Saturday, May 22, 2021

३६ लोक इस्पितळांत गेले आणि परतले श्रीधर तिळवे नाईक 


३६ लोक इस्पितळांत गेले आणि परतले 


एक आमदार होता आणि स्वातंत्र्यसैनिक 

पासवर्ड हरवलेलं प्रेरणास्थान 

गांधींच्या चष्म्यातून हिटलरला पाहणारं 


एक होता हॉटेलवाला 

फिशहुक्ड आणि नेटदार 

तिळवे भोजनालयाच्या डिजिटल फ्लेम ग्लोबल करणारा 


एक नोकरी करणारा 

निहीलिस्टिक भगव्या शेपट्या हलवणारा 


एक करंटआमदाराचा माजी पी ए माजी सरपंच 

ऋतूस्क्रॅपर आणि हातांवर अँबिशनचे डोंगर मळणारा 


एक शॉपर 

पृथ्वीला तबला बनवून 

त्यावर ताल घोळवणारा 

आणि तरीही अमान्य असूनही 

आर्टिफिशियल जग विकणारा 


एक हाऊसवाईफ 

पदरात आत्महत्या , मृत्यू आणि वेडेपणा फरफरवणारी 


दुसरी हाऊसवाईफ 

अनलिमिटेड दुःख गवतात फेकून त्याला नाहीसं करणारी 

चावी शोधणारी 


एक टीव्हीधारक 

मॅचधारक कॅचधारक 


एक आणखी काही आणखी काही 


एका घराण्यातील तीन घरातील 


म्हणतायत 

कोव्हीड खरोखर झाला कि नाही झाला 

माहीत नाही 

पॉझिटिव्ह झालो खरे कि खोटे 

माहीत नाही 


गेलो आणि परतलो 

एव्हढंच मेडिकल सत्य 


बाकी बरे होईपर्यंत आम्हालाही 

आम्ही अफवा आहोत 

असा फील होता 


३६ माणसे पेशन्ट वास्तव म्हणून इस्पितळात गेली 

अफवा बनली 

आणि माणूस बनून घरात परतली 


श्रीधर तिळवे नाईक 

***


तौक्ते श्रीधर तिळवे नाईक 


 १

माणसांना लॉकडाऊन करता येईल 

वादळांचं काय ? निसर्गातल्या ट्रॉपिकल डिस्टरबन्सचं काय ?

आईकडून मुंबईत दाखल झालोय 

तर तुम्ही म्हणताय तौक्ते माणसांच्या काळजावर  घोंगावतंय 

आणि रॅपीडीटीसकट धडकणार  आहे 


आता उघड्या पडलेल्या छताकडं एकटक पाहू 

कि घरातल्या बादल्या नजरेनं मोजू ?

कि काळजाचा करोनाग्रस्त थयथयाट सहन करू ?



कुलपांनी समस्या सोडवल्या असत्या 

तर चाव्या तयार कराव्या लागल्या नसत्या 

लॉकडाऊन म्हणजे चाव्या तयार करण्यासाठी 

मागितलेला कालावधी 

पण तुम्ही तो ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत 

सगळ्यांची दलाली करण्यात वाया घालवला 


टाळूवरचा ऑक्सिजन खाणाऱ्यांचे काय करायचे ?



राजकारण नेहमीच सडलेल्या लोकांच्या हातात असत 

एखादा शिवाजी एखादा यशवंतराव अपवाद 

कारण लोकही शॉर्टकट हितसंबंधपूर्ती शोधत असतात 


लोकांना बेसिक नागरिक कोड पाळायचा नाहीये 

आणि तुम्हाला बेसिक प्रशासकीय ढाचा 


लोकसंख्या इतकीकी 

पूर्वी मेलेले लोक्स दिसायचे नाहीत 

आता मीडिया पाठलाग करत प्रेतं शोधतो 

आणि टीआरपीच्या घोळात आत्महत्या करतो 


गंगेतून वाहिलेली प्रेतं 

लोकशाहीची हत्या सांगतात 



लॉकडाऊन हळूहळू लोकडाऊन बनत चाललंय 


मला माहीत नाही 

ह्या शहरांत जे सतत राजकारणात रुतत 

मी कसा सर्वायव्ह होणार आहे ?


जेमतेम छप्पर 

आणि १२० मेल वेगाने येणारे वादळ 


दलदलीत वसवलं गेलेलं घर 

उखडलं गेलं नाही तरी खूप झालं 


रोज जगण्यासाठी प्रार्थना करणारे लोक 

अधिक काय मागणार ?



तुम्ही सोसायट्यांना माणूस नाकारण्याचा अधिकार दिला 

आणि त्यांनी मी केवळ संन्यासी आहे म्हणून नकार दिला 


गरिबांच्या वस्तीत राहिलो 

तर तुम्ही म्हणालात 

गरिबांनी कौलं नाहीत पत्रे टाकावेत 


आणि पत्रे दिले तेही फाटके 

त्यावर प्लास्टिक कव्हरं घालायला गेलो 

तुम्ही वादळाची वॉर्निंग दिली म्हणून 

तर लॉकडाऊनमुळं दुकानं बंद 

आणि कव्हरं गायब 


तुम्ही सांगा 

पत्र्यांच्या साहाय्यानं 

वादळ कसं परतवायचं ?


तुम्हाला अशा समस्या दिसत नसणारच 

आणि वादळाला तर ते समस्या आहे हेच माहीत नाही 



पाऊस पडतोय 

सारख्याच स्पीडनं 


पूर्वी सहा ते आठ बादल्या पुरायच्या 

आता जे मिळतंय ते लावत सुटलोय 


बादल्या फुल्ल 

भांडी फुल्ल 


एक ओतेतोवर दुसरं फुल्ल 


आणि तेच 

जे होईल असं वाटत होतं 


पत्रा फाटलाय 


पाऊस घरात पडतोय कि बाहेर ?


मी चिंब भिजलोय 


पुस्तकं चिंब भिजलेत 


प्रथमच भिंती पाण्यानं भिजलेत 


मी सर्व पुस्तकांना बाहेर हाकलून द्यावं का ?

किंवा प्रेतासारखं गंगेत विसर्जित ?


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधल्या आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीमधून )


एक आडमुठे कन्फ्युजन 

सत्तेच्या खुर्चीवर देश अडवून बसलेले 


सतत एक्स्ट्रीम गाईडलाईन्स 

सोप्या गाईडमध्ये सपाटपणे पाठ केलेल्या 


अंमलबाजवणी म्हातारी 

सतत भोपळ्यात बसून 

चलरे भोपळ्या टुणूक टुणूक 


कम्फर्टमुद्रा 

विस्कटत 

इतरांना उचकटत 


जणू प्राईममिनिस्टरशिप वॉज एन ऍक्सिडन्टल नाईटमेअर  


समुद्राचा पत्ता नाही शॉवर्स ऑन 


व्हायरसविषयी निदान ऐकलंय हे काय कमीय ?


सायकॉलॉजिकल करोना नावाचा रोग अस्तित्वात आलाय का 

आला असेल तर मनोविश्लेषक तो बरा कसा करणारयत 

कि सत्ता गेली कि आपोआप बरा होईल ?


श्रीधर तिळवे नाईक 


No comments:

Post a Comment