Sunday, September 24, 2017

तुज सगुण म्हणू कि निर्गुण श्रीधर तिळवे नाईक

तुकारामाच्या इंद्रायणीत बुडालेल्या वह्या
तू कोरड्या बाहेर काढल्यास
ह्यावर माझा विश्वास नाही

ज्ञानेश्वर भिंतीवर बसून गेले
ह्यावर माझा विश्वास नाही

हे माझे रॅशनल कंडिशनिंग आहे
कि आंबेडकरवादाचा प्रभाव आहे ?




चमत्कार होतात कि नाही
ते झाले तर ते लोकात घेऊन यावेत कि नाही
ते आपल्याच मेंदूचे भ्रम
कि वस्तुस्थिती ?

चमत्काराचे प्रश्न इतके सोपे नसतात
जितके ते भासतात
विशेषतः त्यांच्याबाबत
ज्यांच्या आयुष्यात ते घडतात

तू एक न्यूट्रल सोर्स आहेस
कि ऍक्टिव्ह सोर्स आहेस
हा मूलभूत प्रश्न
चमत्कारांशी जोडला गेलेला आहे




सतोरी आणि फ्लॅशेस
तू मला एकाच वयात दिलीस

केवळ करुणेपोटी
तू दाखवलेले फ्लॅशेस
मी लोकांना सांगायला सुरवात केली
आणि भक्तांचा गोतावळा
माझ्याभोवती जमा व्हायला लागला

शैवाचार्य म्हणून लाभलेले पारंपरिक भक्त
आणि हे नवे भक्त
ह्यांच्यात गुदमरायला लागलेली माझी साधना
जेव्हा इनजेलींग फील करायला लागली
तेव्हा मी कोल्हापूरपासून पळ काढला
आणि मुंबईत आलो

पण मुंबईतही तू दाखवलेले फ्लॅशेस
दरवाजात उभे राहायला लागले
आणि मी उमगलो
''फ्लॅशेसचा प्रश्न पळून सुटणार नाही ''




मी कदाचित पहिला बाबा असेन
जो भक्तांच्यापासून पळून आला

पण तुझ्यापासून कसा पळून जाणार होतो ?




भक्त होणे सोपं
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सभासद होणे त्याहून सोपं
पण जे घडतंय ते जसेच्या तसे पाहणे स्वीकारणे महाकठीण

मी बायसच्या थैल्या
कधीच डोळ्यात बाळगल्या नाहीत

चमत्कारांच्या नावाने चाललेले शोषणही
मी कधी नजरेआड केले नाही

पण तुकारामाच्या वह्या कायमच
माझा पाठलाग करत राहिल्या

तुकाराम का खोटं लिहितील ?




आणि मग तू आलास
मला अपघात झाला तेव्हा
आणि सर्वांग बदलायला लागलं

माझ्या घरातली काही काम
आपोआपच व्हायला लागली
आणि जनाबाई आठवायला लागली

ही भुताटकी कि मीच बेहोशीत काम करून
ती विसरून जातोय

जे शरीर होशमध्ये उचललं जात नाही
ते बेहोषीत कसं ऍक्टिव्ह होतं ?

एकीकडे सर्वांगाने उमलत चाललेले अवधान
आणि दुसरीकडे हे विश्राम सावधान

आणि मग तुझ्या सगुण लाटांवर लाटा



माझंही एक रॅशनल जग आहे
आणि त्याबाबत मी सजग  आहे

रॉयपासून आंबेडकरांच्यापर्यंत एक कॅनव्हास आहे
जो काळजाच्या लॅबमध्ये
डोवलानं फडफडतोय

आणि तरीही तुझी ह्या सर्वांवर पडलेली लॉजिकल छाया

काय रॅशनल आहे काय इरॅशनल
काय सगुण आणि काय निर्गुण

रॅशनॅलिजम हा माझा अहंकार आहे का
जे घडतंय ते काय आहे
कि मी रॅशनल सजगपणाबाबत पझेसिव्ह आहे ?


माझे सर्वांग बदलते आहे
आणि लोकांना मित्रांना ह्याविषयी संशय आहे

मी लोकांना मित्रांना आणि स्वलाही
फाट्यावर मारतो आहे

सत्यप्राप्तीसाठी कोणतीही किमंत मोजण्याची माझी तयारी
सनातन आहे



हे सर्व खरेतर खूप सोपे आहे

मलाच कठीण आणि गुंतागुंतीची सवय झाली होती

१०

मी नम्रपणें उभा आहे

माझ्या मोक्षात माझा काडीचाही वाटा नाही

मीच च्युतिया
जो काड्यापेट्या जाळत बसलो होतो

११

अचानक अंग मोडत चाललंय
हातात मुंग्या चढतायत

बोटांचे नाकतोडे गवत खातायत का
रक्तात ज्वालामुखीचे कलिंगड फुटतय काय
हाडांच्यात की बोर्ड कुलुपं लावत सुटलाय का


डायबेटिसवर तर मी परवा एक कविता फेसबुकवर टाकली
कवितेतला सिम्बॉलिज्म ऍक्च्युअल झाला काय ?


१२

मी शैल बरोबर चाललोय डायबेटीस टेस्टसाठी

तो मला कुठे घेऊन चाललाय मी विचारत नाही

कार जुहू क्लिनिकल लॅबोरेटरीच्या दारात उभी आहे

 त्यालाही टेस्ट करायची आहे मलाही

डॉक्टर मनसुख शाह माझी वाहिनी शोधतायत
आणि ती त्यांना सापडत नाहीये

त्यांचा चष्मा क्षणभर गोंधळतोय
आणि ते पंजाकडे सरकतायत

रक्ताचा फ्लो सिरिंजमध्ये ऐसपैस होतोय

मला रक्ताचं कायमच आश्चर्य वाटत आलंय
रक्त रोग दाखवतं आणि आरोग्यही

रक्ताच्या वाटापळवाटांतून शरीराचा मॅप उभा राहतोय

आम्ही  परततोय शैलच्या घरी

गुजराती कांदेपोहे शरीरात विरघळत चाललेत



१३

३६५ डेज विद बॉडी
शैलचे लकुलीश कुळाचे गुरु
आणि काय काय


शब्दांचा पाऊस कारमध्ये पडतोय
आणि रस्ते छत्र्या उघडत
पाणी उडवतायत

रक्ताचा लिफाफा उद्या उघडणार आहे
आणि त्यात काय मजकूर असणार आहे
आम्हाला माहित नाही


१४

मी मुंबई विद्यापीठात थिएटर अकॅडमीत
इझम  शिकवतोय
आणि येणारे कॉल मिस करतोय

शिकवतांना होणारा शारीरिक त्रास तीव्र
पण शिकवण्याची कमिटमेंट सुटत नाहीये

मी चाललोय दुसऱ्या पिरियडसाठी
स्क्रिप्ट नाट्यसंहिता कशी वाचायची ते शिकवण्यासाठी
आणि बाळकृष्ण शिर्केच्या फोन येतोय

'' रिपोर्ट काय आलाय माहित आहे ? तुझी शुगर तब्ब - ल २३५ आहे . काळजी घे ''

मी स्क्रिप्ट कशी वाचायची
ते शिकवायला आरंभ करतोय


१५

स्टाफरूममध्ये मिलिंद आणि अमोल आहेत
मी दोघांनाही माझ्या शुगरबद्दल बोलतोय

माझ्या जेवणाचा पॅटर्न मी ताबडतोब बदलतोय

तांदूळ हा माझ्या जेवणाचा मुख्य बिंदू
मी साईडलाईन करत
गव्हाकडे वळतोय

साखरेने माझा ट्रॅक बदललाय
आणि मी शरीर हाकण्यासाठी
अन्न गोळा करतोय

१६

माझा डायबेटीस हा चर्चेचा विषय बनत चाललाय

श्यामलचा फोन मग फोनमागून फोन

''च्यायला तुला कसा डायबेटीस झाला?''

''कोल्ड कॉफिच्या आणि जुसच्या अतिसेवनाने  दारू पीत नाही म्हणून लोकांच्या प्रेमाचा अनादर करायचा नाही म्हणून ह्या गोष्टी घेतल्या तर हा घुसला  सायलेंट किलर  डायबेटीस  ''


१७

मी शिकवणे सोडलेले नाही
पण सर्व काही सोर्सवर सोडलंय

मी उपाय करत नाही म्हणून काहीजण अस्वस्थ

शैल आणि मी
सातत्याने आहारावर चर्चा झोडतोय

दिवस उलटतायंत
आणि मी रात्री अनंतात उभा

''सगुण असशील तर उद्याच्या उद्या मला १०० ने कौंटिंग कमी हवे
आणि एग्झिटची वेळ झाली असेल तर मी जायला तयार आहे ''

तुझा फ्लॅश येत नाहीये
पण मीही तुकारामासारखा साकडं घालून अडून

''त्याच्या वह्या काढल्यास
माझी साखर १०० ने काढ

असशील सगुण
तर दाखव गुण  ''

१८

मी शैलला सांगतोय
''मी काल काहीतरी केलंय
मलाही बघायचंय
या तो खुदा मेरी दवा हैं
या डॉक्टर मेरा खुदा हैं ''

आम्ही suburban  diagnostics कडे चाललोय

precise testing healthier living

अक्षरे डोळ्यातून टापटिपीत सरकतायत

एक स्वच्छ माहोल नजाकतीत नांदतोय

मी मला टेस्टमध्ये सरकवतोय कि तुला
मी माझे रक्त पणाला लावतोय कि तुझे

तुझ्या नावाने चाललेले सारे धर्म सारे कर्मकांड सारा दहशतवाद बोगस आहे
हे मला माहीत आहे आणि तुलाही
तरीही ही अजमाईश का आहे
कि अजमाईश घेणाराही तूच आहेस
आणि देणाराही तूच आहेस ?

मी रक्त देतोय
आणि तुझ्या वाळूतून पाणी पितोय
जे तू माझ्यासाठी तयार केलेस


१९


माझ्यावर तीनदा प्राणघातक हल्ले झाले
आणि हल्ले करणारे लोक धार्मिक होते

मी हल्लेखोरांनाही अध्यात्मिक मिठीच मारली
आणि साधना पुढे ठेवत वाटचाल केली

आणि आज मीच तुझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला नाही काय ?

आज शून्यात टाचणी पडलीये
आणि ती मला बोचत नाहीये

मी वाहतोय


२०

मी रिपोर्ट वाचतोय
''शुगर १३४ ''

माझे डोळे हसतायंत
माझं रक्त हसतंय

मी आता मेलो तरी
मला ते मंजूर आहे

मला क्षमा कर

मी झुकतोय
मी फक्त झुकतोय



श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )