Sunday, October 4, 2020

 दोन गाणी श्रीधर तिळवे नाईक 

 घरी बसून चल करू काम इंटरनेटचे आहे ना जाळे 

बाहेर जग खोळंबलेले आयुष्याला लावून टाळे 

 

काहीच नाही झालेले थोडासा ठहराव आहे 

थोडेसे भय अस्सल बाकी सारा बनाव आहे 

 

उतावळ्या रक्तास जरा संयमाचे लावू डोळे 

बाहेर जग खोळंबलेले आयुष्याला लावून टाळे 

 

स्पर्श धोखादायक होईल कधी कुणास वाटले होते  

स्वतःच्याच माणसांमध्ये  शरीर असे अवघडले होते 

 

स्वतःच्याच घरामध्ये येतील पोटामधून गोळे 

घरी बसून चल करू काम इंटरनेटचे आहे ना जाळे 

 

हेही दिवस सरतील ह्याची मनामध्ये बाळग खात्री 

जे थांबलेत ते आप्त आहेत जे गेले ते होते यात्री 

 

सर्व काही सोसू सहज काय पावसाळे काय उन्हाळे 

घरी बसून चल करू काम इंटरनेटचे आहे ना जाळे 

 

===============

 

महिने वाहून गेले कालनिर्णयात आता का फडफडतीयेस 

ही कोव्हीडमुळे आलेली काळजी कि नुसतीच धडधडतीयेस 

 

हृदय ब्लर झालं आवाज थिंकटॅंकमधला सिंक झाला 

एकत्रित केलेल्या गोष्टी अचानक ब्लिंक झाल्या 

 

रिपीट ऱ्हिदममध्ये डान्स स्टेप नव्याने माळून 

समोर तू नाचतियेस काहीही गाळून 

 

जिथे नाचलो तो पबही आता झाला म्हातारा 

जरी लाभला नाही कधी जीवाला उतारा 

 

जॅकेट काढून नुसत्या ब्रात केलेले बेशक डान्स 

आणि अचानक मला लागलेली मेडिटेटिव्ह ट्रान्स 

 

बेड गरम आणि चादरीवर शुभ्र सावळा  देहपिसारा 

चालून आलेला  दोन देहात अवघ्या विश्वाचा पसारा 

 

कुठे पसार झाली ती रात्र आणि उचंबळलेली गात्रे 

जी नद्यांची बनणार होती ती नाटकातील बनून गेली पात्रे 

 

आणि आता ही खोलवरून आलेली हाक ठीक आहेस ना श्री ?

बोलणारी कोण आहे पबमधील मुलगी कि विवाहात पसार स्त्री ?

 

महिने वाहून गेले कालनिर्णयात आता का फडफडतीयेस 

ही कोव्हीडमुळे आलेली काळजी कि नुसतीच धडधडतीयेस 

श्रीधर तिळवे नाईक 

हठयोग्याचे कोव्हीडमधील स्वगत श्रीधर तिळवे नाईक 

मृत्यू चांगला किंवा वाईट नसतो 

मृत्यू अपरिहार्य असतो 


तरीही तो आपल्या दारात ठाकतो 

तेव्हा त्याला घरात घ्यावंसं वाटत नाही 


कारण पुनर्जन्मावर कितीही विश्वास ठेवला तरी 

आपल्याला सुरवंट आत घ्यावासा वाटत नाही 

मग फुलपाखरू जन्मण्याची खात्री असो 


मृत्यू आयुष्याच्या अर्थाचाही मृत्यू घडवतो 

आणि भाषा निरर्थक करतो 

आणि आपल्या आयुष्याचा मालक हा होता कि आपण 

असा प्रश्न मरताना पडतो 


त्याला टाळण्यासाठी काय काय ऊभं करतो आपण 

कला धर्म पुनर्जन्म समजुती कर्मकांड स्वर्ग नरक 

राष्ट्र धंदा व्यवसाय ज्ञान 

सगळं रसातळाला जाणार हे माहित असूनही 

किती रस निर्माण करतो आपण रस घेऊन 


अर्थ काढून घेणारा त्याचा हात 

आताच जग म्हणून सांगणारा त्याचा गळा 

सार्थक मृत्यू म्हणजे माझ्यापुढे समाधानाने मरणे असं सांगणारा त्याचा मुखवटा 

आणि विज्ञानाने कधीतरी अमर होऊ म्हणून दिलेली लाच 

जी ह्या जन्मात तरी घेता येणार नाही 

ह्याची झालेली जाणीव 


आर्टिफिशयल इंटीलिजन्सची वाकलेली कमर 

जनेतिक इंजिनीरिंगचा खोखो 

आणि रोबोटिक्समधला आपल्या नावाचा रोबो 

ह्यातले सर्व काही एका व्हायरसपुढे हरलं आहे 

ह्याची कुरतडणारी सुन्न जाणीव 


मृत्यूवर मात एव्हढं एकच स्वप्न घेऊन आपण जगतो कि काय ?


मृत्यू नसता तर जीवनाच्या अर्थाचा एव्हढा गहन विचार आपण केला असता ?


समजा मला ह्रितिक     रोशनसारखी सहा बोटं असती तर 

माझ्या आयुष्याचा अर्थ बदलला असता ?

किंवा मी जरासंध असतो तर कितीवेळा स्वतःला जुळवलं असतं महादेवासाठी ?

किंवा अमरच असतो तर चिरंजिवांच्या निरर्थक भेटी घेण्यापलीकडे काय केले असते ?


एक मृत्यूचं आहे फॅक्टसारखा 

जो सगळ्या आभासी दुनियेला वास्तवाचा फाळ लावतोय 

आणि विस्तव वाटतोय 


मृत्यू फेसबुकवर आला असता तर त्याला लाईक करण्याची हिंमत 

कुणाला झाली असती काय 

रिक्वेस्टाच पाठवल्या असत्या लोकांनी कि बुवा आम्हाला वाचव 

इनबॉक्समध्ये मेसेज इतके आले असते कि फेसबुकचे फुटून तुकडे झाले असते 


बस मरणाऱ्याला मरताना किंवा मेल्यानंतर पहाणे 

आणि आपलाही नम्बर लागणार आहे ह्या भयाने 

मृत्यू झटकणे 


स्मशान उगाच नजरेआड नाही ठेवलेलं 


म्हणूनच शिव उतरतो तिथे 

हिम्मत असेल त्याने डोळ्याला डोळे भिडवावे 


तिसरा डोळा स्मशानातच पडून असतो 

लोक उचलायला घाबरतात 


चष्मे लावा चष्मे किंवा गॉगल


श्रीधर तिळवे नाईक 

माणसे निघून गेली श्रीधर तिळवे नाईक 

(कोव्हीडमुळे गेलेल्या तुषार शहा आणि इतर मित्रांसाठी )

हातात हात असणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


प्रार्थना जमल्या ज्यांना वाचणे जमले नाही 

कोंडले गेले तरी दमणे जमले नाही 

अप लिफ्ट करत राहिले माणुसकीची लिफ्ट 

द्वेष बोल्ड झाले तरी प्रेम सुटले नाही 


गुलाब फुलवणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


चंद्र पिळून ज्यांनी सूर्यप्रकाश काढला 

अंधारातही  ज्यांचा जीव झगमगला 

गटारांच्या ज्यांनी केल्या वाहत्या गंगा 

लोकलमधून  घरात आकाशगंगा आणल्या 


सोने पिकवणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


फ्रिजमध्ये ज्यांचे आयुष्य तरंगत होते 

मॉलमध्ये ज्यांचे महत्व रांगत होते 

पत्नीच्या एका जे स्माइलीत हसत होते 

खेळण्यासाठी मुलाच्या जीव टांगत होते 


घरगुती साधीसुधी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


प्राणवायूशी  जे सहज कनेक्टेड होते 

आईवडिलांशी जे सहज रिलेटेड होते 

संस्कृतीवर ज्यांचा होता महाविश्वास 

पावलांमध्ये जे सहज रूटेड होते 


सहज जगणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


गाण्यांच्या भेंड्यामध्ये जी सुगंधित झाली 

पोरांच्या पासिंगने जी समाधानी झाली 

कीर्तिऐवजी ज्यांनी आपले बूट चमकवले 

भेळ खाताना  अख्खी दुनिया खाल्ली 


लिमिटेड लाघवणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली  


बायको म्हणते म्हणून उपवास केले 

डायबेटीस आणि संधिवात सांभाळले 

बिले देता देता ज्यांना धाप लागली 

कोव्हिडमुळे ज्यांना कायमचे टाळे लागले 


फुलांसारखी  मर्त्य माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


ज्यांनी माझी एकही कविता वाचली नाही 

दर्शन मोक्ष ह्यांची पत्रास ठेवली नाही 

सोबत कष्टणारा आपल्यासारखाच एक 

ह्याशिवाय दुसरी ओळख ठेवली नाही 


मला ओळखणारी माणसे निघून गेली 

सोबत चालणारी माणसे निघून गेली 


श्रीधर तिळवे नाईक 

गेला श्रीधर तिळवे नाईक 

गेला , न कळवता गेला , न कळून गेला 

प्रचंड पाऊस झालेले डोळे कोरडे करत 

बुबुळांच्या छत्र्या ज्यांच्यात स्वप्नांची भूछत्रे होती 

गेली 

डोळ्यात छापकाटा खेळवणारी नजर 

गेली 

लोकलच्या टाइमटेबलचे स्टिकर लागलेले पापण्यांचे केस 

गेले 

ह्या शहरात पॅशनचे हार्टअटॅक होतात 

वाढदिवसांचे नॉस्टलजिया 

पर्वर्जनची वाईन 

प्राचीन अवशेषांचे दात घासणारा ब्रश 

गेला 


रक्त म्हातारं होत चाललंय यारा 

काळ काठी कधी हातात देतो ह्याची वाट पाहतोय 

थकलेल्या आवाजात म्हणणारा गेला 


कुरुक्षेत्र समजून लढायचं 

अन द्वारका बनून बुडायचं 

न थकणारे मायोपिक 

आपण मृत्यूला इतके घाबरतो 

मेलेलं प्रेत नागडं ठेवण्याची हिम्मत होत नाही आपल्याला 

गांडू मृत्युपुढं गांडू 


एक कुत्रा होता आत 

एक कोल्हा 

सिंह न्हवता आत 

एक ढेकूण आत 

एक झुरळही 


हत्ती तर फक्त गणपती उत्सवाला 

त्याचे पाच दिवसांनी विसर्जन 

हत्ती परवडत नाही सांभाळायला 


शिळ्या टाइमटेबलच्या ताज्या आवृत्या रोज 

शेवटपर्यंत स्वार्थी चड्डीच्या नाडीपर्यंत 


नथिंगनेस भिंतीसारखा 

पुश तरी किती करणार 

मुंबईत एरिया लिमिटेड 


भिंतीपुढे उलथला 

गेला 

श्रीधर तिळवे नाईक 

ट्रम्प ह्यांच्या पराभवानंतर श्रीधर तिळवे नाईक 

सत्य परतलेलं नाही 

फक्त सत्याभोवतीचा राजकीय टेम्भा नाहीसा झालाय 

वामनाची काल्पनिक उंची नाहीशी झालीये 


डावा डावा आणि उजवा उजवा झालाय 

काळे आणि पांढरे जे फक्त अमेरिकन झाले होते 

पुन्हा सकल मानवाचे झालेत 


सोप ऑपेरा सोपं करून सांगणारे 

पुन्हा कॉम्प्लिकेटेड झालेत 


आयुष्य निर्मळ करणारे साबण सोप बॉक्समध्ये परतलेत 

कचऱ्यात अंघोळ करणारे बाथरूममध्ये परतलेत 


ब्लॅकलिस्ट कोऱ्या झालेत 

ब्लॉकलिस्ट मोकळ्या झालेत 


विकावयाला काढलेल्या लोकशाह्या 

लोकांत परतलेत 


ग्रहणे नाहीशी झालेत 

आणि सूर्य पुन्हा प्रकाशानेच दाढी करायला लागलेत 


सरफेस पुन्हा त्वचा झालेत 

भ्रमटकरी भ्रम होत्या 

स्पष्ट कळतंय 


नाकातले शेम्बुड आता मोती म्हणून विकले जाणार नाहीत 

वॉलवर काल्पनिक खिडक्यांची चित्रे काढावी लागणार नाहीत 

कुलपे दरवाज्यांपेक्षा मोठी दिसणार नाहीत 

वाळूपासून बनलेल्या शहामृगांकडून आता नद्यांच्या कथा ऐकाव्या  लागणार नाहीत 


असं नाही कि सगळं आलबेल झालंय 

फक्त ह्याहून वाईट काय व्हायचं राहिलंय 

हा प्रश्न कदाचित आता विचारावा लागणार नाही