Saturday, August 17, 2019

माझ्या डाव्या पायाच्या उखडल्या गेलेल्या नखा



मी कधीपासून तुला पाहतोय
आठवणी साठत न्हवत्या तेव्हापासून कदाचित

तू पृथ्वी गोळा करत रांगायला लागल्यापासून कदाचित
कदाचित वसंताचे स्वातंत्र्यदिन साजरे करायला शिकलो तेव्हापासून
कदाचित गर्भाशयात अंधारातही बागा चार्ज करायला शिकलो तेव्हापासून कदाचित
आईने दिलेल्या पाठीला टेकून बसलो तेव्हापासून कदाचित

मला आठवतही नाही तेव्हापासून मी तुला माझ्या डाव्या पायावर पाहतोय
आणि आता तू पाण्याने उखडून टाकल्यावर मलूल होऊन पडल्यावर
मी तुला पाहतोय

नरकांच्या ब्रा आणि स्वर्गाच्या पॅंटी घालून संपल्यावर
बाईला जे वाटेल
तसे काहीतरी मला वाटते आहे

तुझे नागवेपण मला चिरडून टाकते आहे



माझे सुंदर निमुळते पाय
हा एकमेव सुंदर अवयव होता माझ्याकडे

" तुझे पाय असे बायकांच्यासारखे सुंदर कसे "

"कारण मी पोटेन्शियल अर्धनारीनरेश्वर आहे "

बायकांशी होणारा माझा हा टिपिकल डायलॉग
आता सॉक्रेटिसच्या संवादासारखा फक्त ऐतिहासिक आणि मेलेला होऊन जाणार आहे



पाणी माझ्या पायांवर चालून येईल असं कुठं वाटलं होतं ?

रस्त्यावर पाणी नाही
आणि जमिनीतून उगवलेल्या पाण्याचा घरात महापूर
अशी ही अभूतपूर्व स्थिती

पाणी रानटी बनले कि उगवणारी
माणूस शहरी होऊन बेफिकीर झाला कि त्याला झोपेतून हलवणारी

फरश्यांचं मांस खात पाणी जनावरासारखं उगवतं
तेव्हा काय करायचं ?
क्युसेक क्युसेक्स कर रहा हैं ?
हे कळेनासं झाल्यावर काय करायचं ?

माणसाला भूक लागते
आणि माणूस जगायला झक मारत घराबाहेर पडतो

बाहेर महापूर असो वा दुष्काळ
भुकेला अन्न शोधण्याखेरीज पर्याय नसतो



अजितचं ऑफिस व्हीनस कॉर्नरला पाण्यात
तिळवे भांडार त्यामुळे ठप्प

शब्दांचा आशय मरून गेलाय
आणि फक्त आवाज उरलाय

अहंकाराची धूळ करत पाणी सर्वत्र

" तुझ्या संभाजी नगरच्या घरातून पाणी घेऊन जाऊ का
फक्त तुमच्याच एरियात  पाणी आहे  "
" जा "

कोल्हापुरातला माझा एरिया अख्ख्या कोल्हापूरला
पिण्याचं पाणी पुरवतोय
आणि इथे मुंबईत मी पाणीदार होत
जमिनीतून उगवलेला महापूर डोळयात रिपीट करतोय



" दादा आमदार  सुदिन ढवळीकर
आपल्या घराला आपदग्रस्त घर म्हणून भेट देणार आहेत काय बोलू ? "

भूषण विचारतोय

काय बोलायचं असतं ?

मतदारांनी आमदारांशी काय बोलायचं असतं ?

" डोंगरातल्या खाचा बुजवल्या त्यामुळे डोंगरावर पाणी न साठता न झिरपता
थेट आमच्या घरावर आदळते
आणि झाडांची मूळं जीर्णशीर्ण करत त्यांना हलवते
परिणामी जी वादळं झाडांना हलवूही शकत न्हवती
ती आता झाडांना उखडायला बघतात
तेव्हा डोंगरातील खाचा पुन्हा निर्माण करा "

आमदार डोंगरातील खाचा पुन्हा निर्माण करणार आहेत का ?
आमदार डोंगरावरील झाडांची हत्या थांबवू शकणार आहेत का ?

काही वर्षांनी डोंगर बोडका होईल
आणि त्याचे टक्कल घरांच्यावर पाणी घेऊन चालून येईल

मतदारांनी आमदारांशी काय बोलायचं असतं ?



आपदग्रस्त असणे म्हणजे काय ?

मदतीचा हा अर्ज
न्हवे हा अर्ज
न्हवे न्हवे न्हवे तो अर्ज

वाहिनी अर्ज भरतायत

आपदग्रस्त म्हणजे फक्त अर्ज भरणे ?



आमदार कायमच मतदारांशी संबंध साधून आहेत
त्यांनी गावातील जवळ जवळ प्रत्येकाला आस्थेवाईकपणे मदत केलेली आहे

पण आमदार झाडांना नद्यांना आणि डोंगरांना मदत करणार आहेत का ?



भूषण आमदारांच्या भेटीने समाधानी आहे
आणि मला भूक लागलेली आहे

मी बिननावाच्या जिन्यावरून
बिननावाच्या पायऱ्यांवरून
बिननावाच्या पाण्यात शिरतोय

पाण्याने पाय गिळलेत
आणि मला चालत जायचंय

तू पाण्यात पोहतंयस
जणू पूर म्हणजे पावसाळ्याने तयार केलेला स्विमिंग पूल



लोक महापुरात बसून
महापुराचे व्हिडीओ फोटो काढतायत

लोक महापूर बघायला जाऊन
महापुरापुढे सेफ राहून सेल्फी काढतायत

लोक महापूरातील लोकांना व्हिडीओ फोटो काढत
काळजापासून मदत करतायत

लोक फोटो व्हिडीओ फाट्यावर मारून
फक्त करुणेने महापूरग्रस्तांना मदत करतायत

१०

घरातून उगवलेले पाणी
रस्त्यावर न उगवल्याने
आमचे पाणी
खाजगी ठरलंय

आम्ही आमचे खाजगी पाणी
सार्वजनिक रस्त्यावर फेकतोय

सुदैवाने हा गुन्हा नाही

११

मीडियाचा महापूर महापुराचा मीडिया
मालूम नही कहाँ गई उडकर सोनेकी चिडियाँ

१२

तू पायांसोबत भीजत चाललयस
आणि मला माहीत माझी नखांची सर
पाण्याकडून असरग्रस्त होतीये

१३

पाण्याने गोवा कोल्हापूर मुंबई एकत्र बांधलेत
आणि तिन्ही ठिकाणी आभाळ
मूळ धरत नाहीये

१४

तुझ्यात पाणी काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहितंय
आणि मी कवी असूनही मला ते कळत नाही

१५

पाण्यापासून होणारी इन्फेक्शन्स

सकाळी इनोसन्ट असणारं पाणी
रात्री खून करू शकतं

तू माझ्या अंगठ्याचा सितारा आहेस
टाचलेला
आणि पाणी तुला सैल करतंय

१६

तुझ्या मुळाशीही मॅट्रिक्स असतं
आणि त्यांना सावली असते

तुझ्या खोडावरही  बेडअसते
ज्याच्याविषयी मी फक्त कल्पना करू शकतो

तुझ्या क्युटिकलवरच पाण्याचा हल्ला झालाय 
आणि तुझ्या प्लेट पाण्याला बळी पडून
स्वतःला घडी घालतायत

१७

तू अंगठ्याचे शिंग आहेस
आणि तरीही तुला लोक ढक्कन समजतात

गेंडागिरी ही अशी आमच्या नसानसांत भिनलेली

१८

प्लेट अलग होतीये
जणू पृथ्वीचा एक खण्ड अलग होतोय

नख माझ्या डोळ्यात तरंगतंय

माझा विश्वास बसत नाहीये

सर्व काही सोडून नख ?

डाव्या अंगठ्याचे एकुलते एक नख ?

१९

मी मेलो तरी बोलत राहीन पासून
मला प्रगाढ शांततेत मरायचं आहे पर्यंतचा माझा प्रवास

मी म्हणायचो
माझ्या फक्त बोटांना अपघात व्हायचा बाकी आहे
बाकी सर्व अवयवांचा नम्बर लागून झालेला आहे

मग एकदिवस बोटं फॅनमध्ये घुसली
आणि मला वाटलं हा पूर्णविराम आहे

आता कळतंय
मी नखांना विसरलो
आणि त्यांच्यातील एक तुलाही

२०

प्रश्न फक्त ऍनाटॉमी खराब होण्याचा नसतो
प्रश्न सौंदर्याचाही असतो

ठेच लागली तेव्हाच ते धोक्यात आलं होतं
डॉक्टर म्हणाले
काही काळजी करू नका
रक्त गोठलय
हळूहळू निवळेल

२१

मी तुझं लालशुभ्र शव पाहतोय

तू पुन्हा कधीच परतणार नाहीस
हे मी जाणतो

उखडल्या गेलेल्या आणि  गळून गेलेल्या गोष्टी
माझ्या आयुष्यात कधीच परतल्या नाहीत

२२

नखांची सर
तू गेल्यावर मला जास्त कळती आहे

जगात काहीच क्षुद्र नसते
हा धडा देऊन
तुझे शव माझ्यापुढे चुपचाप आहे

मी तुला कचरापेटीत फेकू
कि मॉन्युमेंट म्हणून तुला डबीत ठेऊ ?

२३

नशीब कि पाण्यानं द्रोणाचार्यासारखा अंगठा मागितला नाही
फक्त नख मागितलं


श्रीधर तिळवे नाईक

Tuesday, August 6, 2019

पावसाळा २०१९



मी पाण्याशी कधीच डील करत नाही

मी फक्त तरंगतो

कधी लाटांवर
कधी वाऱ्यावर

नाममुद्रा उमटवणारी टांकसाळ माझ्यातून गायब झालीये

चलन रद्द करून
मी फक्त हालचालीत जिवंत आहे

तुझा श्वासोश्वास चालू आहे

आणि घर गळतंय



छप्पर डम्ब करून माणसाने जावे कोठे ?

मी नाकाचा स्ट्रा करून पाणीबंद आवाजात
हवा घेतोय

मुंबईत पावसाळा एकीकडे गरम करतो
दुसरीकडे गार

माझे रात्रीचे जागणे आता सवयीचं झालंय

बादल्या भरून ओतण्याचा प्रोग्राम
मी एन्जॉय करत पार पाडतोय



मला वाटलं तू फक्त अस्मानी  घेऊन आलायस
आणि कोल्हापुरात तिळवे भांडारवर सुलतानी  कोसळतीये

दगडी चेहरे भिंती खातायत

फरश्यांचा फ्रीडम स्ट्रगल चालू आहे

शटर डाऊन डाऊन चा घोष

जगात तुम्ही प्रॉपर्टीशिवाय काय सोडता ?

ह्या पृथ्वीवर फक्त पंचमहाभूतं अमर आहेत

सद्या जमीन भांडण पेटवतीये आग भांडण पेटवतीये त्वचा भांडण पेटवतीये
अलीकडे पाणी आणि भविष्यात श्वास

माणूसवाढ घश्यात दाढ

बिल्डर निघून गेलाय
आणि मी पाण्याच्या ग्लासमध्ये
बुडलेल्या बापाला बाहेर काढतोय



मला आता ह्या गेममधे मजा येतीये

आयुष्याची लीला पाण्यातून वाहत असेल
तर पोहणाऱ्याने स्विमिंग कॉस्च्युम काढून ठेवावा हे बरं

जिथे अभाव असतो
तिथे सत्य उमलते

विषुववृत्त विषवृत्त बनले तरी
माझा गळा अमृताचा आहे

लाटांचा ढीग बनवता येत नाही
म्हणून पाणी फक्त साठतं

तुझा पावलांचा आवाज कधी शिड्या चढत येतो
कधी उड्या मारत

आई झोपलीये
भूषण झोपलाय
वहिनी झोपलीये

आणि तू एखाद्या सुरीसारखा
दोन काटकोन त्रिकोणात
झाड कापतोयस

झाडानं माझ्या घरात उन्मळून जावं हे बरं न्हवे
आणि फक्त फांद्या तोडून
अख्खा गावाची वीज घालवण्याचा प्रोग्राम
आधीच पार पडलेला

तू काहीतरी झाडाबाबत काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहतोयस
आणि तुझ्या क्रिएटिव्हिटीविषयी पूर्ण अंधारात असलेले माझे लोक
झोपेच्या अंधारात अरण्य ऐकतायत



कडाक

झाड खोडात तुटून
थेट छपरांवर

फांद्यांचा पिसारा घेऊन

पाणी कुणाच्याच बापाची परमिशन घेत नाही हे खरं
पण ते झाड असं कर्वतीसारखं सहसा कापत नाही हेही खरं

तिरपा छेद कौलांच्यावरून घरात कौलं मोडत

आईचा गँगरीन झालेला अपंग पाय थरथरतोय
भूषण झोपेतल्या झोपेत दचकलाय

मुंबईत तू गोळ्या झाडत येतोयस
कोल्हापुरात बुलडोझर चालवत
आणि इथे आता कर्वतीसारखा

एकाचवेळी तिन्ही ठिकाणी तू पेंच बनून उपस्थित

माझ्या वर्तमानाचा शर्ट फाटलाय
तुझी ओली प्रेमळ माया थोडी अतिरेकी झालीये

मी भूषणच्या त्वचेवरून रांगत चालतोय
मी अजयच्या टोपीवर सापासारखा डुलतोय

वहिनीचे शेतकरी भाऊ शेतीची सगळी कामं टाकून
बहिणीच्या घरी

रातोरात लाकडं अरेंज करणे
रातोरात कौलं मॅनेज करणं

सगळं गाव सिमेंटची घरं बांधत असतांना
मी ही २१५ वर्षाची कौलारू विरासत अट्टाहासाने टिकवून

मातीच्या भिंतीवरचा भक्कम विश्वास पैलवानासारखा सांभाळत

कुठलाही बुद्ध काळ बरा करू शकत नाही
कुठलाही बुद्ध पाण्याचा तंटा कायमचा सोडवू शकत नाही
कुठलाही बुद्ध काळाचा बदल दुरुस्त करू शकत नाही

तो काळाबाहेर जातो
तो पाण्याबाहेर पोहतो
आणि पावसाळे आनंदाने झेलतो
वा करुणेने पेलतो

स्मृतींची मृगजळे भूषणमध्ये तयार होतायत
आई स्तब्ध

सुरेलची पोस्ट फेसबुकवर
असेच राहिले तर बाजाराचा रस्ता नागेशी नदी म्हणून ओळखला जाईल

बिल्डर विचारतोय
तुमच्यामागे कुठली शक्ती आहे

घरमालक मुंबईत म्हणतायत
सर्व काही पावसाळ्यानंतर

तू हा असा माझ्या चहुबाजुंनी चमकतोयस
आणि मी तुझ्यातल्या विजा आणि पाणी
गळतीखालच्या बादल्यात गोळा करत
स्नानघरात फेकतोय

हा झिम्मा
आणि माझ्या कुंडलिनीची  नागपंचमी

डोक्यावर गंगा अनुभवत

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सिरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )