Saturday, May 4, 2019



वेफरसारखी करकरीत आणि बर्गरसारखी चविष्ट
माझ्या नथिंगनेसच्या पृष्ठभागावर तरंगत तू येतीयेस

मी वजनाने हलका
आणि तुझ्या खांद्यावर वजने नाहीत

अस्तित्वावर कुणी टॉवेल गुंडाळावा तशी तू दिसतियेस
वय वर्षे सतरा आणि तरीही मॅरीड

प्रार्थना करून समुद्र ग्लासात खेचू ही प्रतिज्ञा
मेडिटेशनविषयी अनेक गैरसमज बाळगणारी
तुझ्या अंगाखांद्यावर

खरतर तू बाप शोधतीयेस
आणि तुला त्याची कल्पना नाही

दहशत ही तुला झालेली सवय आहे
प्रियकराने तुझ्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन
तुझ्याशी जबरदस्तीनं लावलेलं लग्न मला स्पष्ट दिसतंय

तुझ्या सासूनं मला भाऊ मानलंय
आणि मी इमानेइतबारे हा रोल निभावतोय

झालेल्या गोष्टींचा त्रास
रक्तात उसळतोय बसतोय

बचपनका प्यार

तुझ्या धुक्याच्या मेणबत्त्या होतायत
आणि गोंधळाचा प्रकाश पडतोय





कितव्या वर्षी मुली किससाठी ओठ तयार करतात ?
तू मला तुझ्या आवडीची क्लासीक गाणी ऐकवतिये
आणि त्यातलं एकही गाणं २००३ पूर्वीचं नाहीये
२००३ क्लासिक ?

आलिया भटचे डिजिटल फोटो कलेक्शन खोलून बसलाय
तुझा टचस्क्रीनल मोबाईल
तिच्या मांसात लडकी ब्युटीफुल कर गयी चूल
बादशहा कधीच बाद होत नाहीत ह्या देशात
काही जमलं नाही तर रॅपर म्हणून उगवतात




सर रक्ताला खिडक्या किती
सर कबुतराला किती नाकं असतात
सर ढगांचा ट्रॅफिक ज्याम झाल्यावर पाऊस पडतो
सर मी तुमच्या घरापासून फक्त दोन कॉल अवे आहे
सर डोळा आयुष्यभर स्वतःला पाहण्याची धडपड का करतो ?
सर पक्ष्यांचा पाऊस कोसळून मुंबईचे वाळवंट झाले

आणि तुझी ती इंटिमेट कुल शैली

सर त्याचा किस ना इंटिमेट आहे
सर तो कॅप्टन कुल आहे
सर तो तर इंटिमेट स्पायडरमॅन आहे टेकनॉलॉजितला

मी फॅन्टाफॅब्युलंस म्हणतोय
आणि तासाभरातच अनेक गोष्टी फॅन्टाफॅब्युलंस होऊन जातात



"माणसं दोन प्रकारची असतात
एकतर लाइमलाईटमधली
किंवा लॅम्पलाईटमधली

मला  लाइमलाईटमधली व्हायचं आहे "

नाकपुड्यातली गोड हवा अत्तराचा सातपुडा बनवतीये
राहुल गांधी तुझ्या मोबाईलमध्ये रोज पंधरा मिनिटाचा डिजिटल वॉक घेतो
" माझा तो फेव्हरेटी मी त्याची फॅनेटी "

माझं घर तुझ्यासाठी केवळ एक व्हॅनिटी आहे कि काय ?



मी तुला ध्यानाच्या दोन तऱ्हा शिकवतोय
त्राटक आणि प्राणक

"हवामे उडता
मेरा कलेजा "
तुझ्यासाठी मेडिटेशन एव्हढंच

"पैसे किती मिळतील मेडिटेशन केल्यावर ?"
"मेडिटेशन पैसे कमवत नाही "
ओह !




"आपण देवाच्या खिडकीची मिरर इमेज आहोत "
असू असू वेलणकीनीच्या खिडक्या

"सावल्यांची गॅंग स्वप्नात पाठलाग करते ह्याचा अर्थ काय सर"
काळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स काढून टाक

"फेअर अँड लव्हली अजून किती महिने वापरावे लागेल ?"
काळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स असे तोवर

आवाजांच्या देशात नॉइज किंग
ऐश्वर्या रॉय शोधायला गेली अभिषेक बच्चनचे बिंग

नेटफ्लिक्सने तुझा दिवस क्लिक होतो
आणि हॉटस्टारने तुझी रात्र हॉट

वरून धवनकी छाती
सबको है लुभाती

वॉशिंग पॉवडर निरमा



तू टाईप दहा मिंट करतेस
आणि पन्नास मिंट मोबाईलवर बागडतेस

डिस्ट्रॅक्शन हीच ऍक्शन झालेली पिढी

मोक्ष म्हणजे देहातल्या देहात मरणे

"देहात कोणीच मरत नाही सर
माणसं देहात फक्त जगतात
आणि मरायची वेळ आली कि
देहाबाहेर जाऊन मरतात

मृत्यू टच करतो आणि माणूस मोबाईल होतो

माणूस मोबाईल म्हणून जन्मतो
आणि स्मार्ट फोन म्हणून मरतो

मी फक्त तुमच्याबरोबर असली कि शार्प होते
नाहीतर फक्त शुटर आणि शीटर "

तुझ्या कुरळ्या केसाचे क्लोजप शार्प होतायत
पण फणा काढत नाहीत

जग तर क्षणाक्षणाला बदलतंय
पिढयांना दोन तीन वर्षे लागतात




तुझा कोवळा अठरा वर्षाचा नवरा
धमक्या देण्यात अधिकच एक्सपर्ट झालाय

त्याच्या कॉलरवर डॉलर आहे बैयापे रुपेइय्या
बधिरपणावर देओ स्प्रे करून
मेंदू संवेदनशील होतो काय ?

नरकात योन्या नसतात
आणि स्वर्गात पुरुषलिंग

दोन स्तनात क्रुसिफाय झालेला प्रेषित
स्लेव बायबलच्या प्रति वाटतोय

हिंसा त्याला दोन्ही हातांनी ग्रॅब करतीये

देवांचे राज्य आपण कधीच स्पॅममध्ये टाकून दिलंय
तो फक्त कन्फर्म करतोय

तो तुझ्यापेक्षा दीड फूट उंच आहे
आणि त्याची थप्पड दसपट ताकदवान

"दरवाजे बंद केले तर तो खिडक्या उघडून आत येतो
खिडक्या बंद केल्या कि तो छत फाडून आत येतो
सर छत कसं बंद करायचं ?"

हे सर्व मोबाईलमध्ये घडतंय
मोबाईल फेक स्वतंत्र हो

तुला मोबाईल फेकायचा नाही
त्यापेक्षा थप्पड परवडेबल



तू सांगतेस म्हणून
मी त्याला हिरव्या भिंती दाखवतोय
वडरमेंटमध्ये अमेंडमेन्ट  करतोय

त्याच्यातल्या मृत गोष्टींच्या आधारे मी जजमेंट देत नाहीये
त्याच्यातील जिवंत गोष्टींचे पुरावे त्याच्यापुढे सादर करतोय

प्रकाशाची राख पुन्हा प्रकाश बनतिये
भुंकणारी निगेटिव्ह शांत होतीये

मी त्याचा अजेंडा बदलून टाकलाय
आणि तो सूर्य दुरुस्त करायला
स्वतःचे स्वावलंबी हात घेऊन जगात दाखल व्हायला चाललाय

१०

एका वर्षांनी भेटू

पण तुमच्या कविता
टाईप कोण करेल सर ?

तू शिक्षण पूर्ण कर

मला तुमची शिष्य बनवा

मी गुरु बनत नाही

अध्यात्मिक असंतोषाच्या वसाहतवादी भिंती कोसळतायत

टेबलवरचे फेव्हर्स नाहीसे होऊन
शुद्ध अंतःकरणाने कॉफी पितायत

माझा झगमगाट प्रोग्रामेबल नाहीये

अब्युजेस ऍबिसिस झालीयेत
आणि तू त्यात पोहतीयेस

हे जग तुझ्यासाठी जलतरण तलाव होवो

*****
श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्य फाइलींतील कविता )