Wednesday, April 17, 2019

हिंदवी महासागराकडून पराभूत होऊन
थेम्ब थेम्ब झालेला ओढा
हिंदवी त्सुनामीला आव्हान देत सळो कि पोळो करून सोडतोय
त्याला आपला मुख्य शत्रू प्रथम छिन्नविछिन्न करायचाय

अरबी आणि पॅसिफिकला ओढा वापरून घ्यायचा आहे
आणि ओढा पॅसिफिकला आणि अरबी समुद्राला नीट ओळखून आहे
आपण ह्या समुद्रांना नीट आव्हान दिलं तर
आपलीही महानदी होईल
ह्याचा त्याला अंदाज आहे

अरबी समुद्र थकलेल्या अरबासारखा दिसतोय
आपण पॅसिफिकपेक्षा फार वेगळे नाही आहोत
ह्याची त्याला नीट कल्पना आहे
तरीही तो पॅसिफिकमध्ये डिझॉल्व होत नाहीये

पॅसिफिक आपल्याला मुख्य समुद्र  म्हणून मान्यता देणार नाही
ह्याची त्याला नीट कल्पना आहे

बोटींना कळत नाहीये
हिंदवी आणि पॅसिफिक ह्यांच्यात फक्त नावाचा फरक आहे
कि पाणीही नावामुळे स्वरूप बदलते आहे ?

बंगालचा उपसागर स्वतःचा बर्फाळ नांगर टाकून
पाणी उपसतो आहे
त्याला आपण ओढा आहे कि नदी आहोत
हे कळेनासं झालंय
तो ते अजमावण्यासाठी स्पर्धेत उतरलाय

पाणी पाण्याशी स्पर्धा करतंय
आणि पाण्याला कळत नाही
ही स्पर्धा लादली गेलीये
कि आपण निवडलीये ?

पाण्याला माहितीये कि
सगळे महासागर सागर नद्या आणि ओढे
आपली निर्मिती आहे

ते त्या निर्मितीत स्वतःला पाहतंय

पाण्याला स्वतःला पाहण्याचा प्रचंड शौक आहे

पाणी फक्त स्वतःच्या अस्तित्वाला
ह्या आरश्यांच्यात पहात स्वतःच सौंदर्य कन्फर्म करतंय

बाकी पाण्याला माहित आहे
मान्सून आपणालाच धाडायचा आहे
आणि शेती आपल्यालाच करायचीये

पाणी शीळ घालत ढग उडवतय

==============================================

श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सीरीजमधील  आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून )

No comments:

Post a Comment