Sunday, May 17, 2020

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग एक - श्रीधर तिळवे नाईक



कोव्हीडमधून वाचलेल्या कविमित्रांनो
कोव्हीडमधून न वाचलेल्यांच्यावतीने मी बोलतोय

मी कोव्हिडला हरवेन किंवा हरेंन
मला माहित नाही

कविमित्रांनो ,
मला वर्तमानावरून हात फिरवण्यास बंदी आहे
म्हणून मी इतिहासावरून हात फिरवतो  आहे

वर्तमानावरून हात फिरवल्यास कोव्हीड होतो
आणि कोव्हीड
माझी सहस्रके दाखवतो  आहे

इटलीत माझा होली रोमन एम्पायरचा चषक खाली पडलाय
एक इटालियन लेखिका मला पत्र लिहीतीये
ती आज जिथे आहे
तिथे आम्ही उद्या असू शकतो ह्या भयाने

ऑर्बिटरी  झालेल्या सर्वाइवलमधून
एक ज्वेलरी शॉप आणि हिरेजडित तलवार डोळे मिचकावतीये

ऍझटेक जपानी सामुराईजवळ उभा आहे
त्याच्या सोन्याचा त्याला वाचण्यासाठी काहीही उपयोग झालेला नाही
गनपावडरने त्याचे सोने बळकावले आहे

रघुजी भोसलेंच्या घरातून हजारो किलो सोने बाहेर काढलं जातंय
त्यानं अहिल्याबाई बनून हे आधीच जनतेत वाटलं असतं तर

इतिहासाला दैनंदिनी कुठे ठाऊक असते ?

इतिहास म्हणून तर कविता वाचतो आणि वाचवतो

आपण कलावंत इतिहासाला कलेतून माणसे पुरवतो
जी लाईव्ह असतात आणि काल्पनिक

कविमित्रांनो

मृत्यूची रिच्युअल्स
वाचलेल्या आर्टिफॅक्ट्समधून मला ऐकू येतायत

आपण जगतांना इतिहास जगत नसतो
आपल्या जगण्याचा इतिहास होतो

वैयक्तिक मालमत्ता थडग्याजवळ पुरून
आपण काय सेलिब्रेट करत असतो
हे कि मेल्यानंतरही माझी प्रॉपर्टी मी वापरणार आहे ?

मेल्यानंतरही?

मार्क्सचा वर्गकलह मेल्यांनंतरही पिरॅमिडमध्ये चालू ?

मृत्यूला डेकोरेट करण्याचा इतिहास
हॉस्पिटलमधून फेकून दिलेल्या प्रेतांच्यात मरत चाललाय

ही बेवारस प्रेतं आपला इतिहास कसा पोहचवतील ?

जिन्सच्या द्वारे?

शरीरात कोव्हीड व्हायरसचे जीन्स सापडले
त्यावरून सिद्ध होतं कि
मरणारा कोव्हिडनं मेला

इतिहास नेहमीच डेकोरेशन्सनी पोहचवलाय
जीन्स आपले डेकोरेशन ?

आर्यांच्या इतिहास पचवणाऱ्या याज्ञीक विटा
गोरेगावच्या आर्य शाखेत जळतायत

पोटात शैव घोडे ठेऊन
मी स्वामी विवेकानंद रोडवरून चालतो आहे

तोंडावर समुद्राचा मास्क
आणि हातात अख्खी मुंबई हॅन्डग्लोव्ज बनून

देवांच्या मूर्त्यांना कोव्हीड होत नाही
त्यामुळेच ते अमर्त्य असतात

लिखित पुरावा नसल्या कि
ह्या अमर्त्य मूर्त्याच पुरावा बनतात

मला वर्तमानावरून हात फिरवण्यास बंदी आहे
म्हणून मी इतिहासावरून हात फिरवतो  आहे

अमेरिकन संविधान मूर्ती आहे
भारतीय संविधान मूर्ती आहे
आणि मूर्तिपूजा हा हिंदूंचा धर्म आहे
आणि मुर्त्या अमर्त्य आहेत

मी वॅटचं स्टीम इंजिन माझ्या श्वासात उकळतोय
आणि ब्रिटिशांची इंडस्ट्री प्लासीकाठी उभी राहतिये

मारुती मोटरने मारुती युग आले कि मोटर युग आले ?




मरणापूर्वी सगळं आयुष्य स्पष्ट दिसते म्हणे

वातावरणातला बर्फ गरम झालाय
आणि युग वितळतंय

वेजिटेशन जमीन उत्क्रांत करत
बारा हजार वर्षाची  बाई खोकतीये पृथ्वी फुफ्फुसात घेऊन

शांततेचे कवच फुटून भाषेचा बदाम बाहेर
सावल्यांचं सावळं स्थापत्य हलतय बदाम खाताना

तिच्या गाण्यात जिनेच जिने

नाईल कुठल्याही बेडवर न झोपता झेपावतीये

सिंधू जिप्सी बनून समुद्रतीये

पाण्याच्या मांड्या आणि अग्नीचे दांडू

एक चायनीज नाक नदीतून ऍम्ब्युलन्स सोडतंय

मी होतो
आणि इतरही होते
आरंभस्थानी

आणि मी आहे
आणि इतरही असतील
अंत्यस्थानी



आफ्रिकेतील माझी प्राचीन आई
कुठलाही मेकप न करता गोरी होतीये

एक दगडाची फरशी मांस तोडत तिच्यासाठी

निअँडरथॉल तिला दफन करणारय
आणि होमो सेपियन्सकडून मारला जाणारय

मी निअँडरथॉलच्या हत्येचं ओझं बाळगावं का ?

समुद्राच्या काठाशी
आणि हिमालयाच्या किनाऱ्यावर

कोण आर्य कोण शैव
मिक्सर आणि रिमिक्स

पार्वतीच्या घाऱ्या डोळ्याचा ड्रम
आणि शंकराच्या काळ्या डोळ्याचा डमरू

मी शंकरासोबत सह्याद्रीवरून कैलासावर उड्या मारतोय

आणि शंकर माझं भुंकणं माणसाळवत

सुजलेल्या पायांनी एक बाई युगवर्तुळ काढतीये

तिच्या मांड्या टिकटिक करतायत



शुलगी ऊरमधून बढाई मारतोय
माझ्या इकवल कुणीच नाही

शहरी राज्याच्या भिंती इरेज होतायत

तेरेकोट्टा बैल ओठ अलग करत डोळे मिचकावतोय इंड्समधून

चार चाकांच्या ट्रॉलींनी काय काय भरून घेतलं पूर्व युरोपात
आणि बर्फाखाली प्रेत झोकण्याची परंपरा
कधी बंद होणारय?

पशुपतींनी भांग शोधली मेगॅस्थिनीस तिला दारू म्हणतोय

माझा आय कॉन्टॅक्ट स्टेडी ठेवणं कठीण होतंय

वारली मला सांगतोय
इथं शंकर आणि पार्वतीने शेती चालू केली
आणि म्हातारे होईतोवर ते शेती करत राहिले
मग विमानात बसून निघून गेले

आजतागायत ते विमान घेऊन परतलेले नाहीत
आणि वारली वाट पाहतायत
शंकर येईल
आणि शेती नीट करेल



जितके मरताहेत त्याहून अधिक जगताहेत
लोक वाढताहेत वाढण्यासाठी

वड म्हणजे वाढ
मी वडाभवती फेऱ्या मारतोय
कारण माझा वंशवृक्ष मला वडासारखा वाढवायचा आहे

माझ्या साठ्यात वंश वाढतोय अन्न वाढतंय धातू वाढतायत

मी पार तयार करतोय भोसकण्यासाठी

ज्याची शस्त्रें प्रगत तो मालक

शेवटी विजय हत्या करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो



रोमँटिक हिस्ट्री मी कधीच तयार केली नाही
शेवटी सीतेला धनुष्याने मारणारा राम आवडतो

नुसती कविता करणारा राम तिला आवडला असता काय

कवी लोकांनी सीता फक्त आश्रमात सांभाळायच्या असतात

मी झाडांना कापणारी करवत शोधली
तेव्हा कुठे माझे फर्निचर तयार झाले

बायकांना फर्निचर आवडते

कुदळीवर दळ
आणि नांगरावर शेती

फावड्याच्या आणि खोऱ्याच्या जीवावर
मी जमीन नाचवली

लाकडापासून चमचा तयार केला पळ्या तयार केल्या
रात्री लाकडापासून तयार केलेली फणी दिली
तेव्हा बायको मिठीत सुखी झाली



हत्तींचे दात निघतायत

हस्तिदंती टॉवर तयार होतोय
आणि मी त्या टॉवरमध्ये राहतोय

आता जंगल जगले काय किंवा मेले काय

सर्व प्राणी माझे अन्न आहेत
वस्त्र आहेत
फर्निचर आहेत
आरोग्य आहेत
आणि शिक्षणही आहेत

सर्वांचा जन्म माझ्यासाठी झाला आहे
आणि सर्वांच्या मृत्यू माझ्या हातात

मी दयाळू आहे
म्हणून काही प्राण्यांना मी पाळणार आहे





 मेल्यानंतर मला प्रिझर्व करा
मी ममी बनून स्वर्गाला जाईन
आणि देवांना विचारेन

स्वर्ग आकाशात ठेवण्याची काय गरज होती
पृथ्वीवर ठेवला असता तर ही कचकच वाचली असती

शरीर प्लास्टरत स्वर्गाकडे
मोजतंय नरकांचे आकडे



शंकर सांगून गेलेत
मळ साफ करून निर्मळ व्हा

मी मोहंजोदाडोला आंघोळ करतोय
स्नानगृह हेच मंदिर
शेजारी शिवलिंग शक्तिलिंग

नद्यांना माता समजा
शंकराने गंगेला पत्नी समजलं त्याचं काय ?

मी नवीन ट्रेंड म्हणून
नदीला माझी मुलगी समजू का ?

शेवटी पाणी माझ्यातही आहेच कि

कदाचित मी पाण्याचं सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट आहे
पाणी माझ्या धर्माचा आधार आहे

समुद्र घुसळला कि रत्ने बाहेर पडतात
हा माझा विश्वास आहे

हा समुद्र आपल्याच डोक्यात असतो हे मात्र मी कुणालाच सांगितलेलं नाही

आणि सर्वोत्कृष्ट विष आपला अहंकार

बाकीच्यांनी चिल्लर रत्ने कमावली
शंकराने हे विष पिऊन मोक्ष कमावला
आणि त्याचा गळा आकाशासारखा निळा झाला

मी शंकराची निळी वाणी आहे

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग दोन श्रीधर तिळवे नाईक




माझं आयुष्य फार एकट्याचं होतं
आणि मला खूप सारे नातेवाईक पेलावे लागले

मी मग इतका एकटा जगलो कि
शेवटचा माणूस म्हणून उरलो तरी
सहज ह्या प्लॅनेटवर एकट्याने जगेन
हा कॉन्फिडन्स मला आला

ह्या खाटेवर एकटा आहे मी
आणि माझ्यात मला
मी सुंदर दिसतो आहे



दरवर्षी येणारे पूर
आणि टिकणारी शेती

मला अजस्त्र तहान लागलीये
आणि मी पुराचे ग्लास भरून पितोय

सत्तापालटानंतर उरलेले कप
क्रांतीच्या टेबलावर

जुन्या राजवटी जाऊन नव्या आल्या
काय फरक पडला ?

सूर्याची न फळलेली पूजा
आणि चंद्राने थुंकलेली पौर्णिमा

दुष्काळ इंटिग्रेट केला म्हणून
पाऊस थोडाच पडतोय ?

नव्या राजवटी जाऊन अधिक नव्या राजवटी आल्या
काय फरक पडला ?

सूर्याच्या लिखित प्रार्थना
आणि वाळून गेलेले ढग

युरेअस नागांच्या डोक्यावरती खाणी
आणि रॅम्सेस शोधतोय सत्तेची नाणी

सिंह नुसता बसून आहे
माणसाचं मुंडकं डकवल्यावर आणखी काय होणार ?

ब्लॅक पिगमेंट रेड पिगमेंट
आणि तळाशी साम्राज्य मेल्याच्या खूणा

पिरॅमिड बांधल्याने मरण टळणारय ?



मी नाईल्समध्ये फेकलेल्या रिकाम्या बॉटल्स परत येतायत

फरोहाच्या सावळ्या नोकरांणी मग घेऊन चाललेत
झाकण सांभाळत
माझे अन्न त्यात नाहीये

काम करू न शकणारे हात
मरताना त्यांना चिमूटभर डिग्निटी हवी
आणि कोव्हीड ती देत नाहीये

प्राचीन काळापासून हेच चालू आहे

हेच -हलकट लोकांचं गुलाम बनणं

का बाबानो
आमच्यापेक्षा काय जास्ती घेऊन आला आहात ?

पेंटर त्याच्या बुटांवर डिग्निटी लिहू शकतो का ?

ब्रश वर्षभर पेंट करतात
झडून जातात

ही कविता टाईप करतांनाही मला भोवळ येतीये

ही माझी शेवटची कविता तर नाहीये

मला पाणी हवंय
आणि पाण्यावर सरकारचा हक्क आहे

सरकारचा म्हणजे कुणाचा
म्हणजे नेमका किती लोकांचा

सगळं सरकारी करा म्हणजे सगळ्या गोष्टींचा पिरॅमिड करा
असाही होऊ शकतो

शाळांना जीवनशाळा म्हंटल जातंय
मुलं प्रथम वाचायला आणि लिहायला शिकतात

मुलांनी काय वाचायचं लिहायचं सरकार ठरवतं
म्हणजे काही माणसं ठरवतात

काही माणसं
ज्यांच्या गांडीवर खुर्चीच्या आकाराचा तीळ असतो
आणि तिळा तिळा दार उघड म्हंटले
कि ज्यांच्यासाठी सत्ता दार उघडतात

लोकांना काही माणसांतून काही माणसं निवडण्याचं स्वातंत्र्य आहे
मात्र निवडणुकीला कुणी उभं राहायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही
तरीही हे संविधान मजबूत आहे ह्यावर विश्वास ठेवा

सत्ता समोर ठाकलीये
अमुलेट्स आणि ब्रेसलेट्स
दोन्हीवर सेठ देवाचं डुक्कर आहे
आणि सेठ देव व्हायोलण्ट आहे

सुवर्णतारमंडित भांड्यात कुणाचं रक्त भरलंय ?
हत्या पहा आणि विसरून जा
फ्रॅहॉज लक्ष्य ठेवून आहेत

आल्बस्टर जार कासवाच्या पाठीवर काय करतोय ?
बाउल्स रिकामी होतायत

पॅपेरस स्क्राइब पचवत ठेवतोय धान्याचे हिशेब
जे दुरून कवितेसारखे दिसतायत
किंवा प्रिस्क्रिप्शनसारखे

ती मला भेटण्यापूर्वी फक्त आजारी दिसायची
आता भेटल्यावर माझे डोळे तिच्यात उडाले
आणि ती मृत्यू पहात असल्यासारखी पहात राहिली
तिला वाटले मास्कमधले तिचे डोळे मला वाचता येणार नाहीत

तिच्या हातातलं ईजिप्शियन बास्केट माझ्या आठवणींना
गोळा करून न्हेत होतं
आणि तिची मोरपंखी कॉलर
सिलेंडर बेडपासून बनलेली
तुटत चालली होती

मी म्हणालो हे बरंच आहे
तिची कॉलर तिचा गळा दाबणार नाही



मांसाहार ही चैन आहे
सामान्य माणसाला न परवडणारी
मात्र मासे आणि बिअर उपलब्ध आहे

खाटीक आणि खाटीकखाने
श्रीमंतांसाठी आरक्षित आहेत

बार्लीसाठी जहाजे
उत्तरेकडून दक्षिणेकडे जातायत
न थांबता

मी वल्ही वेळवतोय
वारा वळेल तसा

नदीप्रवास
कधी नाईलमध्ये कधी गंगेत कधी यांगत्सिमध्ये

पाण्याला बूड नसते
पण बुडबुडे असतात
ते खूप बडबडे असतात
माणसं पाण्यावर खूप शांत होतात
कारण देहातले बुडबुडे
पाण्यात प्रवास करतांना ऐकू येऊ लागतात

मला माल हवा

माझ्या देवांना उदबत्त्या हव्यात
माझ्या राजाला तांबं हवं

ह्या लाकडी बोटी घेऊन
मी आयुष्यभर प्रवास करू शकतो
कंडिशन एकच योग्य जागी योग्य माल

मला राजाबरोबर पिरॅमिडमध्ये मरायचंय

देवा ,
तुला त्यासाठी किती उदबत्या हव्यात ?


श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग तीन  श्रीधर तिळवे नाईक



दोन्ही महायुद्धे आणि फाळण्या
आता बॉलिवूडच्या आणि हॉलिवूडच्या सेटवर घडतायत

कदाचित काही वर्षांनी कोव्हीडचंही हेच होईल
ट्रॅजिडीज स्वभावतः कमर्शियल असतात
फक्त हिरोला हॅप्पी एन्ड दिला कि झालं

मी ईजिप्शियन लोकेशनवर जाऊन परततोय

एयरपोर्टवर ज्या हवेत आपण पोहलो ती हवा आणता येत नाही
एक अनिश्चितता आपल्यासोबत लॅन्ड होते

माझे श्वास अद्यापही दुःख लिहायला घाबरतायत

मास्क विकणारा स्वतःहून चालत येतोय

मी नाकाला तयार करतोय

मृत्यू माझ्याबाजूने साईडवॉक घेतोय



कॉसमॉस केऑस आहे
ही कदाचित अफवा आहे
किंवा कदाचित सत्य आहे
किंवा केवळ हवा आहे
आणि हवा कशाचीही असू शकते
अफवा कशावरही उडू शकते



ममी केसचा पाठलाग चुकवत
तांब्याचे मांजर काशीला धाडत
माणसाच्या चेहऱ्याचे पक्षी फेव्हिस्टिकने ढगाला  चिटकवत
व्हाट्सपवर भूषणने पाठवलेले फोटो शेअर करत

मी हेडरेस्टवर डोकं ठेवतोय

आई विचारतीये
तू लग्न केलं नाही
भूषण मुलांना जन्म देत नाही
तुम्हा दोघांना वंशाचा दि एन्ड हवा आहे का ?

मी आयुष्याचा शेवटच्या क्षणाचा पोकळपणा आता गावा का ?



मी माझ्यातल्या मींची टॅली करणं सोडून दिलंय

आता तर कळत पण नाही माझ्या देहात कोण मेला आणि कोण जन्मला ?

तुझं लॉजिक हातात लागत नाही दोस्त म्हणतात
मी म्हणतो
मी संपूर्ण देहाचं तर्कशास्त्र आहे

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग चार   श्रीधर तिळवे नाईक



धर्मग्रंथ न वाचताच लोकांना धर्मराज्य हवंय
असं आक्रीत फक्त भारतातच घडू शकतं

युरोपियन प्रथम भारतात आले तेव्हा
धड तीन टक्के ब्राम्हणांनीही वेद वाचले न्हवते
आणि तरीही त्यांना वेदांचा अभिमान होता
आणि वेद अपौरुषेय आहेत ह्यावर त्यांचा विश्वास होता

इथे पुराणात वांगी नाहीत मेंदू आहेत
ज्यांचे भरीत बनवता येते
आणि त्या भरीताला भारत असं नाव देता येते



कुऱ्हाडींना स्टेट्स सिम्बॉल बनवणारे युरोपियन कसे दिसत होते ?

स्टोनहेंजच्या फटीत माझा हिरोसारखा फोटो
आणि समोर त्याचे स्टेट्स चेक करणारी हिरॉईन

स्विस नाईफ घेऊ कि इंग्लिश तलवार घेऊ
व्हिलन मारायला

युगानयुगे कर्मबायबल  सांगून भडकावणारा व्हिलन सम्पवायला

त्याच्या डोक्यावर ऊर्नफिल्ड हॅम्लेट

मी शिरस्त्राण फोडण्यासाठी भाल्याला सॉकेटमधून प्रज्वलित करतोय

त्याचे  स्कँडिव्हियन रेझरने साफ केलेले गाल

नेब्रा डिस्क मला मुहूर्त सांगत नाहीये

कितीकाळ मी ब्रिटिश व्हिलनला असं खोळम्बवून ठेवणार आहे
माझ्या ट्रान्सकलोनियल  मनात ?


श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ५  श्रीधर तिळवे नाईक



मी वाट पहायलाही तयार नाही
कारण वाट पाहणाऱ्याच्या पायाखाली \
ही संस्कृती वीट देते
आणि अठ्ठावीस युगं  उभं  करते

असं कोण राहील उभं
आणि तेही अठ्ठावीस युगं ?



मी हिंडतोय
फुलपाखरांसारखी अनप्रेडिक्टेबल अडव्हेंचर्स करत
बेंचवर बसणाऱ्यांना
मी माझ्या साहसांचं मूल्यमापन करू देणार  नाही

मी टरच उडवणार त्यांच्या बाकांची क्लासरूम्सची
आणि विद्यार्थ्यांना रंग लावून
खिडकीतून उडून जाणार

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ६ श्रीधर तिळवे नाईक


ह्या देशात १३० करोड लोक आहेत
आणि करोडमागे एक ह्या न्यायाने
१३० सॅड न्यूज माझी वाट पाहतायत रोज

मी कुणाकुणाचं दुःख साजरं करू
कोणकोणत्या बातमीवर ?

माझी संवेदनशीलता मी बातम्यांच्यावर अवलंबून ठेऊ का ?

मला सामाजिक बांधिलकीइतकी
सामाजिक बधिरतेचीही गरज आहे
ह्या मीडिया युगात

इंद्रियांनो ,
प्रत्यक्ष व्हा
मला तुमच्या वर्तुळात जगू द्या
जिथे एक दुःख बातमीविरहित प्रत्यक्ष वाटेल



न्यूज पॉप्युलेशन वाढतीये
पोएट पॉप्युलेशन वाढतीये

ज्यांनी टीआरपी कमावला
त्यांनी गल्ला जमवला

तुर्कस्तानात माझा मित्र आजारी आहे
त्याच्या दरवाजावर देव पहारे देतायत

इंडिया असो कि तुर्कस्थान
गेटवे सांभाळली कि शिवेवर वीरगळ कमी सापडतात

एक मांग न्यूज घेऊन जिवाच्या आकांताने धावतोय
संध्याकाळपर्यँत पोहचला नाही तर ठार मारला जाणार आहे

पूर्वी पाटील होते
आता मालक

न्यू एज मां थोडे सुटाबुटात हिंडतायत एव्हढच

आणि हो टचेबलही आहेत यु नो ?





चोचदार सुरईतून गळणारी दारू

हतीती हतीती हुतूतू हुतूतू

स्पर्श झाला कि आउट

स्पर्श झाला कि आउट?

माझ्या देशाला अनटचेंबलिटीचं वेड लागलंय काय ?



ह्याला स्पर्शफोबिया म्हणू का डॉक्टर

टच न करता सुधारणा कशा होणार डॉक्टर

म्हणून तर लॉकडाऊन म्हंटल्यावर शिरले आपआपल्या त्वचेत



पैसा संरक्षणावर खर्च होतोय
सरकारं युद्धाच्या भीतीनं कर्जबाजारी होतायत

ह्या प्रदेशाचा मुख्य देव वादळाचा देव आहे

दरवाजे उडवून लावणे हे त्याचं मुख्य क्वालिफिकेशन आहे

माझा मित्र दरवाजावर उभा आहे
आणि माझ्या काळजात वादळ आहे

देव ऑन होऊ नये म्हणून मी काय करावं ?



माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ७ श्रीधर तिळवे नाईक



अल्जीयन पॅलेससमोर  होमर इलियड वाचतोय

ऑलिव्ह तेलाच्या ओघळघण्टा वाजतायत
माझ्या कानात

दारू देऊन धान्य विकत घेण्याचा सोहळा पार पाडला गेलाय
आणि होमरने आता ओडिसी वाचायला घेतलंय

राजवाडे पुन्हा पुन्हा बांधले जातायत
रादर पुन्हा पुन्हा बांधावे लागतायत


बैलाच्या दैवी पोटात वाजणारे भूकंप
आणि माझा कोल्हापूरमधला थरथरणारा नांगर

होमर अजूनही महाकाव्य वाचतोय
कोल्हापूरपर्यंत आवाज जाईल इतक्या मोठ्या आवाजात



महाराष्ट्रातला कान्हा आणि उत्तरेचा श्रीकृष्ण
ह्यांच्यातील फरक मला माहीत आहे

पुरोहितांची गफलत करून टांग पसरण्याची सवय मला माहीत आहे

पर्फ्युमनी भरलेले जार मी व्यापारात  सोडतोय
शेवटी ज्याला व्याप झेपतात त्यालाच व्यापार झेपतात

स्टॉपर नसलेले ऑक्टोपस पॉट्स माझ्या नजरेत अनंत होतायत

माणसांच्या श्वास घेण्याच्या तऱ्हावरून मी माणसे ओळखतो
प्रचंड परफ्युम गोळा करणारी माणसे फुलांबाबत निर्दयी असतात

राजांना सोन्याचे डेथ मास्क घालून मायसेनियन निरोप देतायत
आणि होमर मला विचारतोय
मी लिहिलेलं सगळंच काल्पनिक न्हवतं पटतंय का ?




रिच्युअलीक भांड्यावरचा डॉल्फिन कधीही उडेल

तीन पायांचे भांडे कधीही जेवण शिजवायला सुरवात करेल

मी सीटॅडलमधील तीर्थक्षेत्रे प्रसादाबरोबर सम्पवतोय

शेवटी सारे प्रासाद देवाचे प्रसाद
शेवटी चोझन वन फिलॉसॉफी सर्वत्र

काय बॉलिवूड आणि काय मिनोअन

सुशांतची आत्महत्या तरीही थांबवता येत नाही
आणि युद्धे चोझन वनांना टाळता येत नाहीत

कि त्यांच्यामुळेच होतात ?
कळत नाही

हत्या , आत्महत्या आणि अंत
कायमच अनाकलनीय

सार्कोफॅगसवर पवित्र बैलाचे रक्त वाहिले जात आहे
पहा

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ८ श्रीधर तिळवे नाईक



धुळीच्या ढगापासून पृथ्वी तयार झाली
आणि आता माझ्यात धूळ आहे
ढग आहे
आणि पृथ्वीही आहे

मीही पृथ्वीबरोबर उत्क्रांत होतोय
आणि माझ्या रक्तातही
दगडांची उलथापालथ
चालूच असते

माझ्याबाहेर एक सूर्य नावाचा
गरम गॅसचा राक्षस आहे
आणि त्याची गरमी सहन करणं
कधीकधी फार अशक्य होतं

मी जगतोय मंगळ ते शनी
बुध ते चंद्र
ऍस्टिरॉईड ते धूमकेतू
ह्यांच्या दरम्यान

माझी भाकरी धुळीची उत्क्रांती आहे
आणि कपडे धुळीचे विणकाम

धुळींच्या शेपट्या पकडण्याची ताकद माझ्यात नाही
मात्र धुळीत चेहरे पाहण्याची ताकद
मला ढगात चेहरे पाहून पाहून अवगत आहे

हलक्या गोष्टींच्यापासून बनलेला  सूर्य
जड गोष्टींच्यापासून बनलेल्या पृथ्वीपेक्षा वजनदार आहे
हे कळल्यापासून
मी कुणालाच हलक्यात घेत नाही

मी सूर्याची पूजा करतो आहे
कारण माझ्या प्रकाशाचे उगमस्थान सूर्य आहे
मी जाणतो

सर्व धर्मांचे उगमस्थान सूर्य आहे
किंवा आभाळ

सूर्याच्या प्रकाशविना सर्व निर्जीव आहे
आणि दिसतही नाही

आणि जे दिसत नाही
ते सजीव असले तरी काय फायदा ?

अदृश्य मला घाबरवते
कारण त्याचा मुकाबला अवघड

मी बुध ते मंगळापर्यंत दगड बघतो
गुरु शनीचा गॅस

गॅसचा त्रास मला नाही
पण गॅस माझ्याही आत थोडा आहे
त्याचा धुळीशी नेमका काय संबंध आहे
मला माहीत नाही

लाखो  वर्षे मी ह्या पृथ्वीसोबत तरंगतोच आहे
आणि इतका तरंगूनही मला कळलेलं नाही
बुटक्या ग्रहांच्यात आणि माझ्यात फरक काय?

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ९ श्रीधर तिळवे नाईक



मी पणी आहे कि फिनिशियन
मला माहीत नाही

पळून गेलेल्या पायांना धर्म नसतो
संस्कृती नसते

गाणारी बेटं आणि नाचणारा समुद्र
ह्या दरम्यान आम्हांला आपल्या बोटी स्थिर ठेवाव्या लागतात

लोक म्हणतात
आमच्या मांड्यातसुद्धा ब्रेन आहे

बायब्लॉसच्या बायलाईन्स आत्महत्या करायला निघालेल्या वीजांना
घेऊन परतायत

टायरचे टिम्बर घर बनवायला लागते
आणि घरं आवश्यक असतात

मृत्यू टॅन करतोय पाण्यावर
आणि लाटा दर क्षणाला बदलते टॅटू घेऊन पोहतायत

अनातोलियाच्या मोडून पडलेल्या जहाजावर
मी इतिहासाची वखार काढलीये

अफगाणिस्तानातले टिन अद्याप टिनपॉट नाहीये
आफ्रिकेतले हस्तिदंत आणि शहामृगाची अंडी तेजीत

कॅननमधले सुवर्णालंकार व्यापारी टोपी घालून
मला विकायचेत

शेवटी तिळवे भांडार चालवणाऱ्याकडून
त्यांनी काय शेती करून घ्यावयाची ?



दुकानदारांना प्रतिष्ठा नसलेल्या भुक्कड मराठी संस्कृतीत मी जन्मलो
आणि कवी झालो

नोकरदार भाषेला व्यापारी भाषा करायचं कसं ?

व्यापाऱ्याला फक्त लुटायचं असतं अशी धारणा असणाऱ्यांच्यात
तुकाराम मराठाच होऊ शकतो
वाणी नाही
भले मग त्याने कधीही मी मराठा वा मी क्षत्रिय असं लिहिलं नसेल
आणि मी वाणी वा मी शूद्र यातिहीन असं दहा ठिकाणी म्हंटल असेल

युद्धे सतत चाललेत
कधी हा येऊन लुटतो
कधी तो

वर्चस्वाच्या डॉगशीट प्रदेशात
राजधान्यांची बदलती भूछत्र
आणि प्रत्येकीला राजवाड्याची लाकडी गरज

झाडं कापतांना खूप कठोर व्हावं लागतं
काळजाचा स्फटिक करून
त्यावर तांबं ओतावं लागतं

भावना ऑन ठेवून झाडांचा खाटीकखाना चालवणं अशक्य

खटाक!



सालोमनला जहाज बांधून देतोय

ब्रॉन्झच्या बाउल्समध्ये उन्हाळे आणि हिवाळे

पेट्यात शस्त्र

हिंसेचं पाप शस्त्रं तयार करणाऱ्याला
कि वापरणाऱ्याला ?

शांतता हवी
आणि शस्त्रं आम्हीच तयार करणार आणि विकणार

कारागिरी खूनीच असते

आता बघायचं
युद्ध करायला गेलेले
वस्तू खरेदी करायला
कधी परततात ?

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १०  श्रीधर तिळवे नाईक



नदीच्या काठी शवं पार्क केलेत

रोड सिल्कमधून वहात पश्चिमेत

सहा जिंकून सातव्याची निर्मिती
राज्य पेंटिंगसारखं निर्माण झालंय
आणि गिफ्ट म्हणून वाटण्यात आलंय

शतकं निर्माण होतायत दफन होतायत उंटांच्या तांड्यात

मीही उंटावरचा शहाणा चाललोय चीनमधून
सिल्क घेऊन

व्यापारी म्हणजे गुणवत्तेची गॅरंटी राजा
गुणवत्ता निवडायची गुणवत्ता विकायची
व्यापारीच गुणवत्तेत फसवायला लागले कि समज
राज्य भ्रष्टाचाराकडून गिळलं जाणारय

माझा बाप ओरडतोय
आणि मी चांगला माल निवडून युरोपकडं

सरदार भांडतायत म्हणून चीन राजानं पगारी नोकर निर्माण केलेत
मला मलिक अंबर तेच करतांना दिसतोय
आणि पुढे शिवाजीही

सरदारांची सरदार होण्याची लायकीच नसते काय
कि प्रत्येक आमदाराला मंत्री
प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्री
आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याला पंतप्रधान व्हायचं असतं
म्हणून बंडाळ्या होतात ?

आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना पगारी नोकर करावं काय ?

म्हणजे ते बंडी घालतील
आणि थंड बसतील



समान लिपी समान मापं समान चलन समान पापं

राजा देव तियांचा अंश जसा वैष्णवांच्यात राजा विष्णूचा
एक शिवच काय तो राजांत अवतरत नाही
पुढे तोही अवतरायला लागेल

राजांना दैवी होण्याचा शौक
कुठल्या देशात नाही ?

हान वंशीय बौद्ध धर्म स्वीकारणार अशी अफवा आहे

पर्वताच्या आकाराची झाकणं प्रत्येक जारला
जणू जार गुंफा लपवून ठेवतो

उदबत्यांचे बर्नर हातोहात विकले जातायत
मी इंडियात उदबत्या घेऊन जाऊ का
आपले इंडियन देवही खूषच होतील कि उदबत्त्या सुंघून ?

स्वतःच शरीर जेडच्या सुटात टिकतं म्हणून
प्रत्येक राजाला जेड सूट मेल्यावर

बुद्ध आयुष्यात आला म्हणून काय होतं ?

माणसाला सुटात टिकायचंय

शेवटी उदबत्तीही किती टिकते
त्यावर तिची किंमत अवलंबून नाही का ?



घट्ट झाला आरसा कि चेहरा बनतो
त्या चेहऱ्याचा मग वारसा बनतो

वारश्याला गंज चढे लोखण्डाचा
गंज मग काही काळाने गांजा बनतो

चढत जाते नशा अशी  गांजाची कि
सिंहासनावर चढून गांजा राजा बनतो

राजाचे अनुकरण प्रजा करते
नशेक्कड पसरत पसरत जनता बनतो

मी उंटावरचा शहाणा
उंटावरून उतरून
उंट विकून
शहाणा बनतो



राजाच्या जिभेवर जेड
तोंडावर जेड कानावर जेड

जिथे छेद तिथे जेड

जोवर चेहरा तोवर अमरता
टिकवा टिकवा टिकवा
राजाचा चेहरा टिकवा

हॅट्स बदलतायत कि डोकी बदलतायत ?

स्मशानरक्षक त्वचेवर ड्रॅगन ओढून बसलाय

छातीवर जेड डिस्क
डिस्को करत

हिरव्या सर्पन्टाइल बॉडीज सर्वत्र

मला ७०००० पैकी ७००० कामकरी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय

माझी माणसं राबतायत
आणि जे सेवक राजाबरोबर दफन होणारायत
ते मला मी त्यांना कामकरी म्हणून कामावर घ्यावं
आणि त्यांना वाचवावं म्हणून विनंती करतायत

मेल्यानंतरही ज्यांना सेवेसाठी
सेवक लागतात
त्या शासकांची लायकी काय

स्वर्गात तरी एकट्यानं जावा भx व्यांनो

श्रीधर तिळवे नाईक








Saturday, May 9, 2020

मी जिथे जगतोय
त्या जागेवर माझ्याही पूर्वी कोणी मेला असेल

मी त्याबाबत अनभिज्ञ नाही

पण आत्ता ह्या क्षणी ही जागा मी जगतोय

हेही खरंच कि उद्या कोणी तिसराच
ही जागा जगेल

पण आत्ता ह्या क्षणी ही जागा मी जगतोय

ह्या जागेतच मी कैद आहे
आणि सुटकाही ह्या जागेतूनच होणार आहे
आणि बाहेरून स्वातंत्र्य भोगून आल्यावर
पुन्हा मी ह्याच जागी जगणार आहे

ही जागा मी आत्ता ह्या क्षणी आनंदी का बनवू नये ?
======================================