Saturday, June 15, 2019

ऐटोबायोग्राफी  श्रीधर तिळवे नाईक

आईला मुलगा हवा होता
होत न्हवता
स्पर्म बनून घुसलो
आई म्हणते तू पोटात असतांना मला साधी लाथ मारली नाहीस

आजोबा म्हणाले तू शिवाचा अवतार
मी म्हणालो डोक्यावर गंगा  कुठाय गळ्यात नाग कुठाय


शिक्षकांनी विचारलं तुला काय व्हायचंय  गांधी नेहरू बोस
मी म्हणालो मला काही व्हायचंच नाही

शिक्षकांनी विचारली तुझी जात काय
मी म्हणालो बापानं कधी सांगितली नाही
शिक्षकांनी त्यांना जी वाटते ती जात लिहिली

शिक्षकांनी विचारलं तुझा जन्म कधी झाला
मी म्हणालो मला माहित नाही
शिक्षकांनी त्यांना वाटतं तो बर्थडे लिहिला

वालावलकर सरांनी माझ्या बापाला विचारलं
ज्याला काहीच करायचं नाही अशा विद्यार्थ्यांचं  करायचं काय ?
मी म्हणालो हा तुमचा प्रश्न आहे माझा नाही

कुस्ती केली क्रिकेट खेळलो फुटबॉल खेळलो मारामाऱ्या खेळलो
शाळा चुकवली
गुळवणी सर म्हणाले तू नापास होणार
मी फर्स्ट क्लास मिळून पास झालो

सायन्स घेतलं तर चालता चालता सत्याने दैवी  उडी मारली
लायब्ररी वाचली पण ती उडी काही मिळाली नाही

सायन्स घेतली सोडली 
आर्टस् घेतली उभा इतिहास आडवा वाचला
बक्षिसं जिंकली गटारात सोडली

तहान लागली तेव्हाच पाणी प्यालो
भूक लागली तेव्हाच जेवलो
काम जागला तेव्हाच जुगलो


कविता लिहिल्या सौष्ठव काढलं प्रस्थापित कवितेला जुमानले नाही
अभिधाची व्यंजना केली
कादंबरी लिहिली १२०० पानाची जी साईजमुळं छापनेबल नाही
असं खुद्द पॉप्युलर प्रकाशन म्हणालं

लग्न केलं  नाही लिविंग रिलेशनशिपमध्ये राहिलो

संन्यासी झालो पण ना आश्रम घेतला ना मठ
लोक म्हणाले सोसायटीत प्रवेश नाही
मी एकट्यानं राहण्याच्या जागा शोधल्या
मुंबईत जिथे निसर्ग अशा ठिकाणी मुक्काम ठोकला

पोरी प्रेमात पडल्या मी शिंगावर घेतल्या
लोक म्हणाले हे कसं
मी म्हणालो कन्डम न्हवता तोवर ब्रम्हचर्य ठीक होतं

अंडरवर्ल्ड आलं आभाळात उडवलं
ओव्हरवर्ल्ड आलं ते पाताळात घातलं
मिडलवर्ल्ड आलं त्याचं विमान केलं

नोकरी केली नाही
कैक धंदे केले
हमालीपासून व्हिजिटिंग लेक्चरशिप पर्यंत

लोक म्हणाले असिस्टंट न होता डायरेक्टर  होता येत नाही
झालो
लोक म्हणाले आधी छोटे छोटे अकादमीक पेपर वाचावे लागतात
म्हणालो वाचेन तर मोठ्या ठिकाणी वाचेन
थेट जेएनयूत पहिला पेपर वाचला
सगळे इंटुक बकवास वाटलं म्हणून पुढे पेपर वाचले नाहीत
लोक म्हणाले ज्याला शास्त्रीय संगीत येत नाही
त्याला म्युझिक डिरेक्टर होता येत नाही
झालो

इलेक्शनला ज्यांच्या जाहिराती केल्या
सगळे निवडून आले
त्यांनी विचारले काय पाहिजे
मी म्हणालो घंटा

शब्द दिले पाळले शक्यतोवर वचने जगलो 

हल्ले झाले
जे मारायला आले त्यांनाही दोस्त केले

जीव खाऊन साधना केली
पोहचलो उतरलो

आणि तुम्ही विचारताय
ट्रान्सलेशनविषयी  तुम्हाला  काय म्हणायचंय 

कविता ट्रान्सलेट करता येतील
पण अख्खा कवी ट्रान्सलेट करता येतो का बाई

ज्याला काहीच करायचं न्हवतं अशा माणसाचं काय करायचं
ओरिजिन नाहीसं  झालेल्या माणसाचं  काय करायचं ?

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, June 14, 2019

सावली



आपल्यातलं नातं काय
हे आपण दोघंच जाणतो

दुःखांच्या नद्या एकमेकांना भीडतात
कारण त्यांना एकट्यानं सडायचं नसतं

दुष्काळातही टिकवून ठेवलेल्या किनाऱ्यावरून
आपण एकमेकांना ढग पाठवण्यात यशस्वी होतो
आणि मेमरीच्या बोटीवरून
कधीकधी एकमेकांच्या वादळात दाखल होतो

मृतप्राय हृदये  जमान्याने  टांगून ठेवलेली

कत्तलखाने डॅझलिंग
आणि त्यांच्यातला केऑस शुद्ध शाकाहारी



प्रकाशानेच जी बरी होऊ शकते
ती तूच ती तूच

कॅन्सरमध्ये गोल्ड एजही असते ओल्ड एजही

गर्भाशयाच्या शक्यता संपल्या कि
सृजनाच्या पॉसिबलिटीज लायबेलिटीज वाटू लागतात

" इतके दिवस आम्ही सेक्स करत होतो
आणि कन्डम वापरत होतो
माहित असते जर मूल होणारच नाही तर  "
हसत हसत सांगतांना
तुझी दातखिळी कशी बसत नाही ?

तू वेदनांची अख्खी अँथॉलॉजी घेऊन जन्माला आलीयेस का ?



आनंद दुःख बुद्ध गंध
मला नका सांगू काय तीव्र काय मंद ?

गाथा त्रिपिटक उपदेश संयम
दारू पितांना आणा तमाशाची छमछम

मराठी डिपार्टमेंटला आठ दलित प्राध्यापक
एकही उच्चवर्णीय मारत नाही मराठीत झक

गेली गेली गेली लाईट गेली
कायमची गेली कि ही लोडशेडिंगची तात्पुरती सावली ?



मुस्लिम स्त्रिया बुरखा घालतात म्हणून
त्यांच्यात काम करायचे म्हणून
बुरखा घालणारी तुझी आई

गुप्ततेचे  नियमित परफॉर्मन्स
मिस्टिक वाटणाऱ्या दुःखाचे आकर्षण

भाषेचा रोजच होणारा शेवट
चेहरा मिस्सीन्ग करून बोलणे

कॉमेडी डोळ्यात पाणी आणते

डिस्टॊर्ट होणारे उंबरठे
बुरख्यात वावरणारी टू नेशन थेरी

फाळण्यांच्या फलाटावरून अनेक हत्यांच्या पळालेल्या गाड्या
हुंदक्यांना कम्पोज करणारे गळे

तुझ्या आठवणींच्या पारावर आपण गप्पा मारतो
सपासप मारणाऱ्या गप्पा



कपाळावरचे पक्षी पाहू कि आभाळ ?
गालातले दगड पाहू कि चंद्र ?

ओठावरची मॅट्रिक्स पाहू कि किसेस ?
डोळ्यातले मीठ पाहू कि अस्वस्थता ?

आमंत्रणांना टाळण्यात मी आता निपुण झालोय
कामवासनेचा अस्त झालेल्या माणसाला विपुल सुख लाभते

तुझा माझ्या मोक्षावर विश्वास नाही

रेग्युलर जगणारा मनुष्य
बुद्ध कसा असू शकतो

मी तुझ्या कमळात बसून
पद्मासन घालावे काय ?



आपण आपणातूनच हद्दपार झालोय
आता वेगळ्या अस्पृश्यतेची गरज काय ?

रेकॉर्डवर तुमचे नाव असू शकते दुःख नाही

मी माझ्यापासून गॅपच्या अंतरावर ठेऊन जगले
आता मरावेही तसेच काय ?

गोंधळ दारूचे पैसे देतो
आणि चकणा म्हणून कधीकधी मी तुला आठवते

तू माझा बेस्ट फ्रेंड असूनही
तुला हे समजत कसं नाही श्रीधर ?



श्रीधर गवारीची भाजी तुला आवडते म्हणून केलीये

श्रीधर तुला आणखी एक चपाती लाटून देऊ का

श्रीधर बाळकृष्ण कवठेकर असं म्हणाले

श्रीधर तमाशातून मुस्लिम गायब होतात
मी त्यावर लिहू काय ?

श्रीधर हे श्रीधर ते श्रीधर असे श्रीधर तसे

पोरी तुझ्या दुःखात मी
मरून जावं  असं तुला वाटतं काय ?



अंतकरणात गदगदणाऱ्या तलवारींना
आपण गुलाब भेट देऊ

बाईच्या गळ्यात दागिना म्हणून
आख्खी पृथ्वी घालू

माणूसच माणसाची जागा रे
बाकी क्षणांच्या बागा रे

माझ्या सावलीनं मला गिळलं श्रीधर

मी तुझ्या शेजारी तुला न दिसता
सावलीसारखा उभाय

श्रीधर तिळवे नाईक



Tuesday, June 11, 2019

पाऊस १० जून २०१९ श्रीधर तिळवे नाईक 


१ 

वळीव गडगडत आवाजाच्या तोफा उडवतोय 

ढग आभाळ गुंडाळत चाललेत

विजा ब्रेक डान्स करतायत

पाणी पावसाच्या पिना काढून  सज्ज

मी माझ्या घरात छताची तटबंदी चाचपत

पाऊस मुद्दे घेऊन येत नाही
थेट माणसाच्या थाळीत कोसळतो

निसर्गाने माणसाची कन्क्लुजन्स स्वीकारलेली नाहीत

मी तो स्पंद आहे जो भूमिती नाही

ठक

पहिला थेम्ब
नवीन मुलीच्या पहिल्या किससारखा

वासनामुक्त आणि प्रेमाने बावचळलेला



थेंबातलं पाणी दिसतंय
पण अंधार दिसत नाही

पहिल्या धारा भरतनाट्यम करत

था थई  था

था थई था

थ थ त था




वारा वाईन पिल्यासारखा
हवेची लाकडं मोडत

त्यांच्यातील ओल धुमाकूळ घालण्यास सज्ज

मला धारांच्या पडेल आवाजावरून कळतंय
छतावर प्लास्टिक टाकलं गेलेलं नाही

पावसाळा समुद्राच्या चांगुलपणाचं गोड सेल्फ रिप्रेझेंटेशन असतो

दारातील शिलालेखासारखं असलेलं पेरूचं झाड वाऱ्यात हलतंय
पावसानं बहुदा आपला करस्पॉन्डन्स कोर्स चालू केलाय
पेरूचा सिलॅबस मला माहित नाही

निसर्ग रिहर्सल करत नाही
थेट प्रयोग करतो

माहित नाही पहिला पाऊस मला काय काय दाखवणार आहे ?



टीव्ही पाहून पाहून दगड झालेली माणसं
जिवन्त होतायत

आम्ही एकमेकांच्या गॅलऱ्या पाहात
एकमेकांचे चेहरे पहात

माझ्या खाली आणि समोर असलेल्या बायका
बुरखा काढतायत
आणि पाऊस पाहतायत

शौहर ऑब्जेक्शन घेत नाहीयेत

पाऊस कधीकधी कर्मठपणाही बदलतो

लाइफटाइम चष्मा घातलेली दोन पोर चष्मा उधळून
थेट पावसात

प्रत्येक धारेत पाणी झाड आणि दगड

जाणिवेची सूक्ष्म तिरीप मला सांगतीये
आत वळ



मी घरात वळतोय
छतावर सपासप चाबूक पडायला लागलाय

ओल्या झाडांना न कापणारा मनुष्य
आता त्यांनाही सोडत नाही
त्याचा राग आल्यासारखा पाण्याचा हा चाबूक

मी घर पाहतोय
ते व्हिंव्हळायला लागलंय

शेवटी तेच होतंय
जे होणार असं मला वाटलं होतं



संन्याशाला मुंबईत भाड्याने घरं  मिळत नाहीत
शैव संन्याशाला तर नाहीच नाही
जणू संन्याश्याने हिमालयात जावे
किंवा वैदिक आश्रमात वा शैव मठात

काम करून जगणारा संन्यासी रद्दीत जमा झालाय
आणि मी तरीही जिद्दीने मिळेल ते घर घेऊन मुंबईच्या बाजारात उभा
कधी दलितांच्यात तर कधी मुसलमानांच्यात
आश्रमांना वगळत मठांना टाळत

संन्याश्याचे छत
उडाले काय बसले काय ?

पावसाला माझा संन्यास माहित नाही
त्याला माझ्या छताची भोकं दिसतायत

झिरप्या पाऊस
जुल्फे उडवत

धारांच्या सुया सिमेंटला भोकं पाडत
छत म्हणजे जणू सूक्ष्म फुग्यांचे वारूळ

खरा प्रश्न पुस्तकं वाचवावीत कि रेनडान्स करावा हा आहे



मी डान्सला वळणार तोच
फ्लोरवर तडाखेबंद धार

मला गंमत वाटतीये

अचानक पवार साहेबांचा डायलॉग

" साहेब मधला फ्लोर बांधकामात कच्चा आहे काळजी घ्या
पडला बीडला तर --- "

धार नेमकी कच्च्या बांधकामावर

खाली कच्चेबच्चे असलेली फॅमिली आहे काही झालं तर प्रॉब्लेम

मी डान्स कॅन्सल करून बादलीकडे

पावसाने तर जलस्फोट करायला सुरवात केलीये

मी पुस्तकं तुडवत बादली घेऊन येतोय लावतोय

पाऊस ना ब्रेक लावतोय ना ग्रीप सोडतोय
त्याला पाण्याच्या मोटर सायकल्स बेबंद पळवायच्या आहेत

दुसरा स्फोट दुसरी बादली

अचानक तिसरा स्फोट ऑफिस खोलीत
मी बेडरूममधून किचन तुडवत पुन्हा ऑफिस रूममध्ये
तिसरी बादली घेऊन

नऊ वर्षात प्रथमच इथे धार गळतीये
हवेला गुंतागुंतीचा वास
माती आणि गॅसोलीन एकाच नाकातून वहात

बादल्या संपल्यावर काय लावावं ?




मटेरियल वर्ल्डलाच लिकेज
मंत्रमुग्ध रिस्क

छताला एड्स झालाय कि काय
मरायलाच टेकलंय जणू

मी जम्पऐवजी आता डबल जम्प मारतोय

पॉवरड बाय साईबाबाचे चित्र त्रासलेल्या श्रद्धेसारखं खाली येतंय
आणि ओलं होतंय

आणि अचानक धाडधूड थेट पुस्तकांच्या कपाटांवर

वाचवावीत कि पाण्यात मरू द्यावीत ?

मी पुस्तकं धडाधड फेकतोय

महाभारताचे व्हॉल्युम्स पाणी पितायत
मी फेकतोय
रामायणाच्या चेहऱ्याला पूर आलाय
मी फेकतोय

त्रिपिटकं सुरक्षित

मनुस्मृती धोक्यात

कृष्णमूर्ती सुरक्षित रजनीश पाण्यात

बायबल पाण्यावर चालून जाण्यात अयशस्वी होतंय बुडतंय
कुराण सुट्ट सुट्ट होत घरातील तलवारीवर तरंगतंय

नितीन वाघांनी ट्रान्सलेट केलेली स्त्रीवाहिनी जीवाच्या आकांताने पाण्याबाहेर

३६५ डेज विथ बॉडी काहीही न होता वॉटरप्रूफ असल्यासारखे
पाण्याजवळ असूनही सुरक्षित

धर्मशास्त्र अचानक बादलीत पडलेत त्यांच्यावर पाऊस

एकीकडे पाऊस आल्याबद्दल कृतज्ञता दाटून येतीये
दुसरीकडे पाण्याचा बंदोबस्त करतांना दम लागतोय

गिरीश कर्नाडांवरचा मृत्युलेख कॅन्सल करून
मी पावसाचे आणि माणसाचे हयवदन पाहतोय

लॅपटॉप स्वतःवर पाऊस कोसळेल म्हणून अधिकच काळा पडलाय
पाणी डिलीट करण्याची की  त्याच्याजवळ नाहीये

पाणी छतावर पडलं कि स्क्रोल होतं

मी फक्त जागांत  शिफ्ट होत डॅमेज कंट्रोल करतोय




लीकेजखाली लावून लावून भांडी संपलेत
आता पाणी थोपवायला काय लावावे ?

बादल्या सैनिकांच्यासारख्या लढतायत

पाण्याचा अतिरेकी हल्ला

हळूहळू पाणी साठतंय

आयुष्यातला प्रत्येक पूर पाहिलेला मी
फक्त मुंबईतील टॉपमोस्ट  फ्लोरवरच्या पुराच्या अनुभवापासून वंचित होतो
बहुदा निसर्गाला त्यापासून तरी ह्याला का वंचित करा
म्हणून हा खटाटोप करावासा वाटलेला दिसतोय

खालच्या फ्लोरवरचा सादिक घाबरलाय
मी त्याला माझा फ्लोर आणि त्याचे छत कोसळणार नाही
ह्याची खात्री देतोय

त्याचे ओले झालेले छत
त्याला सैतानासारखे वाटतंय

मी पाण्यात तरंगणारी पुस्तके
तशीच तरंगू देतोय

जेव्हा वाळतील तेव्हा वाळतील

नाहीतरी त्यांचा उपयोग सम्पलेलाच आहे

पाऊस थांबलाय
आणि मी पुन्हा काळजातल्या सूर्यात
पद्मासन घालून बसलोय

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सीरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )








Tuesday, June 4, 2019

दात श्रीधर तिळवे नाईक 


भूक लागेल तेव्हा खाणं
झोप येईल तेव्हा झोपणं

समोर बौद्ध साध्वी
जिला कळत नाहीये
तिला काय हवंय
निर्वाण कि सुपरस्टारडम ?

मडगाव स्टेशनचा जबडा
स्वतःची बॉयलॉजी न्याहाळत
येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे पाहतोय

प्रवासाचं रिपेअरिंग सुरु आहे

प्रवासी स्टेशन बदलून
घरातून निघतायत
किंवा घरात पोहचतायत
त्यांना माहित नाही
घर हीही दीर्घकाळ टिकणारी वेटिंग रुम आहे

ते रुमर्समध्ये मग्न
आणि मी शरीरात उभा

पोटाला कॅलरीज हव्यात म्हणून
कॅंटीनमध्ये




लोकांना भूक लागलीये कि नाही
हे ठरवता येत नाहीये
साध्वी आपणाला भूक लागलीये कि नाही
ह्याचा अंदाज घेतीये

आता वैज्ञानिकांनी हंगर डिटेक्टर शोधावा काय ?

अमुक अमुक कॅलरीजची आपणाला भूक लागली असून
आपण हे हे खावे



इडली चालेल

एका निष्कर्षाला ती  पोह्चलीये
आणि मी एन्ट्री मारतांना पाहिलेली इडली
रिव्हर्स करत
स्पॉटला पोहचतोय



शून्य अंगवळणी पडत चाललंय
आणि ते असंख्य हाताळत जग पेलतंय

होणाऱ्या हस्तक्षेपांचे  सौंदर्य सर्वत्र

स्टेशन सौंदर्यात निखळतंय

माझ्या हातातील नोटांना चित्रकला फुटलीये
आणि मी इडली विकत घेतोय



खाणाऱ्यांना दातांची मॉर्फोलॉजी माहित नसते
त्यांना फक्त दात माहित असतात
टेस्ट माहित असते
आणि खाणे माहित असते

आम्ही खातोय

आमचे दात उत्क्रांत होतायत
आम्हांला कळू न देता



तोंडात अन्नाचे तुकडे करून
अन्नाला पोटात पाठवून
आम्ही ट्रेनची वाट पाहतोय

डोळ्यात प्रवाश्यांची लोकसंख्या
प्रवेशासाठी तळमळणारी

एकमेकांचा वास घेत
बागा टांगणीला लागलेत
आणि फुलांना निघण्याची घाई झालीये



साध्वीच्या डोळ्यात झोप
मी तिला विपश्यना करायला सांगत नाहीये

" ट्रेन मध्ये थेट झोप "

तिचा आनंदी चेहरा
तिच्या झोपेविषयीची न्यूज देतोय

मी माझ्या सर्व दातांनी हसतोय
आणि साध्वी अभिनेत्री होत
थेट ट्रेनमध्ये चढतीये

तिला झोपेसाठी आता फक्त बेड हवाय
बाकी जग मेले तरी चालेल



तिच्या लगेजने  हक्काची सर्व जागा व्यापलीये
आणि एक विवाहित जोडपं
माझ्या जागेवर लगेज ठेऊन
एका सीट्मधे
दोन सिटांच्या झोपेचा प्रबंध करून
निवांत पसरलंय

मी अप्पर बर्थवर सामान चढवून
त्यांना हवे ते देतोय

माणसं अशी निकरावर आलेत
कि इतरांच्या हक्कांचे लुबाडून
निवांत ढेकर देणे
त्यांना अचिव्हमेंट वाटते

मी सर्व दातांनी हसत हसत बर्थच्या चिमटीत बसतोय
आणि कपल प्लांनिंग यशस्वी झालं म्हणून आनंदित

साध्वी अप्पर बर्थवर झोपी गेलीये
आणि लोकसंख्या जागा व्यापून ट्रेनतीये



कुठेही झोपी जाण्याची विद्या मला अवगत आहे
निद्रासाधनेचा एक प्रकार

शरीर संपूर्ण झोपी जातंय
इतरांच्या स्वप्नांचा आवाज कानाआड करत

१०

भूक पिसारा फुलवत नाचतिये
आणि मी उठतोय

माझ्याजवळ बायजीने दिलेले  लाडू आहेत
विकत घेतलेले शेंगदाण्याचे लाडू आहेत

मी खायला म्हणून पिन काढू पाहतोय

खड्डाक

दात तुटलाय
पटाशीचा

मी जीभेनें खात्री करतोय

रक्त येत नाहीये
म्हणजे निखळ दात तुटलाय

प्रथम एका मारामारीत तुटलेला दात
आता पुन्हा परफेक्ट त्याच जागी तुटलाय

मात्र रूट कॅनाल शाबूत आहे

मी दात नीट शोधून
जुडग्याच्या बटव्यात ठेवतोय

माझे बत्तीस दात हसतायंत
मात्र एक तुटलेला आहे

११

मी तुला व्हाट्स अप करतोय
" दात तुटलाय कधी येऊ ?"

एव्हढ्या सकाळी तू मेसेज वाचणार नाहीस ह्याची मला खात्री आहे

नैसर्गिक दात शाबूत ठेऊन
डेन्टिस्ट्री करण्याची तुझी पद्धत मला पाठ आहे

दात म्हणजे डेटा
तो आपण जपला पाहिजे
ह्यावर आपले एकमत आहे

मी उरलेले दात सांभाळत
लाडू खातोय
आणि ट्रेन माझ्या दाताविषयी पूर्ण अनभिज्ञ रहात
धावतीये

हे बरंच आहे कि
तिच्याजवळ माणसांप्रमाणे दन्तकथा नाहीत

१२

साध्वी उठतिये

मी पाहतोय

ती हसतीये

मी हसतोय

तिला तुटलेला दात दिसतोय

" तुमचा दात कुठं गेला ?"

मी बटव्यातला दात दाखवतोय

"रक्त नाही आलं ?

"दात तुटलाय उखडला गेलेला नाहीये "

" मला दात हवाय "

"कशासाठी "

"तुमची आठवण म्हणून "

"तू अजूनही बुद्धाच्या दातात अडकून आहेस ?"

"तुम्हाला प्रॉब्लेम आहे ?"

"नाही पण माझा मित्र नैसर्गिक दातच जसाच्या तसा बसवतो "

"मग ठीक आहे "

मग ठीकच आहे


१३

पटाशीचा दात फक्त अन्न तोडत नाही
सौंदर्यलक्षण म्हणूनही वावरतो

फ्रंटल सेल्फीची सुरवात
ह्या दातांच्यापासून होते

अक्कलदाढ दिसत नाही
कारण अक्कल दाखवण्याची गोष्टच न्हवे

मी सुळ्यांनी नाष्टा करतोय
आणि दाढा सकाळ चावत
सूर्य गातायत

१४

मी पटाशीचे दात नसलेली सेल्फी काढेन म्हणून
साध्वी माझ्या मोबाईलवर नजर ठेऊन आहे

मी सेल्फलेस दातांनी हसतोय

१५

तुझे उत्तर येत नाहीये
म्हणून मी मिसकॉल देतोय

मोबाईल कमीतकमी वापरण्याचा आपला पायंडा

मोबाईलने कॅन्सर होतो हा तुझा विश्वास

मल्टिपल संशोधनाच्या ह्या युगात
अनेक परस्परविरोधी संशोधनांनी
खुद्द डॉक्टरांनाच हैराण केलंय

मेडिकल अंतिम सत्याचा मृत्यू झालाय
आणि उरलंय फक्त तात्कालिक वास्तव
आणि त्याच्या बातम्या

तुझं उत्तर येतंय
कधी येतोस
आणि सोबत
मोबाईलने कॅन्सर होतो ह्या संशोधनाला पुष्टी देणारा लेख

तू उत्तर द्यायला का लेट केलास त्याचे कारण

मी टाइम देतोय
आणि तू कन्फर्म करतोयस


१६

आपल्या मैत्रीचा ढग कधी तयार झाला ?

आपण विद्यार्थी असल्यापासून एकमेकाला ओळखतोय

डेंटिस्ट लोकांच्या ग्रुपमध्ये मीच फक्त पेशन्ट

मारामारीत दात घशात घेतलेले माझे तोंड
तुमच्या दृष्टीने हक्काची प्रयोगशाळाही आहे

माझ्या साधनेच्या मागे
तू कायमच ठाम उभा

निर्वाण आणि बॉडी ह्यांचा सम्बन्ध
हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय

दात पडला हल ला कि
आपण दातांच्यावर सविस्तर चर्चा करतो
आणि मग निर्वाणाच्या जंगलावर
आपली झाडे टेकवतो

१७

मी तुझ्यापुढे पडलेल्या दाताने उभा
आणि तू अचानक दिलखुलास उठत

" हा श्रीधर माझा मित्र कम गुरु मी जे बोलतो
ते ह्याचे असते डेन्टिस्ट्री सोडून "

" आणि श्रीधर हे इंजिनियर टॉपर
सध्या नितीन गडकरींसोबत ही डॉक हसीना ही डॉक स्नेहा  "

मी बुरख्यातल्या डेंटिस्टकडे पाहतोय

हिला बुरख्यातून दात कसे दिसत असतील
आणि ती रूट कॅनल  कसे करत  असेल ?

कि बायका असतांना मुस्लिम असिस्टंट
आणि पुरुष असतांना हिंदू असिस्टंट ?

माझगाव डॉकमध्ये आणखी काय तोडपाणी असू शकतं ?

तू पेशन्टसाठी आत
आणि सगळे भगवे ड्रेस सेलला लागल्याच्या थाटात
इंजिनिअर माझा भाव आजमावतोय

आश्रम काढण्याची ऑफर ठुकरवण्याची तयारी करत
मी त्याच्याशी कन्स्ट्रक्शनवर  बोलतोय
आणि तो त्याच्या साहेबाचे प्लॅन सांगत
माझ्या विटा चाचपतोय

आत रूट कॅनल चालू आहे
बाहेर गडकरी फ्लायओव्हर बांधतायत
१८


पेशन्टला त्याचा जबडा आणि त्याचे दात दाखवणारा
विडिओ असिस्ट माझ्या डोक्यावर
आणि मी पेशन्टचेअरवर

माझे दात मला डिजिटली  दिसतायत

मी शक्यतो भूल घेत नाही
आणि तुही शक्यतो भूल देत नाहीस

दुखलं कि बोट वर करायचं
हे आपलं सनातन अंडरस्टॅण्डिंग
ऑन झालंय

माऊथ मिरर दात लोकेट करत
लोकेशन रिफ्लेक्ट करतायत

स्ट्रेट प्रोब मार्जिन तपासतायत
आणि स्केलर आणि एक्सकॅव्हेटर
दात नीट खोलून सेटिंग करतायत

नैसर्गिक दात पुन्हा सेट होतोय
आणि माझ्या स्मायलींचा झगमगाट
पुन्हा डान्स करतोय


प्रश्न एकच आहे
हे नैसर्गिक दाताचे
आर्टिफिशियल सेटिंग
कितीकाळ टिकणार आहे ?



१९


मी दात घेऊन
पुन्हा पुन्हा तुझ्या स्वप्नात येतोय
आणि तू दातांचा आणि संन्यासाचा सम्बन्ध ताडत
सेटिंग जोखतोयस

श्रीधर हा दोन वर्षांनी पुन्हा कोसळणारच
आपणाला काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवं

नैसर्गिक नाजूक झालंय
आणि त्याचं काय करायचं
हे आपणाला कळत नाहीये

२०

आपण हिंसक होत
एकमेकांचे नैसर्गिक दात का पाडतो ?

कि हिंसेला हिंसा करतांना
स्वतःचा एन्ड दिसत नाही ?

२१

सर्वत्र उत्तम गुणवत्तेच्या कवळ्या उपलब्ध झालेत म्हणून
आपण एकमेकांच्या दातांविषयी केअरलेस झालो आहोत का ?

२२

मारामारी करताना मी तरी कुठे शुद्धीवर होतो
मी त्याची टांग तोडली
त्याने माझा दात पाडला

२३

साध्वी माझा नैसर्गिक दात पाहून खुश झालीये
तिच्यासाठी माझी सेल्फी पुरेशी सुंदर निघतीये
एव्हढेच पुरेसं आहे

२४

माझा लावला गेलेला दात
छिन्नविछिन्न करण्याची ऑर्डर देऊन
तू बाहेर बसलायस

स्नेहा चिसल चालवत नैसर्गिकचा भुगा करतीये
आणि मी चुळा भरून
दात फेकतोय

२५

साध्वी माझा नैसर्गिक दात
पाण्यात गेल्याने दुःखी झालीये

तिला तिच्या डब्बीत तो हवा होता

मोक्षाचा पुरावा दातात अडकत नाही
हे तिला कुणी कसं समजवावं ?

साक्षात्कार स्वतःतच व्हावे लागतात
आणि ब्रह्मांड स्वतःलाच स्वतःच्या जबड्यात दिसते

२६

तू दिलेला तात्पुरता दात घेऊन मी हिंडतोय
कुणालाच संशय नाही
कि हा आर्टिफिशीयल आणि तात्पुरता आहे

एकंदरच लोकांचा दिसण्यावरचा विश्वास वाढत चाललाय
असं दिसतं

२७

तू क्राऊन बसवतोयस
आणि मी जिभेने हा राज्याभिषेक सोहळा चाचपत साजरा करतोय

नवीन दातावर कृत्रिम एनॅमलही उपलब्ध आहे
आणि स्मूदनेस
नैसर्गिकपेक्षा अधिक उजवा आहे

हळूहळू मला त्याचीही सवय होईल
आणि तोही नैसर्गिक होऊन जाईल

मी माझा जबडा नव्याने पाहतोय
आणि तू दिलेला दात
माझ्या ब्रह्मांडात फिट होताना पाहतोय

हा आर्टीफिशियलचा विजय आहे
कि आर्टिफिशियल हेही निसर्गाचा भागच आहे
हे माझ्या इंटीलिजन्सला अद्याप कळलेलं नाहीये

शक्य आहे
हे ब्रह्मांडच
शून्याची कवळी असेल

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सीरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

डेंटिस्ट दात आणि मी

दात , डेंटिस्ट आणि मी



मी दात काढायला तुझ्याकडेच यायचं
आणि दातकाम झाल्यावर तू मला घरी सोडायचं
हा आपल्या मैत्रीकराराचा एक अलिखित भाग आहे

शतकांच्या कॉइल्स फिरतात जातात
पण आपला करंट कायम करंट

दोस्तीच्या ऍकनौलेजमेंट आपण कधीच
मॅनेजमेंटमध्ये दाखल केल्या नाहीत

कि हितसंबंधाच्या रिच्युअल रिन्युअल्समध्ये
आपण कधी अडकलो नाही

सेंट जॉर्जच्या डेन्टल कॉलेजपासून सुरु झालेली आपली मैत्री
अनेक पापात भिजवत
पश्चातापाचे स्लॅब टाकत
सिलॅबस सील करत
सामाजिक तपशिलाच्या चिमट्यातून निसटत
भरत्यांना दगड बनवत
फुलांतून ओहोटया पिळत
जहाजतीये
आणि एक संन्यासी आणि एक डेंटिस्ट
एकत्र करतात तरी काय ह्या विचाराने
पाणी पागल झालंय

पाण्यात बुडालेल्या जहाजांना कप्तान नसतो
आपणालाही नाहीये



दबावांचे थिएटर आणि दाबांचे अभिनय आपल्या वाट्याला आले म्हणून
आपण कधीच मेकप केला नाही

घरात दाबले गेलेले संगीत
आपण एकत्र आलो कि
बंडखोर होते

तू तुझी बीएमडब्ल्यू बाहेर काढतोयस

सरोगेट न झालेले रस्ते बाळासारखे निरागस

सावल्यांना टॅप करणारे ड्रायविंग तुला येतं
देह ढापणारी व्यवस्था तुला फेटाळता येते

मेडिटेशन म्हणजे मेंदूतली वाळू उपसून तिचा संगणक बनवणं

डिझाईनमुळेच स्टेबल झालेली पृथ्वी
आपणालाही डिझाईन समजून
आपली कार सोसतीये

आणि एफममधले सगळे यमनियम संगीतबद्ध करत
आपण रेंज वाजवतोय



आपल्या हार्मोनियस तकलिफी सूरात

श्रीधर तुझा मॅडम तुसादने  स्टॅचू बनवला ना तर तो दुःखाने काळा पडेल
सोडियमने पिन केलेल्या जखमा
लॅबोरेटरी रेग्युलेट केलेल्यांच्या नशिबी पुराण शिकवणे येणे

तुझा फ्रॉग ब्रॉन्झ झालाय माझं अर्थवर्म झालंय सिल्वर
आणि सुश्मिता सेन वगळून नोरा फतेही म्हणतीये दिलवर दिलवर दिलवर

सीटची मांडी मॅसिव झालीये

आपण आपल्या बायकोला आपल्या पॅशनचे गुलाम बनवतो साला
तरी माझी बायको बरी आहे मला माणूस समजते

आपण चोरीला गेलेल्या खजिन्याचे खजिनदार आहोत

तू बडबडत सुटलायस
आणि मी बदललेल्या माझगाव डॉकला पहात
नाकाने वारा पितोय



समुद्र कोरून काढावा तशी निळी बिल्डिंग
चायनीज भांड्यासारखी फुटलेली झोपडपट्टी

इथे साले इतके बांगलादेशी
पण सरकार एकालाही परत पाठवत नाही पक्ष कुणाचाही असो

शरीर आणि त्यावर शीर
चुकूनच तुझ्यासारखा एखादा पीर

घर नसलेले लोक कुठेही सांडतात डॉक्टर

करुणेचा मक्ता काय एकट्या भारतानेच घेतलाय काय ?

इथला जळलेला भगवा कुठे गेला
जळलेला म्हणून काढून टाकला
ह्यापुढे जळलेला भगवा ठेवायचा नाही
असा राजकीय आदेश आहे

माझगाव बदलतंय
माझं गावं बदलतंय



ट्राफिक पार करत आपण हायवेवर

सूर्य काळ्या गाढवांच्यात वितळावेत तश्या रिक्षा
श्रीमंतीचा प्लग काढून घेतल्यासारख्या टॅक्सीज
डेथ सर्टिफिकेट्स घेऊन फिरणाऱ्या बाईक्स
ह्यांच्या गर्दीतून आपण बीएमडब्ल्यू घेऊन चाललोय

हॉर्नला बंदी झाल्याने किंचाळ्या लॉक झालेत

कार्सचे हँगिंग सुस्कारे
आणि त्यांच्या चेहऱ्यावर हातरुमालासारखे घडी पडलेले गोंधळ

हे शहर माणुसकीवरचा ब्लेम आहे
असेल
गेम आहे
असेल
शेम आहे
असेल
ब्लेम गेम आहे
असेल

ह्या शहरावर तुम्ही काहीही बोला
ते तुम्हाला योग्यच वाटेल

शहर खुनी आहे
असेल
धुनी आहे
असेल
धुणी आहे
असेल
गुणी आहे
असेल

ट्राफिक
गॅप कमी करतोय
शेप कमी करतोय
आणि गाडीच्या हालचालींच्यावर दर क्षणी नवे वॉरंट काढतोय



ईशान्या कौरचा कॉल
भेटीचा आग्रह
भविष्यविज्ञान कि असाइनमेंट ?

तुझ्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी अजूनही ऍक्टिव्ह आहेत
हो
मोक्षाचा फायदा काय
शून्य
कर्मयोग
नाही क्रियायोग

शांतता हॉरर फिल्मसारखी झालीये श्रीधर नको वाटते
म्हणूनच मेडिटेशनच्या आग्रह मी धरत नाही
नको धरू

भेटीचा साईनबोर्ड होऊ न देता आपण बोलतोय
कारण ट्राफिक ड्रायविंगला कमी संभाषणाला जास्त वाव देतोय

सर्वांनी स्वीकारलेल्या एका ऑफिशीयल डेथमधून
आपण मार्ग काढत जीवन्तपणा शाबूत ठेवत एकमेकाला डायल करतोय



कॉफी हाऊसेसभी  काफी हुए है इस शहरमे
मैं ऍक्ट्रेसका कॉफी हाऊस ढुंढ रहा हूँ लिंकिंग रोडके कहरमे

तुला अभिनेत्रीला भेटण्यापेक्षा
बायकोशी बोलणे महत्वाचे वाटते म्हणून तू गाडीत

आयकॉनच्या टनेल्सवर बोटं फिरवत तू ऑन
आणि मी कमर्शियल ऑक्सिजनच्या बेटावर कॉफी हाऊसमध्ये

पाठीवर मेग्या मॉल
समोर टीव्ही डॉल

तिच्या चेहऱ्यावरचा मेकप
माझी वाट पाहून पाहून
जांभयां द्यायला लागलाय

बॉलिवूड म्हणजे मेकपला दाद मिळवून
चेहरा कमावणे

मी तिने केलेल्या जाहिरातींच्यावर बोलतोय

तिचा फ्रेंड नितीन चोप्रा आणि ती
दोघांनी एकाचवेळी व्हाटसप केलेले फोटो
मला सपासप आठवतायत

एकाला पाठवलेला  प्रतिमेसेजच 
दुसऱ्याला कॉपी पेस्ट करून पाठवल्याची कबुली मी देतोय

अभिनयाच्या पापण्या डोळे लपवतायत

एकाच वेटिंग बेंचवर आम्ही तिघे बसलेलो आहोत
गोदो करण जोहरकी या आदित्य चोप्राकी गोदमे

मी एमटीव्हीवर मराठी कविता वाचत असल्यासारखा बोलतोय
सत्य आणि स्पष्ट

कॅपचिनोच्या क्रिमी दरवळीवर हिरवळ तरंगतीये

आपण सर्वच कॉफी हाऊसला असे मीटिंगचे शो लावतो
पुढे त्यांचे काय होते कुणालाच माहित नाही

मी ऐकतोय सल्ला देतोय

जेनयुनिटीचा गहू दळून आम्ही ब्रेड बनवलाय
आणि तू गाडीत

मिटिंग संपल्यावर अभिनय विचारतोय
आपण एकमेकांचे काय आहोत

मी शेक हॅन्ड करत म्हणतोय
एकमेकांची रिऍलिटी



तुला प्रचंड भूक लागलीये
आणि आपण मॅकडोनाल्ड शोधत एस वि रोडवर

जाळी क्लाइंब करत हिमालय तयार करत असतांना
आपण काळजाचा सह्याद्री शाबूत ठेऊन आहोत
हे काय कमी आहे ?

माझ्या रक्तवाहिन्या आता उदास होत नाहीत
फक्त फ्रेशनेसमध्ये  अंघोळ करत
क्षण फ्रेश ठेवतात

तू जे जे अवेलेबल आहे त्याची ऑर्डर देतोयस

तुझी अन्नावरची मते भिन्न आहेत

तू पेप्सीकोकचे शास्त्रीय समर्थन करतोयस
आणि व्यायामाची आवश्यकता मांडतोयस

तुझ्यासाठी माझ्या तात्पुरत्या दातावर मी कोला बुचकळतोय
तो विरघळत नाहीये

फ्रेंच फ्राईजची लाइटवेटेड चव जिभेवर उठाबशा काढतीये

करकरीत भोजनाची गहनता ह्या भूकेत कोण तपासणार ?

तुझा हात खात नाहीये
अन्नात स्विमिंग करतोय

बोटे स्लोमोशनची अफवा उडवतायत

भरल्या पोटाची कर्टसी सांभाळत आपण उठतोय




आपल्या भेटीचा इमोशनल कोशण्ट न मोजता
आपण पुन्हा भेटलोय

आपल्या भेटींनी इराणी रेस्टोरंट पाहिले
उडपी पाहिले
बरिस्ता पाहिले
आणि आता आपण
मॅकडोनाल्ड आणि कॉफी हाउसेस पाहतोय

किती कुलिंग आली गेली
किती हीटिंग्ज जाड झाली स्लिम झाली

आजही तुझा चेहरा
कुठलेही चंद्रग्रहण न पाळता
मला सूर्य देऊन जातो

आजही तुझी बोटे पुनर्जन्म घेऊन
माझे दात बसवतात वसवतात

माझ्या दातांची वस्ती
तुझ्यामुळेच शाबूत आहे

मी शेकहॅण्ड करतोय
आणि माझ्या रक्तातून तुझ्या नावाचे झाड
फांद्या हलवतंय

एकमेकात हापूस आंबे पाडत
आपण
एकमेकाच्या जंगलातून
स्वतःच्या घरी चाललोय

श्रीधर तिळवे नाईक


( निर्वाण सीरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )