Wednesday, November 18, 2020

 निसर्गाला माणूस झालाय श्रीधर तिळवे नाईक 

निसर्गाला माणूस झालाय 


पाण्याच्या कुठल्याही काठावर वावरणारा 

आणि फ़िशना फिनिश करणारा 

कासवांच्या मुंडी आवळून 

त्यांचे अवतार कार्य फ्राय करणारा 

पर्यावरणाचा चिखल करून 

त्यात डुकरासारखा लोळणारा 

वाघ सिंहांना फाडून 

त्यांना गांडीखाली ठेवणारा 

शस्त्रांना पुजून शस्त्र पकडणाऱ्या प्रत्येकाला मारणारा 

हा व्हायरस ग्लोबल झालाय 


निसर्गाला माणूस झालाय 


न कोसळणाऱ्या आकाशाखाली 

कोसळ सळसळतीये 

पृथ्वीला खाऊन झाल्यावर 

विनाशाची टीप मिळतिये 

नदी गुलाम बनून 

ह्याला हवी तशी वळतीये 

फेटल आकर्षणाची  नजर

उथळपणाचा चुना मळतीये 


तरीही पाण्यात बुडणाऱ्याला 

पाण्याची शिकार करायचीय 


२ 

पाण्याचा आरसा म्हणून असलेला वापर 

आता बिसलरीत न वाहता फक्त वावरतोय 


प्रत्येकाला डिफरंट व्हायचंय 

पण डायव्हर्सिटी टिकवायची नाहीये 


बापाने केलेल्या चुका म्हणे करायच्या नाहीयेत 

मग पिढ्यानपिढ्या तोच आणि तसाच माणूस का जन्मतोय  ?


स्मॅश करत जाणारी आदळाआपट 

जिला फक्त कॅश मोजता येते 


काहीतरी नाहीसे करून 

जे स्वतःचे वाटते ते शाबूत ठेवणे 


ज्ञानाचे स्फोट होतायत 

आणि पृथ्वी नाहीशी होतीये 

ह्यातली कुठली गोष्ट खरी आहे ?


पॅटर्न समान आहे 

कि लक्ष्यात रहात नाही ?


गूगल मॅप हातात असूनही 

जगण्याचा रूट ठरला असूनही 

ट्रिपा अपघाती 


स्क्रीन जवळून पाहता पाहता 

स्किन दिसेनाशी 


टचच्या अंतरावर स्क्रीन 


५ 

ह्याची लक्षणं कशी सांगावी डॉक्टर 


जीवघेणा व्हायरस आहे हे नक्की 

पण आकाराने मोठ्ठा आहे 

बघायला सूक्ष्मदर्शक लागत नाही 


समोर येतानाच मारायला आलाय हे कळतं 

आणि तरीही मरण्याखेरीज हातात काही हातात उरत नाही 


हत्तीही टिकले नाहीत ह्याच्या साईझपुढं 

गेंडे तर नाकापुढून चालणारे 

नकटे करून मारले गेले 


हत्यारं बनवता येणं हे ह्याचं क्वालिफिकेशन समजायचं का ?


हा इतका बनावट कि स्वतःच्याच जातीतल्या माणसाने 

शस्त्रे ठेवलेत असा आरोप करून त्याला मारले 

आणि त्याच्यासारख्या अनेकांना 


हा इतका कसा हिंसक 

कि ही पृथ्वी ह्याच्या हिंसेची व्यायामशाळा आहे ?



निसर्गाला माणूस झालाय 

आणि इलाज सापडत नाहीये 


ह्याला प्रदुषणाचं व्यसन लागलंय का ?

हा व्हायरस आहे हे ह्याला कळत नाही का ?


हा निसर्गाचा भाग असूनही 

निसर्गासारखा  वाटत का नाहीये ?


ह्याच्या माद्यांनी ह्याचं पुनरुत्पादन थांबवावं म्हणून काय करता येईल ?

लोकसंख्येला ताकद समजणारा हा व्हायरस 

कधीकाळी त्यासाठी आपल्यासारख्या दुसऱ्यांच्या माद्या पळवायचा 


ह्याला बुद्धीचा आड्वान्टेज का दिला जातोय ?


डिनर पार्ट्या असोत कि लन्च 

हा आम्हालाच होरपळवणार 


ह्याच्या डोळयात अश्रू 

आमचे डोळे काढून घेताना 


ह्याची निसर्गाशी असलेली लॉयल्टी कधी चेंज झाली ?


डॉक्टर 

एक व्हायरस सोडा ह्याच्यावर 

जो ह्याला ताळ्यावर आणेल 


एक लस सूक्ष्म करून पाठवाच 


अख्खा निसर्गलोक आजारी आहे 

त्याला हेल्दी ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे 


माणूस कि निसर्ग अशी निवड करायची वेळ येऊ देऊ नका 

निसर्गाने आत्महत्या केली तरी 

त्याला पुन्हा जन्मण्याची युक्ती अवगत आहे 


हा पुन्हा जन्मलेच ह्याची खात्री नाही 


तेव्हा ह्याला जगायचा अधिकार देण्यासाठी का होईना 

एक व्हायरस पाठवा 


नाहीच शहाणा झाला तर आहेच हिमयुगाचे मिसाईल हाती 


बुडेल 

पाण्याला ठार मारण्याची स्वप्ने पहात 


श्रीधर तिळवे नाईक