Monday, June 22, 2020

किसन पाटील गेले

ओओ

सपाट चेहऱ्यावर वियर्ड पाऊस वियर्ड थेंबांचा

साराचा पाय मोडलाय

ओओ

सपाट चेहऱ्यावर वियर्ड पाऊस वियर्ड थेंबांचा

वियर्ड थेंबांचा वियर्ड पाऊस सपाट चेहऱ्यावर

सपाट चेहऱ्यावर वियर्ड थेंबांचा वियर्ड पाऊस

शेणाची गोवरी जणू थापलेली डिजिटल स्क्रीनवर
कधीही गळेल असं वाटणारी

मुद्दा दुःखाचा नाही
दुःख होते कि नाही हा आहे

बधिरपणाची सूरी मी ज्ञ पासून पाहतोय
पण निदान सेल्फिश भावनांचा केऑस तिच्यात जिवन्त होता
तुझा सेल्फ इज डेड टाईप चेहरा

रियॅलिटीची न झेपणारी वायर कट झालीये
कि इमोशनल तार फक्त मोजीत प्रकटते ?

फेसबुकवरील तुझे अश्रू मोजून मी थकून गेलोय

झोपेत ओओ आणि मांजरमोजी

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, June 19, 2020

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ११  श्रीधर तिळवे नाईक



हस्तिदंतातला फिनिशियन स्फिन्क्स घेऊन आलोय
ड्रॅगनला विकायला
शांगच्या राजधानीत

मी भिंतींना पाहतोय
कि भिंती मला पाहतायत
कळत नाही ह्या शहरात

आरश्यांची शेवटची हद्द भिंत असते
असं माझा बाप म्हणायचा

आणि भिंतींना स्फिन्क्स विकणं म्हणजे
सापाला गरुड विकणं

हुआनच्या किनारी सारथी आणि घोड्यांसकट
रथ पुरणाऱ्यांना मी चक्रम म्हणावं का ?

गीता इथे जन्मावी कशी?




अस्तित्वात नसलेल्या स्वर्गासाठी  काय काय करतात लोक

फू हाओ च्या नाजूक बोटांत हस्तिदंताची अंगठी घालून
शृंगार करण्याचा माझा प्लॅन
तिच्या शवापाशी कोसळलाय

प्रेयसीपर्यंत पोहचेपर्यंत युग खपतं आयुष्याचं
आणि शेवटी हाती काय लागतं
तर शव
आणि सोळा बळी
तिच्यासोबत स्वर्गाला जाण्यासाठी किंवा प्रेमात पडले म्हणून

मी आधी पोहचलो असतो
तर सतरावा असतो

राजा मला विचारतोय
स्फिन्क्स मधला सिंह आणि माणूस वेगळे करता येतील का
ते एकत्र असले कि बंडाळ्या होतात

मी म्हणतोय
तुम्ही खरेदी करत असाल तर दोघांना वेगळं करेन महाराज


श्रीधर तिळवे नाईक






माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १२ श्रीधर तिळवे नाईक
व्यापार करून डोकं जड झालंय

एक उदासी पसरलीय मेंदूवर

साला ह्या लेनदेनींन मिळतं काय ?

माल निवडायचा
मालाचं संरक्षण करायचं
माल विकायचा

आणि शेवटी सरकारला टॅक्स द्यायचा
कमावलेल्या पैशाच्या ७० टक्के

साधा उंदरांचा बंदोबस्त होत नाही सरकारकडून
आणि तरी टॅक्स हवा

मार्ग तर फाटलेले जिथेतिथे

बैल आणि घोडे तक्रार करत नाहीत म्हणून बरं
नाहीतर पहिली तलवार प्राण्यांनीच उचलली असती
वर पुन्हा रिश्वत आहेच

जणू सरकारसाठीच व्यापारी राबतो आहे
बाकी जनता तर सरकारी दासच

मतदानाचा हक्क मिळाला म्हणून दासमुक्ती होते काय ?

जोखडाची इतकी सवय झालीये कि
चुकून स्वतंत्र झाले तर लोक गोंधळतील
कि स्वतंत्र हातवारे कसे करायचे म्हणून

मी टॅक्स देऊन पडलोय ह्या जंगलात

एक झोपच आहे
जिचा टॅक्स द्यावा लागत नाही

झोपतो आता
चंद्रापुढं
फेस टू फेस

त्यालाही माझा चेहरा बघून
पौर्णिमेचा फील आला पाहिजे

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक



ब्रॉन्झ भांड्यातून निरोपाची दारू दिली जातीये
आणि मृतावर पवित्र पाणीही शिंपडलं जातंय

नवी भांडी जुन्या भांड्यांना रिप्लेस करतायत
जशी नवी प्रेतं जुन्या प्रेतांना

माणूस गणित काय शिकला
मेल्यानंतर लाखो वर्षे
स्वर्गात जगण्याची स्वप्नं पाहायला शिकला

स्वर्गाचं आणि नरकाचं मूळ
गणितात आणि स्वप्नात



मोल्डही रिपीट होतायत ह्या पिवळ्या लोकांच्या देशात
मेटॅलिक स्पेस हे वैशिष्ट्य

वाढवत न्ह्यायचं हीच जीवनशैली

ईजिप्शियन सिंहाकडून खाल्ले जातायत
तसे हे वाघाकडून खाल्ले जात नाहीत

गुईतलं मांस आणि गुतली वाईन
जिभेवर चव डान्स करतीये

रक्त धुण्यात हे लोक एक्स्पर्ट आहेत

कर्मकांडावर आरूढ होऊन माणूस शेवटी काय कमावतो ?
प्रवास ?

मी समुद्रावर आरूढ व्हायला देश सोडून चाललोय

पाण्यासारखा अश्व नाही
वेद वाचून मी इतकंच शिकलो

श्रीधर तिळवे नाईक



माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक



देव माणसांप्रमाणे दिसतात
हे कॅरलला आलं कि तीव्रतेनं जाणवतं

माझे वडील जे बबलइतके हलके होते
गोळाफेकीतल्या गोळ्यासारखे जड होत गेले

वजन नेमकं कुठं वाढलं
ते शेवटपर्यंत कळलं नाही

इथल्या देवांचंही काहीसं तसंच झालेलं दिसतंय

देव माणसांपेक्षा वजनानं हलका पाहीजे
तरच माणूस तरतो
नाहीतर देवात बुडून मरतो



हे लोक आमच्यासारखेच दिसतात
पण ह्यांचे देव आमच्या देवांपेक्षा क्रूर आहेत

अँडीजच्या पायाशी सुख
शिखरावर नरभक्षक दुःख

ग्रहणांना सतत घाबरणारे लोक
सूर्याला अंडरएस्टीमेट करत असतात

परदेशात स्वदेश सुट्टीवर गेलेला असतो
इथं तसं होत नाहीये

कदाचित हे लोक
समुद्रात वाट चुकलेल्या
आमच्याच पूर्वजांचे वारस असावेत



मेलेल्या पूर्वजांच्यात अडकून पडण्याची सवय सगळीकडं

बरं झालं भगवान शंकरांनी पुनर्जन्म सांगितला
निदान आमच्यासारखे काही
पूर्वज पुन्हा जन्म घेऊन सेटल झालेत म्हणून
कायमचे त्यांच्यापासून मुक्त झालो



इथले भगत नशा करून प्राणी बनतात
आणि अंगात आल्यासारखे बोलतात

मी इथं पॅरॅक्स डिशेससाठी आलोय

एका श्रीमंतांनं ऑफर दिलीये

मी अँटिक गोष्टींना कमर्शियल करून
सिव्हिलायझेशन्स विकायला काढतोय
असा आरोप
माझ्या इथल्या प्रेयसीनं केलाय

मी म्हणालो
क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनपेक्षा
कॅश ऑफ सिव्हिलायझेशन केव्हाही बरी

श्रीधर तिळवे नाईक




नाम
श्रीधर
जात
इन्सान
बाप
शांताराम
जात
ब्राम्हण वैश्य संकर
आई
नलिनी
जात
वैश्य क्षत्रिय संकर
मतलब
आजी प्रभू होती

फिर फुले आंबेड्करके पीछे क्या कर रहा है ?
सही लोग है इसीलिये पकडा है
पकडा नही जकडा है तेरेको इन लोगोंने सत्यानाश करेंगे तेरा क्या लाया है ?
पेरूसे डिशेस है
पेरू ?
देश फल नही
ओरिजिनल है
नाही प्रतिकृती है
अलाउ है ?
ओरिजनल अलौ नही प्रतिकृती है
ताजमहल के माफीक
हां
कबसे धंदेमें हैं ?
१९९१ से
किसने एंट्री दी ?
कमलेशने
तू कमलेशका लडका है ?
नहीं ! मैं कानून तोडता नही !
निकल
मेरा माल
कल कलेक्ट कर
झ्यांसा दे रहे हो क्या ?
अबे कुछ तो इज्जत कर हमारी हम जयभीमवाले है



व्यापारी नॅरेटरही झेपत नाही असं कल्चर पाठीवर टाकून

इथे सोपारा आणि प्रतिष्ठान आणि सातवाहन होऊन गेलेत
ह्यावर कोण विश्वास ठेवेल ?

ग्रीक व्यापारी मराठी व्यापाऱ्यांना स्वतःच्या मुली देत
ह्यावर कोण विश्वास ठेवेल ?

मी कवी होण्यासाठी तिळवे भांडार गुंडाळून ठेवावं काय ?

श्रीधर तिळवे नाईक




माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक

पूर्वी लोक एकदा खोटं बोलले तरी थकून जायचे
आता हजार वेळा खोटं बोलूनही
लोक थकत नाहीत

माणसांचा खोटं बोलण्याचा
आणि खोटं ऐकण्याचा स्टॅमिना वाढलाय

कला खोटी असते
आणि लोक रोज कला पाहतात

सोपं ऑपेरा
मुव्हीज
फेक रियालिटी शोज

लोकांना खोटं पाहण्याची
आणि ऐकायची सवय होत चाललीये

मला भय आहे
माझा मृत्यू
खरं बोलून बोलून होईल

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक

Wednesday, June 17, 2020

आत्महत्या

सुशांतची  आत्महत्या माझी आत्महत्या नाही 
तुझी आत्महत्या नाही 
म्हणूनच ती काल्पनिक आहे 
आकलनाची सुरवात इथून होते 

२ 
मेलेला कशाने मेला 
ह्यावर चर्चा करून 
मेलेला परतत नाही 

आपण आपलं आयुष्य जगावं कि नाही 
हा प्रश्न विचारणारा 
मूळात मुक्त आहे का 
कि तो 
समाजाने तयार केलेला 
आर्टिफिशियल इंटीलिजन्स आहे ?
आत्महत्या करतांना 
मी प्रश्न विचारतो 
आणि आत्महत्या थांबतात 

अनेकदा आत्महत्या 
चुकीच्या प्रश्नांच्यामुळे 
निर्माण झालेली असते 


आपण आपल्या आयुष्याची लायकी ठरवतो 
कि ते जगायच्या लायकीचे आहे 
किंवा मरायच्या लायकीचे आहे 
कशाच्या आधारे ?

लायकी आयुष्याचा भाग आहे का ?
कि ती प्रोग्रामड आहे ?


आपण समाजाला नकोसे झालो 
ह्यामागे 
आपण समाजाला हवेसे असायला हवोत 
हे अपआकलन असते 


अनेकदा 
आत्महत्या हा फक्त विचार असतो 
आणि आपण विचाराच्या आहारी जातो 

विचार आयुष्याचा पाया नाही 
साधन आहे 
आणि साधन आपण वापरू तसे वळते 

आत्महत्या 
बुटांच्या मापात बसत नाहीत म्हणून 
पायांना संपवणे असते 

बूट काढ 
पाय मोकळे होतील 
आणि नाचायला लागतील 

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून)
श्रीधर तिळवे नाईक 

Thursday, June 4, 2020

शेवटी सगळ्यांचा नेमाडे होतो : महानुभवी एकविसाव्या शतकातला दृष्टांत श्रीधर तिळवे नाईक

हत्तीण मेली

ती ना ब्राम्हण क्षत्रिय वैश्य ना शूद्र
ना देशस्थ ना कोकणस्थ ना सुतार ना मांग

त्यामुळे तुम्ही संपूर्णपणे दुःख व्यक्त करू शकता 

मात्र ज्या व्यक्तींमुळे ती मेली
ती ब्राम्हण वैग्रे
ती सुतार गुरव वैग्रे
असू शकते
आणि संपूर्ण राग करण्याऐवजी
तुम्ही पार्टल राग व्यक्त करू शकता
आणि तुमच्या वर्ण जातीचा नसेल तर संपूर्ण

काय करणार
हा देशच असा आहे
कि सगळ्यांचा शेवटी नेमाडे होतो

म्हणजे असं कि
जात व्यवस्था नष्ट होणार नाहीच असं स्वीकारून
मी उभा अक्ष नाकारतो
आडवा स्वीकारतो वैग्रे
जातीयवादी पण खुश
जात न मानणारेही खुश

तेव्हा लागा कामाला
नेमाडे व्हायला

शेवटी सगळ्यांचा नेमाडे होतो

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, June 2, 2020

श्रीधर तिळवे नाईक

संपूर्ण ब्रह्मांड झालास तरी
त्या ब्रह्मांडातला  कोव्हीड
कोव्हीडच राहणार

तू कोव्हिडला बदलू शकतोस ?
आणि समज शकत असलास
तरी तो बदलणं योग्य आहे ?

कॅन्सरनं कित्येक गेले

कसलाही प्रतिकार न करता

रामकृष्णांच्यापासून जे  कृष्णमूर्तीपर्यंत

मरण सोपं असतं
कारण मरण मरण नसतंच

माणसं घाबरतात
मरायला

भय हेच मरण
मरण हेच भय

लोकांना त्यातला काटाछापा कळत नाही

अज्ञान असतं

तुझं ज्ञान इतकंच
कि तुला कळतं
दोन्ही एकच आहे

तुला कळतं
ब्रह्मांड आणि कोव्हीड एकच आहे

तुला कळत
कि शेवटी  अद्वैत आहे

तू मरत नाहीस
तू आतल्या आत कूस बदलतोस

श्रीधर तिळवे नाईक