Tuesday, November 26, 2019

सत्ता



सत्ता संविधानातून निर्माण होते
कि संविधान सत्तेतून निर्माण होते ?

मला कळत नाही

नद्यांत समुद्र राहतो
कि नद्या समुद्रात राहतात
कि दोघेही ढगात राहतात ?



मतदार मेला तेव्हा सर्वच नेते उपस्थित होते

कुणी म्हणाले
बॉल लागून मेला
कुणी म्हणाले
बॅट लागून मेला

कुणीच म्हणाले नाही
सामना बघून मेला



मेळा आणि मेला
टाईप करताना एकसारखे एकमेकाजागी येतात



डायटिंग करणारा मुलगा
मेला त्यावर हसतोय

एक टेपवर्म टेपा लावतोय
मृत शरीरासमोर
एक डास कोकोकोला पितोय
मृत शरीरावर
एक हात पांढरा तांबडा रस्सा पितोय
एक पाय स्वतःच पुनर्घटन करतोय

विजयाचे केक आणि स्टेक
सारख्याच आनंदाने कापले जातायत

ह्याला मी लोकशाहीचा उत्सव समजावं का ?



मुंग्या ऍनॅकाँडा तोंडात पकडून चालतायत

मी स्वर्गाच्या कुठल्या पार्ट मध्ये पार्ट टाइम जॉब करतोय ?

मी फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणून राष्ट्रवादीच्या  क्लायंटला दिलेला आकडा ५४ होता
आणि क्लायन्ट तो १०० टक्के खरा झाल्याने डान्स करतोय

त्याच्या बुबुळाचे हेडलाईट्स टीव्हीवर चमकतायत

दोऱ्या आणि तंतू हातात धरून
कोण सत्ता विणणारी सुई तयार करतंय ?
आणि माझा त्यात सहभाग किती ?



सामान्य दुपारी असामान्य होतायत
सामान्य रात्री असामान्य होतायत
सामान्य सकाळी असामान्य होतायत

राजकारणाची भेळ राजाभाऊंपेक्षा चविष्ट होतीये
राजकारण स्टिअरिंग व्हीलवर बसून आहे आयुष्याच्या

डोक्यांना प्रॉपर बॉडीज सापडत नाहीयेत
स्वर्गवासी झालेला मतदार आता स्वर्गातून पाहतोय

त्याला कळत नाहीये
नरक म्हणतात तो हाच काय ?



"पार्टी विद डिफरन्सला हे ह्याहून डिफ्रन्टली करता आलं असतं"

"पवारांच्या डोक्याला सोन्याचे टाके आहेत"

"काँग्रेस म्यानेक्वीनसारखी दिसतीये ह्या रंगमंचावर"

"उद्धव ठाकरे भाजपने अँपॉईंट केलेल्या फ्रिजमधून
बाहेर आल्यासारखे दिसतायत"

"अजित पवार तर कायम सॉससारखे"

लोक एकमेकांशी बोलतायत
आपल्या नेत्यांविषयी बोलण्याचा त्यांचा हक्क
अद्याप शाबूत आहे



कित्येक दशके आमची ओळखपरेडच चालू आहे

पंख लावून हे युग असेम्बल करता येईल का ?

सर्वांच्याच तोंडाला कडू कारल्याची चव

सत्तेची स्वीट डिश अद्याप अदृश्य

आश्चर्याची भीती वाटू लागलीये

त्या सुंदर मुलीला ब्रेकिंग न्यूज देण्याचं वेड लागलंय



नितंबांचे कर्व
गाडी चालवून ठीक होतात काय ?

सेफ्टीत बसून बसून
आमदार फोमपासून बनल्यासारखे दिसतायत का

आमदारांना न्हेणारी बस येतीये का

चॅनेलची निवेदिका प्रश्न विचारतीये

मॅडम
हा सूर्य मला आज ना उद्या गिळणार आहे
त्याला थांबवता येईल का ?

मॅडम
प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोत
किमान एकदा खोलवर डोकं खुपसायचं असतं
ते साधत नाही ह्यावर उपाय आहे का ?

मॅडम
माझी बायको म्हणते
तिचे केस तिचा मुकुट आहे
हा सत्ता शोधण्याचा प्रयत्न आहे का ?

मॅडम
फक्त कॅमेरामन पाहू नका
फक्त रिपोर्टर पाहू नका
मी टीव्ही पाहतोय मला पहा


१०

गोष्टी एकदा चुकीच्या गेल्या
गोष्टी दुसऱ्यांदा चुकीच्या गेल्या
गोष्टी तिसऱ्यांदा चुकीच्या गेल्या

आम्ही गोष्टीच चुकीच्या निवडल्या होत्या काय ?

११

भगवान शिवांनी हे कसं हाताळलं असतं ?
भगवान महावीरांनी हे कसं हाताळलं असतं ?
भगवान बुद्धांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा बसवेश्वरांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा फुल्यांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा गांधींनी हे कसं हाताळलं असतं ?
बाबासाहेबांनी हे कसं हाताळलं असतं ?

जे मेलं ते पुन्हा परतणार आहे का ?
कि नव्या बंदोबस्तासाठी पुन्हा सर्व मेलं पाहिजे ?

१२

मी अपमान स्वच्छ धुवून स्पॅममध्ये टाकलेत

इन्स्टंट अमानुषतेचं करायचं काय ?

लोकशाही लोकशाहीत मिसिंग आहे
आणि तिची लिंक सापडत नाहीये

प्रत्येकजण किंमती आहे
ह्याचा अर्थ प्रत्येकजण किंमत देऊन खरेदी केला जाऊ शकतो असा आहे

राष्ट्र मार्केटनं रिप्लेस केलंय
आणि आपण सर्वच ह्या राष्ट्रीय मार्केटचे शेअर होल्डर आहोत

संचालकांच्यावर आपली सत्ता नाहीये

ह्यापुढे आरोग्य कायमच कॅन्सरशी बोलत राहणार

सत्ता आपल्या आयुष्याची टाइमलाईन आहे

मी तिला फेसबुकवर ठेऊन
स्वतःच्या स्वायत्ततेत परततोय

श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सीरीजमधील  आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )