Saturday, August 7, 2021

बिसलरी पन्नास श्रीधर तिळवे नाईक 

पाणी पन्नास वर्षाचे झाले 

कृत्रिम शुद्ध पाणी 

मिनरल झरे विकत घेतले गेले 
कार्बोनेट केले गेले 
लोकांना वाटले किती निरुपद्रवी निरोद्योग आहे हा 

पाणी कोण विकत घेतं का ?
तहान शमली कि 
पैसे दिले तरी कोणी पाणी पिणार नाही 

स्पा मावळत गेले 
आणि उगवले बॉटल्ड डिस्ट्रिब्युशन 

तहान डिस्ट्रिब्युट करायची गरज न्हवती 
नाहीतर तीही डिस्ट्रिब्युट केली गेली असती 
मात्र तहानेच्या जाहिराती केल्या गेल्या 

पाणव्याकूळ नट नट्या आणि बॉटल्स 

डोळ्यात कमर्शियल तहान उतरवली गेली 
आणि अशुद्ध पाण्याचे भय 
व मिनरल वॉटरचे फायदे 

घाबरणारे अधिक घाबरले 
शेवटी रोग थांबवणारे पाणी 
आणि रोग देणारे पाणीच  

बघता बघता मिनरल जनरेशन अवतरली 
पस्तिशीत पोहचली 

आता माझ्या देहात 
कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बिस्लरललेले 
आणि झरे आतले 
आटलेले

मी कोरडा पन्नाशीत 
आणि समोर बिसलरी 
सेलिब्रेटिंग फिफ्टी इयर्स ऑफ ट्रस्ट 

मला रिसायकल करत

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून)


 नीरज चोप्रासाठी श्रीधर तिळवे नाईक 


एक भाला पार होतोय 


अन्कम्फर्टेबल व्यवस्थेच्या मढ्यावरून 


एक भाला पार होतोय 


स्पर्शाचीही ऍलर्जी असलेल्या ऍसिडिक झोनमधून 


एक भाला पार होतोय


त्या खांद्यातून जो जमीन पेलून थकला 

पण ज्याने आभाळ पेलले 

एखाद्या पिलोसारखं 


एक भाला पार होतोय 


निसर्गाचा एन्ड करून त्याला प्रेत बनवायला निघालेल्या आर्टिफिशियल फेकंदाजीवरून 


एक भाला पार होतोय

झोपेत क्रायसिसचे ड्रम वाजवणाऱ्या ऑर्केस्ट्रावरून 


एक भाला पार होतोय 

स्वतःच्या मांसावर हृदयाला  टॅटू बनवत 

रक्ताच्या उसळीला देशाची सळसळ बनवत 


एक भाला पार होतोय 

टॉन्टिंग ऐकणाऱ्या कानांना सस्पेंड करत 


एक भाला पार होतोय 

टॉर्चर करणाऱ्या अनऍथलेटिकल रोड्सना अनप्रेडिक्टेबल मसल्स दाखवत 


एक भाला पार होतोय 

कनेक्टीव्ह टिश्यूजना महत्वाकांक्षेला टाचत फुल वेगात 


एक भाला पार होतोय 

अनाटॉमी सांभाळत वर्किंग हॅंड्सना गरुड दाखवत 


एक भाला पार होतोय 

डमी इमोशन्स साईडलाईन करत ओरिजनल आवेगात 


शरीर खवळलेलं दिसत नाही 

फक्त वळलेलं दिसतंय 

समतोलाच्या ठाय पायात 

वळसे घेत 


स्वतःच्या जीवावर स्वतःला उत्क्रांत करत 


एक भाला 

त्या क्षणात 

अचूक 

काळ गिळत 

पारंपरिक घड्याळे मोडत 

सुवर्णात 


मातीतून 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या फाईल मधून )


फोन विकताना श्रीधर तिळवे नाईक 


फोन विकायचा नाही 

ज्याच्याकडून आला त्याला परत करायचा 

हा संन्यासी फण्डा पाळायचा 

तर देणाऱ्याने 

घ्यायला नकार दिलेला 


मग तुझ्या संलग्न हातांनी मागितला खरेदीसाठी 

मग मी हो म्हणालो ह्या करोना काळाची मजबुरी म्हणून 

तर तू म्हणतीयेस 

छान आहे एकदम कुल 

टचपॅड एकदम कुल 

डिझाईन एकदम कुल 


मी फोन करतोय व्हॉइस क्वालिटी तुला कळावी तर 

अचानक समुद्र नासावा आणि नावाडी वासाने मरून जावा 

तशी तू म्हणतीयेस 

व्हॉइस कुल 

पण परवडेबल नाही बाप ओरडेल माझा 


स्वतःचे पैसे आणि बाप ओरडेल ?


मी फोन विकण्याचे टास्क दुमडून ठेवू का ?

मी संन्यासी म्हणून तुला फोन फुकट द्यावा का ?


तुझी मुंडी नकारात्मक मॅनेजमेंटमध्ये 


डिझाईन कुल आहे ह्याचे 


काळजात लोखंडाची खाण 

काळजाबाहेरचे सोनं पंचप्राण 


मी ओपिनियन हलवत नाही 

समग्र माणूस हलवतो 

किंवा आसपास समा हेलावतो 


तुझ्या नजरेत डोळ्यांची भेळ झालेली 

स्वतःच्या सेंटीमेंट्सचे डिटेक्शन 


सर , माझ्या आऊटडेटेड मायक्रोमॅक्सच्या  कि पॅडपेक्षा ह्याचे एकदम स्लिक 

अक्षरं किस घेत शब्द पाडतात फ्लुएंटली 

माझा डब्बा वाटतोय 

नोकिया का बंद पडला होता सर ?


तुला ओपिनियन बनवता येत नाहीये कि 

स्ट्रक्चरल फॅक्चर आहे ब्रेन कल्चरमध्ये ?


तू ओपिनियन मागवतीयेस 

मॉडेल व्हाटसप करत 

मी हालचाली पहात हसतोय 


नाईस बोटं 

पण टेरिबल नखं 

कि लिपस्टिकचा चॉईस हॉरिबल ?


फोनवर मैत्रीण तुझा टेरिबल आहे नवा घे 

एव्हढ्या स्वस्तात कोण देणार 

संन्यासी आहे फायदा घे 


पिक्चर क्वालिटी कशी आहे सर ?


मग माझेच फोटो काढत 

क्वालिटी चेक 


वाळवंटाच्या रिलेशनमध्ये फूल 

सर तुमच्या चेहऱ्यावर इतकं वाळवंट का ?

आणि किती भाजले गेलाय 

आणि कुठं कुठं 


मी इयरफोन ब्रेक झाल्यासारखा 


ओपिनियन व्हाटसप होतायत 


ओपिनियन बार टेंडरसारखे दारू वाटत 

ओपिनियन कूल प्रोटेस्टस 

ओपिनियन अधाशता ताशासारख्या वाजवत 

ओपिनियन महागड्या वस्त्रासारखे माजत गाजत 


मी फक्त हसतोय 


सर आई म्हणतीये 

संन्याश्याकडून फोन घेतला 

कि लग्न होत नाही 

सॉरी 


मी अनलिमिटेड हसतोय 

कि पॅड मधून 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या फाईल मधून )

श्रीधर तिळवे नाईक