Thursday, February 28, 2019

मी आऊटडेटेड होण्याची वाट बघतोय
आणि तुम्ही माझ्या अजून तारखांपर्यंत यायलाही तयार नाही

कुठलीही क्रांती फक्त दहा वर्षे ताजी राहायला हवी
पण तुम्ही इतके नतद्रष्ट
अजूनही
१९६० ते १९८० दरम्यानचे मांस चघळत
खाण्याची आणि ढेकर देण्याची बक्षिसं घेता आहात

तुम्ही अजूनही अपेक्षा करता आहात कि
मी १९९० ते २०१० पर्यंतचे सारे मटण
तुम्हाला श्रीखंड म्हणून वाढावे
आणि तुम्ही मुखशुद्धी म्हणून
स्तुती चघळावी

मित्रांनो
डिजिटल जाऊन पोस्टडिजीट्ल आलं तरी
तुम्ही साठोत्तरी पोस्टी टाकत राहणार असाल
तर संगणकावर मोदीच अवतरणार

नुसत्या जुन्या बेंबट्या मारल्या कि पुरोगामी म्हणून
मिरवता येतं ह्या देशात
लोक असे बनेल झालेत
कि स्वतःचं मौनसुद्धा
बाजारात जाऊन ओरडून विकतायत
तुम्ही त्यांच्यातले आहात काय
स्वतःला विचारा

तुमच्या अनास्थेनंच हा अनास्थेशिया उभा केलाय
उद्या मेलेल्यांना डॉक्टर झाल्याची सर्टिफिकेट्स दिली जातील
आणि तुम्ही केवळ बक्षिसासाठी
पेशंट म्हणून ऍडमिट व्हाल

कॅपिटॅलिझम विरुद्ध सोशॅलिझम हा खेळ पुराणा झालाय
आणि धर्म तर आता ग्रीसमध्येही हेलेनिझमच्या नावाने कमबॅक करतोय
सॉक्रेटिस गोट्या चोळायला लागलाय तिथं धर्माच्या
जिथून सायन्सचा हात उगवला होता

हे गुंतागुंतीचं नेटवर्क आहे
जिथे दिलासा फक्त देव देतायत

तेव्हा पुरोगामी पिचकाऱ्यांनी ट्रोलिंगवाली रंगपंचमी खेळायचं बंद करा
जे आहे ते वसंताच्या अफवा आहे
आणि तुम्ही त्यांची नेहमीच्या देशीवादी सवयीनं
मूळं तपासत बसलाय

बसा
पुरोगामी बोटॅनिस्ट म्हणून मान्यता मिळवायला हे उपयोगी पडेल
पण एक दिवस
नसलेलं झाड खाली कोसळून
तुम्ही त्या झाडाखाली
खर्रर्रखुर्रर्र ठार व्हाल

हे भगव्या रंगाचं वादळ नाहीये
हा पांढऱ्या रंगाचा ऐतिहासिक प्रॉब्लेम आहे

तेव्हा ......

श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण चॅनेल सिरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )