेनसारखा उडवत होता 


आणि आणखी एकदा गणेशोत्सवाला पोहचलो तेव्हा 

गणपती म्हणजे आपले ज्ञान 

वर्षातून किमान एकदा विसर्जित केलं पाहिजे 


आणि कधी न्हवे ते दिवाळीला एकदा 

तू म्हणतीयेस 

बल्बच्या प्रकाशात दिवाळी कसली 

काही सण अंधारात शोभतात 

दिवाळी त्यापैकी एक 


वर्षातून एकदा माझ्या देहात तू शिल्पकाम करतेस 

वर्षातून एकदा माझ्या मुळांचा तू ऍड्रेस सांगतेस 

वर्षातून एकदा एका एपिसोडमध्ये तू संपूर्ण आयुष्य रिटेलीकास्ट करतीयेस 


ह्यावर्षी ह्यातील काही होणार आहे कि नाही ?

कि कोव्हीडच्या दारात वचन दम तोडणार आहे ?


मी पुन्हा पुन्हा क्वारंटाईन होतोय 

तुला पाहण्यासाठी 


माझ्या उगमाची तूच तर सुरवात 

बाहेर आणि आत 


तू बीग बॅंग होतियेस 

पुन्हापुन्हा 


श्रीधर तिळवे नाईक 

Sunday, January 10, 2021

 सूर्याचा लिंबू पिळतोय उन्ह 

क्षितिज मॉलजडित भिंतींच्यासारखं कॉस्मोपॉलिटिन 

श्वास आखडल्यापासून सगळंच आखडल्यासारखं वाटतंय 

पेरू वरुण धवन सारखा उभा कॉमिक मस्क्युलर 

कुठली सना खान त्याला दिसतीये माहित नाही 

तो स्वतःला कुली नम्बर एक समजत नाहीये 

बहुदा हा अधिकार त्यानं गोविंदासारख्या माणसांना दिलाय 

गरुडांचे पंख कोमेजलेले नाहीत

पण पेरू अजूनही त्यांचे रहिवासस्थान नाही  

पोपट अजूनही उत्तराधुनिक न झालेल्या फांदीवर हिरवेगार बसतायत 

पवार आणि त्यांची फॅमिली कोव्हीडमधून परतलीये 

मी खातोय महेश पवार ह्याने रिकमेण्ड केलेली अंडी आणि केळी 

व्हाईट अँड यलो कम्बाईन नजर खिळलेली माझ्या चेहऱ्यावर 

शेवटी खाणाऱ्याचा चेहरा खाल्ले जाणाऱ्यांना कसा दिसत असेल ?

पेरूची पानं वाऱ्यात पोहतायत 

हे पृथ्वीमाते ,

झाडांना कोव्हीड होत नाही म्हणून शुक्रिया 


श्रीधर तिळवे नाईक