Monday, January 11, 2021

आईस दिलेले वचन 

शिवांनी वचन दिलंय पार्वतीला 

कुठेही असलो तरी एका तपात 

परतेनच परतेन 

शिव परततोय किमान एकदा बारा वर्षात 


शंकराचार्यांनी वचन दिलंय आईला 

आयुष्यात पुन्हा एकदा घरी परतेन 

परततायत 


बसवेश्वर वचन देतायत आपल्या दोन्ही बायकांना 

बाहेर असलो तर किमान एकदा येईनच प्रत्येक महिन्यात 

येतायत 


मी तुला वचन देतोय 

भारतात कुठेही असलो तरी 

वर्षातून एकदा घरी येईन 

मग तू कोल्हापुरात अस कि गोव्यात 


आणि हा चैत्र गेला वैशाख गेला 

हां हां म्हणता कार्तिक आला 

आणि मी कोव्हिडच्या कैदेत 


आयुष्यात प्रथमच वचनभंग होतो कि काय 

ह्या प्रश्नात 


संन्याश्यांनी दिलेले  वचन प्राणावर बेतले तरी मोडूं नये 

अशी खूणगाठ आहे 


मी भेटतोय दरवर्षी 

कधी चैत्राच्या वसंताला तू पदरात कसं साठवलं आहेस ते पाहायला 

कधी वैशाखाच्या उन्हाचे रॅपर डोक्याला गुंडाळायला 

कधी आषाढाच्या  गुरु पोर्णिमेतला चंद्र तपासून परत द्यायला 


नवरात्रींचा शाक्त पाउलपंचनामा खिळून 

तुझ्या त्वचेच्या इंटेरियरवर 

दिवाळीचे कुबेर आणि यम 

तू शिवलेले पोशाख घालून उंबरठ्यावर 


"तू व्हावास म्हणून गणपतीला नवस केला 

तर गणेश विसर्जनाला तूच नसतोस

तो शंकर तुला कसा फळणार माहित नाही " 


मी उजू  किंवा भूषणने पाठवलेले फोटो पाहून 

गणेशोत्सव भिनवलेला आहे कित्येकदा डोळ्यात 


आपल्या मिटींगा कधी सफोकेट झाल्या नाहीत 

कि तुझ्या मिठीतल्या नद्या कधी माद्या झाल्या नाहीत 


शुद्ध स्वरांचा कॉन्टिनेन्टल ऍड्रेस कधीच बदलला नाही 

तुझ्या मातृमुखी कपाळावरचा 

तुझ्या भव्य कपाळाचा पर्चा  

मी उसना  घेतला  जीन्समधून 

बुद्धीचा संतापविलासही 

पण संतापातही सोर्स कधी हलला नाही 


गावानं शिव्याही घातल्या वर्षातून यायला लाज कशी वाटत नाही म्हणून 


मी चालत राहिलो शिवातून शक्तीतून बुद्धातून शून्यातून 


आत्महत्या करता येत नाही म्हणून संन्यासी झालेले शेतकरी 

मालकाने काढून टाकल्यावर दुसरं कुठलं काम जमत नाही म्हणून संन्यासी झालेले कामगार 

बायकोपीडित नवरे 

आणि क्वचित एखादा मोक्षजडित ध्यासाची तलवार बाळगणारा मोक्षकु 


पुढील जन्म कोणी पाहिला 

ह्याच जन्मी मोक्ष पाहिजे 


"शब्द संन्याश्याना वापरतात 

आणि भाषा संन्यास बिघडवते 

अशा काळात कशाला पाळायला हवं दिलेलं वचन"

मथुरेत एक संन्यासी विचारतोय 


"तुम लोगोमे ड्रेस नही होता क्या " 

एक जर्मन विचारतोय भक्तिवेदांतामधून 


आईवर प्रेम करणं वेगळं 

आणि आईत अडकून पडणे वेगळं 


तेरा लॉजिक समझमे नही आता श्रीधरभाई 

मुझे तो आप संन्यासी कम डॉनही ज्यादा लगते हो 


तू नकुलीश दर्शनाची प्रतिष्ठा आहेस 

आर्य तक्लीफ देंगे फितरत हैं उनकी अडियल रहना 


भाषा स्विंग होतीये 

मी ब्लॅक होलसारखा आ वासतोय 


शिव विचारतोय 

तू माझ्यासारखा कधी होणार 

मी म्हणतोय 

मी तूच आहेस 


शिव हसतोय 

म्हणतोय 

संन्याशाला पाण्यापासून पूल बनवावे लागतात 


ह्या पापड गल्लीत आरंभही खिंचंताण आहे 


हिसका फ्लोट होतोय 


क्षणांचे आरसे वितळतायत काळाच्या अणुभट्टीत 


हृदय हे कुलूप नाही चावी आहे 

हे कितीजणांना कळतं ?


माझे वचन हृदयापासून आलं होतं 

आणि आता वचनभंग होतोय कि काय 

अशी हृदयात शक्यता 


रक्ताला विरक्त करणारा संन्यास 

शंकरानी कधीच शिकवला नाही 

मात्र रक्ताला आसक्त बनवणारा संन्यासही 

त्यांनी कधी सांगितला नाही 


आसक्ती आणि विरक्ती 

ह्यांच्यादरम्यान जो रक्त समतोल ठेवतो 

तो संन्यासी 



आस्था आणि अंतर सारख्याच आनंदाने साजरा करणारी माझी हाडे 

मी लोकांच्या बर्थडेचे पाढे कधी पाठ केले नाहीत 

अगदी तुझाही जन्मदिवस कधी लक्ष्यात ठेवला नाही 

आणि स्वतःचाही अनेकदा विसरलो 


तू मला भेटतोस तोच माझा बर्थडे 

तू म्हणाली होतीस 

त्यावेळचा तुझा आवाज आनंदाला प्लेनसारखा उडवत होता 


आणि आणखी एकदा गणेशोत्सवाला पोहचलो तेव्हा 

गणपती म्हणजे आपले ज्ञान 

वर्षातून किमान एकदा विसर्जित केलं पाहिजे 


आणि कधी न्हवे ते दिवाळीला एकदा 

तू म्हणतीयेस 

बल्बच्या प्रकाशात दिवाळी कसली 

काही सण अंधारात शोभतात 

दिवाळी त्यापैकी एक 


वर्षातून एकदा माझ्या देहात तू शिल्पकाम करतेस 

वर्षातून एकदा माझ्या मुळांचा तू ऍड्रेस सांगतेस 

वर्षातून एकदा एका एपिसोडमध्ये तू संपूर्ण आयुष्य रिटेलीकास्ट करतीयेस 


ह्यावर्षी ह्यातील काही होणार आहे कि नाही ?

कि कोव्हीडच्या दारात वचन दम तोडणार आहे ?


मी पुन्हा पुन्हा क्वारंटाईन होतोय 

तुला पाहण्यासाठी 


माझ्या उगमाची तूच तर सुरवात 

बाहेर आणि आत 


तू बीग बॅंग होतियेस 

पुन्हापुन्हा 


श्रीधर तिळवे नाईक 

Sunday, January 10, 2021

 सूर्याचा लिंबू पिळतोय उन्ह 

क्षितिज मॉलजडित भिंतींच्यासारखं कॉस्मोपॉलिटिन 

श्वास आखडल्यापासून सगळंच आखडल्यासारखं वाटतंय 

पेरू वरुण धवन सारखा उभा कॉमिक मस्क्युलर 

कुठली सना खान त्याला दिसतीये माहित नाही 

तो स्वतःला कुली नम्बर एक समजत नाहीये 

बहुदा हा अधिकार त्यानं गोविंदासारख्या माणसांना दिलाय 

गरुडांचे पंख कोमेजलेले नाहीत

पण पेरू अजूनही त्यांचे रहिवासस्थान नाही  

पोपट अजूनही उत्तराधुनिक न झालेल्या फांदीवर हिरवेगार बसतायत 

पवार आणि त्यांची फॅमिली कोव्हीडमधून परतलीये 

मी खातोय महेश पवार ह्याने रिकमेण्ड केलेली अंडी आणि केळी 

व्हाईट अँड यलो कम्बाईन नजर खिळलेली माझ्या चेहऱ्यावर 

शेवटी खाणाऱ्याचा चेहरा खाल्ले जाणाऱ्यांना कसा दिसत असेल ?

पेरूची पानं वाऱ्यात पोहतायत 

हे पृथ्वीमाते ,

झाडांना कोव्हीड होत नाही म्हणून शुक्रिया 


श्रीधर तिळवे नाईक