Monday, July 22, 2019


 लंघन श्रीधर तिळवे नाईक 


मी लंघनाच्या तिसऱ्या दिवसात 
आणि तू समोर उभी 
तुझ्या सावळ्या त्वचेत निराधार पोरकेपणाची थरथर 

मुंबईत नद्यासुद्धा कर्कश होतात 
तिथे नात्यांचं काय 

तुला एकीकडे निर्वाण साधायचं आहे 
आणि दुसरीकडे नृत्यात करिअरही करायचं आहे 

तुझ्या गळ्यात वादळे मुसमुसतायत 

मी तुला एन्ट्री देतोय 
आणि दोन दिवस अन्न पाणी घेतलेला मी 
उपाशी पोटातून करुणा सांडतोय 



हे कशासाठी ?

शेवटी २१ दिवस हे करून 
मृत्यूशी डोळा भिडवण्यासाठी 

डोळा भिडवायची गरज काय 
देहकार्य उरकले कि नाहीसे व्हावे देहाने 
जिवंत राहून ताप देऊ नये 

तू पाहुणी म्हणून आलीयेस 
आणि ह्या लंघन करणाऱ्या माणसाशी कसं वागायचं 
ह्याने गोंधळलीयेस 

सुदैव एकच आहे 
तू सोबत डबा घेऊन आलीयेस 
जो आज तू खाऊ शकतेस 


लंघन शस्त्रक्रियेचे शास्त्र आहे 
आत्महत्येचे शस्त्र नाही 

एक फुल दुसऱ्या फुलाला सुगंध देत चाललंय 
पोटात वाळवंट आणि दाणे 

छोट्यातले छोटे सूर्य मला सूक्ष्मदर्शकातून पाहतायत 


तुम्ही बाहेर जा 

डोळे पुरावे देतायत कि 
तुला माझ्यापुढे जेवण्याची लाज वाटतीये 

मी तुझ्या भाषेतून आवाजातून हद्दपार होत 
माझ्या बाहेरच्या रूममध्ये बसतोय 


गेले तीन दिवस मी फोन उचललेला नाही 
अपवाद आणीबाणी फील झालेले फोन 
तुझा आज उचलला 

तिळवे भांडार वाचवण्याच्या तऱ्हा यशस्वी झालेत 
आणि लोक पुन्हा अफवा उडवत 

फक्त तुझे दुकान वाचते 
आणि आख्खी इमारत पडते 
तुझ्या दुकानात साक्षात महादेवाने दर्शन दिले 
आणि पाडणारे गेले म्हणे 

एकंदरच भारतीय चमत्कारांना सोकावलेले आहेत 
मी अर्धा तास समजावतोय कि हे बकवास आहे 

ह्या देशाचे खरे संविधान रामायण महाभारत आहे 
आणि देश त्याप्रमाणे खोटंखोटं जगतो 


माउस प्रगतीचे ग्राफिक डिझायनर झालेत 

मी भुकेचा इकवलायझर पेलत 
शांतपणे कन्व्हिन्स करतोय 

जिभेत पृथ्वीचे सर्वात प्राचीन  वाळवंट राहायला येतंय 
चव नाहीसं करतंय 

भूक खोटं बोलण्यात वाकबगार असते 
म्हणून मी जेवणाविषयी कधी प्रश्न विचारत नाही 

माझी इम्म्युन सिस्टीम म्हातारी होत चाललीये 

तू माझं लंघन मावळण्याची वाट पाहतीयेस 



सूर्य बासरी वाजवत उगवलाय 
उन्हांना कोवळे पाय फुटलेत 
पेरूच्या झाडाला लाफ्टर फुटतायत 

मी प्रसन्नपणे उभा आहे हिरवाईत 

चहू बाजूंनी फाटलेली माझी त्वचा 
आंघॊळ करतीये 

शून्य सगळ्या सेट्सशी 
शेकहॅण्ड करत चाललंय 

मला भूक लागलीये 
आणि तू प्रसन्न चेहऱ्याने चहा घेऊन समोर 

प्रकाश सर्वव्यापी हसतोय 

श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधील  आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )