Wednesday, June 17, 2020

आत्महत्या

सुशांतची  आत्महत्या माझी आत्महत्या नाही 
तुझी आत्महत्या नाही 
म्हणूनच ती काल्पनिक आहे 
आकलनाची सुरवात इथून होते 

२ 
मेलेला कशाने मेला 
ह्यावर चर्चा करून 
मेलेला परतत नाही 

आपण आपलं आयुष्य जगावं कि नाही 
हा प्रश्न विचारणारा 
मूळात मुक्त आहे का 
कि तो 
समाजाने तयार केलेला 
आर्टिफिशियल इंटीलिजन्स आहे ?
आत्महत्या करतांना 
मी प्रश्न विचारतो 
आणि आत्महत्या थांबतात 

अनेकदा आत्महत्या 
चुकीच्या प्रश्नांच्यामुळे 
निर्माण झालेली असते 


आपण आपल्या आयुष्याची लायकी ठरवतो 
कि ते जगायच्या लायकीचे आहे 
किंवा मरायच्या लायकीचे आहे 
कशाच्या आधारे ?

लायकी आयुष्याचा भाग आहे का ?
कि ती प्रोग्रामड आहे ?


आपण समाजाला नकोसे झालो 
ह्यामागे 
आपण समाजाला हवेसे असायला हवोत 
हे अपआकलन असते 


अनेकदा 
आत्महत्या हा फक्त विचार असतो 
आणि आपण विचाराच्या आहारी जातो 

विचार आयुष्याचा पाया नाही 
साधन आहे 
आणि साधन आपण वापरू तसे वळते 

आत्महत्या 
बुटांच्या मापात बसत नाहीत म्हणून 
पायांना संपवणे असते 

बूट काढ 
पाय मोकळे होतील 
आणि नाचायला लागतील 

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून)
श्रीधर तिळवे नाईक 

No comments:

Post a Comment