Tuesday, March 5, 2019

ट्रॅजिडी श्रीधर तिळवे नाईक

कार्यकर्ते राजकारण लिहीतायत फेसबुकवर
त्यांना नेत्यांवरची निष्ठा प्रकट करायची आहे
आणि ह्या देशात फक्त खोटं बोलूनच
नेत्यावरची निष्ठा दाखवता येते

कुणाला तिकीट हवं आहे
कुणाला संघटनेत पद हवं आहे
तर कुणाला सामूहिक संरक्षण


कार्यकर्ते घाबरलेले आहेत कि
निष्ठा कशी मोजली जाणार आहे
आणि कोण मोजणार आहे

कार्यकर्त्यांना कळत नाहीये
आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे
नेत्याची नजर कशी वळवून घ्यायची

कार्यकर्ते येनकेनप्रकारेण
स्वतःकडे लक्ष्य वेधून घेतायत

कोणी फ्लेक्स लावतायत
कोणी ट्रॉल करतायत

त्यांना बुद्धिमान लोकांशी विचारवंतांशी
काहीही देणंघेणं नाही

त्यांना माहित आहे
निवडणूक तिकिटप्राप्तीसाठी पदप्राप्तीसाठी काम करून घेण्यासाठी
इन्टिलेक्च्युअल्स निकम्मे आहेत

त्यांना राजकारण नीट कळलंय
आणि सत्तेची खार तरी आपल्याकडे वळावी म्हणून
ते कुणालाही राम करायला तयार आहेत
कुणासाठीही हनुमान बनायला तयार आहेत

रामांना माहित आहे कि हे कलियुगाचे रामायण आहे

ते रामाचा अभिनय करतायत

सत्ता हीच एक अभिनय होऊन गेलीये

कुणालाच सत्तेने काय साधायला जन्म घेतलाय
ह्याच्याशी देणंघेणं नाही

सर्वत्र अभिनय ऍक्टिव्हेट आहे
फेसबुक ट्वीटर व्हाट्स अप

चेहरा कुणाकडेच शिल्लक नाही

श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या फाईलमधून )

Thursday, February 28, 2019

मी आऊटडेटेड होण्याची वाट बघतोय
आणि तुम्ही माझ्या अजून तारखांपर्यंत यायलाही तयार नाही

कुठलीही क्रांती फक्त दहा वर्षे ताजी राहायला हवी
पण तुम्ही इतके नतद्रष्ट
अजूनही
१९६० ते १९८० दरम्यानचे मांस चघळत
खाण्याची आणि ढेकर देण्याची बक्षिसं घेता आहात

तुम्ही अजूनही अपेक्षा करता आहात कि
मी १९९० ते २०१० पर्यंतचे सारे मटण
तुम्हाला श्रीखंड म्हणून वाढावे
आणि तुम्ही मुखशुद्धी म्हणून
स्तुती चघळावी

मित्रांनो
डिजिटल जाऊन पोस्टडिजीट्ल आलं तरी
तुम्ही साठोत्तरी पोस्टी टाकत राहणार असाल
तर संगणकावर मोदीच अवतरणार

नुसत्या जुन्या बेंबट्या मारल्या कि पुरोगामी म्हणून
मिरवता येतं ह्या देशात
लोक असे बनेल झालेत
कि स्वतःचं मौनसुद्धा
बाजारात जाऊन ओरडून विकतायत
तुम्ही त्यांच्यातले आहात काय
स्वतःला विचारा

तुमच्या अनास्थेनंच हा अनास्थेशिया उभा केलाय
उद्या मेलेल्यांना डॉक्टर झाल्याची सर्टिफिकेट्स दिली जातील
आणि तुम्ही केवळ बक्षिसासाठी
पेशंट म्हणून ऍडमिट व्हाल

कॅपिटॅलिझम विरुद्ध सोशॅलिझम हा खेळ पुराणा झालाय
आणि धर्म तर आता ग्रीसमध्येही हेलेनिझमच्या नावाने कमबॅक करतोय
सॉक्रेटिस गोट्या चोळायला लागलाय तिथं धर्माच्या
जिथून सायन्सचा हात उगवला होता

हे गुंतागुंतीचं नेटवर्क आहे
जिथे दिलासा फक्त देव देतायत

तेव्हा पुरोगामी पिचकाऱ्यांनी ट्रोलिंगवाली रंगपंचमी खेळायचं बंद करा
जे आहे ते वसंताच्या अफवा आहे
आणि तुम्ही त्यांची नेहमीच्या देशीवादी सवयीनं
मूळं तपासत बसलाय

बसा
पुरोगामी बोटॅनिस्ट म्हणून मान्यता मिळवायला हे उपयोगी पडेल
पण एक दिवस
नसलेलं झाड खाली कोसळून
तुम्ही त्या झाडाखाली
खर्रर्रखुर्रर्र ठार व्हाल

हे भगव्या रंगाचं वादळ नाहीये
हा पांढऱ्या रंगाचा ऐतिहासिक प्रॉब्लेम आहे

तेव्हा ......

श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण चॅनेल सिरीजमधील आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

Sunday, January 20, 2019

मी फेसबुकवर असतो
तेव्हा मी फक्त फेसबुक असतो

मी पोस्ट वाचत असतो
तेव्हा ती पोस्ट असतो

पोस्ट टाकत असतो तेव्हाही
ती टाकली जाणारी पोस्ट असतो

कॉमेंट करताना कॉमेंट असतो
डिलीट मारतांना डिलीट

माझा उत्सव अखंड आहे
आणि तो तुमच्या ब्रेकिंग न्यूजच्या कुवतीबाहेर आहे

तुम्हाला हवं आहे हॅपनिंग
आणि मी बीइंग आहे

तेव्हा न्यूज देत रहा
कॉलम टाकत रहा

लाईक देतांना मी लाईक आहे

श्रीधर तिळवे नाईक 

(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )


अचानक राज्य आलंय नयेंद्रथलाच
जो नाहीसा झालाय यूरेशियातून
आणि उगवलाय पुन्हा दक्षिण आशियात
होमो डेनिसोवन म्हणून

तो होमो सेपियनला हरवणार म्हणतो

तीन हजार वर्षांपूर्वी  त्याने समुद्र पार केला होता
एका छोट्या बेटातून
जमिनीच्या शोधात पाणी पार करत

त्याच्या बोटींना त्यावेळी नक्षत्रं जोडलेली होती
आणि पाणी मिश्यासारखे पिळत
स्वतःचा मायटोकोण्ड्रिया आभाळावर छापत
स्वतःच कपाळ वल्हवत
तो जमिनीवर पोहचला होता

मार्च २०१० मध्ये शास्त्रज्ञांनी त्याच्या बोटांवरून त्याला ओळखले होते
आणि सुरवातीला तो  तीरूपात होता
होमो सेपियनबरोबर त्याने वन नाईट स्टॅन्ड रचला होता काय ?
शास्त्रज्ञ ह्याबाबत कन्फ्युज आहेत

तो कितीतरी आधी होमो सेपियनच्या आईबाबांना
होमो सेपियनच्या आधी भेटला होता
आणि कसलीही हत्या न करता
परतला होता

तो २०१४ पासून सर्वांच्या विचाराधीन आहे
आशिया ते सैबेरिया त्याचाच डंका वाजतो आहे

त्याने होमो सेपियनचे एकुलता एक हे बिरुद
काढून घेतलंय
आणि आपण अधिक प्राचीन आहे
हेही सिद्ध केलंय

कुणालाच माहीत नाही
तो दंतकथा आहे कि सत्य ?






Thursday, January 17, 2019


स्वर्ग आणि नरक 
दोन्हीवर एकाच बिग बॉसची  राजवट आहे 
ह्याची कृपया  सर्वच एकबिगबॉसवादी  बांधवांनी नोंद घ्यावी 

स्वर्ग आणि नरक 
दोन्हीवर अनेक बिग बॉसेसची  राजवट आहे 
ह्याची कृपया सर्वच बहुबिगबॉसवादी बांधवांनी  दखल घ्यावी 

स्वर्गात 
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे 
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे 

स्वर्गात 
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे 

स्वर्गाचे डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे 

स्वर्गाचे मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते 

स्वर्गातल्या सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत 

तेव्हा या 
स्वागतासाठी हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे 

नरकात 
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे 
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे 

नरकात  
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे 

नरकाचे  डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे 

नरकाचे  मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते 

नर्कातल्या  सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत 

तेव्हा या 
नर्कासाठी  हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे 

स्वर्ग आणि नरक ह्या दोहोंत 
फरक फक्त साईनबोर्डसचा आहे 
त्याविषयी काही अडचणी असतील तर एक दाबा 
अडचणी नसतील दोन दाबा 
कितीही वेळा बटन दाबण्याचे अनलिमिटेड स्वातंत्र्य आपणास देण्यात आलेले आहे 
गोंधळलेले असाल तर शून्य दाबत राहा 


(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या कविताफाईलीतून )

Wednesday, September 19, 2018



परस्परविरोधी आजारातील बुडबुडा श्रीधर तिळवे नाईक 

परस्परविरोधी आजार चालून येतायत अंगावर

आणि

ह्यातल्या कुठल्या आजारानं मरायचं

हे ठरवणं मी सोर्सवर सोपवले आहे




डायबेटीस झालेल्या माणसाला

सारे आजार सारखेच



मरणाचं  मला काहीही पडलेलं नाहीये


फक्त वाट पाहणाऱ्या कार्याची

प्रायोरिटी लिस्ट

क्षणोक्षणी माझे प्रश्नक मला दाखवत असतात

त्यांना वाटते केवढा हा पसारा

आणि केवढी मर्यादित खोली



सर्वत्र सोर्स आहे

आणि त्याचा अंगठा

कुठल्या कार्यावर कुणाची मोहर उमटवायची हे ठरवतो

हे त्यांच्या गावी नाही



इतके आजार अंगारवाद्यांवर घेऊन

मी शांतपणे जगतोय

हे त्यांना चमत्कारिक वाटतंय



साधना करत असताना

डोक्यापासून मज्जरज्जुपर्यंत

पायाच्या अंगठ्यापासून हाताच्या बोटापर्यंत

माझी प्रत्येक गोष्ट ताणत गेली

आणि मी आपादमस्तक जखम झालो



माझे प्रश्नक
त्या जखमेपासून तयार झालेल्या जखमेत 
वावरलेल्या कविता 
फेसबुकवर टाकतात
ब्लॉगवर चिपकवतात
आणि वडिलांनी सगळे लिखाण
प्रकाशित करायचे वचन घेतले
ते बरे केले कि वाईट
ह्यावर आपापसात वाद घालतात


काहीही मोबदला घेता

त्यांची चाललेली ही सेवा

आभाळाच्या भरवश्यावर चालते

आणि पावसाच्या तालावर हलते



मला दिसणारे प्लॅशेस 

फक्त मलाच का दिसतात

ह्या प्रश्नांचा त्यांच्यात अस्त झालेला नाही


ते साधनेच्या अंगाने प्रश्न विचारत राहतात

मी उत्तरे देत राहतो



प्रश्नक निघून गेलेत

सूर्य अस्ताला गेलाय

लॅपटॉपमधला खिडकीप्रकाश नाहीसा होतोय



सर्वत्र पाणी आहे

सर्वच पाणी आहे


माझ्या मृत्यूची दंतकथा रचत

बुडबुडा उमलतोय

श्रीधर तिळवे नाईक 
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

========================================================================



Friday, February 16, 2018

इन्फर्मेशन द्यायचं व्यसन लागलेली एक स्त्री
एकामागून एक सेल्फी फोटोविडिओज धाडतीये

एक सेल्फीविडिओ हॉस्टेल डेला कॅटवॉक केल्याचा
एक सेल्फीफोटो ती ज्या लोकेशनवर शूट करणार आहे त्या लोकेशनचा
एक तिच्या कॉस्च्युम डिझायनरच्या नाकावर फुले इम्पोझ केलेला
एक गझल लिहितानाचा काफियाला थांबवून शूट केलेला

तिला माहित आहे
ह्याचा माझ्यावरचा परिणाम शून्य आहे
तिला मी हेही समजावलंय कि
माझ्यात कामवासनेचा अस्त झालाय

तरीही ती सेल्फीज धाडतिये
एकामागून एक एकामागून एक

ती नेमकं  काय चाळवतीये ?
आणि कुणात ?

श्रीधर तिळवे नाईक 

( आत्ताच्या कविता ह्या निर्वाण सिरीजमधील कविताफाईलीतून )

Sunday, January 28, 2018

. shridhar tilvechi kavita

एक केऑस उतरतोय प्रत्येक ट्रेनमधून 
वेगाच्या कैफात 
त्याला आपलं डेस्टिनेशन गाठायचंय 
आणि वेग नियंत्रित करणारं 
कोणतंही कनेक्शन  त्याच्या पोटात नाही 

त्याच्या आत दबा धरून मॅडचॅपपणा 
वाट  पाहतोय 
त्या क्षणाची 
जो त्याला केऑसचे कनेक्शन मिळवून देईल 

गेली कित्येक वर्षे तो कनेक्शनची टेंडर्स भरतोय 
पण पूल ती नाकारत 
केऑसला जिवंत  ठेवतोय 

मॅडचॅपपणाला समजत नाही 
पुलाला रक्तात कसं लोळवावं 
तो फक्त वाट पाहतोय 
सुयोग्य शुटरक्षणाची 

शूटर क्षण येतोय 
एकाचवेळी दोन स्टेंशनवर चार ट्रेनस झटकत 
आणि दोन ट्रेनमधला केऑस 
स्वतःतील गर्दी पीत 
दोन पुलापाशी पोहचतोय 

एक पूल पाण्यात 
एक पूल कोरड्यात 


केऑसमधील गर्दीला पाणी अंगाला लावून घ्यायच नाहीये 
तिला पाणी फक्त प्यायला आवळतं 
अंगाला लावून घ्यायला आवळतं 

पाण्यापुढचा केऑस वळतोय कोरड्या पुलापाशी 
जो रुंद व्हावा म्हणून 
कधीपासून प्रशासनपुढे नमाज पढतोय  

दोन केऑस एक पूल 
मॅडमॅपपणाला कळून चुकलंय कि 
हा त्याचा क्षण आहे 

तो अफवा आणि बातमी पतंगासारखी उडवतोय केऑसमध्ये 
पत्रा कोसळलाय 
केऑस भयात बुडत चाललाय 
आणि नाकात पाणी शिरल्यासारखा 
जीव वाचवण्यासाठी पाळायला लागलाय 

केऑसचा प्रॉब्लेम हाच आहे कि 
केऑमधली लोकसंख्या अफाट आहे  
आणि जीव वाचवायला जावं 
तर मात्रे पुढेही जीव आहेत 

जीवांना मॅडचॅपक्षणाचे वेड लावलंय 
आणि जीव एकमेकाला मारत 
स्वतःला वाचवत-  धडाडतायत 

जे वाचलेत ते मुंबई नावाच्या स्वर्गात आहेत 
जे मेले ते मुंबई नावाच्या नरकात आहेत 

ब्रेकिंग न्यूज मुंबईभर फुटतायत 
चर्चा मुंबईभर फुटतायत 
आणि मॅडचॅपपणा  पुन्हा नव्या शुटरक्षणाची वाट पहात 

केऑसकडे कनेक्शनचे टेंडर टाकतोय