Thursday, April 8, 2021

 तू शासनसंस्था 

सत्ता प्राप्त झालेली 

आणि सत्ता हाताळण्यास उत्सुक 


तू भ्रष्टाचार 

मंत्री होण्यास उत्सुक 

संधीची वाट पाहणारा 


तू मेडिकल सायन्स नेट्वर्कतोय 


तुला विरोध करणारा लसीचा पक्ष स्थापन झालाय 

आणि आम्ही पॉलिटीकल नजरेनं पाहतोय 

आमच्या आयुष्याचा फैसला 

आम्हाला वगळून होणारा 


दोन सरकारं बॅडमिंटन खेळतायत 

एकमेकाला बॅड ठरवत 

आणि आम्ही त्यांचे फुल होतोय 


एक उदास करणारा नरराक्षसीपणा सुरूय 

आणि आम्हाला काहीच करता येत नाही 

जीव जात असतानाही 


आरोग्य इतकं पॉलिटिकल होईल असं कुठं वाटलं होतं ?


मॅडनेस ऑफ सिव्हिलायझेशन प्रत्येकाला जडलाय 

आणि आजारी पडणारा बेदखल 


मला कळत नाहीये 

एक नागरिक म्हणून काय करावं 


लस बनवणारी कम्पनी इंडियन 

तर तिचे सगळे प्रॉडक्शन खरेदी करून 

का लसीकरण केले गेले नाही 


परदेशी लसी पाठवण्यातला ग्लोबल माज 

अडाणचोटपणे कुणी फॉल्लो केला आणि का 


तू हे सर्व एन्जॉयच करत असशील 


पॉप्युलेशन जीवाची किंमत कमी करत जाते 

आणि माणसे एकमेकांच्या मरणाविषयी बधिर होतात 


मंगेश बनसोड तिकडे हॉस्पिटलात 

आणि इकडे मला क्वारंटाईन होण्याचा आदेश 


मी आता चौथ्यांदा पार होईन ऑर्फियससारखा 

तुझ्या मृत्युप्रदेशातून 

मागे न पाहता 

माझ्या हेल्थ नामक प्रेयसीला वाचवत 

क्वारंटाईनचे व्हायोलिन वाजवत 


मुद्दा माझ्या आत्मविश्वासाचा नाही 

कितीवेळा क्वारंटाईन हा आहे 


असं नाही कि मी थकलोय 

फक्त माझे पाय आता यमाळू होऊन होऊन कंटाळलेत 


मित्रा 

मी तुला जा म्हणणार नाही

कारण व्हायरस माणसाप्रमाणेच कुठेही जात नाहीत 

फक्त हा जो व्हरायटी सादर करण्याचा तुझा जो वेग आहे 

तो पॉलिटिक्सपेक्षा कमी ठेव 


नाहीतर हे नतद्रष्ट राजकारणी 

तुझ्या नावाने माणसे संपवतील 

आणि माणुसकीही 


व्हायरसा 

मानवांना जमले नाही 

तूच मानवतावादी हो 


श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )