Sunday, May 17, 2020

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग एक - श्रीधर तिळवे नाईक



कोव्हीडमधून वाचलेल्या कविमित्रांनो
कोव्हीडमधून न वाचलेल्यांच्यावतीने मी बोलतोय

मी कोव्हिडला हरवेन किंवा हरेंन
मला माहित नाही

कविमित्रांनो ,
मला वर्तमानावरून हात फिरवण्यास बंदी आहे
म्हणून मी इतिहासावरून हात फिरवतो  आहे

वर्तमानावरून हात फिरवल्यास कोव्हीड होतो
आणि कोव्हीड
माझी सहस्रके दाखवतो  आहे

इटलीत माझा होली रोमन एम्पायरचा चषक खाली पडलाय
एक इटालियन लेखिका मला पत्र लिहीतीये
ती आज जिथे आहे
तिथे आम्ही उद्या असू शकतो ह्या भयाने

ऑर्बिटरी  झालेल्या सर्वाइवलमधून
एक ज्वेलरी शॉप आणि हिरेजडित तलवार डोळे मिचकावतीये

ऍझटेक जपानी सामुराईजवळ उभा आहे
त्याच्या सोन्याचा त्याला वाचण्यासाठी काहीही उपयोग झालेला नाही
गनपावडरने त्याचे सोने बळकावले आहे

रघुजी भोसलेंच्या घरातून हजारो किलो सोने बाहेर काढलं जातंय
त्यानं अहिल्याबाई बनून हे आधीच जनतेत वाटलं असतं तर

इतिहासाला दैनंदिनी कुठे ठाऊक असते ?

इतिहास म्हणून तर कविता वाचतो आणि वाचवतो

आपण कलावंत इतिहासाला कलेतून माणसे पुरवतो
जी लाईव्ह असतात आणि काल्पनिक

कविमित्रांनो

मृत्यूची रिच्युअल्स
वाचलेल्या आर्टिफॅक्ट्समधून मला ऐकू येतायत

आपण जगतांना इतिहास जगत नसतो
आपल्या जगण्याचा इतिहास होतो

वैयक्तिक मालमत्ता थडग्याजवळ पुरून
आपण काय सेलिब्रेट करत असतो
हे कि मेल्यानंतरही माझी प्रॉपर्टी मी वापरणार आहे ?

मेल्यानंतरही?

मार्क्सचा वर्गकलह मेल्यांनंतरही पिरॅमिडमध्ये चालू ?

मृत्यूला डेकोरेट करण्याचा इतिहास
हॉस्पिटलमधून फेकून दिलेल्या प्रेतांच्यात मरत चाललाय

ही बेवारस प्रेतं आपला इतिहास कसा पोहचवतील ?

जिन्सच्या द्वारे?

शरीरात कोव्हीड व्हायरसचे जीन्स सापडले
त्यावरून सिद्ध होतं कि
मरणारा कोव्हिडनं मेला

इतिहास नेहमीच डेकोरेशन्सनी पोहचवलाय
जीन्स आपले डेकोरेशन ?

आर्यांच्या इतिहास पचवणाऱ्या याज्ञीक विटा
गोरेगावच्या आर्य शाखेत जळतायत

पोटात शैव घोडे ठेऊन
मी स्वामी विवेकानंद रोडवरून चालतो आहे

तोंडावर समुद्राचा मास्क
आणि हातात अख्खी मुंबई हॅन्डग्लोव्ज बनून

देवांच्या मूर्त्यांना कोव्हीड होत नाही
त्यामुळेच ते अमर्त्य असतात

लिखित पुरावा नसल्या कि
ह्या अमर्त्य मूर्त्याच पुरावा बनतात

मला वर्तमानावरून हात फिरवण्यास बंदी आहे
म्हणून मी इतिहासावरून हात फिरवतो  आहे

अमेरिकन संविधान मूर्ती आहे
भारतीय संविधान मूर्ती आहे
आणि मूर्तिपूजा हा हिंदूंचा धर्म आहे
आणि मुर्त्या अमर्त्य आहेत

मी वॅटचं स्टीम इंजिन माझ्या श्वासात उकळतोय
आणि ब्रिटिशांची इंडस्ट्री प्लासीकाठी उभी राहतिये

मारुती मोटरने मारुती युग आले कि मोटर युग आले ?




मरणापूर्वी सगळं आयुष्य स्पष्ट दिसते म्हणे

वातावरणातला बर्फ गरम झालाय
आणि युग वितळतंय

वेजिटेशन जमीन उत्क्रांत करत
बारा हजार वर्षाची  बाई खोकतीये पृथ्वी फुफ्फुसात घेऊन

शांततेचे कवच फुटून भाषेचा बदाम बाहेर
सावल्यांचं सावळं स्थापत्य हलतय बदाम खाताना

तिच्या गाण्यात जिनेच जिने

नाईल कुठल्याही बेडवर न झोपता झेपावतीये

सिंधू जिप्सी बनून समुद्रतीये

पाण्याच्या मांड्या आणि अग्नीचे दांडू

एक चायनीज नाक नदीतून ऍम्ब्युलन्स सोडतंय

मी होतो
आणि इतरही होते
आरंभस्थानी

आणि मी आहे
आणि इतरही असतील
अंत्यस्थानी



आफ्रिकेतील माझी प्राचीन आई
कुठलाही मेकप न करता गोरी होतीये

एक दगडाची फरशी मांस तोडत तिच्यासाठी

निअँडरथॉल तिला दफन करणारय
आणि होमो सेपियन्सकडून मारला जाणारय

मी निअँडरथॉलच्या हत्येचं ओझं बाळगावं का ?

समुद्राच्या काठाशी
आणि हिमालयाच्या किनाऱ्यावर

कोण आर्य कोण शैव
मिक्सर आणि रिमिक्स

पार्वतीच्या घाऱ्या डोळ्याचा ड्रम
आणि शंकराच्या काळ्या डोळ्याचा डमरू

मी शंकरासोबत सह्याद्रीवरून कैलासावर उड्या मारतोय

आणि शंकर माझं भुंकणं माणसाळवत

सुजलेल्या पायांनी एक बाई युगवर्तुळ काढतीये

तिच्या मांड्या टिकटिक करतायत



शुलगी ऊरमधून बढाई मारतोय
माझ्या इकवल कुणीच नाही

शहरी राज्याच्या भिंती इरेज होतायत

तेरेकोट्टा बैल ओठ अलग करत डोळे मिचकावतोय इंड्समधून

चार चाकांच्या ट्रॉलींनी काय काय भरून घेतलं पूर्व युरोपात
आणि बर्फाखाली प्रेत झोकण्याची परंपरा
कधी बंद होणारय?

पशुपतींनी भांग शोधली मेगॅस्थिनीस तिला दारू म्हणतोय

माझा आय कॉन्टॅक्ट स्टेडी ठेवणं कठीण होतंय

वारली मला सांगतोय
इथं शंकर आणि पार्वतीने शेती चालू केली
आणि म्हातारे होईतोवर ते शेती करत राहिले
मग विमानात बसून निघून गेले

आजतागायत ते विमान घेऊन परतलेले नाहीत
आणि वारली वाट पाहतायत
शंकर येईल
आणि शेती नीट करेल



जितके मरताहेत त्याहून अधिक जगताहेत
लोक वाढताहेत वाढण्यासाठी

वड म्हणजे वाढ
मी वडाभवती फेऱ्या मारतोय
कारण माझा वंशवृक्ष मला वडासारखा वाढवायचा आहे

माझ्या साठ्यात वंश वाढतोय अन्न वाढतंय धातू वाढतायत

मी पार तयार करतोय भोसकण्यासाठी

ज्याची शस्त्रें प्रगत तो मालक

शेवटी विजय हत्या करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो



रोमँटिक हिस्ट्री मी कधीच तयार केली नाही
शेवटी सीतेला धनुष्याने मारणारा राम आवडतो

नुसती कविता करणारा राम तिला आवडला असता काय

कवी लोकांनी सीता फक्त आश्रमात सांभाळायच्या असतात

मी झाडांना कापणारी करवत शोधली
तेव्हा कुठे माझे फर्निचर तयार झाले

बायकांना फर्निचर आवडते

कुदळीवर दळ
आणि नांगरावर शेती

फावड्याच्या आणि खोऱ्याच्या जीवावर
मी जमीन नाचवली

लाकडापासून चमचा तयार केला पळ्या तयार केल्या
रात्री लाकडापासून तयार केलेली फणी दिली
तेव्हा बायको मिठीत सुखी झाली



हत्तींचे दात निघतायत

हस्तिदंती टॉवर तयार होतोय
आणि मी त्या टॉवरमध्ये राहतोय

आता जंगल जगले काय किंवा मेले काय

सर्व प्राणी माझे अन्न आहेत
वस्त्र आहेत
फर्निचर आहेत
आरोग्य आहेत
आणि शिक्षणही आहेत

सर्वांचा जन्म माझ्यासाठी झाला आहे
आणि सर्वांच्या मृत्यू माझ्या हातात

मी दयाळू आहे
म्हणून काही प्राण्यांना मी पाळणार आहे





 मेल्यानंतर मला प्रिझर्व करा
मी ममी बनून स्वर्गाला जाईन
आणि देवांना विचारेन

स्वर्ग आकाशात ठेवण्याची काय गरज होती
पृथ्वीवर ठेवला असता तर ही कचकच वाचली असती

शरीर प्लास्टरत स्वर्गाकडे
मोजतंय नरकांचे आकडे



शंकर सांगून गेलेत
मळ साफ करून निर्मळ व्हा

मी मोहंजोदाडोला आंघोळ करतोय
स्नानगृह हेच मंदिर
शेजारी शिवलिंग शक्तिलिंग

नद्यांना माता समजा
शंकराने गंगेला पत्नी समजलं त्याचं काय ?

मी नवीन ट्रेंड म्हणून
नदीला माझी मुलगी समजू का ?

शेवटी पाणी माझ्यातही आहेच कि

कदाचित मी पाण्याचं सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट आहे
पाणी माझ्या धर्माचा आधार आहे

समुद्र घुसळला कि रत्ने बाहेर पडतात
हा माझा विश्वास आहे

हा समुद्र आपल्याच डोक्यात असतो हे मात्र मी कुणालाच सांगितलेलं नाही

आणि सर्वोत्कृष्ट विष आपला अहंकार

बाकीच्यांनी चिल्लर रत्ने कमावली
शंकराने हे विष पिऊन मोक्ष कमावला
आणि त्याचा गळा आकाशासारखा निळा झाला

मी शंकराची निळी वाणी आहे

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग दोन श्रीधर तिळवे नाईक




माझं आयुष्य फार एकट्याचं होतं
आणि मला खूप सारे नातेवाईक पेलावे लागले

मी मग इतका एकटा जगलो कि
शेवटचा माणूस म्हणून उरलो तरी
सहज ह्या प्लॅनेटवर एकट्याने जगेन
हा कॉन्फिडन्स मला आला

ह्या खाटेवर एकटा आहे मी
आणि माझ्यात मला
मी सुंदर दिसतो आहे



दरवर्षी येणारे पूर
आणि टिकणारी शेती

मला अजस्त्र तहान लागलीये
आणि मी पुराचे ग्लास भरून पितोय

सत्तापालटानंतर उरलेले कप
क्रांतीच्या टेबलावर

जुन्या राजवटी जाऊन नव्या आल्या
काय फरक पडला ?

सूर्याची न फळलेली पूजा
आणि चंद्राने थुंकलेली पौर्णिमा

दुष्काळ इंटिग्रेट केला म्हणून
पाऊस थोडाच पडतोय ?

नव्या राजवटी जाऊन अधिक नव्या राजवटी आल्या
काय फरक पडला ?

सूर्याच्या लिखित प्रार्थना
आणि वाळून गेलेले ढग

युरेअस नागांच्या डोक्यावरती खाणी
आणि रॅम्सेस शोधतोय सत्तेची नाणी

सिंह नुसता बसून आहे
माणसाचं मुंडकं डकवल्यावर आणखी काय होणार ?

ब्लॅक पिगमेंट रेड पिगमेंट
आणि तळाशी साम्राज्य मेल्याच्या खूणा

पिरॅमिड बांधल्याने मरण टळणारय ?



मी नाईल्समध्ये फेकलेल्या रिकाम्या बॉटल्स परत येतायत

फरोहाच्या सावळ्या नोकरांणी मग घेऊन चाललेत
झाकण सांभाळत
माझे अन्न त्यात नाहीये

काम करू न शकणारे हात
मरताना त्यांना चिमूटभर डिग्निटी हवी
आणि कोव्हीड ती देत नाहीये

प्राचीन काळापासून हेच चालू आहे

हेच -हलकट लोकांचं गुलाम बनणं

का बाबानो
आमच्यापेक्षा काय जास्ती घेऊन आला आहात ?

पेंटर त्याच्या बुटांवर डिग्निटी लिहू शकतो का ?

ब्रश वर्षभर पेंट करतात
झडून जातात

ही कविता टाईप करतांनाही मला भोवळ येतीये

ही माझी शेवटची कविता तर नाहीये

मला पाणी हवंय
आणि पाण्यावर सरकारचा हक्क आहे

सरकारचा म्हणजे कुणाचा
म्हणजे नेमका किती लोकांचा

सगळं सरकारी करा म्हणजे सगळ्या गोष्टींचा पिरॅमिड करा
असाही होऊ शकतो

शाळांना जीवनशाळा म्हंटल जातंय
मुलं प्रथम वाचायला आणि लिहायला शिकतात

मुलांनी काय वाचायचं लिहायचं सरकार ठरवतं
म्हणजे काही माणसं ठरवतात

काही माणसं
ज्यांच्या गांडीवर खुर्चीच्या आकाराचा तीळ असतो
आणि तिळा तिळा दार उघड म्हंटले
कि ज्यांच्यासाठी सत्ता दार उघडतात

लोकांना काही माणसांतून काही माणसं निवडण्याचं स्वातंत्र्य आहे
मात्र निवडणुकीला कुणी उभं राहायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही
तरीही हे संविधान मजबूत आहे ह्यावर विश्वास ठेवा

सत्ता समोर ठाकलीये
अमुलेट्स आणि ब्रेसलेट्स
दोन्हीवर सेठ देवाचं डुक्कर आहे
आणि सेठ देव व्हायोलण्ट आहे

सुवर्णतारमंडित भांड्यात कुणाचं रक्त भरलंय ?
हत्या पहा आणि विसरून जा
फ्रॅहॉज लक्ष्य ठेवून आहेत

आल्बस्टर जार कासवाच्या पाठीवर काय करतोय ?
बाउल्स रिकामी होतायत

पॅपेरस स्क्राइब पचवत ठेवतोय धान्याचे हिशेब
जे दुरून कवितेसारखे दिसतायत
किंवा प्रिस्क्रिप्शनसारखे

ती मला भेटण्यापूर्वी फक्त आजारी दिसायची
आता भेटल्यावर माझे डोळे तिच्यात उडाले
आणि ती मृत्यू पहात असल्यासारखी पहात राहिली
तिला वाटले मास्कमधले तिचे डोळे मला वाचता येणार नाहीत

तिच्या हातातलं ईजिप्शियन बास्केट माझ्या आठवणींना
गोळा करून न्हेत होतं
आणि तिची मोरपंखी कॉलर
सिलेंडर बेडपासून बनलेली
तुटत चालली होती

मी म्हणालो हे बरंच आहे
तिची कॉलर तिचा गळा दाबणार नाही



मांसाहार ही चैन आहे
सामान्य माणसाला न परवडणारी
मात्र मासे आणि बिअर उपलब्ध आहे

खाटीक आणि खाटीकखाने
श्रीमंतांसाठी आरक्षित आहेत

बार्लीसाठी जहाजे
उत्तरेकडून दक्षिणेकडे जातायत
न थांबता

मी वल्ही वेळवतोय
वारा वळेल तसा

नदीप्रवास
कधी नाईलमध्ये कधी गंगेत कधी यांगत्सिमध्ये

पाण्याला बूड नसते
पण बुडबुडे असतात
ते खूप बडबडे असतात
माणसं पाण्यावर खूप शांत होतात
कारण देहातले बुडबुडे
पाण्यात प्रवास करतांना ऐकू येऊ लागतात

मला माल हवा

माझ्या देवांना उदबत्त्या हव्यात
माझ्या राजाला तांबं हवं

ह्या लाकडी बोटी घेऊन
मी आयुष्यभर प्रवास करू शकतो
कंडिशन एकच योग्य जागी योग्य माल

मला राजाबरोबर पिरॅमिडमध्ये मरायचंय

देवा ,
तुला त्यासाठी किती उदबत्या हव्यात ?


श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग तीन  श्रीधर तिळवे नाईक



दोन्ही महायुद्धे आणि फाळण्या
आता बॉलिवूडच्या आणि हॉलिवूडच्या सेटवर घडतायत

कदाचित काही वर्षांनी कोव्हीडचंही हेच होईल
ट्रॅजिडीज स्वभावतः कमर्शियल असतात
फक्त हिरोला हॅप्पी एन्ड दिला कि झालं

मी ईजिप्शियन लोकेशनवर जाऊन परततोय

एयरपोर्टवर ज्या हवेत आपण पोहलो ती हवा आणता येत नाही
एक अनिश्चितता आपल्यासोबत लॅन्ड होते

माझे श्वास अद्यापही दुःख लिहायला घाबरतायत

मास्क विकणारा स्वतःहून चालत येतोय

मी नाकाला तयार करतोय

मृत्यू माझ्याबाजूने साईडवॉक घेतोय



कॉसमॉस केऑस आहे
ही कदाचित अफवा आहे
किंवा कदाचित सत्य आहे
किंवा केवळ हवा आहे
आणि हवा कशाचीही असू शकते
अफवा कशावरही उडू शकते



ममी केसचा पाठलाग चुकवत
तांब्याचे मांजर काशीला धाडत
माणसाच्या चेहऱ्याचे पक्षी फेव्हिस्टिकने ढगाला  चिटकवत
व्हाट्सपवर भूषणने पाठवलेले फोटो शेअर करत

मी हेडरेस्टवर डोकं ठेवतोय

आई विचारतीये
तू लग्न केलं नाही
भूषण मुलांना जन्म देत नाही
तुम्हा दोघांना वंशाचा दि एन्ड हवा आहे का ?

मी आयुष्याचा शेवटच्या क्षणाचा पोकळपणा आता गावा का ?



मी माझ्यातल्या मींची टॅली करणं सोडून दिलंय

आता तर कळत पण नाही माझ्या देहात कोण मेला आणि कोण जन्मला ?

तुझं लॉजिक हातात लागत नाही दोस्त म्हणतात
मी म्हणतो
मी संपूर्ण देहाचं तर्कशास्त्र आहे

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग चार   श्रीधर तिळवे नाईक



धर्मग्रंथ न वाचताच लोकांना धर्मराज्य हवंय
असं आक्रीत फक्त भारतातच घडू शकतं

युरोपियन प्रथम भारतात आले तेव्हा
धड तीन टक्के ब्राम्हणांनीही वेद वाचले न्हवते
आणि तरीही त्यांना वेदांचा अभिमान होता
आणि वेद अपौरुषेय आहेत ह्यावर त्यांचा विश्वास होता

इथे पुराणात वांगी नाहीत मेंदू आहेत
ज्यांचे भरीत बनवता येते
आणि त्या भरीताला भारत असं नाव देता येते



कुऱ्हाडींना स्टेट्स सिम्बॉल बनवणारे युरोपियन कसे दिसत होते ?

स्टोनहेंजच्या फटीत माझा हिरोसारखा फोटो
आणि समोर त्याचे स्टेट्स चेक करणारी हिरॉईन

स्विस नाईफ घेऊ कि इंग्लिश तलवार घेऊ
व्हिलन मारायला

युगानयुगे कर्मबायबल  सांगून भडकावणारा व्हिलन सम्पवायला

त्याच्या डोक्यावर ऊर्नफिल्ड हॅम्लेट

मी शिरस्त्राण फोडण्यासाठी भाल्याला सॉकेटमधून प्रज्वलित करतोय

त्याचे  स्कँडिव्हियन रेझरने साफ केलेले गाल

नेब्रा डिस्क मला मुहूर्त सांगत नाहीये

कितीकाळ मी ब्रिटिश व्हिलनला असं खोळम्बवून ठेवणार आहे
माझ्या ट्रान्सकलोनियल  मनात ?


श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ५  श्रीधर तिळवे नाईक



मी वाट पहायलाही तयार नाही
कारण वाट पाहणाऱ्याच्या पायाखाली \
ही संस्कृती वीट देते
आणि अठ्ठावीस युगं  उभं  करते

असं कोण राहील उभं
आणि तेही अठ्ठावीस युगं ?



मी हिंडतोय
फुलपाखरांसारखी अनप्रेडिक्टेबल अडव्हेंचर्स करत
बेंचवर बसणाऱ्यांना
मी माझ्या साहसांचं मूल्यमापन करू देणार  नाही

मी टरच उडवणार त्यांच्या बाकांची क्लासरूम्सची
आणि विद्यार्थ्यांना रंग लावून
खिडकीतून उडून जाणार

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ६ श्रीधर तिळवे नाईक


ह्या देशात १३० करोड लोक आहेत
आणि करोडमागे एक ह्या न्यायाने
१३० सॅड न्यूज माझी वाट पाहतायत रोज

मी कुणाकुणाचं दुःख साजरं करू
कोणकोणत्या बातमीवर ?

माझी संवेदनशीलता मी बातम्यांच्यावर अवलंबून ठेऊ का ?

मला सामाजिक बांधिलकीइतकी
सामाजिक बधिरतेचीही गरज आहे
ह्या मीडिया युगात

इंद्रियांनो ,
प्रत्यक्ष व्हा
मला तुमच्या वर्तुळात जगू द्या
जिथे एक दुःख बातमीविरहित प्रत्यक्ष वाटेल



न्यूज पॉप्युलेशन वाढतीये
पोएट पॉप्युलेशन वाढतीये

ज्यांनी टीआरपी कमावला
त्यांनी गल्ला जमवला

तुर्कस्तानात माझा मित्र आजारी आहे
त्याच्या दरवाजावर देव पहारे देतायत

इंडिया असो कि तुर्कस्थान
गेटवे सांभाळली कि शिवेवर वीरगळ कमी सापडतात

एक मांग न्यूज घेऊन जिवाच्या आकांताने धावतोय
संध्याकाळपर्यँत पोहचला नाही तर ठार मारला जाणार आहे

पूर्वी पाटील होते
आता मालक

न्यू एज मां थोडे सुटाबुटात हिंडतायत एव्हढच

आणि हो टचेबलही आहेत यु नो ?





चोचदार सुरईतून गळणारी दारू

हतीती हतीती हुतूतू हुतूतू

स्पर्श झाला कि आउट

स्पर्श झाला कि आउट?

माझ्या देशाला अनटचेंबलिटीचं वेड लागलंय काय ?



ह्याला स्पर्शफोबिया म्हणू का डॉक्टर

टच न करता सुधारणा कशा होणार डॉक्टर

म्हणून तर लॉकडाऊन म्हंटल्यावर शिरले आपआपल्या त्वचेत



पैसा संरक्षणावर खर्च होतोय
सरकारं युद्धाच्या भीतीनं कर्जबाजारी होतायत

ह्या प्रदेशाचा मुख्य देव वादळाचा देव आहे

दरवाजे उडवून लावणे हे त्याचं मुख्य क्वालिफिकेशन आहे

माझा मित्र दरवाजावर उभा आहे
आणि माझ्या काळजात वादळ आहे

देव ऑन होऊ नये म्हणून मी काय करावं ?



माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ७ श्रीधर तिळवे नाईक



अल्जीयन पॅलेससमोर  होमर इलियड वाचतोय

ऑलिव्ह तेलाच्या ओघळघण्टा वाजतायत
माझ्या कानात

दारू देऊन धान्य विकत घेण्याचा सोहळा पार पाडला गेलाय
आणि होमरने आता ओडिसी वाचायला घेतलंय

राजवाडे पुन्हा पुन्हा बांधले जातायत
रादर पुन्हा पुन्हा बांधावे लागतायत


बैलाच्या दैवी पोटात वाजणारे भूकंप
आणि माझा कोल्हापूरमधला थरथरणारा नांगर

होमर अजूनही महाकाव्य वाचतोय
कोल्हापूरपर्यंत आवाज जाईल इतक्या मोठ्या आवाजात



महाराष्ट्रातला कान्हा आणि उत्तरेचा श्रीकृष्ण
ह्यांच्यातील फरक मला माहीत आहे

पुरोहितांची गफलत करून टांग पसरण्याची सवय मला माहीत आहे

पर्फ्युमनी भरलेले जार मी व्यापारात  सोडतोय
शेवटी ज्याला व्याप झेपतात त्यालाच व्यापार झेपतात

स्टॉपर नसलेले ऑक्टोपस पॉट्स माझ्या नजरेत अनंत होतायत

माणसांच्या श्वास घेण्याच्या तऱ्हावरून मी माणसे ओळखतो
प्रचंड परफ्युम गोळा करणारी माणसे फुलांबाबत निर्दयी असतात

राजांना सोन्याचे डेथ मास्क घालून मायसेनियन निरोप देतायत
आणि होमर मला विचारतोय
मी लिहिलेलं सगळंच काल्पनिक न्हवतं पटतंय का ?




रिच्युअलीक भांड्यावरचा डॉल्फिन कधीही उडेल

तीन पायांचे भांडे कधीही जेवण शिजवायला सुरवात करेल

मी सीटॅडलमधील तीर्थक्षेत्रे प्रसादाबरोबर सम्पवतोय

शेवटी सारे प्रासाद देवाचे प्रसाद
शेवटी चोझन वन फिलॉसॉफी सर्वत्र

काय बॉलिवूड आणि काय मिनोअन

सुशांतची आत्महत्या तरीही थांबवता येत नाही
आणि युद्धे चोझन वनांना टाळता येत नाहीत

कि त्यांच्यामुळेच होतात ?
कळत नाही

हत्या , आत्महत्या आणि अंत
कायमच अनाकलनीय

सार्कोफॅगसवर पवित्र बैलाचे रक्त वाहिले जात आहे
पहा

श्रीधर तिळवे नाईक

माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ८ श्रीधर तिळवे नाईक



धुळीच्या ढगापासून पृथ्वी तयार झाली
आणि आता माझ्यात धूळ आहे
ढग आहे
आणि पृथ्वीही आहे

मीही पृथ्वीबरोबर उत्क्रांत होतोय
आणि माझ्या रक्तातही
दगडांची उलथापालथ
चालूच असते

माझ्याबाहेर एक सूर्य नावाचा
गरम गॅसचा राक्षस आहे
आणि त्याची गरमी सहन करणं
कधीकधी फार अशक्य होतं

मी जगतोय मंगळ ते शनी
बुध ते चंद्र
ऍस्टिरॉईड ते धूमकेतू
ह्यांच्या दरम्यान

माझी भाकरी धुळीची उत्क्रांती आहे
आणि कपडे धुळीचे विणकाम

धुळींच्या शेपट्या पकडण्याची ताकद माझ्यात नाही
मात्र धुळीत चेहरे पाहण्याची ताकद
मला ढगात चेहरे पाहून पाहून अवगत आहे

हलक्या गोष्टींच्यापासून बनलेला  सूर्य
जड गोष्टींच्यापासून बनलेल्या पृथ्वीपेक्षा वजनदार आहे
हे कळल्यापासून
मी कुणालाच हलक्यात घेत नाही

मी सूर्याची पूजा करतो आहे
कारण माझ्या प्रकाशाचे उगमस्थान सूर्य आहे
मी जाणतो

सर्व धर्मांचे उगमस्थान सूर्य आहे
किंवा आभाळ

सूर्याच्या प्रकाशविना सर्व निर्जीव आहे
आणि दिसतही नाही

आणि जे दिसत नाही
ते सजीव असले तरी काय फायदा ?

अदृश्य मला घाबरवते
कारण त्याचा मुकाबला अवघड

मी बुध ते मंगळापर्यंत दगड बघतो
गुरु शनीचा गॅस

गॅसचा त्रास मला नाही
पण गॅस माझ्याही आत थोडा आहे
त्याचा धुळीशी नेमका काय संबंध आहे
मला माहीत नाही

लाखो  वर्षे मी ह्या पृथ्वीसोबत तरंगतोच आहे
आणि इतका तरंगूनही मला कळलेलं नाही
बुटक्या ग्रहांच्यात आणि माझ्यात फरक काय?

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग ९ श्रीधर तिळवे नाईक



मी पणी आहे कि फिनिशियन
मला माहीत नाही

पळून गेलेल्या पायांना धर्म नसतो
संस्कृती नसते

गाणारी बेटं आणि नाचणारा समुद्र
ह्या दरम्यान आम्हांला आपल्या बोटी स्थिर ठेवाव्या लागतात

लोक म्हणतात
आमच्या मांड्यातसुद्धा ब्रेन आहे

बायब्लॉसच्या बायलाईन्स आत्महत्या करायला निघालेल्या वीजांना
घेऊन परतायत

टायरचे टिम्बर घर बनवायला लागते
आणि घरं आवश्यक असतात

मृत्यू टॅन करतोय पाण्यावर
आणि लाटा दर क्षणाला बदलते टॅटू घेऊन पोहतायत

अनातोलियाच्या मोडून पडलेल्या जहाजावर
मी इतिहासाची वखार काढलीये

अफगाणिस्तानातले टिन अद्याप टिनपॉट नाहीये
आफ्रिकेतले हस्तिदंत आणि शहामृगाची अंडी तेजीत

कॅननमधले सुवर्णालंकार व्यापारी टोपी घालून
मला विकायचेत

शेवटी तिळवे भांडार चालवणाऱ्याकडून
त्यांनी काय शेती करून घ्यावयाची ?



दुकानदारांना प्रतिष्ठा नसलेल्या भुक्कड मराठी संस्कृतीत मी जन्मलो
आणि कवी झालो

नोकरदार भाषेला व्यापारी भाषा करायचं कसं ?

व्यापाऱ्याला फक्त लुटायचं असतं अशी धारणा असणाऱ्यांच्यात
तुकाराम मराठाच होऊ शकतो
वाणी नाही
भले मग त्याने कधीही मी मराठा वा मी क्षत्रिय असं लिहिलं नसेल
आणि मी वाणी वा मी शूद्र यातिहीन असं दहा ठिकाणी म्हंटल असेल

युद्धे सतत चाललेत
कधी हा येऊन लुटतो
कधी तो

वर्चस्वाच्या डॉगशीट प्रदेशात
राजधान्यांची बदलती भूछत्र
आणि प्रत्येकीला राजवाड्याची लाकडी गरज

झाडं कापतांना खूप कठोर व्हावं लागतं
काळजाचा स्फटिक करून
त्यावर तांबं ओतावं लागतं

भावना ऑन ठेवून झाडांचा खाटीकखाना चालवणं अशक्य

खटाक!



सालोमनला जहाज बांधून देतोय

ब्रॉन्झच्या बाउल्समध्ये उन्हाळे आणि हिवाळे

पेट्यात शस्त्र

हिंसेचं पाप शस्त्रं तयार करणाऱ्याला
कि वापरणाऱ्याला ?

शांतता हवी
आणि शस्त्रं आम्हीच तयार करणार आणि विकणार

कारागिरी खूनीच असते

आता बघायचं
युद्ध करायला गेलेले
वस्तू खरेदी करायला
कधी परततात ?

श्रीधर तिळवे नाईक


माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १०  श्रीधर तिळवे नाईक



नदीच्या काठी शवं पार्क केलेत

रोड सिल्कमधून वहात पश्चिमेत

सहा जिंकून सातव्याची निर्मिती
राज्य पेंटिंगसारखं निर्माण झालंय
आणि गिफ्ट म्हणून वाटण्यात आलंय

शतकं निर्माण होतायत दफन होतायत उंटांच्या तांड्यात

मीही उंटावरचा शहाणा चाललोय चीनमधून
सिल्क घेऊन

व्यापारी म्हणजे गुणवत्तेची गॅरंटी राजा
गुणवत्ता निवडायची गुणवत्ता विकायची
व्यापारीच गुणवत्तेत फसवायला लागले कि समज
राज्य भ्रष्टाचाराकडून गिळलं जाणारय

माझा बाप ओरडतोय
आणि मी चांगला माल निवडून युरोपकडं

सरदार भांडतायत म्हणून चीन राजानं पगारी नोकर निर्माण केलेत
मला मलिक अंबर तेच करतांना दिसतोय
आणि पुढे शिवाजीही

सरदारांची सरदार होण्याची लायकीच नसते काय
कि प्रत्येक आमदाराला मंत्री
प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्री
आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याला पंतप्रधान व्हायचं असतं
म्हणून बंडाळ्या होतात ?

आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना पगारी नोकर करावं काय ?

म्हणजे ते बंडी घालतील
आणि थंड बसतील



समान लिपी समान मापं समान चलन समान पापं

राजा देव तियांचा अंश जसा वैष्णवांच्यात राजा विष्णूचा
एक शिवच काय तो राजांत अवतरत नाही
पुढे तोही अवतरायला लागेल

राजांना दैवी होण्याचा शौक
कुठल्या देशात नाही ?

हान वंशीय बौद्ध धर्म स्वीकारणार अशी अफवा आहे

पर्वताच्या आकाराची झाकणं प्रत्येक जारला
जणू जार गुंफा लपवून ठेवतो

उदबत्यांचे बर्नर हातोहात विकले जातायत
मी इंडियात उदबत्या घेऊन जाऊ का
आपले इंडियन देवही खूषच होतील कि उदबत्त्या सुंघून ?

स्वतःच शरीर जेडच्या सुटात टिकतं म्हणून
प्रत्येक राजाला जेड सूट मेल्यावर

बुद्ध आयुष्यात आला म्हणून काय होतं ?

माणसाला सुटात टिकायचंय

शेवटी उदबत्तीही किती टिकते
त्यावर तिची किंमत अवलंबून नाही का ?



घट्ट झाला आरसा कि चेहरा बनतो
त्या चेहऱ्याचा मग वारसा बनतो

वारश्याला गंज चढे लोखण्डाचा
गंज मग काही काळाने गांजा बनतो

चढत जाते नशा अशी  गांजाची कि
सिंहासनावर चढून गांजा राजा बनतो

राजाचे अनुकरण प्रजा करते
नशेक्कड पसरत पसरत जनता बनतो

मी उंटावरचा शहाणा
उंटावरून उतरून
उंट विकून
शहाणा बनतो



राजाच्या जिभेवर जेड
तोंडावर जेड कानावर जेड

जिथे छेद तिथे जेड

जोवर चेहरा तोवर अमरता
टिकवा टिकवा टिकवा
राजाचा चेहरा टिकवा

हॅट्स बदलतायत कि डोकी बदलतायत ?

स्मशानरक्षक त्वचेवर ड्रॅगन ओढून बसलाय

छातीवर जेड डिस्क
डिस्को करत

हिरव्या सर्पन्टाइल बॉडीज सर्वत्र

मला ७०००० पैकी ७००० कामकरी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय

माझी माणसं राबतायत
आणि जे सेवक राजाबरोबर दफन होणारायत
ते मला मी त्यांना कामकरी म्हणून कामावर घ्यावं
आणि त्यांना वाचवावं म्हणून विनंती करतायत

मेल्यानंतरही ज्यांना सेवेसाठी
सेवक लागतात
त्या शासकांची लायकी काय

स्वर्गात तरी एकट्यानं जावा भx व्यांनो

श्रीधर तिळवे नाईक








Saturday, May 9, 2020

मी जिथे जगतोय
त्या जागेवर माझ्याही पूर्वी कोणी मेला असेल

मी त्याबाबत अनभिज्ञ नाही

पण आत्ता ह्या क्षणी ही जागा मी जगतोय

हेही खरंच कि उद्या कोणी तिसराच
ही जागा जगेल

पण आत्ता ह्या क्षणी ही जागा मी जगतोय

ह्या जागेतच मी कैद आहे
आणि सुटकाही ह्या जागेतूनच होणार आहे
आणि बाहेरून स्वातंत्र्य भोगून आल्यावर
पुन्हा मी ह्याच जागी जगणार आहे

ही जागा मी आत्ता ह्या क्षणी आनंदी का बनवू नये ?
======================================









Tuesday, February 4, 2020

वॉटर रिटर्न्स



you love because you like her character
and her character itself kills her love

कुठून आलं हे सर ?

ऋषिकेश  रत्नपारखींचा व्हाट्स अपवर प्रश्न

मला माझंच लिहिलेलं आठवत नाहीये



थिएटर अकादमीतील शेवटची व्याख्याने

मी लेक्चर सम्पवून बाहेर आलोय
तर बाहेर विद्यार्थ्यांचा घोळका

ऋषिकेश पुन्हा

'' सर शंकर भट म्हणजे महेश भट का आणि नीरजा भट म्हणजे पूजा भट ? "

" राजीला तुम्ही राजस्थानात जाऊ का दिलं "

अ डॉ हॉ का बा ना सु ना वाचून विद्यार्थ्यांनी आत्मचरित्राला विचारलेले प्रश्न

मी म्हणतोय
" मी अफेयर्स किती केली ते महत्वाचं नाही
मी कामवासनेतून कसा मुक्त झालो ते अधिक महत्वाचं "

"बुद्धाच्या निर्वाणापेक्षा त्याच्या राजवाड्यातल्या त्याच्या वडिलांनी ठेवलेल्या दासींशी
त्याने केलेल्या लीला अधिक थ्रिल्लिंग वाटतात सर "

"हे तुमचं तारुण्य बोलतंय मॅच्युअर व्हाल तेव्हा कामवासनेच्या अस्ताची महती कळेल "

"सध्यातरी आम्ही तरुण आहोत सर आणि कामपूर्ती ---"

एक नवीन पिढी बोलायला लागलीये
आणि आपण तिचे शिक्षक आहोत 

" सर ती बारबाला अजूनही भेटते का आणि तिला तुम्ही मूल दिलं ?"



"तू  सी ए ए ला साधी रिऍक्शनही का दिली नाहीस "

मित्राचा प्रश्न

एक लेख - एक समर्थन
माझा पर्सनल वर्तमान पब्लिक वर्तमानांपेक्षा मला महत्वाचा वाटतो म्हणून
प्रत्येकवेळी मी पर्सनल वर्तमानाचा अजेंडा कसा शाबूत ठेवला ह्यावरचा



एकादमी गणेश चंदनशिवमध्ये तात्पुरती सेटल
एक विद्यार्थिनी फोनवर विचारतीये
" सर तुम्ही योगेश सोमणचे म्हणून तुमची व्याख्याने
ह्या महिन्यात ठेवली नाहीयेत
असं काही विध्यार्थी म्हणतात ते खरं का "
"मी समग्र आहे समस्तांचा आहे सम्यक आहे
मला मंगेश बंसोडनं बोलावलं म्हणून मी अकादमीत आलो ही वस्तुस्थिती
बाकी गटबाजीत नो इंटरेस्ट नो पॉलिटिक्स
आणि हो जातीपातीच्या बाहेर या  "

आणि अचानक दारावर बेल
मी दरवाजा उघडून पाहतोय
दारात शैलेंद्र
" मेट्रो बांधायच्या नादात पाईपलाईन फुटलीये
रेल्वे आणायच्या प्रयत्नात पाणी वाहून चाललंय
बांद्रा ते जोगेश्वरी पाणी बंद
टँकरचे भाव गगनाला बिसलरी शॉर्टेज "

काय हवं ?

"पाणी एक्स्ट्रा हो तो "

आहे प्रोडक्शनवाल्यांची एक बिसलरीची टँकी आहे

एकंदरच मी पाणी वाटण्यासाठी जन्मलोय कि काय ?

आपल्या फोनच्या अंतरावर पाणी गायब झालंय
आणि आपल्याला ते माहित नाही

मुस्ताक टँकी उचलून गाडीत टाकतोय
आणि मी म्हणतोय
"बरं झालं पाणी मार्गाला लागलं "



लोकांनी पाण्याच्या पुनरुत्थानाजागी जिझसचं पुनरुत्थान स्वीकारलंय
जो साई समस्तांना पाणी धाडत नाही तो ब्रँड म्हणून साईगंगा बॉटलमध्ये
शिवलिंग दुधाने अजिबात धुऊ नका
त्याऐवजी ते दूध गरिबांना द्या आणि पाण्याने धुतांना पाणी मुबलक असेल तरच धुवा
जो गरिबापाशी धावला त्यालाच शिव पावला

मी प्रवचन देतोय
आणि माझ्यापुढे गंगा
प्रदूषित
प्रोटोकॉल उध्वस्त झालेली

लोक हर हर महादेव बोलतायत
आणि गंगेच्या प्रदूषणात पापं धुण्यासाठी उतरतायत

त्यांना कळत नाही
प्रदूषण हेच पाप
निर्मळता हाच मोक्ष



कुठलाही साधक हा हत्तीच्या कळपाचा सभासद असतो
आणि हा हत्ती मेंदूत असतो

माझ्या आजारपणाची चौकशी करून दोन साधक गेलेयत
आणि उघड्या दारात तू -तब्बल पंचवीस वर्षांनी

"आओ "

तुझ्या सोबत तुझा मुलगा

" शेवटी एकट्यानं मुलाला जन्म देण्याचा अट्टाहास पूर्ण केलास तर "

" तू नाही म्हणालास म्हणून मी थोडीच थांबणार ?"

आपला शब्दांविना संवाद

तुझ्या त्वचेचा गोरा हिरा वयस्क झालाय
केसातली पांढरी चांदी अंतःकरणातलं सोनं हाताळायला शिकलीये
मी म्हणालो होतो
"समुद्र ईश्वराचं सबटायटल आहे
आणि तू त्या समुद्रातील एकुलती एक बोट "

तू म्हणतीयेस
" पाणी हवंय तूच आठवलास हमखास पाणी मागता येईल असा हक्काचा
 xxx त असं कधी झालंच नाही ना ? निदान माझ्या वाट्याला नाही आलं  "

"मी वचन दिलंय ऑल्वेज अँड फॉरेव्हर "

मी आणखी एक टँकी
तुझ्या गाडीत ठेवतोय

"उद्या पुन्हा येईन "

ऍड्रेस कुणी दिला

" तुझ्या मराठी विकिपीडियाला मिळाला "

नितीन चंदावरकरची मेहनत अशी फळणार होती ?

बार ?

"पूर्ण सोडला कधीच शायरके बिना क्या बार क्या प्यार "

तुला वाटतं मी विचारावं
मुलगा कुणाचा
मी विचारत नाहीये

तुझी कार चाललीये

धुळीतून काही जुने सूर्य आणि तारे उडतायत



बारमध्ये नाचणार आणि मेडिटेशनही करणार असं कोण

तू तू तू

तारुण्याचा स्वतःचा म्हणून एक ऑर्केस्ट्रा असतो
तो म्हातारपणात चालत आला कि त्याचा लग्नाचा बॅंड बनतो

पाण्याचे ऑर्डीनरी वाटणारे डोळे
टंचाई निर्माण झाली कि डिव्हाईन वाटतात

तृष्णांचा नाश झालेला मनुष्य आतमध्ये समुद्र
आणि बाहेर नदी बनतो

लोकांना मिनरल वॉटरच्या  बॉटलची सवय व्हावी
असे कारस्थान रचले जात आहे काय ?

पाण्याच्या व्यवसायात अजून अंबानी आणि अदानी कसे उतरलेले नाहीत ?

रिलायन्स वॉटर कब आयेगा कब ?

कि वीज आणि पेट्रोलवरच भागणार आहे ?

कि पाणी अनरिलायबल आहे म्हणून त्याची भीती वाटते ?

 ८

आज तू साडी नेसून आलीयेस -पंचवीस वर्षांपूर्वीची

"पाणी मागायला आलीयेस कि साडी दाखवायला आलीयेस ?"

माझा थेट प्रश्न

"अंदर 'तेरीही नदी थी है और  रहेगी  "

"मेडिटेशन शुरू हैं या "

" मुझे तो बस तुझसेही मुक्ती चाहिये थी नहीं मिल रही हैं साला इतनासा झाटूक शायर तू  "

तुझी बारमधली भाषा जागी झालीये
आणि मी तुझ्या भडासमध्ये आंघोळ करतोय



ओल्या डोळ्यांनी तू पाणी काढतीयेस
जणू ह्या घरावर तुझा हक्क आहे

मी तुझ्या मुलाशी खेळतोय

तुझा काळ्या बांगड्या घालण्याचा शौक अजूनही कायम

एव्हढी गोरीचिट्टी तू तुला काळा रंगच का आवडावा

"क्यूँ कि मेरा बाप गोरा था - तूनेभी मुझे तक्लिफ दी शायर  "

मग साऱ्या मर्द जमातीचा उद्धार

तुझ्या दुःखांचा जामानिमा समृद्ध आहे

हवेत संताप खोकतोय

"प्रेम हॉन्टिंग करत राहतं सालं
जानेवाला चला जाता हैं
बैठनेवाला अपनीही लाश गोदमे लेकर बैठा हुआ "

आणि मग एक सीपॉज

पाणी गाडीच्या डिकीत टाकून झालंय

तू बोलावं कि न बोलावं
आणि मग उपवास सोडल्यासारखी

"एकबार तेरे पैरोपें डालना था बेटेको
पानिके  बहाने हो गया
जीन्स किसीकेभी हो
आत्मा तेरी रहे  "

मी आशिर्वाद देतोय

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सिरीजमधील "आत्ताच्या कविता "  ह्या फाईलमधून )

Tuesday, November 26, 2019

सत्ता



सत्ता संविधानातून निर्माण होते
कि संविधान सत्तेतून निर्माण होते ?

मला कळत नाही

नद्यांत समुद्र राहतो
कि नद्या समुद्रात राहतात
कि दोघेही ढगात राहतात ?



मतदार मेला तेव्हा सर्वच नेते उपस्थित होते

कुणी म्हणाले
बॉल लागून मेला
कुणी म्हणाले
बॅट लागून मेला

कुणीच म्हणाले नाही
सामना बघून मेला



मेळा आणि मेला
टाईप करताना एकसारखे एकमेकाजागी येतात



डायटिंग करणारा मुलगा
मेला त्यावर हसतोय

एक टेपवर्म टेपा लावतोय
मृत शरीरासमोर
एक डास कोकोकोला पितोय
मृत शरीरावर
एक हात पांढरा तांबडा रस्सा पितोय
एक पाय स्वतःच पुनर्घटन करतोय

विजयाचे केक आणि स्टेक
सारख्याच आनंदाने कापले जातायत

ह्याला मी लोकशाहीचा उत्सव समजावं का ?



मुंग्या ऍनॅकाँडा तोंडात पकडून चालतायत

मी स्वर्गाच्या कुठल्या पार्ट मध्ये पार्ट टाइम जॉब करतोय ?

मी फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणून राष्ट्रवादीच्या  क्लायंटला दिलेला आकडा ५४ होता
आणि क्लायन्ट तो १०० टक्के खरा झाल्याने डान्स करतोय

त्याच्या बुबुळाचे हेडलाईट्स टीव्हीवर चमकतायत

दोऱ्या आणि तंतू हातात धरून
कोण सत्ता विणणारी सुई तयार करतंय ?
आणि माझा त्यात सहभाग किती ?



सामान्य दुपारी असामान्य होतायत
सामान्य रात्री असामान्य होतायत
सामान्य सकाळी असामान्य होतायत

राजकारणाची भेळ राजाभाऊंपेक्षा चविष्ट होतीये
राजकारण स्टिअरिंग व्हीलवर बसून आहे आयुष्याच्या

डोक्यांना प्रॉपर बॉडीज सापडत नाहीयेत
स्वर्गवासी झालेला मतदार आता स्वर्गातून पाहतोय

त्याला कळत नाहीये
नरक म्हणतात तो हाच काय ?



"पार्टी विद डिफरन्सला हे ह्याहून डिफ्रन्टली करता आलं असतं"

"पवारांच्या डोक्याला सोन्याचे टाके आहेत"

"काँग्रेस म्यानेक्वीनसारखी दिसतीये ह्या रंगमंचावर"

"उद्धव ठाकरे भाजपने अँपॉईंट केलेल्या फ्रिजमधून
बाहेर आल्यासारखे दिसतायत"

"अजित पवार तर कायम सॉससारखे"

लोक एकमेकांशी बोलतायत
आपल्या नेत्यांविषयी बोलण्याचा त्यांचा हक्क
अद्याप शाबूत आहे



कित्येक दशके आमची ओळखपरेडच चालू आहे

पंख लावून हे युग असेम्बल करता येईल का ?

सर्वांच्याच तोंडाला कडू कारल्याची चव

सत्तेची स्वीट डिश अद्याप अदृश्य

आश्चर्याची भीती वाटू लागलीये

त्या सुंदर मुलीला ब्रेकिंग न्यूज देण्याचं वेड लागलंय



नितंबांचे कर्व
गाडी चालवून ठीक होतात काय ?

सेफ्टीत बसून बसून
आमदार फोमपासून बनल्यासारखे दिसतायत का

आमदारांना न्हेणारी बस येतीये का

चॅनेलची निवेदिका प्रश्न विचारतीये

मॅडम
हा सूर्य मला आज ना उद्या गिळणार आहे
त्याला थांबवता येईल का ?

मॅडम
प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोत
किमान एकदा खोलवर डोकं खुपसायचं असतं
ते साधत नाही ह्यावर उपाय आहे का ?

मॅडम
माझी बायको म्हणते
तिचे केस तिचा मुकुट आहे
हा सत्ता शोधण्याचा प्रयत्न आहे का ?

मॅडम
फक्त कॅमेरामन पाहू नका
फक्त रिपोर्टर पाहू नका
मी टीव्ही पाहतोय मला पहा


१०

गोष्टी एकदा चुकीच्या गेल्या
गोष्टी दुसऱ्यांदा चुकीच्या गेल्या
गोष्टी तिसऱ्यांदा चुकीच्या गेल्या

आम्ही गोष्टीच चुकीच्या निवडल्या होत्या काय ?

११

भगवान शिवांनी हे कसं हाताळलं असतं ?
भगवान महावीरांनी हे कसं हाताळलं असतं ?
भगवान बुद्धांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा बसवेश्वरांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा फुल्यांनी हे कसं हाताळलं असतं ?
महात्मा गांधींनी हे कसं हाताळलं असतं ?
बाबासाहेबांनी हे कसं हाताळलं असतं ?

जे मेलं ते पुन्हा परतणार आहे का ?
कि नव्या बंदोबस्तासाठी पुन्हा सर्व मेलं पाहिजे ?

१२

मी अपमान स्वच्छ धुवून स्पॅममध्ये टाकलेत

इन्स्टंट अमानुषतेचं करायचं काय ?

लोकशाही लोकशाहीत मिसिंग आहे
आणि तिची लिंक सापडत नाहीये

प्रत्येकजण किंमती आहे
ह्याचा अर्थ प्रत्येकजण किंमत देऊन खरेदी केला जाऊ शकतो असा आहे

राष्ट्र मार्केटनं रिप्लेस केलंय
आणि आपण सर्वच ह्या राष्ट्रीय मार्केटचे शेअर होल्डर आहोत

संचालकांच्यावर आपली सत्ता नाहीये

ह्यापुढे आरोग्य कायमच कॅन्सरशी बोलत राहणार

सत्ता आपल्या आयुष्याची टाइमलाईन आहे

मी तिला फेसबुकवर ठेऊन
स्वतःच्या स्वायत्ततेत परततोय

श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सीरीजमधील  आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )




Friday, October 18, 2019

विलाप : श्रीधर तिळवे नाईक

वाघापुढं गर्जना करणारे लोक
कमळापुढं नांग्या टाकणारे लोक बनत चाललेत काय ?

वाघाचा पंजा ज्यांचा खांदा होता
राजकारणाची  जादू ज्यांच्यात जिवंत होती
ते लोक
परत न येणाऱ्या परतीच्या प्रवासाकडे चाललेत कि काय ?

छोट्या छोट्या डुलक्या सेल्फी म्हणून कुणी सादर केल्या ?
माझा भगवा संन्यासी कुडता अचानक असा राजकारणाला कुणी टांगला ?

सुरकुत्या पडलेली कोडी अशी अश्रू का ढाळतायत  ?

शेवट दिसल्यासारखे लोक काय पाहतायत ?

करोडो लाईट इयर्स दूर असणारी गॅलेक्सी दाखवून
हिंद महासागरात  पोहणारा  देवमासा कुणी जाळ्यात ओढला ?

माझ्या पायावर फक्त बुटाचं पॉलीश आहे
आणि बूट गायब आहे

पोलीस म्हणतायत जोवर पाय गायब होत नाही
तोवर आम्ही कम्प्लेंट घेऊ शकत नाही

मातीला मळ म्हणणारे लोक
निर्मला वॉशिंग पावडर विकतायत

खिडकीतून फक्त पावसाळा दिसतोय
किंवा इलेक्शनचा गाजावाजा

माझे आयुष्य एव्हढे पॉलिटिकल कुणी केलं ?

मेमरी कार्ड मागं पुढं होतंय

पिवळीधमक  गरमी  उताणी हवेतल्या हवेत
आणि अचानक पाऊस

हे हवामान आहे कि
आभाळाची डिसेंट्री ?

गरजेच्या शेवटच्या टोकावर करमणुकीचा दि एन्ड ?
कि तिथेही नवीन टायटल सॉंग ?

कल्पनाशक्ती घरंगळली कि भगवी दिसते आजकाल
वास्तववाद लालऐवजी निळा

उद्या निषेध म्हणून सूर्य काळा उगवला तर
काय क्काय नेमकं उजेडात दिसेल ?

मरायला टेकलो तरी माझं  वेटिंग लिस्टमध्ये असणं
संपता संपत नाहीये

अरेबियन गालिच्यावरचे समुद्र गुलाबातल्या गुलाबात सुकलेत

ह्या परिस्थितीत माझे खांदे उडवून
मी चलते बनो म्हणू शकत नाही

एकतर लाईक करा
किंवा शेअर करा
असे दोनच पर्याय दिले जाणार असतील
तर डेमोक्रसीचं फेसबुक गागात घालायचं आहे ?

मी स्वतःच्या हुक्कीप्रमाणं जगलो
आणि स्वतःतून पक्षी उडवले

आता पक्ष्यांना घरटी बांधायला ठेवलेली झाडेच
रातोरात कापली जाणार असतील तर
व्हायब्रेट होणाऱ्या जंगलांना घेऊन जायचं कुठं ?

दुःख आणि प्रेम ह्यांच्यापासून  माणसं बनायची
ती उगवायची  आणि मावळायची
त्यांच्या अश्रूंनाही सुगंध होता

आणि आता मी पाहतोय
तर माझा विलापही प्लास्टीकचा बनत चाललेला

झाडांच्या सावलीत ज्यांना जगायचंय
अशा माणसांनी जावं कुठं  ?

श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

वाघाला माहीत नाही
कमळ शाखाहारी कि मांसाहारी

त्यानं फक्त डोळ्यादेखत
कमळाला जंगलाएव्हढं होताना पाहिलंय

कमळात किती भुंगे आहेत
ते वाघाला खाण्याइतके शक्तिशाली आहेत कि नाही
वाघाला अंदाज येत नाही

वाघाच्या बापाला कसं सर्व सोपं होतं
बाप उजव्या पंजात कमळ घ्यायचा
आणि डाव्या नाकपुडीने हुंगायचा

कमळ कधी पंजातून  निसटत गेलं
बापालाही कळलं नाही
आणि मग पोराच्या डोळ्यादेखत ते जंगलांएवढं झालं

कमळाच्या पाकळ्या व वाघांची नखं
ह्यांच्यातील स्पर्धा
शेवटी संख्येच्या जीवावर कमळाने जिंकली

शेकडो बोटांचा हात कमळाच्या पाकळ्या उखडून उखडून थकला
पण लोटस टस कि मस न होता
घडाळ्याच्या गजर ऐकत -वाढत

कमळाभवतीचा चिखलही इतका सुगंधी झाला कि
बनवणाऱ्यांनी त्याच्यापासून उदबत्त्या आणि परफ्युम बनवले काहींनी डिओही

वाघाला चिखलाची ऍलर्जी
म्हणूनच वाघ कमळाचा भुंगा व्हायला तयार नाही

मात्र कमळासोबत असला कि
तो जंगलाचा राजा असतो
आणि राजा असण्याचं फिलिंग वाघाला आवडतं

जंगलभर कमळाची आणि वाघाची ही युती
कधी आश्चर्याने तर कधी उद्वेगाने पाहिली जातिये

दोघांचा रंग भगवा आहे एव्हढा एकच  फॅक्टर
त्यांना बांधून ठेवतो

बाकी डोळे काळीज मेंदू पाय हात नाक पाकळ्या देठ
सगळं काही वेगळं आहे

कमळाला का ते माहीत नाही
पण वाघ भुंग्यासारखा दिसतो

त्याला खात्री आहे
एके रात्री हा वाघासारखा दिसणारा भुंगा
आपल्या मोहात पडेल
आणि कायमचा आत येईल

म्हणूनच कमळाचा दरवाजा वाघासाठी सदैव उघडा असतो

आणि वाघ कायमस्वरूपी
पाकळ्यांच्या  खिडक्यांत पंजा सरकवत
सेफ डिस्टन्सवरून भगवा शेकहॅण्ड करत
पॉलिटिकली करेक्ट !

श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरींजमधील आजच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

Saturday, August 17, 2019

माझ्या डाव्या पायाच्या उखडल्या गेलेल्या नखा



मी कधीपासून तुला पाहतोय
आठवणी साठत न्हवत्या तेव्हापासून कदाचित

तू पृथ्वी गोळा करत रांगायला लागल्यापासून कदाचित
कदाचित वसंताचे स्वातंत्र्यदिन साजरे करायला शिकलो तेव्हापासून
कदाचित गर्भाशयात अंधारातही बागा चार्ज करायला शिकलो तेव्हापासून कदाचित
आईने दिलेल्या पाठीला टेकून बसलो तेव्हापासून कदाचित

मला आठवतही नाही तेव्हापासून मी तुला माझ्या डाव्या पायावर पाहतोय
आणि आता तू पाण्याने उखडून टाकल्यावर मलूल होऊन पडल्यावर
मी तुला पाहतोय

नरकांच्या ब्रा आणि स्वर्गाच्या पॅंटी घालून संपल्यावर
बाईला जे वाटेल
तसे काहीतरी मला वाटते आहे

तुझे नागवेपण मला चिरडून टाकते आहे



माझे सुंदर निमुळते पाय
हा एकमेव सुंदर अवयव होता माझ्याकडे

" तुझे पाय असे बायकांच्यासारखे सुंदर कसे "

"कारण मी पोटेन्शियल अर्धनारीनरेश्वर आहे "

बायकांशी होणारा माझा हा टिपिकल डायलॉग
आता सॉक्रेटिसच्या संवादासारखा फक्त ऐतिहासिक आणि मेलेला होऊन जाणार आहे



पाणी माझ्या पायांवर चालून येईल असं कुठं वाटलं होतं ?

रस्त्यावर पाणी नाही
आणि जमिनीतून उगवलेल्या पाण्याचा घरात महापूर
अशी ही अभूतपूर्व स्थिती

पाणी रानटी बनले कि उगवणारी
माणूस शहरी होऊन बेफिकीर झाला कि त्याला झोपेतून हलवणारी

फरश्यांचं मांस खात पाणी जनावरासारखं उगवतं
तेव्हा काय करायचं ?
क्युसेक क्युसेक्स कर रहा हैं ?
हे कळेनासं झाल्यावर काय करायचं ?

माणसाला भूक लागते
आणि माणूस जगायला झक मारत घराबाहेर पडतो

बाहेर महापूर असो वा दुष्काळ
भुकेला अन्न शोधण्याखेरीज पर्याय नसतो



अजितचं ऑफिस व्हीनस कॉर्नरला पाण्यात
तिळवे भांडार त्यामुळे ठप्प

शब्दांचा आशय मरून गेलाय
आणि फक्त आवाज उरलाय

अहंकाराची धूळ करत पाणी सर्वत्र

" तुझ्या संभाजी नगरच्या घरातून पाणी घेऊन जाऊ का
फक्त तुमच्याच एरियात  पाणी आहे  "
" जा "

कोल्हापुरातला माझा एरिया अख्ख्या कोल्हापूरला
पिण्याचं पाणी पुरवतोय
आणि इथे मुंबईत मी पाणीदार होत
जमिनीतून उगवलेला महापूर डोळयात रिपीट करतोय



" दादा आमदार  सुदिन ढवळीकर
आपल्या घराला आपदग्रस्त घर म्हणून भेट देणार आहेत काय बोलू ? "

भूषण विचारतोय

काय बोलायचं असतं ?

मतदारांनी आमदारांशी काय बोलायचं असतं ?

" डोंगरातल्या खाचा बुजवल्या त्यामुळे डोंगरावर पाणी न साठता न झिरपता
थेट आमच्या घरावर आदळते
आणि झाडांची मूळं जीर्णशीर्ण करत त्यांना हलवते
परिणामी जी वादळं झाडांना हलवूही शकत न्हवती
ती आता झाडांना उखडायला बघतात
तेव्हा डोंगरातील खाचा पुन्हा निर्माण करा "

आमदार डोंगरातील खाचा पुन्हा निर्माण करणार आहेत का ?
आमदार डोंगरावरील झाडांची हत्या थांबवू शकणार आहेत का ?

काही वर्षांनी डोंगर बोडका होईल
आणि त्याचे टक्कल घरांच्यावर पाणी घेऊन चालून येईल

मतदारांनी आमदारांशी काय बोलायचं असतं ?



आपदग्रस्त असणे म्हणजे काय ?

मदतीचा हा अर्ज
न्हवे हा अर्ज
न्हवे न्हवे न्हवे तो अर्ज

वाहिनी अर्ज भरतायत

आपदग्रस्त म्हणजे फक्त अर्ज भरणे ?



आमदार कायमच मतदारांशी संबंध साधून आहेत
त्यांनी गावातील जवळ जवळ प्रत्येकाला आस्थेवाईकपणे मदत केलेली आहे

पण आमदार झाडांना नद्यांना आणि डोंगरांना मदत करणार आहेत का ?



भूषण आमदारांच्या भेटीने समाधानी आहे
आणि मला भूक लागलेली आहे

मी बिननावाच्या जिन्यावरून
बिननावाच्या पायऱ्यांवरून
बिननावाच्या पाण्यात शिरतोय

पाण्याने पाय गिळलेत
आणि मला चालत जायचंय

तू पाण्यात पोहतंयस
जणू पूर म्हणजे पावसाळ्याने तयार केलेला स्विमिंग पूल



लोक महापुरात बसून
महापुराचे व्हिडीओ फोटो काढतायत

लोक महापूर बघायला जाऊन
महापुरापुढे सेफ राहून सेल्फी काढतायत

लोक महापूरातील लोकांना व्हिडीओ फोटो काढत
काळजापासून मदत करतायत

लोक फोटो व्हिडीओ फाट्यावर मारून
फक्त करुणेने महापूरग्रस्तांना मदत करतायत

१०

घरातून उगवलेले पाणी
रस्त्यावर न उगवल्याने
आमचे पाणी
खाजगी ठरलंय

आम्ही आमचे खाजगी पाणी
सार्वजनिक रस्त्यावर फेकतोय

सुदैवाने हा गुन्हा नाही

११

मीडियाचा महापूर महापुराचा मीडिया
मालूम नही कहाँ गई उडकर सोनेकी चिडियाँ

१२

तू पायांसोबत भीजत चाललयस
आणि मला माहीत माझी नखांची सर
पाण्याकडून असरग्रस्त होतीये

१३

पाण्याने गोवा कोल्हापूर मुंबई एकत्र बांधलेत
आणि तिन्ही ठिकाणी आभाळ
मूळ धरत नाहीये

१४

तुझ्यात पाणी काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहितंय
आणि मी कवी असूनही मला ते कळत नाही

१५

पाण्यापासून होणारी इन्फेक्शन्स

सकाळी इनोसन्ट असणारं पाणी
रात्री खून करू शकतं

तू माझ्या अंगठ्याचा सितारा आहेस
टाचलेला
आणि पाणी तुला सैल करतंय

१६

तुझ्या मुळाशीही मॅट्रिक्स असतं
आणि त्यांना सावली असते

तुझ्या खोडावरही  बेडअसते
ज्याच्याविषयी मी फक्त कल्पना करू शकतो

तुझ्या क्युटिकलवरच पाण्याचा हल्ला झालाय 
आणि तुझ्या प्लेट पाण्याला बळी पडून
स्वतःला घडी घालतायत

१७

तू अंगठ्याचे शिंग आहेस
आणि तरीही तुला लोक ढक्कन समजतात

गेंडागिरी ही अशी आमच्या नसानसांत भिनलेली

१८

प्लेट अलग होतीये
जणू पृथ्वीचा एक खण्ड अलग होतोय

नख माझ्या डोळ्यात तरंगतंय

माझा विश्वास बसत नाहीये

सर्व काही सोडून नख ?

डाव्या अंगठ्याचे एकुलते एक नख ?

१९

मी मेलो तरी बोलत राहीन पासून
मला प्रगाढ शांततेत मरायचं आहे पर्यंतचा माझा प्रवास

मी म्हणायचो
माझ्या फक्त बोटांना अपघात व्हायचा बाकी आहे
बाकी सर्व अवयवांचा नम्बर लागून झालेला आहे

मग एकदिवस बोटं फॅनमध्ये घुसली
आणि मला वाटलं हा पूर्णविराम आहे

आता कळतंय
मी नखांना विसरलो
आणि त्यांच्यातील एक तुलाही

२०

प्रश्न फक्त ऍनाटॉमी खराब होण्याचा नसतो
प्रश्न सौंदर्याचाही असतो

ठेच लागली तेव्हाच ते धोक्यात आलं होतं
डॉक्टर म्हणाले
काही काळजी करू नका
रक्त गोठलय
हळूहळू निवळेल

२१

मी तुझं लालशुभ्र शव पाहतोय

तू पुन्हा कधीच परतणार नाहीस
हे मी जाणतो

उखडल्या गेलेल्या आणि  गळून गेलेल्या गोष्टी
माझ्या आयुष्यात कधीच परतल्या नाहीत

२२

नखांची सर
तू गेल्यावर मला जास्त कळती आहे

जगात काहीच क्षुद्र नसते
हा धडा देऊन
तुझे शव माझ्यापुढे चुपचाप आहे

मी तुला कचरापेटीत फेकू
कि मॉन्युमेंट म्हणून तुला डबीत ठेऊ ?

२३

नशीब कि पाण्यानं द्रोणाचार्यासारखा अंगठा मागितला नाही
फक्त नख मागितलं


श्रीधर तिळवे नाईक

Tuesday, August 6, 2019

पावसाळा २०१९



मी पाण्याशी कधीच डील करत नाही

मी फक्त तरंगतो

कधी लाटांवर
कधी वाऱ्यावर

नाममुद्रा उमटवणारी टांकसाळ माझ्यातून गायब झालीये

चलन रद्द करून
मी फक्त हालचालीत जिवंत आहे

तुझा श्वासोश्वास चालू आहे

आणि घर गळतंय



छप्पर डम्ब करून माणसाने जावे कोठे ?

मी नाकाचा स्ट्रा करून पाणीबंद आवाजात
हवा घेतोय

मुंबईत पावसाळा एकीकडे गरम करतो
दुसरीकडे गार

माझे रात्रीचे जागणे आता सवयीचं झालंय

बादल्या भरून ओतण्याचा प्रोग्राम
मी एन्जॉय करत पार पाडतोय



मला वाटलं तू फक्त अस्मानी  घेऊन आलायस
आणि कोल्हापुरात तिळवे भांडारवर सुलतानी  कोसळतीये

दगडी चेहरे भिंती खातायत

फरश्यांचा फ्रीडम स्ट्रगल चालू आहे

शटर डाऊन डाऊन चा घोष

जगात तुम्ही प्रॉपर्टीशिवाय काय सोडता ?

ह्या पृथ्वीवर फक्त पंचमहाभूतं अमर आहेत

सद्या जमीन भांडण पेटवतीये आग भांडण पेटवतीये त्वचा भांडण पेटवतीये
अलीकडे पाणी आणि भविष्यात श्वास

माणूसवाढ घश्यात दाढ

बिल्डर निघून गेलाय
आणि मी पाण्याच्या ग्लासमध्ये
बुडलेल्या बापाला बाहेर काढतोय



मला आता ह्या गेममधे मजा येतीये

आयुष्याची लीला पाण्यातून वाहत असेल
तर पोहणाऱ्याने स्विमिंग कॉस्च्युम काढून ठेवावा हे बरं

जिथे अभाव असतो
तिथे सत्य उमलते

विषुववृत्त विषवृत्त बनले तरी
माझा गळा अमृताचा आहे

लाटांचा ढीग बनवता येत नाही
म्हणून पाणी फक्त साठतं

तुझा पावलांचा आवाज कधी शिड्या चढत येतो
कधी उड्या मारत

आई झोपलीये
भूषण झोपलाय
वहिनी झोपलीये

आणि तू एखाद्या सुरीसारखा
दोन काटकोन त्रिकोणात
झाड कापतोयस

झाडानं माझ्या घरात उन्मळून जावं हे बरं न्हवे
आणि फक्त फांद्या तोडून
अख्खा गावाची वीज घालवण्याचा प्रोग्राम
आधीच पार पडलेला

तू काहीतरी झाडाबाबत काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहतोयस
आणि तुझ्या क्रिएटिव्हिटीविषयी पूर्ण अंधारात असलेले माझे लोक
झोपेच्या अंधारात अरण्य ऐकतायत



कडाक

झाड खोडात तुटून
थेट छपरांवर

फांद्यांचा पिसारा घेऊन

पाणी कुणाच्याच बापाची परमिशन घेत नाही हे खरं
पण ते झाड असं कर्वतीसारखं सहसा कापत नाही हेही खरं

तिरपा छेद कौलांच्यावरून घरात कौलं मोडत

आईचा गँगरीन झालेला अपंग पाय थरथरतोय
भूषण झोपेतल्या झोपेत दचकलाय

मुंबईत तू गोळ्या झाडत येतोयस
कोल्हापुरात बुलडोझर चालवत
आणि इथे आता कर्वतीसारखा

एकाचवेळी तिन्ही ठिकाणी तू पेंच बनून उपस्थित

माझ्या वर्तमानाचा शर्ट फाटलाय
तुझी ओली प्रेमळ माया थोडी अतिरेकी झालीये

मी भूषणच्या त्वचेवरून रांगत चालतोय
मी अजयच्या टोपीवर सापासारखा डुलतोय

वहिनीचे शेतकरी भाऊ शेतीची सगळी कामं टाकून
बहिणीच्या घरी

रातोरात लाकडं अरेंज करणे
रातोरात कौलं मॅनेज करणं

सगळं गाव सिमेंटची घरं बांधत असतांना
मी ही २१५ वर्षाची कौलारू विरासत अट्टाहासाने टिकवून

मातीच्या भिंतीवरचा भक्कम विश्वास पैलवानासारखा सांभाळत

कुठलाही बुद्ध काळ बरा करू शकत नाही
कुठलाही बुद्ध पाण्याचा तंटा कायमचा सोडवू शकत नाही
कुठलाही बुद्ध काळाचा बदल दुरुस्त करू शकत नाही

तो काळाबाहेर जातो
तो पाण्याबाहेर पोहतो
आणि पावसाळे आनंदाने झेलतो
वा करुणेने पेलतो

स्मृतींची मृगजळे भूषणमध्ये तयार होतायत
आई स्तब्ध

सुरेलची पोस्ट फेसबुकवर
असेच राहिले तर बाजाराचा रस्ता नागेशी नदी म्हणून ओळखला जाईल

बिल्डर विचारतोय
तुमच्यामागे कुठली शक्ती आहे

घरमालक मुंबईत म्हणतायत
सर्व काही पावसाळ्यानंतर

तू हा असा माझ्या चहुबाजुंनी चमकतोयस
आणि मी तुझ्यातल्या विजा आणि पाणी
गळतीखालच्या बादल्यात गोळा करत
स्नानघरात फेकतोय

हा झिम्मा
आणि माझ्या कुंडलिनीची  नागपंचमी

डोक्यावर गंगा अनुभवत

श्रीधर तिळवे नाईक

( निर्वाण सिरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )