Friday, October 18, 2019

विलाप : श्रीधर तिळवे नाईक

वाघापुढं गर्जना करणारे लोक
कमळापुढं नांग्या टाकणारे लोक बनत चाललेत काय ?

वाघाचा पंजा ज्यांचा खांदा होता
राजकारणाची  जादू ज्यांच्यात जिवंत होती
ते लोक
परत न येणाऱ्या परतीच्या प्रवासाकडे चाललेत कि काय ?

छोट्या छोट्या डुलक्या सेल्फी म्हणून कुणी सादर केल्या ?
माझा भगवा संन्यासी कुडता अचानक असा राजकारणाला कुणी टांगला ?

सुरकुत्या पडलेली कोडी अशी अश्रू का ढाळतायत  ?

शेवट दिसल्यासारखे लोक काय पाहतायत ?

करोडो लाईट इयर्स दूर असणारी गॅलेक्सी दाखवून
हिंद महासागरात  पोहणारा  देवमासा कुणी जाळ्यात ओढला ?

माझ्या पायावर फक्त बुटाचं पॉलीश आहे
आणि बूट गायब आहे

पोलीस म्हणतायत जोवर पाय गायब होत नाही
तोवर आम्ही कम्प्लेंट घेऊ शकत नाही

मातीला मळ म्हणणारे लोक
निर्मला वॉशिंग पावडर विकतायत

खिडकीतून फक्त पावसाळा दिसतोय
किंवा इलेक्शनचा गाजावाजा

माझे आयुष्य एव्हढे पॉलिटिकल कुणी केलं ?

मेमरी कार्ड मागं पुढं होतंय

पिवळीधमक  गरमी  उताणी हवेतल्या हवेत
आणि अचानक पाऊस

हे हवामान आहे कि
आभाळाची डिसेंट्री ?

गरजेच्या शेवटच्या टोकावर करमणुकीचा दि एन्ड ?
कि तिथेही नवीन टायटल सॉंग ?

कल्पनाशक्ती घरंगळली कि भगवी दिसते आजकाल
वास्तववाद लालऐवजी निळा

उद्या निषेध म्हणून सूर्य काळा उगवला तर
काय क्काय नेमकं उजेडात दिसेल ?

मरायला टेकलो तरी माझं  वेटिंग लिस्टमध्ये असणं
संपता संपत नाहीये

अरेबियन गालिच्यावरचे समुद्र गुलाबातल्या गुलाबात सुकलेत

ह्या परिस्थितीत माझे खांदे उडवून
मी चलते बनो म्हणू शकत नाही

एकतर लाईक करा
किंवा शेअर करा
असे दोनच पर्याय दिले जाणार असतील
तर डेमोक्रसीचं फेसबुक गागात घालायचं आहे ?

मी स्वतःच्या हुक्कीप्रमाणं जगलो
आणि स्वतःतून पक्षी उडवले

आता पक्ष्यांना घरटी बांधायला ठेवलेली झाडेच
रातोरात कापली जाणार असतील तर
व्हायब्रेट होणाऱ्या जंगलांना घेऊन जायचं कुठं ?

दुःख आणि प्रेम ह्यांच्यापासून  माणसं बनायची
ती उगवायची  आणि मावळायची
त्यांच्या अश्रूंनाही सुगंध होता

आणि आता मी पाहतोय
तर माझा विलापही प्लास्टीकचा बनत चाललेला

झाडांच्या सावलीत ज्यांना जगायचंय
अशा माणसांनी जावं कुठं  ?

श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

वाघाला माहीत नाही
कमळ शाखाहारी कि मांसाहारी

त्यानं फक्त डोळ्यादेखत
कमळाला जंगलाएव्हढं होताना पाहिलंय

कमळात किती भुंगे आहेत
ते वाघाला खाण्याइतके शक्तिशाली आहेत कि नाही
वाघाला अंदाज येत नाही

वाघाच्या बापाला कसं सर्व सोपं होतं
बाप उजव्या पंजात कमळ घ्यायचा
आणि डाव्या नाकपुडीने हुंगायचा

कमळ कधी पंजातून  निसटत गेलं
बापालाही कळलं नाही
आणि मग पोराच्या डोळ्यादेखत ते जंगलांएवढं झालं

कमळाच्या पाकळ्या व वाघांची नखं
ह्यांच्यातील स्पर्धा
शेवटी संख्येच्या जीवावर कमळाने जिंकली

शेकडो बोटांचा हात कमळाच्या पाकळ्या उखडून उखडून थकला
पण लोटस टस कि मस न होता
घडाळ्याच्या गजर ऐकत -वाढत

कमळाभवतीचा चिखलही इतका सुगंधी झाला कि
बनवणाऱ्यांनी त्याच्यापासून उदबत्त्या आणि परफ्युम बनवले काहींनी डिओही

वाघाला चिखलाची ऍलर्जी
म्हणूनच वाघ कमळाचा भुंगा व्हायला तयार नाही

मात्र कमळासोबत असला कि
तो जंगलाचा राजा असतो
आणि राजा असण्याचं फिलिंग वाघाला आवडतं

जंगलभर कमळाची आणि वाघाची ही युती
कधी आश्चर्याने तर कधी उद्वेगाने पाहिली जातिये

दोघांचा रंग भगवा आहे एव्हढा एकच  फॅक्टर
त्यांना बांधून ठेवतो

बाकी डोळे काळीज मेंदू पाय हात नाक पाकळ्या देठ
सगळं काही वेगळं आहे

कमळाला का ते माहीत नाही
पण वाघ भुंग्यासारखा दिसतो

त्याला खात्री आहे
एके रात्री हा वाघासारखा दिसणारा भुंगा
आपल्या मोहात पडेल
आणि कायमचा आत येईल

म्हणूनच कमळाचा दरवाजा वाघासाठी सदैव उघडा असतो

आणि वाघ कायमस्वरूपी
पाकळ्यांच्या  खिडक्यांत पंजा सरकवत
सेफ डिस्टन्सवरून भगवा शेकहॅण्ड करत
पॉलिटिकली करेक्ट !

श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )