Tuesday, November 21, 2017

शिव प्रत्येकाला नकोय
म्हणूनच जो तो शिव्या देतोय
शीव ओलांडून

नपुसंकता आणि राग
ह्यांच्या मांडवाखालून
उग्र चेहऱ्याने शिव्या जातायत

त्यांना वाटतंय
त्या हिंसेची रिप्लेसमेंट आहेत
जश्या कि वेश्या बलात्काराची

सभ्यता काकडतिये
शिव्यांनीं  निर्माण केलेल्या काकडथंडीत
तिला भीती आहे
पुरुष पुन्हा रानटी होऊन
हिंसेत परतेल

ती डिप्लोमॅटिकली केस टाकून
पुरुषाकडून पुरुष आवरू पाहतिये

पुरुषांना सभ्य बनवण्यात आपण कुठं कमी पडलो
हा प्रश्न तिला आताशा पडत नाहीये
तिला फक्त शिव्या देणाऱ्या पुरुषांना अहिंसा  शिकवायचीये

ती शब्दांनी पुरुषांना बदडतीये
आणि पुरुष पुन्हा शिव्याच देतोय
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


शेवटी त्यांनी तेच केलं
जे करण्यासाठी ते निवडून आले होते

ज्यांनी त्यांना मते दिली न्हवती
त्यांना त्यांनी काहीही केलेलं मानवलं नाही

दोन्हीकडून ट्रोलिंग झालं
पोलिन्ग झालं

जे भुके होते ते भुकेच राहिले
ज्यांच्या विहिरी पळवल्या गेल्या त्या पळवलेल्याच राहिल्या

हे म्हणाले गेल्या सत्तर वर्षात काही विकास झाला नाही
ते म्हणाले गेल्या पाच वर्षात काय घंटा विकास झाला

कुणाचेच गळे बसले नाहीत
गळ्यात उभी असलेली भाषा उभीच राहिली


तिला बसायला कुणी साधी खुर्चीही दिली नाही

वासनांच्या मोरपिसांनी काल्पनिक मोर नाचवले
तृष्णांच्या सापांनी स्वतःचे दात मोजून कवळीत ठेवून दिले

प्रामाणिकपणाचा प्रश्न काहीकाळ प्रामाणिक झाला
आणि मग सत्तेच्या गोट्या चोळायला निघून गेला

हे पुढच्या तयारीला लागले
ते पुढच्या तयारीला लागले

जे तयारीत सामील न्हवते
ते मागे मत द्यायला राहू लागले

पन्नास वर्षे गेली
शंभर वर्षे गेली

राजकारणाने संस्कृतीची चांगली करमणूक केली

आता ऐकतोय कि संविधान फरार आहे
आणि प्रत्येक  पोलीस स्टेशनात
त्याविषयी तक्रार आहे

सापडल्यास कृपया आणून द्यावे
ह्या कवितेचे कवी म्हणून स्वतःचे नाव टाकावे

आपला फरार झालेला कवी
(ज्याच्या फरार होण्याविषयी कुठल्याच पोलीस स्टेशनात तक्रार नाही )
----------------------------------------------------------------------------------------------