Tuesday, May 25, 2021

माझं समस्त ब्रह्मांडावर प्रेम आहे 

त्यात तू ही येतेस 

विशेष प्रेम माझ्यात अस्तित्वात नाही 



मी आहे समग्र 

तूला हवं आहे अग्र 

पुनरुत्पादनासाठी 


तुला नीना गुप्ता व्हायचं आहे 

आणि मी व्हिव्हियन रिचर्ड्स व्हावं अशी तुझी इच्छा आहे 


इच्छा चुकीची नाही  

शेवटी मूळ कुणाचे ठेवायचे 

हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बाईला असतो 

पण मूल फक्त हवेवर सांभाळणार आहेस का ?



मी मूलांना जन्म दिला नाही 

कारण संसार 

मूलांच्यापासून सुरु होतो 

एकदा मूळ सुरु झालं कि 

झाडं आपोआप तयार होतात 

आणि जंगलही 


मला मोक्षाखेरीज काहीच नको होतं 

आणि मुमुक्षुला 

झाड आणि जंगल 

दोन्ही वगळावी लागतात 

संसार वगळावा लागतो 


कंडोमने मूल होत नाही म्हणून 

संसार सुरु होत नाही 

म्हणून मी सेक्स एन्जॉय केला 

पण पुढं कळलं 

सेक्स ही सर्वात मोठी तृष्णा आहे 

आणि सेक्समधून जोवर मोकळा होत नाही 

तोवर मी मुक्त होणार नाही 


मी मग कामावर फोकस करून 

 कामातून मुक्त झालो 


तुला आता असं वाटतंय कि 

मी फक्त मूल द्यावं 

आणि निघून जावं 


मूल म्हणजे काय पार्टटाइम कनेक्टिव्हीटी नसते 

बाप ऑपरेट होत राहतो सूक्ष्मपणे 

म्हणूनच बुद्ध यशोधरेकडे येतो 

आणि राहूलला घेऊन जातो 



सेक्स न करता मूल होऊ शकतं 

पण त्याचा परिणाम नेमका काय 

ह्याविषयी मीही तुझ्याइतकीच अनभिज्ञ आहे 


आपल्याला अज्ञानापासून सुरवात करावी लागेल 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )


जागतिक व्हायला निघालो होतो 

घरामध्ये अगतिक झालो 


आकाश अवघे दिसत होते 

पिंजऱ्याचा नागरिक झालो 


जमीन सर्वांना मुक्त वाटली  

रस्त्यांसाठी मोताज झालो 


कुठेही कसाही बाउंस व्हायचो 

कोपऱ्यामधली केरसुणी झालो 


वाटले जग अव्हेलेबल झाले 

मर्यादित डिजिटल खिडकी झालो 


जो तो देतोय गाईडलाईन्स 

घेणारा पाईप लाईन झालो 


होईन मीही कधीतरी रिस्टोर 

ट्रांझीटरी ठहराव झालो 


जगण्यावर ताव मारायचा होता 

मी जगण्याचा आव झालो 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )



==========================================================

फॅमिली मॅन श्रीधर तिळवे नाईक 

आई गेलीये 

मेंदूतले कैक डाऊनलोड्स 

अनलोड करून 

माझ्या रिक्ततेचा एकमेव शृंगार समाप्त 

अंगार समाप्त  


करोना स्टॅटिस्टिकल फॅट  वाढवत 

प्रोटिन्सच्या आवाक्याबाहेर

ह्युमन इम्म्युनिटीचा अदमास घेत 

 

मी गोरेगावमधलं आकाश मोजत बसलोय 

आणि गोव्यात मडकईत 

ऍसिड 

थेम्ब न मोजता 

फॅक्ट्रीत काम करतांना 

भूषणच्या हातापायांवर 

आगीचा भाजलेला नकाशा नोंदवत 


कयामतींची मला सवय झालीये 

मी फक्त अलची डेन्सिटी मोजत 


आसपास त्रिशंकू झालेलं युग 

स्वतःचा मर्डर 

आत्महत्या म्हणून सादर करत 


तुझ्या सौंदर्याच्या हालचाली पहाव्या म्हणावं तर 

तुझा पाय नाचण्याआधीच जायबंदी 


नृत्य थांबलेल्या कालखंडाचं काय करावं 

अमर नसलेल्या माणसांनी ?



बुद्धाचा सार्वजनिक अस्त झालाय 

मोक्ष पर्सनल करण्याचं कारस्थान यशस्वी 


नैतिकतेने कुत्र्यासारखी शेपूट हलवत उभं रहावं

अशी राजकीय अपेक्षा सर्वत्र 


एक निराशा आहे चहुबाजूने चालून येणारी पब्लिकवर 

आणि पब्लिक जखमी जनावरासारखं 

मीडियाला हवे असलेले आवाज 

बाइट्स म्हणून देत 


माणुसकी गोठून पडलीये आसमंतात 

बर्फ इनव्हिजिबल ठेवत 


चांगुलपणाचे ल लागलेत 

आणि वाईट य फाकवून 


माणसं मरतायत 

पण मरताना आसक्त्या सोडत नाहीयेत 


युद्धसुद्धा स्मॉल एडिशन वाटावी अशी परिस्थिती 

मी निष्क्रिय व्हायरससारखा जीवनमुक्त 


आणि जो तो मी ऍक्टिव्ह व्हावं म्हणून प्रयत्नशील 



कदाचित सारीच युगं अशी होती दारू प्यालेली 

आणि कदाचित सारेच बुद्ध असे होते कवितेत खितपत पडलेले 


निवृत्तीवर ज्ञानेश बसलेले 

मुक्ती पहात 

चढलेले सोपान उतरावे लागतात जगात वावरताना शरीराला 


शरीराला ज्वलंत भूक लागते 

शरीर जेवण करते 

शरीराला पार्थिव व्याप्ती असते 

शरीर घर व्यापते 

शरीराला किकमय  संडास लागतो 

शरीर संडासला जाते 


साध्या सोप्या क्रिया 

दुबळ्या शरीराच्या 


माया चढत 

माया उतरत 

आडव्या तिडव्या 


बुद्धिबळाच्या सोंगट्या हलाव्यात तशा 


प्रसन्न हसत 



शरीर मळतं कागदासारखं 

पण फाटत नाही 


मळ इरेज करण्यासाठी अंघोळ 


डेटॉलच्या चेहऱ्यावर माझे अंग अंग 

तरंग तरंग जलतरंग 


नव्याने बसवलेल्या चायनीज टाईल्स 

चकाचक डेंजरस सुंदर 

वॉर्निंग देऊनही बसवल्या गेलेल्या 


पाणी त्वचेवर मायक्रो नद्या सोडत 

आणि मी अचानक 

चायनीज टाइल्सवरून घसरतोय 


घसरताना मला भान 

पकडायला काहीच नाही 

मी संडासातील बादलीवर पाठ टाकत कोसळतोय 


डाव्या हाताला अपघात झाला म्हणून उजव्या हातावर तोलत 

नको तेवढं ओझं 


बोटं मोडू नयेत म्हणून मनगट 


माझ्या डोक्याखाली बादली ठार 


तोलाचं इंद्रिय गमावलेल्या माणसाला खूप सावधान जगावं लागतं 


आंतरिक चैतन्य 

मानवी हालचालींना 

प्रत्येकवेळी सपोर्ट देईलच असं नाही 


अपघात झाला नाही अशी जागा कुठाय शरीरावर ?


नखंसुद्धा बोंबलली विषात 


मी कसाबसा उभा 

पेलत चैतन्याचा सुभा 



मग पुन्हा संडासाच्या भांड्यात 

संडास करतांना 


फर्स्ट ट्रॅजेडी 

सेकण्ड टाइम कॉमेडी 


आपण हसतोय 

आपल्यातले ढग हलवत 



तुझा डान्स करणारा डान्सर पाय गेलाय 

माझा कविता लिहिणारा लेखकाचा हात गेलाय 


काहीही न करण्याचं युग दाटलंय अपंग जीवनशैलीत 


मी फॅमिली मॅन पहात 

टाईमपास  


शून्यता 

नॉनस्क्रीनल 

शरीर नाही म्हणून वाचत 

वाचवत 

वावरत 


तू विचारतीयेस 

नेमकं काय झालं 


मी म्हणतोय 

शिव आंघोळ करतांना 

शिवामध्ये पडला 

आणि आता तुझ्याशी बोलतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )


रीओपन करणाऱ्यास  श्रीधर तिळवे नाईक 


घाबरू नकोस समुद्र रिओपन करायला 

घाबरू नकोस मोकळे आकाश पाहायला 

री ओढत सरकारची जगलास 

आता री ओढ नव्या सुरवातीची 


मृत्यू झाले 

नाही असं नाही 

पण मृत्यूच्या भींतीने 

कितीकाळ स्वतःला कुलूप घालणार ?


स्वतःचं अख्ख आयुष्य लॉकडाऊन करणार ?


पूर्णविराम न्हवता हा अन्गझायटीचा स्वल्पविराम होता 

संपूर्ण वीज न्हवे विजेचा झटका होता 


रक्ताचा बर्फ वितळव आईस्क्रीम बन 

नव्या संवादाची रिमझिम बन 


बंद खिडक्यांचा कोर्स सम्पव 

सडलेले जुनाट सारे सोर्स सम्पव 


हो ताजा फ्रेश भाज्यांसारखा 

पर्यावरणाचे होमवर्क पुन्हा शिकव 

भीतीचा चष्मा डोळ्यावरून उतरव 


काळजातली डायग्राम रियल कर 

किलोग्रॅम झालेले ओझे मिलिग्रॅम कर 


करोना आहे सैतान नाही 

सर्वव्यापक त्याचा अद्याप प्राण नाही 


आऊटब्रेकची शक्यता किती 

आणि तुझ्या इन्फेक्ट होण्याचे भय किती 


नीट बघ नको जाऊ गडबडून 

डिप्रेशनचे ताणही ताड ताडून 


नव्या मेडिटेशनची संधी म्हणून बघ 

स्वतःत वाकण्याची संधी म्हणून बघ 


ऍबिलिटीची क्वालिटी मेंटेन कर 

काही होणार नाही काळजी घे सस्टेन कर 


मेथड बदल क्लोजपची सवय लाव 

आणखी नव्या लयीची सवय लाव 


बघ बाग पुन्हा गजबजली 

फुलांची रहदारी पुन्हा नव्याने सजली 


क्रियेट ट्रॅक ! सेट ! गो फॉर न्यू बिगिनीग माय डियर ! विदाउट फीयर !

झाड  हेल्थ अँड हेल्दीनेस 

मुळातून 

मूळापासुन 


श्रीधर तिळवे नाईक 



फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


पडतांना  गेले बूड 

हातांवर पडला आसूड 

रक्तात रवंथ आहेत 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


लिहिता नाही येत मला 

टायपिंगने तोल सांभाळला 

अक्षरांची  दन्त आहेत 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


पुन्हा घोळ चायनीज 

मणक्यातली काढली वीज 

तरी रीच वाढवंत आहे 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


लेखणीचा हा अस्त का ?

संगणकच मस्त का ?

हा कशाकशाचा अंत  आहे 

फक्त बोटंच जिवंत आहेत 

सुदैवाने ती संत आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

No comments:

Post a Comment