Sunday, January 28, 2018

. shridhar tilvechi kavita

एक केऑस उतरतोय प्रत्येक ट्रेनमधून 
वेगाच्या कैफात 
त्याला आपलं डेस्टिनेशन गाठायचंय 
आणि वेग नियंत्रित करणारं 
कोणतंही कनेक्शन  त्याच्या पोटात नाही 

त्याच्या आत दबा धरून मॅडचॅपपणा 
वाट  पाहतोय 
त्या क्षणाची 
जो त्याला केऑसचे कनेक्शन मिळवून देईल 

गेली कित्येक वर्षे तो कनेक्शनची टेंडर्स भरतोय 
पण पूल ती नाकारत 
केऑसला जिवंत  ठेवतोय 

मॅडचॅपपणाला समजत नाही 
पुलाला रक्तात कसं लोळवावं 
तो फक्त वाट पाहतोय 
सुयोग्य शुटरक्षणाची 

शूटर क्षण येतोय 
एकाचवेळी दोन स्टेंशनवर चार ट्रेनस झटकत 
आणि दोन ट्रेनमधला केऑस 
स्वतःतील गर्दी पीत 
दोन पुलापाशी पोहचतोय 

एक पूल पाण्यात 
एक पूल कोरड्यात 


केऑसमधील गर्दीला पाणी अंगाला लावून घ्यायच नाहीये 
तिला पाणी फक्त प्यायला आवळतं 
अंगाला लावून घ्यायला आवळतं 

पाण्यापुढचा केऑस वळतोय कोरड्या पुलापाशी 
जो रुंद व्हावा म्हणून 
कधीपासून प्रशासनपुढे नमाज पढतोय  

दोन केऑस एक पूल 
मॅडमॅपपणाला कळून चुकलंय कि 
हा त्याचा क्षण आहे 

तो अफवा आणि बातमी पतंगासारखी उडवतोय केऑसमध्ये 
पत्रा कोसळलाय 
केऑस भयात बुडत चाललाय 
आणि नाकात पाणी शिरल्यासारखा 
जीव वाचवण्यासाठी पाळायला लागलाय 

केऑसचा प्रॉब्लेम हाच आहे कि 
केऑमधली लोकसंख्या अफाट आहे  
आणि जीव वाचवायला जावं 
तर मात्रे पुढेही जीव आहेत 

जीवांना मॅडचॅपक्षणाचे वेड लावलंय 
आणि जीव एकमेकाला मारत 
स्वतःला वाचवत-  धडाडतायत 

जे वाचलेत ते मुंबई नावाच्या स्वर्गात आहेत 
जे मेले ते मुंबई नावाच्या नरकात आहेत 

ब्रेकिंग न्यूज मुंबईभर फुटतायत 
चर्चा मुंबईभर फुटतायत 
आणि मॅडचॅपपणा  पुन्हा नव्या शुटरक्षणाची वाट पहात 

केऑसकडे कनेक्शनचे टेंडर टाकतोय