Monday, August 21, 2017

मी कधीही जाऊ शकतो
माझा काही नेम नाही

माझे विसर्जन होऊन गेलयं
जे शिल्लक आहे ते शारीरिक दृष्ट्या यातनामय आहे

रोगांचा अनावश्यक डोलारा
आणि वय पकडत वयात थरथरणारे शरीर

आनंदाचा आलिशान कारंजा त्यातून उडतोय
आणि समुद्राला माझ्या हाताचे हातवळण लावतोय

पाणी मळून त्याच्या चपात्या लाटणे सुरूच आहे

लोक खातायत
पण मला थांबवायला ते पुरेसं नाही

मी वाट पहातोय त्या अदभूत इशाऱ्याची
जो समुद्र गिळवून आत प्रकटेल

तोवर हा कॉन्टेम्पररी वॉटर डान्स

श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

*****************************

Wednesday, August 2, 2017

गेम श्रीधर तिळवे 

पाहण्यात मग्न असलेले लोक पाहतायत जे घडतंय ते निमूट 
दारू पिऊन शुद्धीवर राहिलेले खेळतायत मृत्यूशी खेळ 
व्हिडिओ शूट करणारे फक्त नेत्रमग्न होत करतायंत शूट 
हिल स्टेशनवर  तयार होतीये फक्त ब्रेकिंग न्यूजची विसंगत भेळ 

लोकांना फक्त पाहायचंय आणि करमणूकीत पावन व्हायचंय 
ज्यांना दारू चढलीये त्यांना  व्हायचंय निरंतर बेहोष 
ते थ्रिलच्या काठावर कपडे काढतायत मृत्यूला चिमटा काढत 
मरणारे मरण पाहणारे मरण शूट करणारे कुणालाच वाटत नाही काही दोष 

दारूचे समर्थन करणारे दारू पित बद्लायतात कॅमेऱ्याचे अँगल 
दारू आणि थ्रिलमध्ये लोम्बकळतायंत शुद्धीवर नसणारे ब्रेन  
मजा आणि मस्ती ह्यांच्या दंगलीत निसटतायत पाय 
मरणारे असे मरतायत जसे कोसळावे एरोप्लेन 

कुणीच जाऊन का अडवले नाही का फक्त पहात राहिले 
जणू समोर चालला होता मोबाईलमधला एक व्हिडीओ गेम 
मेलेले मूर्ख कि त्यांची डेड बॉडी शोधणारे मूर्ख कि शूटकर्ते मूर्ख 
त्यांच्या मरण्याचा व्हिडिओ व्हायरल बदलत स्वतःची फ्रेम आणि नेम 

आजच्यापुरता कळकळबाणा  ब्लेम गेम आणि  क्लेम 
उद्या पुन्हा नवी दारू नवे झिंगाडे नवे शूटर्स बाकी सेम टू सेम 

श्रीधर तिळवे नाईक 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )