Sunday, August 2, 2020

गेट वेल सून श्रीधर तिळवे नाईक



मागचं अख्ख परड
तुम्ही नावावर करून घेतलत
आणि मी इस्टेटीचा मोह बरा न्हवे
म्हणून ते सोडून दिलं

तुझा कुठला डोळा अधिक लालची
डावा कि उजवा
मला कळलं नाही
फक्त दोघे एकमेकांना पाहून हसत होते
आणि जो अधिक लालची होत होता
तो अधिक हसत होता



वादळी खिडक्यांतून येणारी खेळणी
मी स्वीकारली नाहीत
पानगळीच्या प्रचंड शाळा
तुझ्या अंगणातल्या
मी अटेंड केल्या नाहीत
मी मासे खात नाही
पण जाळे लावलेले मला कळते

सगळे खुनी सभ्य चेहरा करूनच आले माझ्या आयुष्यात
आत्मे कधीच चिरतरुण नसतात
तेही शरीराबरोबर म्हातारे होत जातात

तुझ्या ओठांवरचे भाषिक बेसमेंट
गनिमी कावा बांधण्यात उस्ताद

चालताना गावात
अनेक माणसे भूतांबरोबर बोलत असतात

आकलनाच्या सुरवातीला पुस्तके
आकलनाच्या शेवटी धुर्तपणा

मी काय करू राजा
आणि मला आलेला फ्लॅश

समाजशास्त्र कर
किमान प्राध्यापक होशील

तू पुस्तकांची नावे विचारतोयस
आणि मी सांगतोय

कृतज्ञतेचा हिप्नोटिक माहोल दरवळत क्षणभर
आणि मग मी तुला कसा वापरला ह्याचा दर्प सुसरीसारखा तुझ्या डोळ्यात

राजा म्हणजे एक नंबरचा च्युतिया माणूस
भोळाशंकर
तू माझ्याच दोस्ताला सांगतोयस
आणि तरीही शंका आली कि माझ्या वळचणीला येतोयस

मार्गदर्शन घेण्याचा कृत्रिम अविर्भाव
मी खूपवेळा सोसला आहे
आणि तू कसाही असलास तरी
माझा चुलत भाऊ आहेस म्हणून
मी तो झेलतो आहे



एका क्षणात कोसळून
दुसऱ्या क्षणात कोसळण्यासाठी जाणे
ही गावाची जीवनशैली बनत चाललीये हल्ली

सर्व गमावून पुन्हा सुरवात करणे
हे शेतीत नवीन नसते

शेतकऱ्याएव्हढी रिस्क फक्त सैनिक घेतात
आणि अनेक सैनिक शेतीलाही ज्यादा झालाय म्हणून
सैन्यात पाठवलेला

आपलं बरं आहे
व्यवसाय आहे
आणि मंदिर आहे
शाळा हवी ?
श्रीधर तिळवे बालवाडी आणि मग पुढे
मिठाई हवी ?
तिळवे स्वीट
जेवण दारू हवी ?
तिळवे भोजनालय
पान सिगरेट ?
आमचेच पान शॉप
किराणा माल
प्रभाकर तिळवे किराणा भुसार साबणापासून स्लिपरपर्यंत
भाजी ?
आमचीच
वकील हवा ?
दत्ता तिळवे सुरेल तिळवे
निसर्ग पाहायचाय
आसपास पहा हवा तेवढा निसर्ग
तबला मृदूंग हवे
रमा आहे दीपक आहे
ज्योतिष फलज्योतिष तत्वज्ञान दर्शन साहित्य सगळं ऑल इन वन
श्रीधर तिळवे
गणपतीच्या मुर्त्या
आम्हीच बनवतो

आणि तरीही समस्या असेल तर
रवळनाथ मंदिर
शैव असल्याने सर्व जाती धर्मांना खुले

आपण चालते बोलते मॉल आहोत आपल्या गावात
आणि तरीही आपली अस्वस्थता संपत नाही



घरटी एक टू व्हीलर किमान
एक लॅपटॉप किमान
रस्ता अजूनही सफाईदार

आपण कायमच डेव्हलपमेंट सेलिब्रेट केली
तरीही असमाधान संपत नाही

पंचायतीत किमान एक पंच आपला
आणि अनेकदा सरपंच आपण
तरीही चिंतांचे पतंग उडणारे

कायम ब्रोकन चेहरे
आभाळ फिक्स करणारा स्क्रू आपणाजवळ नाही

अनएन्डिंग मिसअंडरस्टँडिंग

काय खुपतंय
सुरे तर आपण कधीच वापरले नाही राजकारणात

गांधी मुरवून घेतले
असंख्य गांधील माश्या आणि चावे पेलत

होईल तितके भले केले
आणि तरीही नष्टतेचा नाष्टा चुकत नाही

दूधसागरासारखी कोसळ कानात तुकडे कोंबणारी

भावा
तुझ्या अनलिमिटेड तृष्णा फक्त तुझ्याच आहेत
कि सगळ्यांच्या आहेत



एकत्र कौल लावते ते कुल
तिळवे नाईक ह्यांचे संकुल

कधीकाळी मुली एकमेकातच दिलेल्या
सुखी संसाराची गॅरेंटी
माहेर तेच सासर
तिळव्यांनी नाईकांच्यात द्यायच्या
नाईकांनी तिळव्यांच्यात

आज्ञा देणारा साक्षात रवळनाथ

आजोबा जे बोलायचे
ते खरे व्हायचे

त्यांचे फ्लॅश जनेटिकली माझ्याकडे जीन्समधून

तू मला विचारतोयस
हे फ्लॅश मला ट्रान्सफॉर्म करू शकशील

तू ते बाजारात जाऊन विकशील
आणि फ्लॅशेस
नॉट फॉर सेल
बिकॉज दे आर स्पिरिच्युअल



आपण तुळूनाडमधून आलोय कि कैरीमधून
वाद चालू आहे

आपण तूळव कि तिळवे
वाद चालू आहे

आपण नायक कि महाजन कि तिळवे
वाद चालू आहे

कर्नाटकातील एक
दागिने देऊन गेलेला
परत मागतोय
आणि तू म्हणतोयस
दागिने ठेवलेच न्हवते

मी म्हणतोय
हे चूक आहे
तू म्हणतोस
जग असंच आहे

घर आणि दागिने इतके महत्वाचे ?

तू संत असशील राजा
पण मी ह्या जगात जगतो

बरं झालं मी ह्या गावात नाहीये
तुम्हाला परवडलो नसतो



तू घर चढवतोय्स
आणि आमच्या भिंतीवर चढतोयस

मी ओळखतोय
ही संतापायची जागा आहे

मी कोल्हापुरी हिसक्यात बोलतोय
जे तुला अनपेक्षित आहे

लालसेला एकच भाषा कळते
आणि मी त्याही भाषेत बोलू शकतो

तुझा अंधार माझे दात घासतोय
आणि मी त्याला कोलगेटच्या ट्यूबमध्ये धाडतोय



कुणाचं चुकतंय
कुणाचं चुकतंय

करणारा तुमच्या कुळातच आहे

कोण आहे कोण आहे

देव गप्प

मी गावात नाहीये ते बरं आहे



राजा मोक्ष मिळवलेल्या माणसाला दुखावलं
कि खूप आपत्त्या येतात
हे खरं आहे का ?

आजारी पडलायस

हो

१०

कुणाचं चुकतंय
कुणाचं चुकतंय

करणारा तुमच्या कुळातच आहे

कोण आहे कोण आहे

देव गप्प आणि तुझा कबुलीजवाब
मीच केलंय सर्व

शिव्यांचा मार बेशुमार

११

आणि आता तुला कोव्हीड झालाय

लाऊड स्मॉल आवाज

तुझे डोळे कुरळे झालेत

एक टिपिकल निष्काळजीपणा
भेट द्यायला आलेला
कॅरियर

डायमंड कॉलर मातीची झालीये

वाढदिवसाची गिफ्ट
अख्खे कुटुंब करोनात लिफ्ट

आता प्रत्येकाला स्मशानाशेजारी राह्ल्याचा फील

राखेची सुंदर रांगोळी
आणि गोळी
आत्मा ड्राय करणारी

मला प्रथमच वाडा पाडून सेपरेट घरं बांधली
हे बरं झालं असं वाटतंय

कुठल्याही आजारपणात खांदे उडवून चालणारा मी
प्रथमच धीरगंभीर

आजाराची आवेगी यात्रा सुरु

तू कसाही असलास तरी
प्रथम माझा चुलत भाऊ आहेस

तुझे काळे बदक शुभ्र राजहंस होवो

तुझ्या जादूटोण्याची फुंकर वाऱ्याला भिडून मरण पावो

तुझे वासनेचे ढग चांगुलपणाच्या स्वर्गात शुद्ध होवोत

काळ्याला सरमिसळ करणारी तुझी बोटे पांढरी होवोत

तुझ्या जंगली भुकांना स्मॅश करणारा स्मॅशर तुला तुझ्या आत सापडो

गेट वेल सून ब्रदर
अँड टेक केअर
ऑफ इनर अँड आऊटर

श्रीधर तिळवे नाईक

बायजींसाठी एक कविता



गेले कित्येक दिवस आपण भेटलेलो नाही

सगळं जग एक सिम्युलेशन बनून गेलंय प्लास्टिकचं
जिथे व्हर्चुअल रियॅलिटी कॅट वॉक करतीये
मांजराच्या शोधात
जिला वाघ म्हणून पाळता येईल

हिमालयाच्या उंचीवर बसून आपण गायली आनंदाची गाणी
आणि बर्फाचं आईस्क्रीम बनवलं प्रत्येक क्षणातल्या

लोक म्हणायचे
तिळव्यांच्या घरी मजा येते

मग समुद्र शेती करायला आला दुःखांचा
आणि आपण मीठ फुकट मिळतंय
ह्याच सेलिब्रेशन केलं

झेनचा झोन आपण कधी बदलला नाही झोत बदलले तरी
आणि खांद्यावर तर नेहमीच टिकवली श्रावणाची तरतरी

उपयोगी पुरुषांच्या रांगा बिझनेस टेबलवर लागणे बंद झाले
साखर दाखवणारे सिग्नल मंद झाले

आनंदाला मतदान करू
जिंकू किंवा मरू



तू माझी बहीण आहेस ह्याचा मला कायमच अभिमान वाटला

केवळ xxx सेठचा लैंगिक ससेमिरा नको म्हणून
भाऊंनी बंद पाडलेली तुझी नृत्यसारणी

आणि पु ल देशपांड्यासारखे लोक
सेठकडे पाणी भरतांना
ज्यांना माहीतच नाही
वारुणीच्या ग्लासात किती बलात्कार आहेत ?

रोमँटिसिझमचे एजन्ट आंधळे असतात

नृत्य बंद पडल्यानंतरचा तुझा आकांत
आणि तुझ्या सुरक्षिततेसाठी म्हणून घेतलेली काळजी

बापांना मुलींच्या श्वासात व्हिलन म्हणून वावरावं लागतं

आणि मग कधीतरी मी सांगितलेल्या कारणांची मीमांसा
आणि आपला बाप व्हिलन न्हवता ह्याने तुझा उजळलेला चेहरा

मी खूप आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं का ?

मी भाऊ बोलतील म्हणून वाट बघत राहिलो
आणि मग भाऊच गेले

आजही मला प्रश्न पडतो
घरातील दोन व्यक्ती एकमेकांशी बोलू शकत नसतील
तर इंटरनेट काय भोकात घालायचंय



एकमेकांच्या वाऱ्यात आपण डान्स अनुभवले

एकमेकांच्या पृथ्वीवरून चालतांना
कधी फुलांचा लवाजमा उगवला
कधी काट्यांची गुंडगिरी

लोक डबल एजन्ट बनत असतांना
आपण पाण्यासारखे वाहिलो एकमेकात

तुझी दुःख सोसत लाम्बवण्याची शैली
मला लांबून ओळखायला शिकावं लागलं

काय केलं नाहीस आमच्यासाठी ?

दुसरी आई बनलीस
प्रेमाची फॅक्ट बनलीस

विश्वास जळणाऱ्या होळ्या पेटल्या तेव्हा
दिवे दाखवणारी टॅक्ट बनलीस

मग जतीन एक दिवस म्हणाला
मला माझ्या आईसारखी बायको हवी होती

मी म्हणालो
अशक्य तेच मागतोयस
ह्या युगात
फक्त मॉडेल्स मिळतात
फेक हालचालींच्यापासून बनवलेल्या
ज्यांना स्वतःलाही कळत नाही
जेनुइन म्हणजे काय

जेव्हा गंगा प्रदूषित होते
तेव्हा दोनच चॉईस
स्वप्नात जलपरी
हातात बिसलरी



राजा
आमच्याकडं फ्लडच फ्लड

पाण्यावर आशिकी चाललीये आमची
उपासमारी येत नाही हेचि भाग्य

हाडांच्यातच काहीतरी चुकलंय ह्या सिस्टीमच्या
कॅल्शियम खात नाही बहुधा ऑनेस्टीचं

कोल्हापूरला पाण्यात बुडवणे
हा राजकीय धंदा आहे

भरपाईच्या नावाने पैसे
कर्जाच्या नावानं पैसे

एव्हढ्या पाण्याचं करायचं तरी काय
आपले तर फक्त दोनच पाय

तुझा निडरपणा अजूनही शाबूत आहे

आयुष्याला मी घाबरलेली नाहीये रे
पण आयुष्यानं तरी मला सतत का घाबरावं

तुझी नात तुझ्याजवळ नाहीये
हिसकावून न्हेलीये

जतीनची उदासीनता मलाही कळते
पण कट्यारी वाट्याला आला म्हणून
आपण लिंबू कापून
सरबत पिऊ नये असं थोडंच आहे

जख्मासकट जगायला शिक



आम्ही आजऱ्यात बाहेरून येणाऱ्यांना शेतात पाठवतो
क्वारंटाईनला

मी म्हणतो छान आहे

मग लॉकडाऊन उठले
आणि लोक फटाफट गावात शिरले

कसले शहरी लोक रे
शेतात रहायचं नाही म्हणून घरात पळून जातायत
आम्ही अडाणी गाववाले बरे कि

सगळं ऑड झालंय
ह्या शहरी लोकांनी आजार पसरवला बघ

आपण खूप दिवसात भेटलो नाही राजा
हो आपण खूप दिवसात भेटलेलो नाही बायजी

खूप दिवसात बटाटयाच्या कापांनी
माझ्या पोटावर सर्जिकल स्ट्राईक केलेला नाही

खूप दिवस झाले
हवा नवीन बाळासारखी फ्रेश हसलेली नाही

खूप दिवस
आभाळ तारकांचा तोरा दाखवायला आलेलं नाही

खूप दिवस झाले
भाऊजींच्या मिशीतल्या मिशीत हसण्यातून
चांदणं सांडलेलं नाही

खूप दिवस
जतीनच्या बाईकवरून रस्त्यांचा पाठलाग केलेला नाही

खूप दिवस
दिवस आलेच नाहीत

श्रीधर तिळवे नाईक


अजून आपली सारी पानं गळून गेलेली नाहीत श्रीधर तिळवे नाईक

अजून आपली सारी पानं गळून गेलेली नाहीत

अजून आपले झाड जिवंत आहे

अजून माझ्या खाण्यात चमचाभर माणुसकी
अजूनही भयाचे स्विंग क्रिकेटबॉल इतके लाईट
अजूनही कणांच्या सरफेसवर ताजेतवाने दव
अजूनही शर्टावर प्रेमाने फिरलेली कमर्शियल इस्त्री

आंघोळ करतांना मुलांचा निरागस दुधी  कलकलाट
ताज्या हवेची प्रोफेशनल झुळूक अजूनही
ग्लासवर ठेवल्या जाणाऱ्या शांततेच्या गोळ्या म्हातारे टिकावेत म्हणून
तेहरांमध्ये बुरख्याआड वाचली जाणारी लोलीता

बेस्टच्या बसचं माणसांची वाट पाहणारं इंटेरियर
अजूनही एकमेकांचे दिले जाणारे शेअर्स प्रेमाने
श्वासोश्वास व कोव्हीड  ह्यांच्या दरम्यानचे हेलकावे
खोकणाऱ्या सेलफोनमधून आवाजांची चौकशी

आळशी माणसांना सांभाळून घेणारे कष्ट ऑफिसमधील
ओल्ड मन्कमध्ये दफन होणारे हसरे पण दारुडे पिरॅमिड
फम्बल मारणाऱ्या स्वप्नांना सांभाळणारे स्ट्रगलर
कुलूप दिसत नाही तरीही वाट पाहणाऱ्या चाव्या

इंटरनेटवर असेल पण माणुसकी तरी आहे
आतमध्ये  अजून आनंदाची  तरतरी आहे
अजून आपली सारी पानं गळून गेलेली नाहीत
अजून आपले झाड जिवंत तरी आहे

श्रीधर तिळवे नाईक


मरणं , नाहीसे होणं , सेंड ऑफ देणं
तरंगणं हवेतल्या हवेत प्रेतासारखं
आणि जिवंत परतणं स्वतःच्या शरीरात
नेटवर्कमधून स्वतःला सोडवून घेणं
मोबाईलवरून डायल करणं स्वतःला
रिपोर्टमधून तपासणं स्वतःच्या श्वासाची कसर
आनंदणं स्वतःच्या श्वासाचा डान्स शाबूत बघून
टच टाळणं टचवर ठेवून स्क्रीनच्या आणि
स्किनला लँडफोनसारखी फिक्स बघून हळहळणं
विचारानं टॉर्च फिरवणं भोवताली
नजर लावून छताला पाहणं आणि कल्पना करणं
आकाशाची
उधळणं शब्दांमधून लहर येईल तसं तरंगीत
हातातले ग्लोव्ज शाप असल्यासारखे पहाणं

फेसबुकवर चाळणं चाळवाचाळवीला
जिवंत असण्याचा अदमास घेणं लाईव्ह सेलिब्रेशन
पोस्ट म्हणून टाकणं
आणि वाचणं जिवंतपणाची बातमी
घरातल्या घरात

लॉकडाऊनमधली क्वारंटाईन स्वगते 

श्रीधर तिळवे नाईक