मोर्चा २ श्रीधर तिळवे नाईक
मोर्चा इंटरनेटसारखा ग्राहक वाढवत चाललाय
मोर्चा तत्सम होतोय तद्भव होतोय अपभ्रंश होतोय
इट माइट बी गेम फ्रॉम बारामती
मुलगी मेलीये आणि रडतीये स्वतःच्या प्रेतात
हे सगळं तिच्यातून निघालंय ह्यावर तिचा विश्वास बसत नाहीये
ती अतोनात दुःखी आहे
जखमा सुजलेत
हा मोर्चा तिचा शोक आहे का ?
तिने ऍट्रॉसिटी कायदा वाचलेला नाहीये
तिला खुंखारतेचा माइक्रोहार्ड माहित आहे
हा मोर्चा त्या पुरुषप्रधानतेच्या दारी का जात नाहीये
तिला प्रेतात बसूनही गुंतागुंत कळत नाहीये
ती विचार करतीये
मुलीला भिंतीसमोर
बलात्कारात आरक्षण रीमिक्स होतंय
आणि मोर्चा मिक्सर घुसळत घुसळत रिसिम्युलेट होतोय
शासक वाट पाहतायत एका नव्या ब्रेकिंग न्यूजची
सर्वांनाच माहित आहे
श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
नोटा श्रीधर तिळवे नाईक
१
ईश्वर म्हणाला कि
एकतर संपूर्ण मेंदू रद्द करता येईल
किंवा मेंदूतील नोटा
मी मेंदू रद्द करवून निघालो तर
जागोजागी लोक नोटा कॅश करत
२
लोक म्हणाले कि
नोटा चलनात आहेत
आणि चलनाविना चालणे अशक्य आहे
मी रद्द झालेल्या मेंदूने
चालण्यासाठी आवश्यक तेवढ्याच नोटा
नोटा म्हणून स्वीकारल्या
आणि आवश्यक तितक्याच नोटा बाळगायला सुरवात केली
३
मी रद्द झालेल्या मेंदूने चालत चालत
आवश्यक तेवढ्याच नोटा बाळगत
मिलिंदच्या बंगल्यात पोचलोय
आम्ही एकमेकात छत्तीस वर्षे खेळवलीयेत
आणि आठवणींचा मैत्रय उपसा चालू आहे
करस्पॉन्डन्सचं स्पेलिंगही माहित नसलेली माणसे
करस्पॉन्डन्स सांभाळण्यासाठी सरकारने हाताखाली दिलीयेत
आणि त्यांना सांभाळतांना होणारी सरकारची गोची
तो शेअर करतोय
अचानक बातमी झळकतीये टीव्हीवर
५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यात
बहुदा मेंदू रद्द करण्यात सरकारला अपयश आलंय
किंवा सरकारला मेंदू रद्द करणे शक्य नाही म्हणून
सरकारने रिप्लेसमेंट म्हणून हा उपाय शोधलाय
४
मी मिलिंदकडे टकामका पाहतोय
मी संन्यासी तो इनकम टॅक्स आणि कस्टम ऑफिसर
नोटा चलनात पांढऱ्या ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावरही आहे
आणि सरकारने काळ्या नोटा नष्ट व्हाव्यात म्हणून हा उपाय योजलाय
असं सरकार सांगतंय
आपल्या मेंदूत काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या नोटा असतात का ?
मी प्रश्न विचारत नाही
कारण मिलिंद अस्वस्थ आहे
हा निर्णय चूक कि बरोबर त्याच्या मेंदूला ठरवता येत नाहीये
५
मी बंगला सोडून
बाईकवर बसून
स्वतःत चालतोय
ह्या देशात काळ्या नोटा नाहीत असा मेंदू कोणाकडे आहे ?
६
लोक ऑल टाइम मेंदू ( ए टी एम )पुढे रांगा लावून उभे आहेत
त्यांना पांढऱ्या नोटा काढणे
सरकारने सक्तीचं केलंय
आमची मेहनत आमचा पैसा आमचे अकौंट आमचा मेंदू
त्यातून किती नोटा काढायच्या हे ठरवणारे
सरकार कोण ?
कुणी संतप्त होऊन विचारतोय
आणि रांग संतापातून ताप झेलत पुढे सरकतीये
७
ज्यांचा हिशेब लागतो त्या पांढऱ्या
ज्यांचा लागत नाही त्या काळ्या
सरकारला हा हिशेब द्यायला हवा
कारण सर्व नोटा सरकारने स्पॉन्सर केलेत
अंतिमतः सर्व नोटा सरकारी आहेत
सरकार सर्वनोटांधीश आहे
असे असेल तर
सरकारला स्वतःच्याच नोटांचा हिशेब लागत नाही
हे गौडबंगाल काय आहे ?
८
काळ्या नोटा सरकारचा अनकॉन्शसनेस आहे का ?
तोच आख्खा कॉन्शसनेस डिक्टेट करतो का ?
हे कॉन्शसनेसने अनकॉन्शसनेसविरुद्ध केलेले बंड का ?
९
ज्याच्याकडे काळ्या नोटा
तोच ह्या देशात श्रीमंत कसा ?
हे ब्लॅक मॅजिक काय आहे भाऊ ?
१०
लोकांना किराणाभुसार भरायला
भाज्या विकत घ्यायला
औषधे खरेदी करायला
लग्न करायला
नोटा हव्या आहेत
आणि सरकार म्हणतंय
हे सर्व ह्यापुढे पांढऱ्या नोटांनीच करायचं
पण पांढऱ्या नोटा कुठं आहेत ?
कुठं आहेत पांढऱ्या नोटा ?
सरकारने पुरेश्या पांढऱ्या नोटा छापल्याच नाहीत का ?
मग चलनातल्या नोटा रद्द का केल्या ?
नोटांच्याशिवाय हा मेंदू चालवायचा कसा ?
११
सरकार दिलासा देतंय
नव्या नोटा येतील येतील येतील येतील
शहर बँक्यांच्यापुढे ए टी एम पुढे रांगा लावून
नव्या नोटांची वाट बघत उभं आहे
आणि नव्या नोटा कुठं आहेत
त्या पुरेश्या आहेत कि नाहीत
कुणालाच माहीत नाही
नोटा कमी पडणारे मेंदू सर्वत्र हिंडतायत
नोटा कमी पडल्याने मेंदूला लकवा पडण्याची भीती आहे
नोटांना अडिक्ट झालेला मेंदू पिसाळलाय
मी पिसाळण्यातून कोल्हापुरभर हिंडतोय
हे अघटित आहे पण घडतंय
नोटांना अडिक्ट झालेलं शहर
नोटांच्याशिवाय पिसाळत चाललंय
मात्र ते सूर्याजी पिसाळ बनणार कि
शिवाजीराजे भोंसले
हे इतकी वर्षे ह्या शहरात राहूनही
मला कळत नाहीये
श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
जे बोलायचं ते बोलून झालंय
फुलांचा सुगंध आपोआप पसरतो
पण सर्वच नाकांना तो घेता येतो असे नाही
अत्तरांना सरावलेली नाके
आणि पडद्यात झोपी गेलेले मेंदू
उमललायस उत्तम
वाळताना ह्यांना समजत कसे नाही
ही कळकळ नको
करुणेची वाजणारी बासरी
बहिऱ्यांना जाऊन मिळते
तरीही वाजव
ताजेतवाने श्वास
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
पुरस्कार वापसी श्रीधर तिळवे नाईक
राजकारणाला ठार मारायला निघालेत कवी
पुरस्कार परत करून
जे कवितेच्या झ्याटाएवढेही नाहीत
त्यांना कळत नाही
सरकार म्हणजे पंतप्रधान वा पार्टी न्हवे
आणि पुरस्कार परतावा म्हणजे निषेध न्हवे
त्यांचं कौतुक होतंय
आणि ते खुश आहेत
कि त्यांचं कौतूक होतंय
शासन आणि प्रशासन हसतंय
त्यांना कवितेला हसून ठार मारण्याची कला
१९४७ पासूनच अवगत आहे
ते फक्त अचम्बा दाखवतायत
कि हे गवताचं पातं
धक्कादायक आहे
त्यांना पूर्वीही काही करायचं न्हवतं
त्यांना आत्ताही काही करायचं नाहीये
फक्त परत आलेल्या पुरस्कारांची विल्हेवाट
कुठल्या खात्याची
एवढंच ठरवायचं आहे
आणि नंतर हेही काम पेंडिंग ठेवत
हसायचंय
कवींना वाटतंय कि
ते पीएमना टक्कर मारतायत
आणि पीएम आहेत कि
त्यांना अद्याप
भालचंद्र नेमाडेंची स्वहस्ते पुरस्कार दिलेली कादंबरीही
वाचायला वेळ मिळालेला नाही
निषेधाच्या सूया उगवतायत
आणि शासन आणि प्रशासन त्यांना
दातात अडकलेल्या मांसाला काढण्यासाठी
दंतकोरण्यासारखं वापरतायत
कवींना प्रसिद्धी मिळतिये
मीडियाला फुटेज मिळतंय
प्रेक्षकांना करमणूक मिळतिये
शासकीय कारभार
नेहमीप्रमाणे काहीच न करता
सुरळीत चालू आहे
त्याला सत्तेचा स्वभाव माहित आहे
आणि
कवींच्या आणि राजकारण्यांच्या मर्यादांही
तो अमर्याद आळसाने
कवींना जांभया कधी येतायत
त्याची वाट पाहतोय
आणि कवी पुरस्कार परत करत
जांभई पुढे ढकलतायत
श्रीधर तिळवे नाईक
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
शहाणा माणूस ब्रम्हचर्य पाळणारा असावा
भारत जळाला त्या दिवशी
१
मुक्त झालेल्या माणसाच्या अंगाला
मृत्यू लागत नाही
त्याच्यासाठी मृत्यू हा फक्त कपडा असतो
आणि तो मृत्यूवर चर्चा करताना
कापडावर चर्चा करत असतो
२
शिष्टाचार कापडापासून बनलेले असतात
आणि त्यांना कापसात परतणे अशक्य असते
३
असं नाही कि
मृत्यू हे दुःख नाही
पण ते टाळता येतं
तू केवळ माझ्याशी स्पर्धा करत
मेडिटेशन केलंस
आणि तुझी साधना ही साधना न राहता
केवळ एकांताचा फुगवटा बनली
आणि शेवटी मृत्यूच्या सुईने फुटली
४
फुटणार तर सगळेच आहोत
आपण सर्वच फुटायच्या गोळ्या
आपल्या बॉडीत घेऊन जन्मलो आहोत
मी देहातच फुटलो
आणि फुटायच्या गोळ्यांचा अंत झाला
महामृत्यू पाहिला कि
इतर सारे मृत्यू किरकोळ होतात
तुही अपवाद नाहीस
फक्त भाऊ असल्याने
हा किरकोळपणा थोडा सशक्त वाटतो
इतकंच
५
जळ
मी नसताना जळ
माझ्या अभावापुढे जळ
सारे अभाव जळतात
अगदी त्यांचा पीळही
तुझा सुम्भ थोडा कडक असल्याने
त्याचा आवाज
मला थेट मुंबईत ऐकू येतोय
एव्हढंच
*****
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )
माझ्यासाठी तू फक्त आई नाहीस
माझं लाईफ जन्माला घालणारी लाईफ पार्टनर आहेस
तुझेही नखरे आहेत विशेषतः संताप
काहीही फेकून मारायचीस आमच्या लहानपणी
राग आल्यावर
बायजीनं तर तू तिला मारायचीस म्हणून
स्वतःच्या मुलांनाही मारलं नाही प्रतिक्रिया म्हणून
तुझेही ताप आहेत विशेषतः स्पष्टवक्तेपणा
कुणासमोर कुठंही कधीही
मग डॉन असोत कि पोलीस
सत्याला घालूनच हिंडायचीस तू
तुझं प्रेम पृथ्वी घुसळणारं
आणि तुझं मनमोकळं स्माईल सगळ्या जेलनां लॉक करून जाणारं
घर सोडलं तर कशाविषयीच पझेसिव्ह नाहीस तू
" बाईमाणसाला हक्काचं घर लागतं राजा स्वतःच्या पिल्लांसाठी "
ब्रा न घालता बिनधास्त फक्त चोळी घालण्याचा तुझा धीटपणा
थेट पार्वतीशेजारी तुला उभा करतो
मला लहानपणी तुझा लाल परकर जबरदस्त आवडायचा
मायेच्या अनेक नद्या वाहायच्या त्यातून
मी स्त्रीमुक्ती थेट तुझ्याकडून शिकलो
तू म्हणायचीस ," बाईनं नदीसारखं असायला हवं पुरुष वाळवंटांसारखे असतात कोरडे
बायकाही कोरड्या झाल्या तर जग कसं चालेल ?"
भारत अंगावेगळा करायला ठाम नकार देणारी ममता
ज्या वेळी भारत बिघडायला लागला
तेव्हा गडबडायला लागली
त्याच्या दारुड्या रात्री तुझ्या पदरात कोसळायला लागल्या
आणि तू आतून फाटत गेलीस
आताही तो दारू पिऊन आला कि तू कोसळतेस
आणि आता उजू गेल्यावर तू कायमची अबोल
मी आभाळाचं खरकटं असल्यासारखे काळजातले ढग
बेसिनमध्ये विसळतोय
अख्ख घर घासतोय
पण आता काहीही चकाचक दिसत नाहीये
वाटतं कि घर दगावलं
अंगणातली झाडं पडतायत
उजूच्या आठवणीत
मांजर काहीही खात नाहीये
तिलाही कळलंय
"उजू गेली "
मी बसलोय तुझ्यापुढे मांडी घालून
आणि तू अबोल
घराचा अंत झालाय
आणि तू न बोलून
आणि मी बोलून
खांदा देतोय
श्रीधर तिळवे नाईक