Sunday, January 20, 2019

मी फेसबुकवर असतो
तेव्हा मी फक्त फेसबुक असतो

मी पोस्ट वाचत असतो
तेव्हा ती पोस्ट असतो

पोस्ट टाकत असतो तेव्हाही
ती टाकली जाणारी पोस्ट असतो

कॉमेंट करताना कॉमेंट असतो
डिलीट मारतांना डिलीट

माझा उत्सव अखंड आहे
आणि तो तुमच्या ब्रेकिंग न्यूजच्या कुवतीबाहेर आहे

तुम्हाला हवं आहे हॅपनिंग
आणि मी बीइंग आहे

तेव्हा न्यूज देत रहा
कॉलम टाकत रहा

लाईक देतांना मी लाईक आहे

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )


अचानक राज्य आलंय नयेंद्रथलाच
जो नाहीसा झालाय यूरेशियातून
आणि उगवलाय पुन्हा दक्षिण आशियात
होमो डेनिसोवन म्हणून

तो होमो सेपियनला हरवणार म्हणतो

तीन हजार वर्षांपूर्वी  त्याने समुद्र पार केला होता
एका छोट्या बेटातून
जमिनीच्या शोधात पाणी पार करत

त्याच्या बोटींना त्यावेळी नक्षत्रं जोडलेली होती
आणि पाणी मिश्यासारखे पिळत
स्वतःचा मायटोकोण्ड्रिया आभाळावर छापत
स्वतःच कपाळ वल्हवत
तो जमिनीवर पोहचला होता

मार्च २०१० मध्ये शास्त्रज्ञांनी त्याच्या बोटांवरून त्याला ओळखले होते
आणि सुरवातीला तो  तीरूपात होता
होमो सेपियनबरोबर त्याने वन नाईट स्टॅन्ड रचला होता काय ?
शास्त्रज्ञ ह्याबाबत कन्फ्युज आहेत

तो कितीतरी आधी होमो सेपियनच्या आईबाबांना
होमो सेपियनच्या आधी भेटला होता
आणि कसलीही हत्या न करता
परतला होता

तो २०१४ पासून सर्वांच्या विचाराधीन आहे
आशिया ते सैबेरिया त्याचाच डंका वाजतो आहे

त्याने होमो सेपियनचे एकुलता एक हे बिरुद
काढून घेतलंय
आणि आपण अधिक प्राचीन आहे
हेही सिद्ध केलंय

कुणालाच माहीत नाही
तो दंतकथा आहे कि सत्य ?






Thursday, January 17, 2019


स्वर्ग आणि नरक 
दोन्हीवर एकाच बिग बॉसची  राजवट आहे 
ह्याची कृपया  सर्वच एकबिगबॉसवादी  बांधवांनी नोंद घ्यावी 

स्वर्ग आणि नरक 
दोन्हीवर अनेक बिग बॉसेसची  राजवट आहे 
ह्याची कृपया सर्वच बहुबिगबॉसवादी बांधवांनी  दखल घ्यावी 

स्वर्गात 
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे 
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे 

स्वर्गात 
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे 

स्वर्गाचे डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे 

स्वर्गाचे मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते 

स्वर्गातल्या सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत 

तेव्हा या 
स्वागतासाठी हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे 

नरकात 
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे 
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे 

नरकात  
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे 

नरकाचे  डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे 

नरकाचे  मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते 

नर्कातल्या  सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत 

तेव्हा या 
नर्कासाठी  हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे 

स्वर्ग आणि नरक ह्या दोहोंत 
फरक फक्त साईनबोर्डसचा आहे 
त्याविषयी काही अडचणी असतील तर एक दाबा 
अडचणी नसतील दोन दाबा 
कितीही वेळा बटन दाबण्याचे अनलिमिटेड स्वातंत्र्य आपणास देण्यात आलेले आहे 
गोंधळलेले असाल तर शून्य दाबत राहा 


(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या कविताफाईलीतून )