Saturday, October 1, 2016

आत्ताच्या कविता श्रीधर तिळवे नाईक 
मोर्चा १ श्रीधर तिळवे नाईक 


एक सिंग्युलॅरिटीचा अवाढव्य भास
तलवारीसारखा रस्त्यावरून चालत

स्क्रिनवर युद्धसदृष्य शांतता पेश करत

वाहिन्यांची नाकं बंद झालेत
त्यांच्या नाकातून नाकाबंदीचे रक्त येतंय

अनपेक्षित नॉकॉउटने सर्व हैराण झालेत

हा लाव्हा कुणी तयार केला
ह्या ज्वालामुखीची बीजे  कुणी पेरली

शेतीला आग लागल्यानंतरही पेरणारे हात इतके जिवंत ?

ज्यांनी त्यांना देशोधडीला लावले त्यांना त्यांचे शांतपणे चालणेही
धमकी वाटू लागलीये

मागण्या चुकीच्या कि बरोबर हे ठरवता येत नाहीये

हा मोर्चा पोस्टमॉडर्न म्हणावा का मग ?

कि हा जागतिकीकरणामुळे हवालदिल झालेल्यांचा
पोस्टपोस्टमॉडर्न मोर्चा आहे ?

कि सतराव्या शतकानंतर नव्याने आलेली ही जाग आहे ?

हातात तलवारी नाहीत
पण प्रत्येकजण योद्धा आहे

ह्यांना जातीयवादी म्हणावे का मग ?

ही जात आहे कि जनता आहे ?

जंतूंना ठरवता येत नाहीये

एक जंगली अस्वस्थता आहे
जी रस्त्यारस्त्यावर माणुसकी लिहीत चाललीये
आणि माणसांना ह्या माणुसकीचे काय करायचे
ते कळत नाहीये

श्रीधर तिळवे नाईक 

मोर्चा  श्रीधर तिळवे नाईक 
मोर्चा सिम्युलेट होतोय 
मोर्चा रिक्लोन होतोय 

मोर्चा इंटरनेटसारखा ग्राहक वाढवत चाललाय 

मोर्चा तत्सम होतोय तद्भव होतोय अपभ्रंश होतोय 

इट माइट बी गेम फ्रॉम बारामती 
मती मारली गेल्याने हा सातबारा रस्त्यावर आलाय 
हा महाराष्ट्राच्या पुरोगामी समाजकारणात प्रतिगामी हस्तक्षेप आहे 

मुलगी मेलीये आणि रडतीये स्वतःच्या प्रेतात 

हे सगळं तिच्यातून निघालंय ह्यावर तिचा  विश्वास बसत नाहीये 

ती अतोनात दुःखी आहे 

जखमा सुजलेत 
रक्त वळून खड झालंय 
आणि त्या खडीवरून मोर्चा चाललाय 

नराधम माहीत आहेत 
पण ती  मेल्याने ती त्यांचे काहीच करू शकत नाहीये 
ती प्रेतात बसून रडतीये 

हा मोर्चा तिचा शोक आहे का ?

तिने ऍट्रॉसिटी कायदा वाचलेला नाहीये 
तिला फेबु दलित माहीत नाहीत 
तिला फेबु मराठा माहीत नाहीत  

तिला खुंखारतेचा माइक्रोहार्ड माहित आहे 
निर्लज्ज पुरुषप्रधानतेचा टोकदार पाशवीपणा माहीत आहे 

हा मोर्चा त्या पुरुषप्रधानतेच्या दारी का जात नाहीये 
कि आपल्यासाठी चाललेला हा सविनय आक्रोश आहे ?

तिला प्रेतात बसूनही गुंतागुंत कळत नाहीये 

मोर्चे इतके गुंतागुंतीचे का होतायत 
कि नवा समाज नीट असेम्ब्ल  झाल्याचे हे लक्षण आहे ?
कि समाज कायमच चिरफाळी असतो ?

अट्रोसिटीची चायनीज वॉल शोक करतीये 
तिला आपण संरक्षक असल्याचा अभिमान होता 
त्याला छेद गेलाय 

ती विचार  करतीये 
परिवर्तन म्हणजे काय ?
कालच्या शोषितांना उद्याचे शोषक बनण्याची संधी ?

मुलीला भिंतीसमोर 
आणि भिंतीला मुलीसमोर उभं केलं गेलंय 
आणि भिंत आणि मुलगी 
एकमेकासमोर ठाकल्यासारख्या दिसतायत  

दोघीही शोक करतायत 
आणि आपले  अश्रू राजकीय होतील ह्या भयाने अवघडतायत 

बलात्कारात आरक्षण रीमिक्स होतंय 
आरक्षणात शेती रिमिक्स होतीये 
शेतीत पावसाळा रिमिक्स होतोय 
पावसाळ्यात समाजव्यवस्था रिमिक्स होतीये 
समाजव्यवस्थेत ब्रेकिंग न्यूज रिमिक्स होतीये 

आणि मोर्चा मिक्सर घुसळत घुसळत रिसिम्युलेट होतोय 

शासक वाट पाहतायत एका नव्या ब्रेकिंग न्यूजची 
माध्यमे वाट पाहतायत एका फ्रेश ब्रेकिंग न्यूजची 
जी मोर्चा नाहीशी करेल 
आणि फक्त रस्त्यापुरता उरवेल 

सर्वांनाच माहित आहे 
मोर्चा एक दिवस 
थकून घरी परतणार आहे 


श्रीधर तिळवे नाईक 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )


नोटारद्दता 
पूछे जनता , नेता और पिये 
दो ह्जारमे कोई कैसे जिये 

इस पीएम का क्या करे 
बत्ती गुल की बुझाये दिये 

मेरी मेहनत तो सफेद थी 
फिर किसने पैसे काले किये 

अभीभी समझ न आ रहा हैं 
हमने दिये या उन्होंने लिये 

पुरे देशकी फटी पडी हैं 
अब सिये तो कहाँ कहाँ सिये 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

नोटा श्रीधर तिळवे नाईक 

ईश्वर म्हणाला कि 
एकतर संपूर्ण मेंदू रद्द करता येईल 
किंवा मेंदूतील नोटा 
मी मेंदू रद्द करवून निघालो तर 
जागोजागी लोक नोटा कॅश करत 
वेगवेगळ्या चलनातील वेगवेगळ्या नोटा 
लोक म्हणाले कि 
नोटा  चलनात आहेत 
आणि चलनाविना चालणे अशक्य आहे 
मी रद्द झालेल्या मेंदूने 
चालण्यासाठी आवश्यक तेवढ्याच नोटा 
नोटा म्हणून स्वीकारल्या 
आणि आवश्यक तितक्याच नोटा बाळगायला सुरवात केली 

मी रद्द झालेल्या मेंदूने चालत चालत 
आवश्यक तेवढ्याच नोटा बाळगत 
मिलिंदच्या बंगल्यात पोचलोय 

आम्ही एकमेकात छत्तीस वर्षे खेळवलीयेत 
आणि आठवणींचा मैत्रय उपसा चालू आहे 

करस्पॉन्डन्सचं स्पेलिंगही माहित नसलेली माणसे 
करस्पॉन्डन्स सांभाळण्यासाठी सरकारने  हाताखाली दिलीयेत 
आणि त्यांना सांभाळतांना होणारी सरकारची  गोची 
तो शेअर करतोय 

अचानक  बातमी झळकतीये टीव्हीवर 
५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यात 

बहुदा मेंदू रद्द करण्यात सरकारला अपयश आलंय 
किंवा सरकारला मेंदू रद्द करणे शक्य नाही म्हणून 
सरकारने रिप्लेसमेंट म्हणून हा उपाय शोधलाय 



मी मिलिंदकडे टकामका पाहतोय 
मी संन्यासी तो इनकम टॅक्स आणि कस्टम ऑफिसर 

नोटा चलनात पांढऱ्या ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावरही आहे 
आणि सरकारने काळ्या नोटा नष्ट व्हाव्यात म्हणून हा उपाय योजलाय 
असं सरकार सांगतंय 

आपल्या मेंदूत काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या नोटा असतात का ?

मी प्रश्न विचारत नाही 
कारण मिलिंद अस्वस्थ आहे 

हा निर्णय चूक कि बरोबर त्याच्या मेंदूला ठरवता येत नाहीये 



मी बंगला सोडून 
बाईकवर बसून 
स्वतःत चालतोय 

ह्या देशात काळ्या नोटा नाहीत असा मेंदू कोणाकडे आहे ?


लोक ऑल टाइम मेंदू ( ए टी एम )पुढे रांगा लावून उभे आहेत 

त्यांना पांढऱ्या नोटा काढणे 
सरकारने सक्तीचं केलंय 

आमची मेहनत आमचा पैसा आमचे अकौंट आमचा मेंदू 
त्यातून किती नोटा  काढायच्या हे ठरवणारे 
सरकार कोण ?
कुणी संतप्त होऊन विचारतोय 
आणि रांग संतापातून ताप झेलत पुढे सरकतीये 



ज्यांचा हिशेब लागतो त्या पांढऱ्या 
ज्यांचा लागत नाही त्या काळ्या 

सरकारला हा हिशेब द्यायला हवा 
कारण सर्व नोटा सरकारने स्पॉन्सर केलेत 

अंतिमतः सर्व नोटा सरकारी आहेत 
सरकार सर्वनोटांधीश आहे 

असे असेल तर 
सरकारला स्वतःच्याच नोटांचा हिशेब लागत नाही 
हे गौडबंगाल काय आहे ?


काळ्या नोटा सरकारचा अनकॉन्शसनेस आहे का ?
तोच आख्खा कॉन्शसनेस डिक्टेट करतो का ?

हे कॉन्शसनेसने अनकॉन्शसनेसविरुद्ध केलेले बंड का ?



ज्याच्याकडे काळ्या नोटा 
तोच ह्या देशात श्रीमंत कसा ?

हे ब्लॅक मॅजिक काय आहे भाऊ ?

१०

लोकांना किराणाभुसार भरायला 
भाज्या विकत घ्यायला 
औषधे खरेदी करायला 
लग्न करायला 

नोटा हव्या आहेत 
आणि सरकार म्हणतंय 
हे सर्व ह्यापुढे पांढऱ्या नोटांनीच करायचं 

पण पांढऱ्या नोटा कुठं आहेत ?
कुठं आहेत पांढऱ्या नोटा ?

सरकारने पुरेश्या पांढऱ्या नोटा छापल्याच नाहीत का ?
मग चलनातल्या नोटा रद्द का केल्या ? 

नोटांच्याशिवाय हा मेंदू चालवायचा कसा ?

११
सरकार दिलासा देतंय 
नव्या नोटा येतील येतील येतील येतील 

शहर बँक्यांच्यापुढे ए टी एम पुढे रांगा लावून 
नव्या नोटांची वाट बघत उभं आहे 
आणि नव्या नोटा कुठं आहेत 
त्या पुरेश्या आहेत कि नाहीत 
कुणालाच माहीत नाही 

नोटा कमी पडणारे मेंदू सर्वत्र हिंडतायत 

नोटा कमी पडल्याने मेंदूला लकवा पडण्याची भीती आहे 

नोटांना अडिक्ट झालेला मेंदू पिसाळलाय 

मी पिसाळण्यातून कोल्हापुरभर हिंडतोय 

हे अघटित आहे पण घडतंय  

नोटांना अडिक्ट झालेलं शहर
नोटांच्याशिवाय पिसाळत चाललंय 

मात्र ते  सूर्याजी पिसाळ बनणार कि 
शिवाजीराजे भोंसले 
हे इतकी वर्षे ह्या शहरात राहूनही 
मला कळत नाहीये  

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
***



जे बोलायचं ते बोलून झालंय 

जे अंमलात आणायचं ते राहून गेलंय 

ते उत्क्रांत झालंय जे लोम्बकळ्त होतं 

ज्यांना साधना करायची नाहीये 
ते स्पिरिच्युअल बेस्टसेलर्स लिहीतायत 

मोक्ष कुणाला हवाय 
ज्याला त्याला हवा दिलासा 
आणि थोडे अध्यात्मिक मनोरंजन 

अशा बोलघेवड्यांच्या भाजीबाजारात 
कशाला मांडावयास हवी शून्याची अमृतवेल आणि अमृतफळे 

हे लोक असे कि 
तिचेही बोन्साय करतील 
आणि सेल्फी काढून फेसबुकला टाकतील 

तू एका नतद्रष्ट काळात पार पोहचलास 

हा आर सेल्फी काढण्याऱ्यांसाठी सोडून दे 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

फुलांचा सुगंध आपोआप पसरतो 
पण सर्वच नाकांना तो घेता येतो असे नाही 

अत्तरांना सरावलेली नाके 

आणि पडद्यात झोपी गेलेले मेंदू 

उमललायस उत्तम 

वाळताना ह्यांना समजत कसे नाही 
ही कळकळ नको 

करुणेची वाजणारी बासरी 

बहिऱ्यांना जाऊन मिळते 

तरीही वाजव 

ताजेतवाने श्वास 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )


कार्ड्स

एक पोस्टकार्ड चाललंय काळजात नॉनडिजिटल प्रेम फुलवत
त्येला मांसच गावेना

एक व्हिजिटिंग कार्ड चाललय आयुष्याची इलेकट्रीसिटी शिवत
त्येला भारनियमन पेलेना

एक मेमरी कार्ड चाललय मोबाईलच्या स्मार्ट स्तनातून पाझरत
त्येला कमिटमेंट झेपना

एक डेबीट कार्ड गेलंय स्वतःच्याच जमाखर्चात थकून
त्याला रिफ्रेशमेंट भेटंना

एक येटीयम कार्ड चोवीस तास स्वतःला घामात वटवत
त्येला ऐसी वारं घालंना

एक ग्रीटिंग कार्ड गुलाब माळून चाफे गोळा करत
त्येचे झाडं होईना

एक पॅन कार्ड सुरकुत्या मोजतय टांगणीला लागलेल्या वृद्धाश्रमात
त्येला म्हातारपण फळेना

एक आयडेंयंटी कार्ड दोन आयडेंयंटी  कार्ड्सचा हात हातात घेऊन पळतय
त्येला शाळा निरागस होऊ देईना

आणि एक आधारकार्ड सव्वाशे कोटी आधारकार्डांशी चेस खेळतय
त्येला जिंकता येईना

आणि तरीही सगळी कोकोकोलतायत
आनंद पोटात माझा मावंना मावंना 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

पुरस्कार वापसी श्रीधर तिळवे नाईक 

राजकारणाला ठार मारायला निघालेत कवी
पुरस्कार परत करून
जे कवितेच्या झ्याटाएवढेही नाहीत

त्यांना कळत नाही
सरकार म्हणजे पंतप्रधान वा पार्टी न्हवे
आणि पुरस्कार परतावा म्हणजे निषेध न्हवे

त्यांचं कौतुक होतंय
आणि ते खुश आहेत
कि त्यांचं कौतूक होतंय

शासन आणि प्रशासन हसतंय
त्यांना कवितेला हसून ठार मारण्याची कला
१९४७ पासूनच अवगत आहे

ते फक्त अचम्बा दाखवतायत
कि हे गवताचं पातं 
धक्कादायक आहे 

त्यांना पूर्वीही काही करायचं न्हवतं 
त्यांना आत्ताही काही करायचं नाहीये 
फक्त परत आलेल्या पुरस्कारांची विल्हेवाट 
कुठल्या खात्याची 
एवढंच ठरवायचं आहे 
आणि नंतर हेही काम पेंडिंग ठेवत 
हसायचंय 

कवींना वाटतंय कि 
ते पीएमना टक्कर मारतायत 
आणि पीएम आहेत कि 
त्यांना अद्याप 
भालचंद्र नेमाडेंची स्वहस्ते पुरस्कार दिलेली कादंबरीही 
वाचायला वेळ मिळालेला नाही 

निषेधाच्या सूया उगवतायत 
आणि शासन आणि प्रशासन त्यांना 
दातात अडकलेल्या मांसाला काढण्यासाठी 
दंतकोरण्यासारखं वापरतायत 

कवींना प्रसिद्धी मिळतिये 
मीडियाला फुटेज मिळतंय 
प्रेक्षकांना करमणूक मिळतिये 

शासकीय कारभार 
नेहमीप्रमाणे काहीच न करता 
सुरळीत चालू आहे 

त्याला सत्तेचा स्वभाव माहित आहे 
आणि
 कवींच्या आणि राजकारण्यांच्या मर्यादांही 

तो अमर्याद आळसाने 
कवींना जांभया कधी येतायत 
त्याची वाट पाहतोय 
आणि कवी पुरस्कार परत करत 
जांभई पुढे ढकलतायत 

श्रीधर तिळवे नाईक  

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
15 शनी शिंगणापूर श्रीधर तिळवे 

माझ्या मुक्तीचा मोगरा पूर्ण फुललाय 
पण माझी बाग अद्याप सुगंधित नाही 

मी झालोय विमुक्त जंगल 
पण दिल गार्डन गार्डन करणारे व्हिलन 
कसे नाहीसे करायचे हे मला  समजत नाही 

बुद्ध होण्यातलं गणित वितळून गेलंय 
आणि बौद्ध होण्यातलं निरर्थकत्व पार करत 
मी निर्वाणात 

निर्वाणीचे क्षण निर्वाणापूर्वी असतात 
कालातितचा उमलाव अनंतदार 

शनी आदळतोय शिंगणापूरातून 

मी मुक्त नव्हतो तेव्हाही 
कधी शनीपुढे दिवे लावले नाहीत 

रवी आणि शनी ह्यांच्यातले मायायुद्ध 
हे माझ्यासाठी प्राचीन बॉलीवूड होते

सूर्याला कोण जाणत नाही ?

सूर्य ही निर्वाणाची केवळ उपमा नाही 
मूर्तीपूजा आहे 

लोक विचारतात 
"श्रीधर महाराज तुमची रिऍक्शन काय ?"
माझ्या आत काहीच शिल्लक नाही 
तर रिऍक्शन कशाला आणि कुठून 

मी ना- बुद्ध म्हणून जगायचा निर्णय घेतला 
आणि मी कॉमन झालो 

शून्य आत 
बाहेर आकड्यांच्या माकडचेष्टा 

शनी हीही खरेतर माकडचेष्टा 
पण ती हानीकारक असल्याने 
मी मेंदूला कॉल लावतोय 

जो धर्म सांगतो तो निर्बुद्ध 
आणि शनी तर निर्बुद्धांचा चालता बोलता धर्म 

माझे भविष्यविज्ञान प्लानेटरी पोझिशन मधून येत नाही 
अनंताच्या पोझिशनल चेंजेसमधून येतं  
ते येतं - मला विचारता 

१०
शक्ति नारीशक्तितून सामाजिक होते 
शिव समाजमुक्त 

११
शनीचा काळा पाषाण 
आणि विठ्ठलाची काळी मूर्ती 
ह्यांच्यात फरक काय ?

१२
शंकराने कधीच  ब्रम्हचर्य पाळले नाही 
पार्वतीला दोन मुले होती - गणपती आणि स्कंद 
शनीचे ब्रम्हचर्य कुठून आले ?
 ब्रम्हचर्याला इतिहास असतो ?

१३
शिव हाच आदिनाथ 
वृषभनाथ हा आदिनाथाचा शिष्य 
नंदीबैल हाच वृषभनाथ का ?

बैलापासून सुरु होऊन 
साधना ब्रह्मचर्यापर्यंत कधी पोहचली 
कशी पोहचली 
मीडिया मूलभूत प्रश्न विचारत नाहीये 
त्याला मूलभूतता पेलायची नाही बहुधा 
हे कसले ब्रम्हचर्य ?

१४
शैव नक्षत्रापमाणे चालले 
ग्रीक राशिग्रहाप्रमाणे 

रवीपासून तयार झाले कित्त्येक मुख्य देव 
आणि शनीपासून तयार झाला सैतान 

सॅटनीक हेच सैतानी ?

बाईला सैतानापुढे आणू नये म्हणून 
हे ईव्हप्रबंधन

सैतानापुढे स्त्रीला आणले तर 
ती पुन्हा ऍपल खाईल अशी भीती ?

दिल गार्डन गार्डन होऊ नये म्हणून हा 
खटाटोप ?

१५
सैतानाला बायको नाही 
म्हणून सैतान ब्रम्हचारी ? शनी ब्रम्हचारी ?
कि हे इब्लिस कार्ट ब्रम्हचारी राहिलं नाही 
तर पृथ्वीभर पोरांना जन्म घालेल हे भय 

सैतानी सृजनशीलता 
हे तर माझ्याही काव्य सृजनशीलतेचे वैशिष्ट आहे  

१६
शनीला शिवभक्त रावणाने पालथे पाडून 
पायाखाली घेतले होते म्हणतात 
मग शनीला गुलाम करण्यासाठी 
रावणाची पूजा का नाही ?

शनीची पूजा ?
कि शनीला पालथे पाडणाऱ्या रावणाची पूजा ?

श्रेष्ठ काय ?

१७
शनी हा टाईमपास आहे ?

१८
शनी हा आरसा आहे 
त्यात सोशल स्पष्ट उमटते 

१९
जे  ब्रम्हचर्य शिवाला अनावश्यक वाटलं 
ते  ब्रम्हचर्य वृषभनाथांना आवश्यक का वाटलं ?

२०
शनीला ब्रम्हचर्य का दिलं गेलं ?
शहाणा माणूस ब्रम्हचर्य पाळणारा असावा 
ही अपेक्षा का 

लग्न करणे हा शहाणपणा ?

२१
लोक म्हणतात 
"श्रीधर महाराज रिअक्शन द्या "

शनी हीच रिऍक्शन ?
ईश्वराची ?
रवीची ?
चंद्राची ?
शनी रवीला ग्रासतो चंद्राला ग्रासतो 
शनी ईश्वराला ग्रासतो ?

शनी देवांनाही सोडत नाही म्हणतात 
शनी सर्वांनाच ग्रासत असेल 
तर तो मोस्ट पॉवरफुल का नाही ?

२२
शनी 
मोस्ट  वॉन्टेड प्लानेटरी देव आहे म्हणतात 

लोक 
इतर ग्रहांना घाबरत नाही 
शनीला मात्र घाबरतात 

मानवजात ही 
शनीने पृथ्वीवर सोडलेली पिल्लावळ आहे का ?  

२३ 
शनी 
मेंदूची सालटं काढतो 

त्या सालटापासून ईव्हची ईच्छा तयार 
झाली का ?

जे शुन्याकडे न्हेते तेच शन्य का ?
आणि शनी हा त्या शन्याचे दैवतशास्त्र ?

२४
बाहेर अनावश्यक प्रश्न लाटा उठवत 
आणि उत्तरांचा  केऑस  जहाजीक 

आत शनीला  गीळलेले 
माझ्यातील शून्य स्तब्ध 

२५
लोक ओरडतायत 
श्रीधर महाराज रिऍक्शन द्या 

रिअक्शन द्यायला 
'मी ' अस्तित्वात असावा लागतो 

तोच नाहीसा 
म्हणून शनीही नाहीसा 

मित्रहो 
'मी ' नाहीसा करा 
नाहीतर 
एकमेकाचे शनी बनून 
रिऍक्शन देत रहाल 
ऍक्शन मागत रहाल 

'मी' आत आहे 
तोवर तुम्हीच शनी 
आणि तुम्हीच शिंगणापूर 

***
श्रीधर तिळवे नाईक 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
भारत जळाला त्या दिवशी 

मुक्त झालेल्या माणसाच्या अंगाला 
मृत्यू लागत नाही 
त्याच्यासाठी मृत्यू हा फक्त कपडा असतो 
आणि तो मृत्यूवर चर्चा करताना 
कापडावर चर्चा करत असतो 


शिष्टाचार कापडापासून बनलेले असतात 
आणि त्यांना कापसात परतणे अशक्य असते 


असं नाही कि 
मृत्यू हे दुःख नाही 
पण ते टाळता येतं 

तू केवळ माझ्याशी स्पर्धा करत 
मेडिटेशन केलंस 
आणि तुझी साधना ही साधना न राहता 
केवळ एकांताचा फुगवटा बनली 
आणि शेवटी मृत्यूच्या सुईने फुटली 



फुटणार तर सगळेच आहोत 

आपण सर्वच फुटायच्या गोळ्या 
आपल्या बॉडीत घेऊन जन्मलो आहोत 

मी देहातच फुटलो 
आणि फुटायच्या गोळ्यांचा अंत झाला 

महामृत्यू पाहिला कि 
इतर सारे मृत्यू  किरकोळ होतात 
तुही अपवाद नाहीस 
फक्त भाऊ असल्याने 
हा किरकोळपणा थोडा सशक्त वाटतो 
इतकंच 


जळ 

मी नसताना जळ 
माझ्या अभावापुढे जळ 

सारे अभाव जळतात 
अगदी त्यांचा पीळही 

तुझा सुम्भ थोडा कडक असल्याने 
त्याचा आवाज 
मला थेट मुंबईत ऐकू येतोय 
एव्हढंच 

*****
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )



माझ्यासाठी तू फक्त आई नाहीस 

माझं लाईफ जन्माला घालणारी लाईफ पार्टनर आहेस 


तुझेही नखरे आहेत  विशेषतः संताप 

काहीही फेकून मारायचीस आमच्या लहानपणी 

राग आल्यावर 

बायजीनं तर तू तिला मारायचीस म्हणून 

स्वतःच्या मुलांनाही मारलं नाही प्रतिक्रिया म्हणून 


तुझेही ताप आहेत  विशेषतः स्पष्टवक्तेपणा 

कुणासमोर कुठंही कधीही 

मग डॉन असोत कि पोलीस 

सत्याला घालूनच हिंडायचीस तू 


तुझं प्रेम पृथ्वी घुसळणारं  

आणि तुझं मनमोकळं स्माईल सगळ्या जेलनां लॉक करून जाणारं 


घर सोडलं तर कशाविषयीच पझेसिव्ह नाहीस  तू 

" बाईमाणसाला हक्काचं घर लागतं राजा स्वतःच्या पिल्लांसाठी "


ब्रा न घालता बिनधास्त फक्त चोळी घालण्याचा तुझा धीटपणा 

थेट पार्वतीशेजारी तुला उभा करतो 

मला लहानपणी  तुझा लाल परकर जबरदस्त आवडायचा 

मायेच्या अनेक नद्या वाहायच्या त्यातून 

मी स्त्रीमुक्ती थेट तुझ्याकडून शिकलो 

तू म्हणायचीस ," बाईनं नदीसारखं असायला हवं पुरुष वाळवंटांसारखे असतात कोरडे 

बायकाही कोरड्या झाल्या तर जग कसं चालेल ?"


भारत अंगावेगळा करायला ठाम नकार देणारी ममता 

ज्या वेळी भारत बिघडायला लागला 

तेव्हा गडबडायला लागली 

त्याच्या दारुड्या रात्री तुझ्या पदरात कोसळायला लागल्या 

आणि तू आतून फाटत गेलीस 


आताही तो दारू पिऊन आला कि तू कोसळतेस  


आणि आता उजू गेल्यावर तू कायमची अबोल 


मी आभाळाचं खरकटं असल्यासारखे काळजातले ढग 

बेसिनमध्ये विसळतोय 

अख्ख घर घासतोय 


पण आता काहीही चकाचक दिसत नाहीये 

वाटतं कि घर दगावलं 


अंगणातली झाडं पडतायत 

उजूच्या आठवणीत 


मांजर काहीही खात नाहीये 

तिलाही कळलंय 

"उजू गेली  "


मी बसलोय तुझ्यापुढे मांडी घालून 

आणि तू अबोल 


घराचा अंत झालाय 

आणि तू न बोलून 

आणि मी बोलून 

खांदा देतोय 


श्रीधर तिळवे नाईक 


(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )