Tuesday, June 11, 2019

पाऊस १० जून २०१९ श्रीधर तिळवे नाईक 


१ 

वळीव गडगडत आवाजाच्या तोफा उडवतोय 

ढग आभाळ गुंडाळत चाललेत

विजा ब्रेक डान्स करतायत

पाणी पावसाच्या पिना काढून  सज्ज

मी माझ्या घरात छताची तटबंदी चाचपत

पाऊस मुद्दे घेऊन येत नाही
थेट माणसाच्या थाळीत कोसळतो

निसर्गाने माणसाची कन्क्लुजन्स स्वीकारलेली नाहीत

मी तो स्पंद आहे जो भूमिती नाही

ठक

पहिला थेम्ब
नवीन मुलीच्या पहिल्या किससारखा

वासनामुक्त आणि प्रेमाने बावचळलेला



थेंबातलं पाणी दिसतंय
पण अंधार दिसत नाही

पहिल्या धारा भरतनाट्यम करत

था थई  था

था थई था

थ थ त था




वारा वाईन पिल्यासारखा
हवेची लाकडं मोडत

त्यांच्यातील ओल धुमाकूळ घालण्यास सज्ज

मला धारांच्या पडेल आवाजावरून कळतंय
छतावर प्लास्टिक टाकलं गेलेलं नाही

पावसाळा समुद्राच्या चांगुलपणाचं गोड सेल्फ रिप्रेझेंटेशन असतो

दारातील शिलालेखासारखं असलेलं पेरूचं झाड वाऱ्यात हलतंय
पावसानं बहुदा आपला करस्पॉन्डन्स कोर्स चालू केलाय
पेरूचा सिलॅबस मला माहित नाही

निसर्ग रिहर्सल करत नाही
थेट प्रयोग करतो

माहित नाही पहिला पाऊस मला काय काय दाखवणार आहे ?



टीव्ही पाहून पाहून दगड झालेली माणसं
जिवन्त होतायत

आम्ही एकमेकांच्या गॅलऱ्या पाहात
एकमेकांचे चेहरे पहात

माझ्या खाली आणि समोर असलेल्या बायका
बुरखा काढतायत
आणि पाऊस पाहतायत

शौहर ऑब्जेक्शन घेत नाहीयेत

पाऊस कधीकधी कर्मठपणाही बदलतो

लाइफटाइम चष्मा घातलेली दोन पोर चष्मा उधळून
थेट पावसात

प्रत्येक धारेत पाणी झाड आणि दगड

जाणिवेची सूक्ष्म तिरीप मला सांगतीये
आत वळ



मी घरात वळतोय
छतावर सपासप चाबूक पडायला लागलाय

ओल्या झाडांना न कापणारा मनुष्य
आता त्यांनाही सोडत नाही
त्याचा राग आल्यासारखा पाण्याचा हा चाबूक

मी घर पाहतोय
ते व्हिंव्हळायला लागलंय

शेवटी तेच होतंय
जे होणार असं मला वाटलं होतं



संन्याशाला मुंबईत भाड्याने घरं  मिळत नाहीत
शैव संन्याशाला तर नाहीच नाही
जणू संन्याश्याने हिमालयात जावे
किंवा वैदिक आश्रमात वा शैव मठात

काम करून जगणारा संन्यासी रद्दीत जमा झालाय
आणि मी तरीही जिद्दीने मिळेल ते घर घेऊन मुंबईच्या बाजारात उभा
कधी दलितांच्यात तर कधी मुसलमानांच्यात
आश्रमांना वगळत मठांना टाळत

संन्याश्याचे छत
उडाले काय बसले काय ?

पावसाला माझा संन्यास माहित नाही
त्याला माझ्या छताची भोकं दिसतायत

झिरप्या पाऊस
जुल्फे उडवत

धारांच्या सुया सिमेंटला भोकं पाडत
छत म्हणजे जणू सूक्ष्म फुग्यांचे वारूळ

खरा प्रश्न पुस्तकं वाचवावीत कि रेनडान्स करावा हा आहे



मी डान्सला वळणार तोच
फ्लोरवर तडाखेबंद धार

मला गंमत वाटतीये

अचानक पवार साहेबांचा डायलॉग

" साहेब मधला फ्लोर बांधकामात कच्चा आहे काळजी घ्या
पडला बीडला तर --- "

धार नेमकी कच्च्या बांधकामावर

खाली कच्चेबच्चे असलेली फॅमिली आहे काही झालं तर प्रॉब्लेम

मी डान्स कॅन्सल करून बादलीकडे

पावसाने तर जलस्फोट करायला सुरवात केलीये

मी पुस्तकं तुडवत बादली घेऊन येतोय लावतोय

पाऊस ना ब्रेक लावतोय ना ग्रीप सोडतोय
त्याला पाण्याच्या मोटर सायकल्स बेबंद पळवायच्या आहेत

दुसरा स्फोट दुसरी बादली

अचानक तिसरा स्फोट ऑफिस खोलीत
मी बेडरूममधून किचन तुडवत पुन्हा ऑफिस रूममध्ये
तिसरी बादली घेऊन

नऊ वर्षात प्रथमच इथे धार गळतीये
हवेला गुंतागुंतीचा वास
माती आणि गॅसोलीन एकाच नाकातून वहात

बादल्या संपल्यावर काय लावावं ?




मटेरियल वर्ल्डलाच लिकेज
मंत्रमुग्ध रिस्क

छताला एड्स झालाय कि काय
मरायलाच टेकलंय जणू

मी जम्पऐवजी आता डबल जम्प मारतोय

पॉवरड बाय साईबाबाचे चित्र त्रासलेल्या श्रद्धेसारखं खाली येतंय
आणि ओलं होतंय

आणि अचानक धाडधूड थेट पुस्तकांच्या कपाटांवर

वाचवावीत कि पाण्यात मरू द्यावीत ?

मी पुस्तकं धडाधड फेकतोय

महाभारताचे व्हॉल्युम्स पाणी पितायत
मी फेकतोय
रामायणाच्या चेहऱ्याला पूर आलाय
मी फेकतोय

त्रिपिटकं सुरक्षित

मनुस्मृती धोक्यात

कृष्णमूर्ती सुरक्षित रजनीश पाण्यात

बायबल पाण्यावर चालून जाण्यात अयशस्वी होतंय बुडतंय
कुराण सुट्ट सुट्ट होत घरातील तलवारीवर तरंगतंय

नितीन वाघांनी ट्रान्सलेट केलेली स्त्रीवाहिनी जीवाच्या आकांताने पाण्याबाहेर

३६५ डेज विथ बॉडी काहीही न होता वॉटरप्रूफ असल्यासारखे
पाण्याजवळ असूनही सुरक्षित

धर्मशास्त्र अचानक बादलीत पडलेत त्यांच्यावर पाऊस

एकीकडे पाऊस आल्याबद्दल कृतज्ञता दाटून येतीये
दुसरीकडे पाण्याचा बंदोबस्त करतांना दम लागतोय

गिरीश कर्नाडांवरचा मृत्युलेख कॅन्सल करून
मी पावसाचे आणि माणसाचे हयवदन पाहतोय

लॅपटॉप स्वतःवर पाऊस कोसळेल म्हणून अधिकच काळा पडलाय
पाणी डिलीट करण्याची की  त्याच्याजवळ नाहीये

पाणी छतावर पडलं कि स्क्रोल होतं

मी फक्त जागांत  शिफ्ट होत डॅमेज कंट्रोल करतोय




लीकेजखाली लावून लावून भांडी संपलेत
आता पाणी थोपवायला काय लावावे ?

बादल्या सैनिकांच्यासारख्या लढतायत

पाण्याचा अतिरेकी हल्ला

हळूहळू पाणी साठतंय

आयुष्यातला प्रत्येक पूर पाहिलेला मी
फक्त मुंबईतील टॉपमोस्ट  फ्लोरवरच्या पुराच्या अनुभवापासून वंचित होतो
बहुदा निसर्गाला त्यापासून तरी ह्याला का वंचित करा
म्हणून हा खटाटोप करावासा वाटलेला दिसतोय

खालच्या फ्लोरवरचा सादिक घाबरलाय
मी त्याला माझा फ्लोर आणि त्याचे छत कोसळणार नाही
ह्याची खात्री देतोय

त्याचे ओले झालेले छत
त्याला सैतानासारखे वाटतंय

मी पाण्यात तरंगणारी पुस्तके
तशीच तरंगू देतोय

जेव्हा वाळतील तेव्हा वाळतील

नाहीतरी त्यांचा उपयोग सम्पलेलाच आहे

पाऊस थांबलाय
आणि मी पुन्हा काळजातल्या सूर्यात
पद्मासन घालून बसलोय

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सीरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )








No comments:

Post a Comment