Friday, July 24, 2020


पुस्तकं 


माझ्या बेटावर सर्वाधिक जागा पुस्तकांनी व्यापली आहे 
उरलेली काळजातल्या कवितांनी 
आणि ह्या दरम्यान शिल्लक मी 
जो स्वतःही एक पुस्तक आहे 
असा मला संशय आहे 


लोक कवितेतच बोलत असतात 
त्यांना त्याची जाणीव नसते 

त्यांचे पॉज व्याकरणाचा दबाव असतो 
आणि सिस्टीम दिसली 
कि ते गद्यात बोलायला लागतात 



क्रिकेट खेळताना मी  ब्रिटिश झालो 
फुटबॉल खेळताना स्पॅनिश 
कबड्डी खेळताना इंडियन 

मी काय खेळलो कि मराठी होईन 
ह्या प्रश्नाने माझा पाठलाग केला 
आणि शेवटी मी कविता खेळलो 
आणि मराठी झालो 


न वाचलेली पुस्तकं माझी श्रीमंती निश्चित करतात 

कारण ती माझ्याकडे आहेत 
हे महत्वाचं असतं 
आणि हे श्रीमंत माणसाचं लक्षणही असतं 

कधीतरी पुस्तकांच्यावर जमलेलं बर्फ व धूळ झटकून 
मी ही श्रीमंती झटकेन 
आणि हिरे माणके सांडतील 
अशा नजरेनं मी त्यांच्याकडे पहात राहतो 

पुस्तकांना मी कसबी जोहऱ्यासारखा दिसत असेन ?
कि मी त्यांच्यासाठी आणलेली पुस्तकं न वाचणारा आळशी मनुष्य असेंन ?
कि मी त्यांचा क्रोमार्यभंग करूच नये म्हणून ती प्रार्थना करत असतील ?


पुस्तकांनी मला पुस्तकी सुलतान तर बनवलेलं नाही ना ?




इतकी पुस्तके वाचूनही 
मला कळलेलं नाही 
शेल्व्हवर पुस्तके आहेत कि रद्दी ?


अंगठा अंगठी आणि अंगुली 
ह्यातील काय शाबूत ठेवले कि 
ऑथेन्टिसिटी टिकते ?

कवी स्वतः पुस्तक असतात 
तरी ते पुस्तकांवर फार कमी कविता लिहितात 

टीव्हीनं लोकशाही टिकवलीये 
कार्पोरेट शाही झेलत 
तिला पटवत 

पुस्तकांनी काय टिकवलंय ?   



मी कवी नाही जादू आहे 
जी पहिल्या ओळीबरोबर सुरु होते 
आणि कविता संपेपर्यंत टिकते 

कला हीच फक्त नॅचरल उरलीये जगात 
बाकी सर्व ऍनिमेटेड झालंय 


असे कित्येक कवी आहेत 
जे त्यांच्या हातून एक तरी ग्रेट कविता निर्माण होईल 
ह्याची वाट पाहून मरून गेले 

लोक छोट्या गोष्टी लिहतायत 
कारण त्या आय पॅड वा फेसबुक पोस्टवर दिसायला चांगल्या दिसतात 

ज्ञान आणि अनुभव फक्त वरून शांत  
त्यांच्या पोटात वादळं  
म्हणूनच पुस्तकं कायम डिस्टरबिंग असतात 

मी पुस्तकांना हात लावताना  शांत असतो  
आणि माझे तळवे वादळं उमलण्याची वाट पाहतात 

न्यूट्रल वादळे 
फक्त इथे 
पुस्तकातल्या पुस्तकात 
वाचताना 

१०

रेसिपीची पुस्तकं दुष्काळावरची पुस्तकं 
नद्यांवरची पुस्तकं समुद्रावरची पुस्तकं 
आहारावरची पुस्तकं 

पुस्तकं ही ज्ञानाची जाहिरात झाली आहेत का ?
ज्ञान कोण स्पॉन्सर करतं हे ज्ञानापेक्षा महत्वाचं आहे का ?

पुस्तकांच्याविषयी मी पूर्वीसारखा निरागस राहिलेलो नाही 
पुस्तकांच्याविषयी रोमँटिक बोलणारे लोक मी सहन करतो 
पण पुस्तकांआडून चालणारे राजकारण आणि समाजकारण 
इतिहासवाचनामुळे मला माहित आहे 

कोण कुठली पुस्तके प्रमोट करतो ह्यावर माझी नजर असते 
कारण त्याचे प्रमोशन त्याचे खरे रूप दाखवत असतं 

पुस्तकानं काय प्रमोट करायचं ते लेखक ठरवतो 
आणि लेखकाचं प्रमोट केलेलं किती प्रमोट करायचं ते व्यवस्था 

पुस्तक हे फक्त कव्हर नसतं 
त्याच्या आत बुद्ध आणि युद्ध असतात 
आईन्स्टाईन असतो मनु असतो 
जे सहजासहजी दिसत नाही

वर्णव्यवस्था प्रमोट करणारी पुस्तकं 
स्त्रियांना समान हक्क नाकारणारी पुस्तकं
वर्णव्यवस्था नाकारणारी पुस्तक 
स्त्रियांना समान हक्क मागणारी पुस्तकं  

पुस्तक स्वतःहून काही करत नाहीत असं म्हणणं म्हणजे 
पुस्तकांच्या आत काय आहे ते पुस्तकाचा भाग नसतं 
असं म्हणण्यासारखं आहे 

मी पुस्तकाचा फक्त चेहरा पहात नाही 
पुस्तकाचा मेंदू हृदय फुफ्फुसं यकृत किडनी वैग्रे 
सगळं पाहतो 

फायनली
ऑल वॉर्स आर वॉर्स बिटवीन ऑर अमंग बुक्स 

१२

माझ्या पुस्तकाची भाषांतरं करू इच्छिणारी मला विचारतीये 

आय एम अलोन कॅन आय ट्रान्सलेट यु ?

 मी :
व्हाय यु वॉन्ट टू ट्रान्सलेट मी ऍज आय एम डेड इन बुक 
 ती :
आय कान्ट चेन्ज फॅक्ट दॅट यु आर अलाइव्ह 
मी :
अँड अलाईव्ह इज अनट्रान्सलेटबल 
ती :
यु आर बिगेस्ट एनिमी ऑफ ट्रान्सलेशन 
 मी :
असेल बाई माझ्यावरचा प्रत्येक आरोप मी मान्यच करतो 
कारण मी निर्दोष आहे हे जाणतो 
 ती :
गो तू हेल 
 मी :
गो टू बियॉंड हेल अँड हेवन 
 ती :
आशीर्वाद देतोयस ?
 मी :
सत्य हा मोक्षाचा अनुवाद आहे 
जो कुठल्याच पुस्तकांत सापडू शकत नाही

रागाने डीसकनेक्ट 
मग प्रेमाने रीकनेक्ट 
ट्रान्स्लेशनचा दि एन्ड 

प्रत्येक पुस्तक अंतिमतः जे अंतिम आहे 
त्याचं फक्त तात्कालिक ट्रान्सलेशनच असतं कि काय ?


श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )