स्वर्ग आणि नरक
दोन्हीवर एकाच बिग बॉसची राजवट आहे
ह्याची कृपया सर्वच एकबिगबॉसवादी बांधवांनी नोंद घ्यावी
स्वर्ग आणि नरक
दोन्हीवर अनेक बिग बॉसेसची राजवट आहे
ह्याची कृपया सर्वच बहुबिगबॉसवादी बांधवांनी दखल घ्यावी
स्वर्गात
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे
स्वर्गात
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे
स्वर्गाचे डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे
स्वर्गाचे मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते
स्वर्गातल्या सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत
तेव्हा या
स्वागतासाठी हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे
नरकात
सर्वांसाठी जिओ मोबाईलची व्यवस्था आहे
जिथे डेटा फ्री आहे कॉल फ्री आहेत अपलोड डाउनलोड फ्री आहे
नरकात
बिग बॉसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इंटेलवर सोपवण्यात आली असून इन्फोसिसला आऊटसोर्सिंग देण्याचे मान्य करण्यात आले आहे
नरकाचे डिझाईन पूर्णपणे अँपलने तयार केले आहे आणि भारतीय सोडून इतर सर्व देशातील कॉन्ट्रॅक्टरवर बांधकामाची जबाबदारी टाकली आहे
नरकाचे मार्केटिंग मायक्रोसॉफ्ट करते तर आयबीम सपोर्ट पुरवते
नर्कातल्या सर्व किंमती गेटवे ठरवत असून घासाघीस सांभाळण्यासाठी चार भारतीय बायका ऑन स्पेशल ड्युटी नेमलेल्या आहेत
तेव्हा या
नर्कासाठी हॉलिवूड बॉलिवूड सज्ज आहे
स्वर्ग आणि नरक ह्या दोहोंत
फरक फक्त साईनबोर्डसचा आहे
त्याविषयी काही अडचणी असतील तर एक दाबा
अडचणी नसतील दोन दाबा
कितीही वेळा बटन दाबण्याचे अनलिमिटेड स्वातंत्र्य आपणास देण्यात आलेले आहे
गोंधळलेले असाल तर शून्य दाबत राहा
(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या कविताफाईलीतून )
No comments:
Post a Comment